पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
Posted On:
26 OCT 2025 11:43AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2025
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार, 'मन की बात' मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण देशात सध्या उत्सवांचा जल्लोष भरून राहिला आहे. काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली आणि आता मोठ्या संख्येनं लोक छठ पूजा करण्यात व्यग्र आहेत. घरांमध्ये ठेकुआ बनवले जात आहेत. ठिकठिकाणी घाट सजवले जात आहेत. बाजारपेठा फुलल्या आहेत. सगळीकडे भक्ती, आत्मीयता आणि परंपरा यांचा संगम दिसून येत आहे. छठचं व्रत करणाऱ्या महिला ज्या समर्पणानं आणि भक्तीनं या सणाची तयारी करतात ते खरोखरच प्रेरणादायी आहे.
मित्रांनो,
छठचा हा महान सण संस्कृती, निसर्ग आणि समाज यांच्यातल्या सखोल एकतेचं प्रतिबिंब आहे. समाजातला प्रत्येक घटक छठ घाटांवर एकत्रितपणे उभा आहे. हे दृश्य भारताच्या सामाजिक एकतेचं सर्वात सुंदर उदाहरण आहे. तुम्ही देशात किंवा जगात कुठेही असलात तरी संधी मिळाल्यास छठ उत्सवात नक्की सहभागी व्हा. हा अनोखा अनुभव स्वतः अनुभवा. मी छठी मैयाला नमन करतो. माझ्या सर्व देशबांधवांना, विशेषतः बिहार, झारखंड आणि पूर्वांचलमधल्या लोकांना छठ सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
सणांच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना एक पत्र लिहून माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. पत्रात मी देशाच्या अशा कामगिरीबद्दल बोललो आहे, ज्यामुळे उत्सवांचा आनंद पूर्वीपेक्षा अधिक झाला आहे. माझ्या पत्राला उत्तर म्हणून देशातल्या अनेक नागरिकांनी मला संदेश पाठवले आहेत. खरोखरच, 'ऑपरेशन सिंदूर' नं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भारून टाकलं आहे. ज्या भागात एकेकाळी माओवादी दहशतीचा अंधार होता तिथेही यावेळी आनंदाचे दिवे पेटले होते. लोकांना आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात आणणाऱ्या माओवादी दहशतीचे समूळ उच्चाटन करायचं आहे.
जीएसटी बचत महोत्सवामुळेही लोकांमध्ये खूप उत्साह आहे. यावेळी सणांमध्ये आणखी एक सुखद बाब दिसून आली. बाजारपेठेत स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढली आहे. लोकांनी मला पाठवलेल्या संदेशांमध्ये त्यांनी यावेळी कोणकोणती स्वदेशी उत्पादनं खरेदी केली आहेत ते सांगितलं आहे.
मित्रांनो,
माझ्या पत्रात मी खाद्यतेलाच्या वापरात 10 टक्के कपात करण्याची विनंती देखील केली होती, यावरही लोकांनी खूप सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे.
मित्रांनो, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या प्रयत्नांबद्दल मला खूप सारे संदेश मिळाले आहेत. मी तुम्हाला देशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या अशा कथा सांगू इच्छितो ज्या खूप प्रेरणादायी आहेत. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये, शहरातील प्लास्टिक कचरा साफ करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अंबिकापूरमध्ये कचरा कॅफे चालवले जात आहेत. हे असे कॅफे आहेत जिथे प्लास्टिक कचरा दिल्यावर भरपेट जेवण दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीने एक किलो प्लास्टिक आणून दिलं तर त्याला दुपारचं किंवा रात्रीचं जेवण मिळतं आणि जर कोणी अर्धा किलो प्लास्टिक दिले तर त्याला अल्पोपहार मिळतो. हे कॅफे अंबिकापूर महानगरपालिकेतर्फे चालवले जातात.
मित्रांनो,
असाच एक पराक्रम बेंगळुरूमधील अभियंता कपिल शर्मा यांनी केला आहे. बेंगळुरूला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि कपिल यांनी इथल्या तलावांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. कपिल यांच्या पथकानं बेंगळुरू आणि आसपासच्या परिसरात 40 विहिरी आणि 6 तलावांचं पुनरुज्जीवन केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मोहिमेत कॉर्पोरेट्स आणि स्थानिक लोकांनाही सहभागी करून घेतलं आहे. त्यांची संस्था वृक्षारोपण मोहिमेशीही संलग्न आहे. मित्रांनो, अंबिकापूर आणि बेंगळुरू ही प्रेरणादायी उदाहरणं असं सांगतात की जर दृढनिश्चय केला तर बदल घडवून आणता येतोच.
मित्रांनो,
बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांचं आणखी एक उदाहरण मी तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. तुम्हा सर्वांना माहीत आहे की ज्याप्रमाणे पर्वतांवर आणि मैदानात जंगलं असतात, ही जंगलं मातीला धरून ठेवतात, तशीच भूमिका खारफुटी समुद्रकिनाऱ्यावर बजावतात. खारफुटी वनस्पती समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आणि दलदलीच्या जमिनीत वाढतात आणि त्या सागरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग असतात. त्सुनामी किंवा चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या वेळी या खारफुटी खूप उपयुक्त ठरतात.
मित्रांनो,
खारफुटीचं महत्त्व ओळखून गुजरातच्या वन विभागानं एक विशेष मोहीम सुरू केली आहे. पाच वर्षांपूर्वी वन विभागाच्या पथकांनी अहमदाबादजवळील धोलेरामध्ये खारफुटीची लागवड सुरू केली होती आणि आज धोलेराच्या किनाऱ्यावर साडेतीन हजार हेक्टरवर खारफुटीची झाडं पसरली आहेत. या खारफुटींचा प्रभाव संपूर्ण प्रदेशात दिसून येतो. तिथल्या परिसंस्थेत डॉल्फिनची संख्या पूर्वीपेक्षा वाढली आहे. खेकडे आणि इतर जलचर प्राणी देखील वाढले आहेत. इतकेच नाही तर स्थलांतरित पक्षी देखील इथे मोठ्या संख्येनं येत आहेत. याचा तिथल्या पर्यावरणावर तर सकारात्मक परिणाम झालाच आहे, परंतु धोलेराच्या मत्स्यपालकांनाही त्याचा फायदा होत आहे.
मित्रांनो,
धोलेरा व्यतिरिक्त गुजरातच्या कच्छमध्येही सध्या खारफुटीची लागवड जोरात सुरू आहे, इथल्या कोरी खाडीत 'खारफुटी प्रशिक्षण केंद्र' देखील स्थापन करण्यात आलं आहे.
मित्रांनो,
हे वनस्पती आणि झाडांचं वैशिष्ट्य आहे. स्थान काहीही असो, ते सर्व सजीवांच्या कल्याणासाठी उपयुक्त असतात. म्हणूनच आपल्या ग्रंथांमध्ये म्हटलं आहे:
धन्या महीरूहा येभ्यो,
निराशां यान्ति नार्थिनः ||
म्हणजेच, धन्य आहेत ती झाडं आणि वनस्पती जी कोणालाही निराश करत नाहीत. आपणही ज्या क्षेत्रात राहतो तिथे झाडं लावली पाहिजेत. आपण ‘एक पेड़ माँ के नाम’ ही मोहीम आणखी पुढे नेली पाहिजे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
'मन की बात' मध्ये आपण ज्या विषयांवर चर्चा करतो त्यामध्ये मला सर्वात जास्त समाधान कशामुळे मिळतं हे तुम्हाला माहीत आहे का? मी तर असं म्हणेन की 'मन की बात' मध्ये आपण ज्या विषयांवर चर्चा करतो त्यामुळे लोकांना समाजासाठी काहीतरी चांगलं, काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. यामुळे आपल्या संस्कृतीचे आणि आपल्या देशाचे अनेक पैलू सामोरे येतात.
मित्रांनो,
तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल की सुमारे पाच वर्षांपूर्वी मी या कार्यक्रमात भारतीय वंशाचे श्वान म्हणजेच कुत्र्यांवर चर्चा केली होती. मी देशवासीयांना आणि आपल्या सुरक्षा दलांना भारतीय जातीचे कुत्रे पाळण्याचं आवाहन केलं होतं, कारण ते आपल्या वातावरण आणि परिस्थितीशी अधिक सहजपणे जुळवून घेतात. मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की आपल्या सुरक्षा दलांनी या दिशेनं प्रशंसनीय प्रयत्न केले आहेत. सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने आपल्या पथकांमध्ये भारतीय वंशाच्या कुत्र्यांची संख्या वाढवली आहे. कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाचं राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र ग्वाल्हेरच्या टेकनपूर इथे आहे. इथे उत्तर प्रदेशातले रामपूर हाउंड तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या मुधोळ हाउंड जातींवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे. या केंद्रातले प्रशिक्षक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेच्या मदतीनं कुत्र्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देत आहेत. भारतीय जातीच्या कुत्र्यांसाठीची प्रशिक्षण नियमावली पुन्हा लिहिण्यात आली आहे जेणेकरून त्यांचं अद्वितीय सामर्थ्य उजेडात येईल. मोंग्रेल्स, मुधोळ हाउंड, कोम्बाई आणि पांडिकोना यासारख्या भारतीय कुत्र्यांना बेंगळुरूमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या डॉग ब्रीडिंग अँड ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे.
मित्रांनो,
गेल्या वर्षी लखनौमध्ये अखिल भारतीय पोलीस ड्युटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिया नावाच्या एका श्वानाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती सीमा सुरक्षा दलाने प्रशिक्षित केलेली मुधोळ हाउंड आहे. रियानं अनेक परदेशी जातींना मागे टाकत पहिलं पारितोषिक जिंकलं होतं.
मित्रांनो,
आता सीमा सुरक्षा दलाने आपल्या कुत्र्यांना परदेशी नावांऐवजी भारतीय नावं देण्याची परंपरा सुरू केली आहे. आपल्या स्थानिक कुत्र्यांनीही अद्भुत धाडस दाखवलं आहे. गेल्या वर्षी छत्तीसगडच्या माओवादग्रस्त भागात गस्त घालत असताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका स्थानिक कुत्र्यानं 8 किलो स्फोटकं शोधून काढली होती. या दिशेनं केलेल्या प्रयत्नांबद्दल मी सीमा सुरक्षा दलाचं आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचं अभिनंदन करतो. तसं पाहता, मी 31 ऑक्टोबरची प्रतीक्षा करत आहे. हा लोहपुरुष सरदार पटेल यांचा जयंतीदिन आहे. यानिमित्तानं गुजरातमधील एकता नगर इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ दरवर्षी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. इथे एकता दिन परेड देखील आयोजित केली जाते आणि या परेडमध्ये भारतीय कुत्र्यांची ताकद पुन्हा प्रदर्शित केली जाईल. तुम्हीही एक संधी साधून ती जरूर पाहावी.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
सरदार पटेल यांची 150 वी जयंती म्हणजे संपूर्ण देशासाठी एक अतिशय खास प्रसंग आहे. सरदार पटेल हे आधुनिक काळातले राष्ट्राच्या महान व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वात अनेक गुण सामावले होते. ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांनी भारत आणि ब्रिटन, दोन्ही ठिकाणी अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी केली होती. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी वकिलांपैकी एक होते. ते वकिलीमध्ये आणखी नाव मिळवू शकले असते, परंतु गांधीजींपासून प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. खेडा सत्याग्रहापासून बोरसद सत्याग्रहापर्यंतच्या अनेक चळवळींमधलं त्यांचं योगदान आजही स्मरणात आहे. अहमदाबाद नगरपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ देखील ऐतिहासिक होता. त्यांनी स्वच्छता आणि सुशासनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण त्यांचे नेहमीच ऋणी राहू.
मित्रांनो,
सरदार पटेल यांनी भारताच्या नोकरशाही चौकटीचा एक मजबूत पायाही रचला. त्यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी अतुलनीय प्रयत्न केले. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की 31 ऑक्टोबर रोजी सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या 'रन फॉर युनिटी'मध्ये नक्कीच सहभागी व्हा - आणि एकटे नाही तर सर्वांना सोबत घेऊन जा. एक प्रकारे ही युवकांच्या जागरूकतेची एक घटना झाली पाहिजे. रन फॉर युनिटी ऐक्य मजबूत करेल. भारताला एकतेच्या धाग्यात बांधणाऱ्या त्या महान व्यक्तिमत्त्वासाठी हीच आपली खरीखुरी भावांजली असेल!
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
तुम्हाला सर्वांना चहाशी असलेलं माझं नातं माहीत आहेच, पण आज मी विचार केला की 'मन की बात' मध्ये कॉफीवर चर्चा का करू नये? तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी आपण 'मन की बात' मध्ये अराकू कॉफीवर चर्चा केली होती. काही काळापूर्वी ओडिशातील अनेक लोकांनी माझ्यासोबत कोरापुट कॉफीबद्दलच्या त्यांच्या भावना सामायिक केल्या होत्या. त्यांनी मला पत्र लिहून 'मन की बात' मध्ये कोरापुट कॉफीवर चर्चा करण्याची विनंती केली होती.
मित्रांनो,
मला सांगण्यात आलं आहे की कोरापुट कॉफीची चव अद्भुत आहे, आणि इतकंच नाही तर कॉफीची लागवडही लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे. कोरापुटमध्ये असे काही लोक आहेत जे एका ध्यासापोटी कॉफीची लागवड करतात. त्यांना कॉर्पोरेट जगात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या होत्या, परंतु त्यांना कॉफीची इतकी आवड होती की त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि आता ते यशस्वीरित्या काम करत आहेत. अशा अनेक महिला आहेत ज्यांचं जीवन कॉफीमुळे बदललं आहे. कॉफीनं त्यांना आदर आणि समृद्धी, दोन्ही दिली आहे. हे अगदी उचित म्हटलं आहे:
कोरापुट कॉफी अत्यंत सुस्वादु |
एहा ओडिशार गौरव |
(मराठी भाषांतर: कोरापुट कॉफी खरोखरच स्वादिष्ट आहे ! ही सर्वार्थाने ओडिशासाठी अभिमानास्पद बाब आहे!)
मित्रांनो,
भारतीय कॉफी जगभरात लोकप्रिय होत आहे. कर्नाटकातील चिकमंगळूर, कुर्ग आणि हासन असो, तमिळनाडूतील पुलनी, शेवरॉय, निलगिरी आणि अन्नामलाई प्रदेश असो, कर्नाटक-तमिळनाडू सीमेवरील बिलीगिरी प्रदेश असो किंवा केरळमधील वायनाड, त्रावणकोर आणि मलाबार प्रदेश असोत - भारताच्या कॉफीचं वैविध्य लगेच दिसून येतं.
मला सांगण्यात आलं आहे की आपला ईशान्येकडचा प्रदेश देखील कॉफी लागवडीत प्रगती करत आहे. यामुळे भारतीय कॉफीची जागतिक ओळख आणखी मजबूत होत आहे - म्हणूनच कॉफी प्रेमी म्हणतात:
भारताची कॉफी ही सर्वोत्तम कॉफी आहे.
ती भारतात तयार होते आणि जगभरात प्रिय ठरली आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता 'मन की बात' मध्ये आपण अशा विषयावर बोलू जो आपल्या सर्वांच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. हा विषय आहे आपल्या राष्ट्रगानाचा- भारताचं राष्ट्रगान म्हणजे 'वंदे मातरम्'. एक असं गीत ज्याचा पहिलाच शब्द आपल्या हृदयात भावनांचं उधाण आणतो. 'वंदे मातरम्' या एका शब्दात खूप भावना सामावलेल्या आहेत, खूप ऊर्जा आहे. हे आपल्याला भारतमातेच्या वात्सल्याची सहज भावानं अनुभूति देतं. हे आपल्याला भारतमातेचे पुत्र म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतं. जर कठीण काळ असेल तर 'वंदे मातरम्' चा उद्घोष 140 कोटी भारतीयांना ऐक्याच्या ऊर्जेनं भारून टाकतो.
मित्रांनो,
जर देशभक्ती, भारतमातेवरील प्रेम ही शब्दांच्या पलीकडली भावना असेल, तर 'वंदे मातरम्' हे गीत त्या अमूर्त भावनेला ठोस आवाज देणारं आहे. शतकानुशतकांच्या गुलामगिरीमुळे कमकुवत झालेल्या भारतात नवीन प्राण फुंकण्यासाठी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ते रचलं होतं. 'वंदे मातरम्' हे गीत जरी 19 व्या शतकात लिहिलं गेलं असेल, परंतु त्याची भावना भारताच्या हजारो वर्षांच्या अमर चेतनेशी जोडलेली होती. वेदांनी "माता भूमी: पुत्र अहं पृथ्वी:" (पृथ्वी ही माता आहे आणि मी तिचे मूल आहे) असे म्हणत भारतीय संस्कृतीचा पाया रचला होता. 'वंदे मातरम्' लिहून बंकिमचंद्रजींनी मातृभूमी आणि तिच्या अपत्यांचं तेच नातं भावविश्वातल्या एका मंत्ररूपात बांधलं होतं.
मित्रांनो,
तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी अचानक वंदे मातरम् बद्दल इतकं का बोलत आहे? खरं तर, काही दिवसांतच, 7 नोव्हेंबर रोजी, आपण वंदे मातरमच्या 150 व्या वर्षाच्या उत्सवात प्रवेश करणार आहोत. वंदे मातरम 150 वर्षांपूर्वी रचलं गेलं होतं आणि 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा हे गायलं होते.
मित्रांनो,
"वंदे मातरम्" च्या गायनात लाखो देशवासीयांना नेहमीच राष्ट्रप्रेमाचं प्रचंड उधाण जाणवलं आहे. आपल्या पिढ्यांनी "वंदे मातरम्" च्या शब्दांमध्ये भारताची एक जिवंत आणि भव्य प्रतिमा पाहिली आहे.
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्!
आपल्याला असाच भारत घडवायचा आहे. या प्रयत्नांमध्ये 'वंदे मातरम्' नेहमीच आपली प्रेरणा राहील. म्हणूनच आपल्याला 'वंदे मातरम्'चे 150 वे वर्ष संस्मरणीय करायचं आहे. आगामी पिढ्यांसाठी हा संस्कारांचा प्रवाह आपल्याला पुढे न्यायचा आहे. येणाऱ्या काळात 'वंदे मातरम्'शी संबंधित अनेक कार्यक्रम होतील, देशात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. आपण सर्व देशवासीयांनी 'वंदे मातरम्'चा गौरव करण्यासाठी उत्स्फूर्त प्रयत्न करावेत अशी माझी इच्छा आहे. कृपया #VandeMatram150 वर तुमच्या सूचना मला पाठवा. #VandeMatram150. मी तुमच्या सूचनांची वाट पाहत आहे आणि आपण सर्वजण हा प्रसंग ऐतिहासिक करण्यासाठी प्रयत्न करूया.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
संस्कृतचं नाव ऐकताच आपल्या मनात येतात - आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषदं, पुराणं, शास्त्रं, प्राचीन ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान. पण एकेकाळी या सर्वांसोबतच संस्कृत ही संभाषणाची भाषा देखील होती. त्या काळात अभ्यास आणि संशोधन फक्त संस्कृतमध्येच होत असत. नाटकं देखील संस्कृतमध्येच सादर केली जात. पण दुर्दैवानं गुलामगिरीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही संस्कृतची सतत उपेक्षाच होत राहिली. त्यामुळे तरुण पिढ्यांमधलं संस्कृतचं आकर्षणही कमी होऊ लागलं. पण मित्रांनो, आता काळ बदलत आहे, संस्कृतचा काळही बदलत आहे. संस्कृती आणि समाज माध्यमाच्या विश्वाने संस्कृतला एक नवीन जीवन दिलं आहे. सध्या बरेच तरुण संस्कृतशी निगडित असलेलं खूप मनोरंजक काम करत आहेत. जर तुम्ही समाज माध्यमावर गेलात तर तुम्हाला असे अनेक रील दिसतील जिथे अनेक तरुण संस्कृतमध्ये आणि संस्कृतबद्दल बोलताना दिसतील. बरेच लोक त्यांच्या समाज माध्यमा द्वारे संस्कृत शिकवतात. असाच एक तरुण कंटेंट क्रिएटर आहे - यश साळुंके. यशबाबत विशेष बाब म्हणजे यश हा कंटेंट क्रिएटर आणि क्रिकेटपटू , दोन्ही आहे. संस्कृतमध्ये बोलत बोलत क्रिकेट खेळतानाचे त्याचे रील खूप लोकप्रिय झाले आहेत.
जरा ऐका – (AUDIO BYTE OF YASH’s SANSKRIT COMMENTARY)
मित्रांनो,
कमला आणि जान्हवी या दोन्ही भगिनींचं कामही अद्भुत आहे. या दोघीही अध्यात्म, तत्वज्ञान आणि संगीतावर कंटेंट तयार करतात. इंस्टाग्रामवर 'संस्कृत छात्रोहम' नावाचे आणखी एक तरुणांचं चॅनेल आहे. हे चॅनेल चालवणारे तरुण केवळ संस्कृतशी संबंधित माहितीच देत नाहीत तर ते संस्कृतमध्ये विनोदी व्हिडिओ देखील तयार करतात. तरुणांना संस्कृतमधले हे व्हिडिओ खूप आवडतात. तुमच्यापैकी अनेक मित्रांनी समष्टीचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. समष्टी तिची गाणी संस्कृतमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सादर करते. दुसरा तरुण म्हणजे 'भावेश भीमनाथनी'. भावेश संस्कृत श्लोक, आध्यात्मिक तत्वज्ञान आणि तत्त्वांबद्दल बोलतो.
मित्रांनो,
भाषा ही कोणत्याही संस्कृतीची मूल्यं आणि परंपरेची वाहक असते. संस्कृतने हजारो वर्षांपासून हे कर्तव्य पार पाडलं आहे. काही तरुण आता संस्कृतसाठीचं आपलं कर्तव्य पार पाडत आहेत हे पाहून मनाला आनंद वाटतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता मी तुम्हाला एका मागील कालखंडात घेऊन जातो. 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळाची कल्पना करा! दूर दूरपर्यंत स्वातंत्र्याची कोणतीही आशा कुठे नजरेस पडत नव्हती. संपूर्ण भारतभर ब्रिटिशांनी शोषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या आणि त्यावेळी हैदराबादच्या देशभक्त लोकांवर होणारा अत्याचार आणखी भयानक झाला होता. त्यांना क्रूर आणि निर्दयी निजामाचे अत्याचार सहन करण्यास भाग पाडलं जात होतं. गरीब, वंचित आणि आदिवासी समुदायांवरील अत्याचारांना सीमा नव्हती. त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात होत्या आणि अवजड कर देखील लादले जात होते. जर त्यांनी या अन्यायाला विरोध केला तर त्यांचे हात छाटून टाकले जात.
मित्रांनो,
अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.
मित्रांनो,
मी ज्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलत आहे ते आहेत कोमरम भीम. त्यांची जयंती नुकतीच 22 ऑक्टोबर रोजी साजरी झाली. कोमरम भीम जास्त काळ जगले नाहीत; ते फक्त 40 वर्षे जगले, परंतु त्यांच्या हयातीत त्यांनी असंख्य लोकांच्या, विशेषतः आदिवासी समुदायाच्या हृदयावर आपली अमिट छाप सोडली. त्यांनी निजामाविरुद्ध लढणाऱ्यांमध्ये नवीन शक्ती निर्माण केली. ते आपल्या धोरणात्मक कौशल्यासाठी देखील ओळखले जात असत. त्यांनी निजामाच्या सत्तेविरोधात एक मोठे आव्हान उभे केले. 1940 मध्ये निजामाच्या माणसांनी त्यांची हत्या केली. मी तरुणांना त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचं आवाहन करतो.
कोमरम भीम की…
ना विनम्र निवाली |
आयन प्रजल हृदयाल्लों...
एप्पटिकी निलिचि-वूँटारू |
(मराठी भाषांतर: कोमरम भीमजींना माझी विनम्र आदरांजली, ते लोकांच्या हृदयात नेहमीच राहतील.)
मित्रांनो,
पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला आपण "आदिवासी गौरव दिन" साजरा करणार आहोत. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा हा शुभ प्रसंग आहे. मी भगवान बिरसा मुंडा यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासी समुदायाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. झारखंडमधील भगवान बिरसा मुंडा यांच्या उलिहातू या गावाला भेट देण्याचं सौभाग्य मला लाभलं. मी तिथली माती माझ्या कपाळावर लावली आणि आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा आणि कोमरम भीम यांच्यासारखीच, आपल्या आदिवासी समुदायात अनेक महान व्यक्तिमत्त्वं झाली आहेत. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल वाचण्याची विनंती करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
मला "मन की बात" साठी तुमच्याकडून असंख्य संदेश मिळतात. या संदेशांमध्ये बरेच लोक आपल्या सभोवतालच्या प्रतिभावान लोकांची चर्चा करतात. आपल्या लहान शहरांमध्ये, गावांमध्ये आणि खेड्यांमध्येही नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या जात आहेत हे वाचून मला आनंद होतो. सेवेच्या भावनेने समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्ती किंवा गटांची माहिती तुम्हाला असेल तर कृपया मला कळवा. नेहमीप्रमाणे मी तुमच्या संदेशांची वाट पाहत आहे. पुढच्या महिन्यात, आपण 'मन की बात' च्या पुढच्या भागात काही नवीन विषयांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत, मी तुमचा निरोप घेतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार.
* * *
नाना मेश्राम/आकाशवाणी, मुंबई/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182584)
Visitor Counter : 12
Read this release in:
Punjabi
,
Telugu
,
Manipuri
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam