गृह मंत्रालय
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो
सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त यंदाचा राष्ट्रीय एकता दिवस विशेष असेल
यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या अनोख्या सोहळ्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
विविधतेमध्ये एकतेचा संदेश देण्यासाठी, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ संचलनात सहभागी होणार
Posted On:
24 OCT 2025 4:09PM by PIB Mumbai
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय एकता दिवस भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यंदाचा राष्ट्रीय एकता दिवस हा विशेष सोहळा ठरेल. यंदाचा उत्सव अनेक प्रकारे आगळा ठरेल आणि तो कायम स्मरणात राहील.

राष्ट्रीय एकता दिनाचा वार्षिक उत्सव देशवासीयांना स्वतंत्र भारताच्या निर्मितीत आणि 562 संस्थानांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचण्यामध्ये सरदार पटेल यांनी बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेची आठवण करून देतो. त्यांचे नेतृत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रति असलेल्या अढळ वचनबद्धतेमुळे, सरदार पटेल यांना "राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार आणि भारताचे लोहपुरुष" म्हणून आदरणीय मानले जाते.

यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या अनोख्या सोहळ्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जाईल. संचलनादरम्यान, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि राज्य पोलिस दल त्यांचे कौशल्य, शिस्त आणि शौर्य प्रदर्शित करतील. या वर्षी राष्ट्रीय एकता दिनाच्या संचलनमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी), तसेच आसाम, त्रिपुरा, ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांचे पोलीस दल आणि राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी) यांच्या तुकड्यांचा समावेश असेल. या संचलनात घोडदळ आणि उंटांवर स्वार झालेल्या तुकड्या, तसेच देशी कुत्र्यांच्या प्रजाती आणि विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींची प्रात्यक्षिके असतील.

या संचलनात महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभागही दिसून येईल. पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व एक महिला अधिकारी करणार आहे. सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या महिला कर्मचारी मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींचे प्रात्यक्षिक दाखवतील, यामधून भारताच्या कन्यांचे सामर्थ्य आणि धैर्य प्रदर्शित होईल.

या वर्षीच्या संचलनामध्ये बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलामधील भारतीय श्वान प्रजातीतील कुत्र्यांचा समावेश असलेले ‘मार्चिंग’ पथक, गुजरात पोलिसांचे अश्वदल, आसाम पोलिसांचा मोटारसायकल ‘डेअरडेव्हिल’ शो आणि सीमा सुरक्षा दलाचे उंट पथक आणि उंटावर स्वार बँड यांचा समावेश हे यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असतील.
एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे छात्र आणि शालेय बँड त्यांच्या लक्षवेधी सादरीकरणाने समारंभाची शोभा वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण पथकाची नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिके संचलनाची शान आणखी वाढवणार आहेत.
विविधतेतील एकतेचा संदेश देण्यासाठी, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ देखील संचलनाचा भाग असतील. यावर्षीच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या संचलनामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी), एनडीआरएफ, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार बेटे, मणिपूर, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड आणि पुडुचेरी यांचे 10 चित्ररथ असतील, त्यातून "विविधतेत एकता" संकल्पना प्रतिबिंबीत होईल.
या वर्षीच्या संचलनाला अधिक भव्य बनवण्यासाठी, बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, दिल्ली पोलिस, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरचे ब्रास बँड देखील सहभागी होतील. या वर्षी संचलनामध्ये सीआरपीएफचे पाच शौर्य चक्र विजेते आणि बीएसएफचे 16 वीरता पदक विजेते सहभागी होतील. झारखंडमधील नक्षलविरोधी कारवाया आणि जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये या शूर व्यक्तींनी असामान्य धैर्य दाखवले. पश्चिम सीमेवर ऑपरेशन सिंदूर दरम्यान बीएसएफच्या जवानांनी त्यांचे अतुलनीय शौर्य आणि धाडस दाखवले.

या संचलनाबरोबरच सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या संस्कृतीची समृद्ध विविधता आणि राष्ट्रीय एकतेला उजाळा देणारे 900 कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करतील.
राष्ट्रीय एकता दिवस उत्सवाचे उद्दिष्ट राष्ट्रीय एकता, सौहार्द आणि देशभक्तीची भावना जागृत करणे, नागरिकांना या मूल्यांचा अंगीकार करण्यास प्रेरणा देणे आहे. सर्व नागरिकांना या भव्य आणि महाउत्सवात सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि भाग घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत, एकता नगर येथे भारत पर्व आयोजित केले जाईल, ज्यामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सवाचा समावेश असेल. 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करणाऱ्या विशेष कार्यक्रमांनी या महोत्सवाचा समारोप होईल. त्यामध्ये आपल्या आदिवासी समुदायांची वैभवशाली संस्कृती आणि सळसळत्या चैतन्यावर प्रकाश टाकण्यात येईल.
***
सुषमा काणे / राजश्री आगाशे / सुवर्णा बेडेकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182259)
Visitor Counter : 50