पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रांतवर साजरी केली दिवाळी
आयएनएस विक्रांत केवळ एक युद्धनौका नव्हे तर 21 व्या शतकातील भारताचे परिश्रम ,प्रतिभा,प्रभाव व वचनबद्धतेची साक्ष आहे - पंतप्रधान
आयएनएस विक्रांत म्हणजे स्वदेशी व आत्मनिर्भर भारत यांचे उच्च प्रतीक आहे - पंतप्रधान
तीनही सैन्यदलांमधील अभूतपूर्व समन्वयामुळे पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर दरम्यान शरणागती पत्करावी लागली - पंतप्रधान
गेल्या दशकभरात सैन्यदलांची आत्मनिर्भरतेकडे ठाम वाटचाल सुरु आहे - पंतप्रधान
भारताला जगातील आघाडीचा संरक्षण निर्यातदार बनवणे हे आमचे ध्येय आहे - पंतप्रधान
भारतीय नौदल म्हणजे हिंदी महासागरातील आपला संरक्षक आहे - पंतप्रधान
आपल्या सुरक्षा दलांच्या शौर्य व दृढनिश्चयामुळे देशाने एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे, आपण माओवादी दहशतवाद संपवत आहोत - पंतप्रधान
Posted On:
20 OCT 2025 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित केले. आजचा दिवस म्हणजे एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आहे आणि समोर एक उल्लेखनीय दृश्य आहे असे नमूद करून, मोदी यांनी एका बाजूला विशाल महासागर आणि दुसरीकडे भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट शक्ती असल्याचे अधोरेखित केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे, तर दुसऱ्या बाजूला आयएनएस विक्रांतची प्रचंड शक्ती आहे, जी अनंत शक्तीचे मूर्त रूप आहे, असे त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाची चमक दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी लावलेल्या दिव्यांशी मिळती जुळती आहे, त्यामुळे दिव्यांची दिव्य माला तयार होते असं ते म्हणाले. भारतीय नौदलाच्या शूर जवानांमध्ये ही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणे हा आपला बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.
आयएनएस विक्रांतवर घालवलेल्या त्यांच्या रात्रीची आठवण सांगताना पंतप्रधान म्हणाले की, हा अनुभव शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. अथांग समुद्रातील रात्र आणि सूर्योदय पाहण्याच्या अनुभवामुळे ही दिवाळी संस्मरणीय बनली आहे, असे वर्णन त्यांनी केले. आयएनएस विक्रांतवरून पंतप्रधानांनी देशातील सर्व 140 कोटी नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आयएनएस विक्रांत राष्ट्राला अर्पण करण्यात आली त्या क्षणाचे स्मरण करताना मोदी म्हणाले की, त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, विक्रांत ही युद्धनौका भव्य, विशाल, विहंगम, अद्वितीय आणि अपवादात्मक आहे. "विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही; ती 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेची साक्ष आहे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ज्या दिवशी देशाला स्वदेशी बनावटीचे आयएनएस विक्रांत मिळाले, त्याच दिवशी भारतीय नौदलाने वसाहतवादी वारशाच्या प्रमुख प्रतीकाचा त्याग केला होता याची त्यांनी आठवण करून दिली . नौदलाने स्वीकारलेला नवीन ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतुन साकारला होता, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
"आयएनएस विक्रांत आज ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेड इन इंडिया’ अर्थात ‘स्वदेशी’चे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून उभे आहे", असे उद्गार पंतप्रधानांनी काढले, स्वदेशी बनावटीचे आयएनएस विक्रांत, समुद्राच्या लाटा कापत जेव्हा पुढे जाते, तेव्हा ते भारताच्या लष्करी क्षमतेला प्रतिबिंबित करते, असे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वीच विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली होती याची त्यांनी आठवण करून दिली. आयएनएस विक्रांत ही अशी युद्धनौका आहे जिचे केवळ नावच शत्रूची घमेंड जिरवण्यासाठी पुरेसे आहे असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी भारतीय सशस्त्र दलांना विशेष अभिवादन केले. भारतीय नौदलाने निर्माण केलेली भीती, भारतीय हवाई दलाने दाखवलेले असाधारण कौशल्य आणि भारतीय सैन्याचे शौर्य, तसेच तिन्ही दलांमधील अभूतपूर्व समन्वय यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला त्वरित शरण यावे लागले, हे त्यांनी अधोरेखित केले. या मोहिमेत सहभागी असलेले सर्व कर्मचारी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत असे ते म्हणाले.
जेव्हा शत्रू समोर असतो आणि युद्ध जवळ येते तेव्हा स्वबळावर लढण्याची ताकद असलेल्या पक्षाला नेहमीच फायदा होतो असे मोदी यांनी सांगितले. सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. गेल्या दशकात, भारतीय सैन्याने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने सातत्याने प्रगती केली आहे, याबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला. सशस्त्र दलांनी निदर्शनास आणलेली बहुतेक आवश्यक लष्करी उपकरणे आता देशांतर्गत तयार केली जात आहेत त्यामुळे पूर्वी आयात कराव्या लागणाऱ्या हजारो वस्तू आता आयात कराव्या लागत नाहीत. गेल्या 11 वर्षांत, भारताचे संरक्षण उत्पादन तिप्पट झाले आहे. गेल्या वर्षी त्याचे मूल्य ₹1.5 लाख कोटींपेक्षा जास्त होते असे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय जहाजबांधणी कारखान्यांकडून नौदलाला 40 हून अधिक स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुड्या मिळाल्या आहेत अशी माहिती मोदी यांनी यावेळी राष्ट्राला दिली. सध्या सरासरी दर 40 दिवसांनी एक नवीन स्वदेशी युद्धनौका किंवा पाणबुडी नौदलात समाविष्ट केली जात आहे, असे ते पुढे म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ‘ब्रह्मोस’ आणि ‘आकाश’ सारख्या क्षेपणास्त्रांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. जगभरातील अनेक देश आता ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास इच्छुक आहेत",असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत तिन्ही सशस्त्र दलांसाठी शस्त्रे आणि उपकरणे निर्यात करण्याची क्षमता निर्माण करत आहे, असे ते म्हणाले. "गेल्या दशकात भारताची संरक्षण निर्यात 30 पटीने वाढली असून जगातील आघाडीच्या संरक्षण निर्यातदारांमध्ये गणले जाणे हे भारताचे ध्येय आहे", असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी या यशाचे श्रेय संरक्षण क्षेत्रातील स्टार्ट-अप्स आणि स्वदेशी संरक्षण उत्पादन आस्थापनांच्या योगदानाला दिले.
पंतप्रधानांनी सांगितले की, ताकद आणि क्षमतेबाबत भारताची परंपरा नेहमीच "ज्ञानय दानय च रक्षणय" या तत्वात रुजलेली आहे, म्हणजेच आपले विज्ञान, समृद्धी आणि शक्ती मानवतेच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी समर्पित आहे, असा त्याचा अर्थ आहे. आजच्या परस्परावलंबी जगात, जिथे राष्ट्रांची अर्थव्यवस्था आणि प्रगती सागरी मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते, तेथे जागतिक स्थिरता सुनिश्चित करण्यात भारतीय नौदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जगातील 66 टक्के तेल पुरवठा करणारी आणि 50 टक्के कंटेनर जहाजे हिंदी महासागरातून जातात यावर मोदी यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की भारतीय नौदल हे सागरी मार्ग सुरक्षित करण्यासाठी हिंदी महासागराचे संरक्षक म्हणून तैनात आहे. याव्यतिरिक्त, मिशन-आधारित तैनाती, चाचेगिरी विरोधी गस्त आणि मानवतावादी मोहिमांद्वारे, संपूर्ण प्रदेशात जागतिक सुरक्षा भागीदार म्हणून भारतीय नौदल काम करते.
“भारतीय नौदल भारतीय बेटांचे संरक्षण आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. 26 जानेवारी रोजी देशातील प्रत्येक बेटावर राष्ट्रध्वज फडकवण्याच्या काही काळापूर्वी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी यावेळी स्मरण करून दिले. नौदलाने हा राष्ट्रीय संकल्प पूर्ण केला आणि आज प्रत्येक भारतीय बेटावर नौदलाकडून अभिमानाने तिरंगा फडकवला जात आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले.
भारत वेगाने प्रगती करत असताना, ग्लोबल साऊथच्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन मिळून प्रगती करावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत 'महासागर सागरी दृष्टिकोन' यावर काम करत आहे आणि अनेक देशांच्या विकासाचा सहयोगी बनत आहे यावर त्यांनी भर दिला. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा जगात कुठेही मानवतेसाठी मदत करण्यास भारत तयार आहे, यावर त्यांनी भर दिला. आपत्तीच्या काळात, आफ्रिकेपासून आग्नेय आशियापर्यंत, संपूर्ण जग भारताला जागतिक सहायक म्हणून पाहते. 2014 मध्ये, जेव्हा शेजारील मालदीव बेटाला पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागला, तेव्हा भारताने 'ऑपरेशन नीर' सुरू केले आणि नौदलाने त्या देशाला स्वच्छ पाणी पोहोचवले, याची आठवण श्री मोदी यांनी करून दिली. 2017 मध्ये, जेव्हा श्रीलंकेला विनाशकारी पुराचा तडाखा बसला, तेव्हा सर्वप्रथम भारताने मदतीचा हात पुढे केला. 2018 मध्ये, इंडोनेशियातील त्सुनामी आपत्तीनंतर, भारत मदत आणि बचाव कार्यात इंडोनेशियाच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. त्याचप्रमाणे, म्यानमारमध्ये भूकंपामुळे झालेला विनाश असो किंवा 2019 मध्ये मोझांबिक आणि 2020 मध्ये मादागास्कर येथे आलेले संकट असो भारत सर्वत्र सेवा भावनेने त्वरित पोहोचला आहे.
भारताच्या सशस्त्र दलांनी वेळोवेळी परदेशात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मोहिमा राबवल्या आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. येमेनपासून सुदानपर्यंत, जेव्हा जेव्हा गरज भासली, त्या त्या वेळी भारतीय नौदलाच्या शौर्य आणि धाडसाने जगभरातील भारतीयांवरचा विश्वास अधिक दृढ केला आहे. या मोहिमांद्वारे भारताने हजारो विदेशी नागरिकांचे प्राण वाचवले आहेत.
"भारताच्या सशस्त्र दलांनी जमीन, समुद्र आणि हवाई अशा सर्व क्षेत्रांवर आणि प्रत्येक परिस्थितीत देशाची सेवा केली आहे", असे उद्गार काढत मोदी म्हणाले की, भारताच्या सागरी सीमा आणि व्यापारी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी नौदल समुद्रात तैनात आहे, तर हवाई दल आकाशमार्गे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. जमिनीवर, जळत्या वाळवंटांपासून ते बर्फाळ हिमनद्यांपर्यंत, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि भारत तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या (आयटीबीपी) जवानांसह, सैन्य खंबीरपणे आपले पाय रोवून उभे आहे. विविध आघाड्यांवर एसएसबी, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि गुप्तचर संस्थांचे कर्मचारी भारतमातेची सेवा करत आहेत,यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी राष्ट्रीय संरक्षणात भारतीय तटरक्षक दल बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचीही प्रशंसा केली, हे दल भारताच्या किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी नौदलाशी सतत समन्वय साधत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या या भव्य मोहिमेत त्यांचे विपुल योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी सांगितले की, भारतीय सुरक्षा दलांच्या शौर्य आणि धाडसामुळे देशाने, माओवादी दहशतवादाचे उच्चाटन -हा एक मोठा टप्पा गाठला आहे -
भारत आता नक्षलवादी-माओवादी अतिरेक्यांपासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या मार्गावर आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. 2025 पूर्वी, सुमारे 125 जिल्हे माओवादी हिंसाचाराने प्रभावित झाले होते; आज ही संख्या फक्त 11 पर्यंत कमी झाली आहे. केवळ तीनच जिल्ह्यांत त्याचा अधिक प्रभाव आहे. 100 हून अधिक जिल्हे आता माओवादी दहशतीच्या छायेतून पूर्णपणे बाहेर पडले आहेत आणि पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत आहेत आणि दिवाळी साजरी करत आहेत, यावर त्यांनी भर दिला. पिढ्यानपिढ्या भीतीने दडपून राहिलेले लाखो लोक आता विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. ज्या प्रदेशांमध्ये माओवाद्यांनी एकेकाळी रस्ते, शाळा, रुग्णालये आणि मोबाईल टॉवर बांधण्यात अडथळा आणला होता, तेथे आता महामार्ग बांधले जात आहेत आणि नवीन उद्योग उदयास येत आहेत. हे यश भारतीय सुरक्षा दलांच्या समर्पण, त्याग आणि शौर्यामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अशा अनेक जिल्ह्यांमध्ये लोक पहिल्यांदाच दिवाळी साजरी करत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला. जीएसटी बचत उत्सवादरम्यान या भागात विक्रमी विक्री आणि खरेदी झालेली दिसून येत आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यांमध्ये माओवादी दहशतवाद्यांनी एकेकाळी संविधानाचा उल्लेखही दडपला होता, तिथे आता स्वदेशीचा मंत्र गुंजतो आहे.
“भारत वेगाने प्रगती करत आहे आणि 140 कोटी नागरिकांची स्वप्ने पूर्ण करत आहे. जमिनीपासून अंतराळापर्यंत, एकेकाळी कल्पनेपलीकडे मानले जाणारे यश आता वास्तवात उतरत आहे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. राष्ट्राच्या गती, प्रगती, परिवर्तन आणि वाढत्या विकास आणि आत्मविश्वासावर त्यांनी प्रकाश टाकला. राष्ट्रउभारणीच्या या भव्य कार्यात सशस्त्र दलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सैन्ये केवळ प्रवाहाचे अनुयायी नाहीत; त्यांच्याकडे त्याचे मार्गदर्शन करण्याची क्षमता, काळाचे नेतृत्व करण्याचे धैर्य, अनंत मर्यादा ओलांडण्याचे शौर्य आणि दुर्गमतेवर मात करण्याचे सामर्थ्य आहे, असे मोदी यांनी नमूद केले. आपले सैनिक जिथे खंबीरपणे उभे आहेत ती पर्वतशिखरे भारताचे विजयस्तंभ होतील आणि त्यांच्याखालील समुद्राच्या महाकाय लाटा भारताच्या विजयाचा प्रतिध्वनी करतील असे त्यांनी घोषित केले. या गर्जनेतून एकजूटीने आवाज उठेल - 'भारत माता की जय!'
अशाप्रकारे उत्साहाने आणि दृढनिश्चयाने, पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
नेहा कुलकर्णी/उमा रायकर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
(Release ID: 2181009)
Visitor Counter : 33