गृह मंत्रालय
पोलीस स्मृती दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार
Posted On:
19 OCT 2025 11:00AM by PIB Mumbai
21 ऑक्टोबर 1959 रोजी, लडाखच्या हॉट स्प्रिंग येथे सशस्त्र चीनी सैन्याच्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाची आणि राष्ट्राची सुरक्षा आणि अखंडत्व जपण्यातील त्यांच्या सर्वोच्च भूमिकेची दखल घेत, माननीय पंतप्रधानांनी 2018 मध्ये पोलीस स्मृतीदिनानिमित्त नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील राष्ट्रीय पोलीस स्मारक राष्ट्राला समर्पित केले.
या स्मारकामुळे पोलीस दलामध्ये राष्ट्रीय ओळख, अभिमान, उद्देश्याची एकता, एक समान इतिहास आणि भविष्य यांची जाणीव निर्माण होते, तसेच जीवाची बाजी लावून राष्ट्राचे रक्षण करण्याप्रती त्यांची वचनबद्धता बळकट करते.
या स्मारकामध्ये, एक केंद्रीय शिल्प, शौर्याची भिंत आणि संग्रहालयाचा समावेश आहे. 30 फूट उंच ग्रॅनाईट मोनोलिथ सेनोटाफमध्ये बनवलेलेले हे केंद्रीय शिल्प पोलीस कर्मचाऱ्यांची ताकद, लवचिकता आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यापासून कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांची नावे शौर्य भिंतीवर कोरलेली आहेत जी पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य आणि बालिदानाची पावती आहे. संग्रहालयाच्या संकल्पनेत भारतीय पोलिस व्यवस्थेचा इतिहास आणि तिच्या विकास प्रवासाचे दर्शन घडते. पोलीस कर्मचारी आणि सामान्य माणसासाठी हे स्मारक एक श्रद्धास्थान आहे, एक तीर्थक्षेत्र आहे. सोमवार वगळता राष्ट्रीय पोलीस स्मारक सर्व दिवशी सामान्य नागरिकांसाठी खुले असते. केंद्रीय सशस्त्र दलाच्या (CAPF) वतीनं, सूर्यास्ताअगोदर एक तास आधी दर शनिवार आणि रविवार संध्याकाळी राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं वाद्यवृंद सादरीकरण, संचलन आणि रिट्रीट समारंभाचे आयोजन केले जाते.
देशभरात शहिद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि दिल्ली पोलिसांचे संयुक्त संचलन आयोजित करण्यात येईल. संरक्षण मंत्री, केंद्रीय गृह राज्यमंत्री, पोलिस पार्श्वभूमी असलेले खासदार, सशस्त्र पोलीस दलाचे प्रमुख, केंद्रीय पोलीस दलाचे प्रमुख यांच्यासह इतर मान्यवरही शहिदांना श्रद्धांजली वाहातील. निवृत्त पोलीस महासंचालक, पोलिस अधिकारी आणि इतर मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत.
पोलीस शहिदांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर, संरक्षण मंत्री सभेला संबोधित करतील, शहिदांचे स्मरण करून पोलिसांच्या कर्तव्यासमोरील आव्हाने मांडतील. कार्यक्रमाचा समारोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हॉट स्प्रिंग्जमध्ये शहीदांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून होईल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून तसेच पोलीसांच्या संकेतस्थळावर त्याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे तसेच आकाशवाणी, माध्यमांकडून त्याचे वार्तांकन केले जाईल.
या स्मृतिदिनाचा एक भाग म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि केंद्रीय पोलिस दल 22 ते 30 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय पोलिस स्मारकामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्य शहीदांच्या कुटुंबियांच्या भेटी, पोलिस वाद्यपथकाचे प्रदर्शन, दुचाकी फेरी, शहीदांसाठी धावण्याची स्पर्धा, रक्तदान शिबिरे, मुलांसाठी निबंध/चित्रकला स्पर्धा, पोलीस कर्मचाऱ्यांचे बलिदान, शौर्य आणि सेवा प्रदर्शित करणारे चित्रपट प्रदर्शन यांचा समावेश आहे. या काळात देशभरात पोलीस दलाकडून अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

***
सोनल तुपे / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2180843)
Visitor Counter : 21
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam