पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे केले उद्घाटन


हे रुग्णालय वाराणसी आणि परिसरातील अनेक लोकांच्या जीवनातील अंधार दूर करेल आणि त्यांना प्रकाशाकडे घेऊन जाईल: पंतप्रधान

उत्तर प्रदेशातील काशी हे आता पूर्वांचलमधील एक मोठे आरोग्य केंद्र आणि हेल्थकेअर हब म्हणून प्रसिद्ध होत आहे: पंतप्रधान

आजच्या भारताच्या आरोग्य धोरणाचे पाच स्तंभ आहेत - प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, रोगाचे वेळेवर निदान, मोफत आणि कमी खर्चाचे उपचार, लहान शहरांमध्ये चांगले उपचार आणि आरोग्यसेवेमध्ये तंत्रज्ञानाचा विस्तार: पंतप्रधान

Posted On: 20 OCT 2024 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले. या रुग्णालयात डोळ्यांच्या विविध आजारांवर व्यापक सल्लामसलत आणि उपचार दिले जातात. यावेळी आयोजित केलेल्या प्रदर्शनाची माहितीही मोदींनी घेतली.

या प्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, या शुभ काळात काशीला भेट देणे ही पुण्य अनुभवण्याची संधी आहे. त्यांनी काशीतील नागरिक, संत आणि दानशूर व्यक्तींच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला आणि परमपूज्य शंकराचार्यांचे दर्शन, प्रसाद आणि आशीर्वाद घेण्याचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी भर दिला की काशी आणि उत्तरांचलला आज आणखी एक आधुनिक रुग्णालय मिळाले आहे आणि भगवान शंकराच्या भूमीतील आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाच्या समर्पणाचा उल्लेख केला. मोदींनी या प्रसंगी काशी आणि उत्तरांचलच्या लोकांचे अभिनंदन केले.

भारतातील प्राचीन धर्मग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या एका वाक्याचे उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले की आर जे शंकरा नेत्र रुग्णालय अंधार पुसून टाकेल आणि अनेक लोकांना प्रकाशाकडे घेऊन जाईल. मोदी म्हणाले की, नुकतीच नेत्र रुग्णालयाला भेट दिल्यावर आपल्याला असे वाटले की हे रुग्णालय म्हणजे अध्यात्म आणि आधुनिकतेचे मिश्रण असून वृद्ध आणि तरुण अशा दोघांनाही दृष्टी देण्यास मदत करेल. या रुग्णालयात गरीबांना मोठ्या संख्येने मोफत उपचार मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी यांनी नमूद केले की नेत्र रुग्णालय अनेक तरुणांसाठी नोकरीच्या नवीन संधी तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नोकरी आणि इंटर्नशिपच्या संधी तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी नोकऱ्या निर्माण करेल.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना शंकरा आय फाउंडेशनशी असलेल्या आपल्या संबंधांची आठवण पंतप्रधानांनी सांगितली आणि श्री शंकरा विजयेंद्र सरस्वती यांच्या गुरूंच्या उपस्थितीत शंकरा आय हॉस्पिटलचे उद्घाटन केल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगद्गुरु शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांचे आशीर्वाद मिळणे ही खूप समाधानाची गोष्ट आहे आणि परमपूज्य जगद्गुरु श्री जयेंद्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामे पूर्ण केल्याचा उल्लेख केला. आजच्या प्रसंगाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, गुरुंच्या तीन वेगवेगळ्या परंपरांशी जोडले जाणे ही वैयक्तिक समाधानाची गोष्ट आहे. या प्रसंगाला आशीर्वाद दिल्याबद्दल श्री शंकरा विजयेंद्र सरस्वती यांचे पंतप्रधानांनी आभार मानले आणि वाराणसीचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे स्वागत केले.

मोदींनी प्रसिद्ध उद्योजक दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या सेवा आणि कार्याची आठवण करून दिली. त्यांनी झुनझुनवाला यांचा वारसा पुढे चालू ठेवल्याबद्दल त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी आठवण करून दिली की त्यांनी शंकरा आय हॉस्पिटल आणि चित्रकूट आय हॉस्पिटल या दोन्ही संस्थांना वाराणसीमध्ये आपल्या आस्थापना स्थापन करण्याची विनंती केली होती आणि काशीच्या लोकांच्या विनंतीचा आदर केल्याबद्दल दोन्ही संस्थांचे त्यांनी आभार मानले. त्यांनी नमूद केले की पूर्वी त्यांच्या संसदीय मतदारसंघातील हजारो लोक चित्रकूट आय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि आता वाराणसीमध्ये त्यांच्या आवाक्यात दोन नवीन अत्याधुनिक नेत्र रुग्णालये आहेत.

अनादी काळापासून वाराणसीची ओळख धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून होती, हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी सांगितले की आता वाराणसी उत्तर प्रदेश आणि पूर्वांचलचे आरोग्य केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होत आहे. बीएचयू ट्रॉमा सेंटर असो किंवा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल असो किंवा दीनदयाल  उपाध्याय हॉस्पिटल असो किंवा कबीर चौरा हॉस्पिटलमधील सुविधा मजबूत करणे असो किंवा ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष रुग्णालय असो किंवा वैद्यकीय महाविद्यालये असोत, गेल्या दशकात आरोग्य क्षेत्रात मोठे काम झाले आहे असे मोदी म्हणाले. वाराणसीमध्ये कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी देखील आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी यांनी अधोरेखित केले की, पूर्वी दिल्ली किंवा मुंबईला जावे लागत असे , त्याऐवजी आज वाराणसीमध्ये रुग्णांना चांगले वैद्यकीय उपचार मिळत आहेत. बिहार, झारखंड आणि इतर ठिकाणांहून हजारो लोक उपचारांसाठी वाराणसीला येत आहेत, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितले की, पूर्वीच्या "मोक्षदायिनी" वाराणसीचे नवीन ऊर्जा आणि संसाधनांसह "नवजीवनदायिनी" वाराणसीमध्ये रूपांतर होत आहे.

मागील सरकारांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की वाराणसीसह पूर्वांचलमधील आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष केले गेले. ते पुढे म्हणाले की परिस्थिती अशी होती की 10 वर्षांपूर्वी पूर्वांचलात मेंदूतापासाठी ब्लॉक-स्तरीय उपचार केंद्रे नव्हती. त्यामुळे मुलांचा मृत्यू ओढवून माध्यमांमध्ये मोठा गोंधळ उडत असे. गेल्या दशकात केवळ काशीमध्येच नव्हे तर पूर्वांचलच्या संपूर्ण प्रदेशात आरोग्य सुविधांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केले. 

त्यांनी नमूद केले की आज पूर्वांचलमध्ये मेंदूतापावर उपचार करण्यासाठी अशी 100 हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत आणि गेल्या दशकात पूर्वांचलमधील प्राथमिक आणि सामुदायिक केंद्रांमध्ये 10 हजारांहून अधिक नवीन खाटांची भर पडली आहे. त्यांनी पुढे नमूद केले की 10 वर्षांत पूर्वांचलमधील गावांमध्ये साडेपाच हजारांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत. पंतप्रधानांनी असेही सांगितले की 10 वर्षांपूर्वी पूर्वांचलच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस सुविधा नव्हत्या, त्या तुलनेत आज 20 हून अधिक डायलिसिस युनिट्स कार्यरत आहेत जी रुग्णांना मोफत उपचार देत आहेत.

21 व्या शतकातील भारताने आरोग्यसेवेबाबतची जुनी मानसिकता आणि दृष्टिकोन सोडून दिला आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी भारताच्या आरोग्यसेवा धोरणाचे पाच स्तंभ अधोरेखित केले ते असे - प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, वेळेवर निदान, मोफत औषधे आणि उपचार, चांगल्या आरोग्यसेवा सुविधा आणि लहान शहरांमध्ये पुरेसे डॉक्टर आणि आरोग्यसेवेमध्ये तंत्रज्ञानाचा व्यापक वापर.

लोकांना आजारांपासून रोखणे हे भारताच्या आरोग्य धोरणाचे सर्वोच्च प्राधान्य आणि पहिला स्तंभ आहे हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी असे निदर्शनास आणून दिले की आजारांमुळे लोक अधिक गरीब होतात. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत हे लक्षात घेऊन मोदी म्हणाले की एक गंभीर आजार त्यांना पुन्हा गरिबीकडे ढकलू शकतो. म्हणूनच, पंतप्रधान म्हणाले की सरकार स्वच्छता, योग, आयुर्वेद आणि पोषण यावर विशेष लक्ष देत आहे. लसीकरण मोहिमेच्या विस्तृत व्याप्तीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी असे निदर्शनास आणून दिले की दहा वर्षांपूर्वी लसीकरणाचे प्रमाण केवळ 60 टक्के होते तेव्हा कोट्यवधी मुले त्यातून वगळली गेली होती. 

दरवर्षी लसीकरणाची व्याप्ती फक्त एक ते दीड टक्क्यांनी वाढत होती, याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आणि सांगितले की प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक मुलाला लसीकरणाच्या व्याप्तीखाली आणण्यासाठी आणखी 40-50 वर्षे लागली असती. सध्याच्या सरकारने मुलांमध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याला प्राधान्य दिले आहे असे ते म्हणाले आणि मिशन इंद्रधनुषचा उल्लेख केला ज्यामध्ये अनेक मंत्रालये एकत्रितपणे काम करत होती. यामुळे लसीकरण व्याप्तीदरात वाढ झाली आणि कोट्यवधी गर्भवती महिला आणि मुलांपर्यंत सेवा पोहोचल्या. ते म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात सरकारने लसीकरणावर भर दिल्याचे फायदे दिसून आले, आजही देशभरात ही लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे.

पंतप्रधानांनी रोगाचे लवकर निदान होण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि कर्करोग व मधुमेह यांसारख्या अनेक आजारांचे अगदी सुरुवातीलाच निदान करण्यासाठी देशभरात लाखो आयुष्मान आरोग्य मंदिरांची स्थापना केल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज देशात क्रिटिकल केअर ब्लॉक्स आणि आधुनिक प्रयोगशाळांचे जाळे देखील तयार केले जात आहे. "आरोग्य क्षेत्राचा हा दुसरा आधारस्तंभ लाखो लोकांचे जीव वाचवत आहे", असेही ते म्हणाले.

आरोग्याचा तिसरा आधारस्तंभ म्हणजे कमी खर्चाचे उपचार आणि स्वस्त औषधे हे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी रोगांच्या उपचारांवरील सरासरी खर्च 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे अधोरेखित केले आणि 80 टक्के सवलतीत औषधे उपलब्ध असलेल्या पंतप्रधान जनऔषधी केंद्रांचाही उल्लेख केला. त्यांनी माहिती दिली की हृदय स्टेंट, गुडघेरोपण आणि कर्करोगाच्या औषधांच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. आयुष्मान योजनेत गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात जे जीवनरक्षक ठरतात. त्यांनी माहिती दिली की आतापर्यंत 7.5 कोटींहून अधिक रुग्णांनी आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ घेतला आहे.

आरोग्य क्षेत्राच्या चौथ्या स्तंभाचे स्पष्टीकरण देताना मोदी यांनी नमूद केले की यामुळे दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांवरील उपचारांसाठीचे अवलंबित्व कमी होणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की सरकारने गेल्या दशकात लहान शहरांमध्ये एम्स, वैद्यकीय महाविद्यालये आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालये स्थापन केली आहेत. पंतप्रधानांनी असेही नमूद केले की देशातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी गेल्या दशकात हजारो नवीन वैद्यकीय जागा वाढविण्यात आल्या आहेत. त्यांनी पुढे सांगितले की सरकारने पुढील 5 वर्षांत 75 हजार अधिक जागांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य क्षेत्राचा पाचवा स्तंभ म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा अधिक सुलभ करणे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आज डिजिटल आरोग्य ओळखपत्रे तयार केली जात आहेत आणि रुग्णांना ई-संजीवनी अ‍ॅपसारख्या माध्यमातून घरी सल्लामसलत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले. आनंद व्यक्त करताना मोदी यांनी नमूद केले की आतापर्यंत ई-संजीवनी अ‍ॅपच्या मदतीने 30 कोटींहून अधिक लोकांनी सल्ला घेतला आहे. ड्रोन तंत्रज्ञानाने आरोग्य सेवा जोडण्याच्या दिशेनेही भारत वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की एक निरोगी आणि सक्षम तरुण पिढीच विकसित भारताचा संकल्प पूर्ण करेल. मोदी यांनी विशेषतः भारतातील डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि इतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कांची कामकोटी पीठम, कांचीपुरमचे जगद्गुरु पीठाधिपती श्री शंकरा विजयेंद्र सरस्वती या वेळी उपस्थित होते. 

 

 

 

 

 

* * *

आशिष सांगळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179935) Visitor Counter : 6