पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतील स्वच्छता कार्यक्रमात पंतप्रधानांनी युवा वर्गाशी साधलेला संवाद (मराठी अनुवाद)

Posted On: 02 OCT 2024 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान: स्वच्छता राखण्याचे काय फायदे आहेत?

विद्यार्थी: सर, त्यामुळे आजार टाळण्यास मदत होते आणि आपण नेहमीच स्वच्छ राहतो. यासोबतच, जर आपला देश स्वच्छ राहिला तर लोकांना पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वही समजेल.

पंतप्रधान: शौचालय नसेल तर काय होईल?

विद्यार्थी: सर, रोगराई पसरेल.

पंतप्रधान: खरोखरच, रोगराई पसरेल. भूतकाळातली स्थिती आठवा, जेव्हा शौचालयांची कमतरता होती, 100 पैकी 60 घरांमध्ये ती नव्हती. लोक उघड्यावर शौचाला जायचे, ते आजारांचे एक प्रमुख कारण बनले. महिलांना, विशेषतः माता, बहिणींना आणि मुलींना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यापासून, आम्ही प्रथम शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र सुविधेची सोय असलेली शौचालये बांधली पाहिजेत याची सुनिश्चिती केली. परिणामी, मुलींचे गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे आणि त्या आता त्यांचे शिक्षण सुरू ठेवत आहेत. तर यातून, स्वच्छता ही फायदेशीर असल्याचेच सिद्ध झाले नाही का?

विद्यार्थी: हो, सर.

पंतप्रधान: आज आपण कोणाची जयंती साजरी करत आहोत?

विद्यार्थी: गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची, सर.

पंतप्रधान: ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी योगाभ्यास करता का?... अरे, खूप छान, तुमच्यापैकी इतके जण करतात. आसने करण्याचे काय फायदे आहेत?

विद्यार्थी: सर, त्यामुळे आपले शरीर अधिक लवचिक होते.

पंतप्रधान: लवचिक, आणखी?

विद्यार्थी: सर, त्यामुळे आजार टाळण्यासही मदत होते आणि रक्ताभिसरण चांगले होते.

पंतप्रधान: छान. आता तुम्हाला घरी काय खायला आवडते? जेव्हा तुमची आई तुम्हाला भाज्या खाण्यास आणि दूध पिण्यास सांगते, तेव्हा तुमच्यापैकी किती जण विरोध करतात किंवा त्याबद्दल वाद घालतात?

विद्यार्थी: आम्ही सर्व भाज्या खातो.

पंतप्रधान: कारल्यासह सर्व भाज्या सगळे जण खातात का?

विद्यार्थी: होय, कारल्याशिवाय.

पंतप्रधान: आह, कारल्याशिवाय.

पंतप्रधान: सुकन्या समृद्धी योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

विद्यार्थी: होय, सर.

पंतप्रधान: ती काय आहे?

विद्यार्थी: सर, ही आपणच सुरू केलेली एक योजना आहे, ज्याचा अनेक मुलींना फायदा होत आहे. 10 वर्षांपर्यंतच्या वयात आम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतो. जेव्हा आम्ही 18 वर्षांचे होऊ, तेव्हा ही योजना आम्हाला आमच्या शिक्षणात खूप मदतीची ठरेल. आम्ही या खात्यातून पैसे काढू शकतो.

पंतप्रधान: अगदी बरोबर. मुलगी जन्माला येताच सुकन्या समृद्धी खाते उघडता येते. पालक दरवर्षी 1,000 रुपये जमा करू शकतात, म्हणजे दरमहिल्याला सुमारे 80 - 90 रुपये होतात. समजा, 18 वर्षांनंतर तिला उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज आहे – तर त्या उद्देशासाठी अर्धी रक्कम काढता येते. आणि, जर ती 21 व्या वर्षी लग्न करत असेल, तर त्या उद्देशासाठीही पैसे काढता येतात. जर 1,000 रुपये नियमितपणे जमा केले, तर पैसे काढण्याच्या वेळी तिला सुमारे 50,000 रुपये मिळतील, ज्यामध्ये सुमारे 30,000 - 35,000 रुपये व्याजाचेच असतील. मुलींसाठी व्याजाचा दर 8.2% आहे, जो सामान्य दरापेक्षा जास्त आहे.

विद्यार्थी: इथे एक तक्ता आहे, त्यात म्हटलेय की आपण शाळेची स्वच्छता करावी, आणि त्यात मुले स्वच्छता करताना दिसत आहेत.

पंतप्रधान: एकदा मी गुजरातमध्ये होतो, आणि तिथे एका शाळेत एक शिक्षक होते, त्यांनी एक उल्लेखनीय काम केले. ती शाळा किनारपट्टीच्या भागात होती, तिथले पाणी खारट होते आणि जमीन नापीक होती, तिथे झाडे किंवा हिरवळ नव्हती. तर शिक्षकांनी काय केले? त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक बिसलेरीची रिकामी बाटली आणि त्यांनी तेलाचे रिकामे डबे दिले, ते त्यांनी स्वच्छ केलेले होते. त्यांनी मुलांना त्यांच्या आईने जेवणानंतर भांडी धुण्यासाठी वापरलेले पाणी दररोज त्या बाटल्यांमध्ये भरून शाळेत आणायची सूचना केली. त्यांनी प्रत्येक मुलासाठी एक झाड नेमून दिले, आणि त्यांनी घरून आणलेले पाणी त्यांच्या झाडाला देण्यासाठी वापरावे असे सांगितले. मी जेव्हा 5-6 वर्षांनंतर त्या शाळेला भेट दिली, तेव्हा संपूर्ण शाळा कोणी कल्पनाही केली नसेल इतकी हिरवीगार झाली होती.

विद्यार्थी: हा सुका कचरा आहे. जर आपण अशा प्रकारे सुका आणि ओला कचरा वेगळा केला, तर त्याची खत बनवण्यात मदत होते.

पंतप्रधान: तर, तुम्ही सर्वजण घरी हे करता का?

पंतप्रधान: जेव्हा तुमची आई भाजी घेण्यासाठी जाते आणि रिकाम्या हाताने निघते, तेव्हा ती प्लास्टिकच्या पिशवीत भाज्या घेऊन येते का? तुमच्यापैकी कोणी तिला समजावता का, की आई, घरातून पिशवी घेऊन जा. तू प्लास्टिक घरी का आणतेस? घरात असा कचरा का आणायचा? तुमच्यापैकी कोणी तिला याची आठवण करून देतात का?

विद्यार्थी: (होय, आम्ही तिला सोबत घेऊन जाण्यास प्रोत्साहित करतो) कापडी पिशव्या सर.

पंतप्रधान: म्हणजे तुम्ही त्यांना सांगता?

विद्यार्थी: होय, सर.

पंतप्रधान: ठीक आहे मग.

पंतप्रधान: हे काय आहे? हा गांधीजींचा चष्मा आहे, आणि गांधीजी तुम्ही स्वच्छता राखत आहात की नाही हे पाहत आहेत असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला आठवत असेल, गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी समर्पित केले. ते नेहमीच कोण स्वच्छता राखतो आणि कोण नाही हे त्यावर लक्ष ठेवून असतात. ते एकदा म्हणाले होते की जर त्यांना स्वातंत्र्य आणि स्वच्छतेपैकी एकाची निवड करायची असेल, तर ते स्वच्छतेची निवड करतील. यावरून त्यांनी स्वच्छतेला, स्वातंत्र्यापेक्षाही किती महत्त्व दिले होते हे दिसून येते. आता मला सांगा, आपली स्वच्छता मोहीम पुढे चालू ठेवली पाहिजे का?

विद्यार्थी: होय सर, आपण ती पुढे नेली पाहिजे.

पंतप्रधान: तर, तुम्हाला काय वाटते, स्वच्छता केवळ एक कार्यक्रम असावा की ती एक सवय बनायला हवी?

विद्यार्थी: ती एक सवय बनायला हवी.

पंतप्रधान: खूप छान. काही लोकांना वाटते की ही स्वच्छता मोहीम मोदीजींचा कार्यक्रम आहे, परंतु सत्य हे आहे की स्वच्छता हे एक दिवसाचे काम नाही, किंवा ती केवळ एका व्यक्तीची किंवा एका कुटुंबाची जबाबदारी नाही. ही आयुष्यभराची वचनबद्धता आहे — वर्षाचे 365 दिवस, जोपर्यंत आपण जगतो आहोत तोपर्यंतची. यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला एका मानसिकतेची , एका मंत्राची गरज आहे. कल्पना करा की देशातील प्रत्येक नागरिकाने कचरा न करण्याची शपथ घेतली तर, काय होईल?

विद्यार्थी: तर मग स्वच्छतेचे वातावरण निर्माण होईल.

पंतप्रधान: अगदी बरोबर. तर, आता तुम्ही कोणती सवय लावली पाहिजे? कचरा न करण्याची सवय — हे पहिले पाऊल आहे. आले लक्षात ?

विद्यार्थी: होय, सर.

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179871) Visitor Counter : 10