पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून साजऱ्या केलेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले


अभिधम्म धम्मात सामावले आहे, धम्माचे सार समजून घेण्यासाठी पाली भाषेचे ज्ञान आवश्यक आहे: पंतप्रधान

भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही, भाषा ही सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा आहे: पंतप्रधान

प्रत्येक राष्ट्र आपल्या वारशाला आपल्या ओळखीशी जोडते, दुर्दैवाने भारत या दिशेने खूप मागे राहिला होता, परंतु देश आता न्यूनगंडापासून मुक्त होऊन पुढे जात आहे, मोठे निर्णय घेत आहे: पंतप्रधान

नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत देशातील तरुणांना स्वतःच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा पर्याय मिळाल्यापासून भाषा अधिक मजबूत होत आहेत: पंतप्रधान

आज भारत एकाच वेळी जलद विकास आणि समृद्ध वारसा या दोन्ही संकल्पांची पूर्तता करण्यात गुंतलेला आहे: पंतप्रधान

भगवान बुद्धांच्या वारशाच्या पुनर्जागरणात भारत आपली संस्कृती आणि सभ्यता पुन्हा निर्माण करत आहे: पंतप्रधान

भारताने महायुद्ध दिले नाही, तर बुद्ध दिले आहेत: पंतप्रधान

आज अभिधम्म पर्वानिमित्त मी संपूर्ण जगाला युद्धाचा नाही तर शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांच्या शिकवणीत उपाय शोधण्याचे आवाहन करतो: पंतप्रधान

भगवान बुद्धांचा प्रत्येकासाठीचा समृद्धीचा संदेश म्हणजे मानवतेचा मार्ग आहे: पंतप्रधान

भारताने आपल्या विकासासाठी बनवलेल्या पथदर्शीमध्ये भगवान बुद्धांची शिकवण मार्गदर्शन करेल: पंतप्रधान

भगवान बुद्धांची शिकवण मिशन लाईफच्या केंद्रस्थानी आहेत, शाश्वत भविष्याचा मार्ग प्रत्येक व्यक्तीच्या शाश्वत जीवनशैलीतून उदयास येईल: पंतप्रधान

भारत विकासाकडे वाटचाल करत आहे आणि स्वतःची मुळे मजबूत करत आहे, भारतातील तरुणांनी केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातच जगाचे नेतृत्व करावे असे नाही तर आपल्या संस्कृती आणि मूल्यांचा अभिमान देखील बाळगावा: पंतप्रधान

Posted On: 17 OCT 2024 12:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस आणि पालीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून साजऱ्या केलेल्या समारंभात भाषण केले. अभिधम्म दिवस हा अभिधम्माची शिकवण घेतल्यानंतर भगवान बुद्धांच्या स्वर्गीय अवतरणाचे स्मरण करतो. अलिकडेच पालीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या वर्षीच्या अभिधम्म दिवस उत्सवाचे महत्त्व वाढले आहे कारण भगवान बुद्धांची अभिधम्मावरील शिकवण मूलतः पाली भाषेत उपलब्ध आहे.

या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी अभिधम्म दिवसाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, की हा प्रसंग लोकांना प्रेम आणि करुणेने जगाला एक चांगले स्थान बनवण्याची आठवण करून देतो. मोदी यांनी गेल्या वर्षी कुशीनगरमध्ये झालेल्या अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, की भगवान बुद्धांशी जोडण्याचा प्रवास आपल्या जन्मापासून सुरू झाला असून तो आजही सुरू आहे. पंतप्रधानांनी माहिती दिली, की त्यांचा जन्म गुजरातमधील वडनगर येथे झाला होता, जे एकेकाळी बौद्ध धर्माचे उल्लेखनीय केंद्र होते आणि तेच त्यांना भगवान बुद्धांच्या धम्म आणि शिकवणींबद्दलच्या अनुभवांना प्रेरणा देणारे ठरले. 

गेल्या 10 वर्षांत भगवान बुद्धांशी संबंधित असंख्य शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या भारत आणि जगातल्या विविध संधींचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि नेपाळमधील भगवान बुद्धांच्या जन्मस्थळाला भेट देणे, मंगोलियामध्ये भगवान बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण करणे आणि श्रीलंकेतील वैशाख समारंभ यांची उदाहरणे दिली. संघ आणि साधक यांचे एकत्रीकरण हे भगवान बुद्धांच्या आशीर्वादाचे परिणाम आहेत, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आणि या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. शरद पौर्णिमेच्या शुभ प्रसंगाची आणि महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीची त्यांनी नोंद घेतली. पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावर्षीचा अभिधम्म दिवस विशेष असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला कारण भगवान बुद्धांनी ज्या पाली भाषेत प्रवचन दिले होते तिला भारत सरकारने याच महिन्यात अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. म्हणूनच, त्यांनी पुढे म्हटले की, आजचा हा प्रसंग आणखी विशेष होता. अभिजात भाषेचा दर्जा देऊन पालीला मिळालेला सन्मान हा भगवान बुद्धांच्या महान वारशाला आणि संपदेला आदरांजली आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी पुढे म्हणाले की, अभिधम्म धम्मात सामावलेला आहे आणि धम्माचे खरे सार समजून घेण्यासाठी पाली भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. धम्माचे विविध अर्थ स्पष्ट करताना मोदी म्हणाले, की धम्म म्हणजे भगवान बुद्धांचा संदेश आणि सिद्धांत, मानवी अस्तित्वाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे, मानवजातीसाठी शांतीचा मार्ग, बुद्धांची शाश्वत शिकवण आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दृढ आश्वासन. त्यांनी पुढे सांगितले की, संपूर्ण जग बुद्धाच्या धम्माने सतत प्रबुद्ध होत आहे.

पंतप्रधान म्हणाले की दुर्दैवाने भगवान बुद्धांची बोलण्याची पाली भाषा आता सामान्य वापरात नाही. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर संस्कृती आणि परंपरेचा आत्मा असतो, हे अधोरेखित करून ती मूलभूत अभिव्यक्तींशी जोडलेली आहे असे पंतप्रधान म्हणाले आणि आजच्या काळात पाली भाषा जिवंत ठेवणे ही सामायिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या सरकारने ही जबाबदारी नम्रतेने पार पाडली आहे आणि भगवान बुद्धांच्या कोट्यवधी शिष्यांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

"कोणत्याही समाजाची भाषा, साहित्य, कला आणि अध्यात्माचा वारसा हा त्याच्या अस्तित्वाला परिभाषित करतो", असे पंतप्रधानांनी सांगितले. कोणत्याही देशाने शोधलेले कोणतेही ऐतिहासिक अवशेष किंवा कलाकृती संपूर्ण जगासमोर अभिमानाने सादर केल्या जातात हे अधोरेखित करून ते म्हणाले की, जरी प्रत्येक राष्ट्र आपापल्या वारशाला ओळखीशी जोडत असले तरी, स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या आक्रमणांमुळे तसेच स्वातंत्र्यानंतर गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे भारत मागे राहिला. पंतप्रधानांनी यावर भर दिला की भारत एका अशा परिसंस्थेने ताब्यात घेतला होता ज्याने राष्ट्राला उलट दिशेने ढकलण्याचे काम केले. ते म्हणाले की, भारताच्या आत्म्यात राहणारे बुद्ध आणि स्वातंत्र्याच्या वेळी स्वीकारलेली त्यांची प्रतीके नंतरच्या दशकांमध्ये विसरली गेली. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही पाली भाषेला स्वतःचे योग्य स्थान मिळाले नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की देश आता त्या न्यूनगंडातून बाहेर पडून पुढे जात आहे आणि मोठे निर्णय घेत आहे. ते म्हणाले की एकीकडे पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर दुसरीकडे मराठी भाषेलाही तोच आदर दिला जात आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की बाबासाहेब आंबेडकरांची मातृभाषा मराठी होती, ते देखील बौद्ध धर्माचे मोठे समर्थक होते आणि त्यांची धम्मदीक्षा पाली भाषेत होती. मोदी यांनी बंगाली, आसामी आणि प्राकृत भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतही भाष्य केले.

"भारतातील विविध भाषा आपल्या विविधतेचे पोषण करतात", असे पंतप्रधान म्हणाले. भूतकाळातील भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी यांनी सांगितले की, आपल्या प्रत्येक भाषेने राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज भारताने स्वीकारलेले नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे देखील या भाषांचे जतन करण्याचे माध्यम बनत आहे. देशातील तरुणांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा पर्याय मिळाल्यापासून मातृभाषा अधिक मजबूत होत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले.

आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने लाल किल्ल्यावरून 'पंच प्राण' चे स्वप्न पुढे आणले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंच प्रणची कल्पना स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, याचा अर्थ विकसित भारताची निर्मिती, गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्तता, देशाची एकता, कर्तव्यांची पूर्तता आणि आपल्या वारशाचा अभिमान असा होता. ते पुढे म्हणाले की, आज भारत जलद विकास आणि समृद्ध वारसा या दोन्ही संकल्पांची एकाच वेळी पूर्तता करण्यात गुंतलेला आहे. पंच प्रण मोहिमेचे प्राधान्य भगवान बुद्धांशी संबंधित वारशाचे जतन करण्याला असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

भारत आणि नेपाळमधील भगवान बुद्धांशी संबंधित स्थळांच्या विकास प्रकल्पांना बुद्ध सर्किट म्हणून सूचीबद्ध करताना मोदी म्हणाले, की कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले आहे, लुंबिनीमध्ये भारत आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संस्कृती आणि वारसा केंद्र बांधले जात आहे, लुंबिनी येथील बौद्ध विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट अभ्यास अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे, तसेच बोधगया, श्रावस्ती, कपिलवस्तू, सांची, सतना आणि रेवा अशा अनेक ठिकाणी सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन ते 20 ऑक्टोबर 2024 रोजी करणार आहेत. त्यांनी असेही सांगितले की, सरकार भारताच्या समृद्ध भूतकाळाचे जतन करण्यासाठी देखील प्रयत्न करत आहे. मोदी यांनी यावर भर दिला की सरकारने गेल्या दशकात 600 हून अधिक प्राचीन वारसा कलाकृती आणि अवशेष भारतात परत आणले आहेत, त्यापैकी बरेच बौद्ध धर्माशी संबंधित होते. त्यांनी स्पष्ट केले की बुद्धाच्या वारशाच्या पुनर्जागरणात भारत आपली संस्कृती आणि सभ्यता नवीन पद्धतीने सादर करत आहे. केवळ राष्ट्राच्या हितासाठीच नव्हे तर मानवतेच्या सेवेसाठी भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रचार करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की बुद्धांच्या शिकवणीचे पालन करणाऱ्या देशांना एकत्र करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत आणि म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड सारखे अनेक देश सक्रियपणे पाली भाषेतील भाष्ये संकलित करत आहेत. मोदी यांनी अधोरेखित केले, की सरकार ऑनलाइन प्लॅटफॉर्म, डिजिटल संग्रह आणि ॲप्स वापरून पाली भाषेचा प्रचार करण्यासाठी भारतात पारंपरिक पद्धती आणि आधुनिक दृष्टिकोन एकत्र आणून अशाच प्रकारच्या प्रयत्नांना गती देत आहे. भगवान बुद्धांना समजून घेण्यासाठी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी म्हणाले, "बुद्ध म्हणजे ज्ञान आणि चौकशी दोन्ही आहे", बुद्धांच्या शिकवणीमध्ये आंतरिक शोध आणि शैक्षणिक संशोधन दोन्हीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. युवावर्गाला या मोहिमेकडे आकर्षित करण्यासाठी बौद्ध संस्था आणि भिक्षूंनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. 

21 व्या शतकातील वाढत्या जागतिक अस्थिरतेचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की बुद्धांची शिकवण आजच्या जगात केवळ प्रासंगिकच नाही तर अत्यावश्यक देखील आहे. संयुक्त राष्ट्रांकडून मिळालेल्या संदेशाचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान म्हणाले की, “भारताने जगाला युद्ध दिले नाही तर बुद्ध दिले आहेत”. जगाला युद्धात नाही तर भगवान बुद्धांमध्ये उपाय सापडतील, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी जगाला बुद्धांकडून शिकण्याचे, युद्ध नाकारण्याचे आणि शांतीचा मार्ग प्रशस्त करण्याचे आवाहन केले. भगवान बुद्धांचे शब्द उद्धृत करत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की शांतीपेक्षा मोठा आनंद नाही; सूड उगवल्याने सूड पूर्ण होत नाही आणि केवळ करुणा आणि मानवतेच्या माध्यमातूनच द्वेषावर मात करता येते. त्यांनी भगवान बुद्धांचा सर्वांसाठी आनंद आणि कल्याणाचा संदेश दिला.

भारताने 2047 पर्यंत येणारी 25 वर्षे हा अमृत काळ असल्याचे ओळखले आहे, हे लक्षात घेऊन मोदी म्हणाले की, हा अमृत काळ भारताच्या प्रगतीचा काळ असेल, एक विकसित भारत निर्माण करण्याचा काळ असेल जिथे भगवान बुद्धांची शिकवण भारताने स्वतःच्या विकासासाठी बनवलेल्या पथदर्शीला मार्गदर्शन करेल. ते पुढे म्हणाले की, आज जगातील सर्वात मोठी लोकसंख्या संसाधनांच्या वापराबद्दल जागरूक आहे, हे केवळ बुद्धांच्या भूमीवरच शक्य आहे. संपूर्ण जगाला भेडसावत असलेल्या हवामान बदलाच्या संकटाविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, भारत स्वतःहून या आव्हानांवर केवळ उपाय शोधत नाही तर ते जगासोबत सामायिक करत आहे. ते पुढे म्हणाले की, भारताने जगातील अनेक देशांना सोबत घेऊन मिशन लाईफ सुरू केले आहे. 

भगवान बुद्धांची शिकवण उद्धृत करताना मोदी म्हणाले की कोणत्याही प्रकारच्या चांगुलपणाची सुरुवात स्वतःपासूनच करावी हा मिशन लाईफच्या कल्पनेचा केंद्रबिंदू आहे. त्यांनी पुढे सांगितले की शाश्वत भविष्याचा मार्ग प्रत्येक व्यक्तीच्या शाश्वत जीवनशैलीतून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे व्यासपीठ, जी-20 च्या अध्यक्षपदाच्या काळात जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना, एक सूर्य, एक जग, एक ग्रिडचे स्वप्न यासारखे भारताचे जगासाठी योगदान लक्षात घेऊन मोदी म्हणाले की हे सर्व भगवान बुद्धांच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. त्यांनी पुढे म्हटले की भारताचा प्रत्येक प्रयत्न जगाचे शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठीच आहे. पंतप्रधानांनी भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक संचार मार्ग, भारताचे हरित हायड्रोजन अभियान, 2030 पर्यंत भारतीय रेल्वेसाठी निव्वळ शून्य लक्ष्य, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढवणे यासारख्या विविध उपक्रमांकडे लक्ष वेधले. या सर्व उपायांनी पृथ्वीचे रक्षण करण्याचा भारताचा दृढ हेतू दर्शविला असल्याचे ते म्हणाले. 

सरकारचे अनेक निर्णय बुद्ध, धम्म आणि संघापासून प्रेरित आहेत, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आणि जगातील संकटाच्या वेळी भारत प्रथम प्रतिसाद देणारा असल्याचे उदाहरण दिले. तुर्कीमधील भूकंप, श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि कोविड-19 साथीच्या आजारासारख्या जागतिक आपत्कालीन परिस्थितीत देशाने केलेल्या जलद कृतींवर त्यांनी प्रकाश टाकला. हे बुद्धांच्या करुणेच्या तत्त्वाचे प्रतिबिंब आहे असे त्यांनी नमूद केले. "विश्वबंधू (जगाचा मित्र) म्हणून भारत सर्वांना सोबत घेऊन चालला आहे", असे त्यांनी नमूद केले. योग, भरड धान्ये, आयुर्वेद आणि नैसर्गिक शेती यासारखे उपक्रम भगवान बुद्धांच्या शिकवणीने प्रेरित आहेत असे ते म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, “विकासाकडे वाटचाल करणारा भारत आपली मुळेही मजबूत करत आहे”. भारतातील तरुणांनी आपली संस्कृती आणि मूल्यांचा अभिमान बाळगून विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करावे, असे ध्येय‌ बाळगावे, असे त्यांनी सांगितले. या प्रयत्नांमध्ये बौद्ध धर्माची शिकवण आपली सर्वात मोठी मार्गदर्शक आहे, असे त्यांनी सांगितले आणि भगवान बुद्धांच्या शिकवणीसह भारत प्रगती करत राहील, असा विश्वास व्यक्त केला. 

या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.

पार्श्वभूमी

भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशनने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस सोहोळ्यात 14 देशांतील शिक्षणतज्ज्ञ आणि भिक्षू आणि भारतातील विविध विद्यापीठांमधील बुद्ध धम्मावरील तरुण तज्ञांचा लक्षणीय सहभाग होता.

 

 

* * *

नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179644) Visitor Counter : 6