पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 09 OCT 2024 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2024

 

नमस्कार!

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, श्री अजित पवार जी, इतर सर्व मान्यवर आणि महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो…!

महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त बंधु आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार.

आज महाराष्ट्राला 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची भेट मिळत आहे. त्यासोबतच दोन महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प देखील सुरू झाले आहेत — ते म्हणजे नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्तार तसेच शिर्डी विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीचे बांधकाम. या सर्व विकास प्रकल्पांसाठी मी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो. मागील आठवड्यातच मी ठाणे आणि मुंबईला भेट दिली. या भेटीत 30,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे, ज्यात मेट्रो लाईनचाही समावेश आहे, उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले. त्यापूर्वीही अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो कोटी रुपये मूल्यांचे विकास प्रकल्प सुरू करण्यात आले. अनेक शहरांत मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. काही विमानतळांचे अद्यतनीकरण सुरू आहे. रस्ते आणि महामार्ग प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहेत. पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि वस्त्रोद्योग उद्याने (टेक्सटाईल पार्क्स) यांसारख्या अनेक क्षेत्रांत नवे प्रकल्प सुरू झाले आहेत. शेतकरी आणि पशुपालकांच्या हितासाठी नवनव्या योजना राबविण्यात येत आहेत. देशातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदर असणाऱ्या – वाढवण बंदराच्या – पायाभरणीचा शुभारंभ देखील महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही एवढ्या वेगाने आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रांत विकास झाला नव्हता. हो, हे मात्र खरे आहे की, काँग्रेसच्या काळात इथे एवढ्याच वेगाने आणि एवढ्याच प्रमाणात भ्रष्टाचार होत असे.

बंधूंनो आणि भगिनींनो,

काही दिवसांपूर्वीच आम्ही मराठी भाषेला “अभिजात भाषेचा” दर्जा दिला आहे. जेव्हा एखाद्या भाषेला योग्य सन्मान मिळतो, तेव्हा केवळ शब्दांना नाही तर संपूर्ण पिढीला नवे विचार, नवी अभिव्यक्ती मिळते. कोट्यवधी मराठी जनतेचे दशकांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या आनंदाचा उत्सव साजरा झाला. आजही मला महाराष्ट्रातील असंख्य गावांमधून शुभेच्छा आणि आनंदाचे संदेश येत आहेत. या संदेशात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल लोक आभार प्रकट करत आहेत — पण मी स्पष्ट सांगू इच्छितो की, हे मी एकट्याने केलेले नाही. हे तुमच्या आशीर्वादांमुळे शक्य झाले. महाराष्ट्रातील प्रत्येक विकासप्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या महान विभूतींच्या आशीर्वादानेच साकार होत आहेत. 

मित्रांनो,

कालच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे निकाल आले. हरियाणाने देशाला स्पष्ट संदेश दिला आहे! दोन कार्यकाळ पूर्ण करून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणे ऐतिहासिक बाब आहे. काँग्रेसची संपूर्ण “प्रणाली” — त्यातले शहरी नक्षल गटही — जनतेची दिशाभूल करण्यात गुंतले होते. पण काँग्रेसच्या सर्व कटकारस्थानांचा चुराडा झाला. त्यांनी दलित समाजात खोट्या धारणा पेरण्याचा प्रयत्न केला, पण दलित समाजाने त्यांचा हेतू ओळखले. दलितांच्या लक्षात आले की काँग्रेस त्यांचे आरक्षण काढून आपल्या मतपेढीसाठी ते वाटू पाहत आहे. आज हरियाणातील दलित समाजाने भाजपा वर विक्रमी प्रमाणात विश्वास दाखवला आहे. भाजपाने केलेला विकास लक्षात घेत हरियाणाचा ओबीसी समाजदेखील भाजपासोबत उभा आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांना माहित आहे की त्यांना त्यांच्या पिकासाठी किमान आधारभूत किंमत कोण देतं. हरियाणाचे शेतकरी भाजपाच्या कल्याणकारी योजनांमुळे समाधानी आहेत. काँग्रेसने तरुणांनाही भुलवण्याचा प्रयत्न केला, पण हरियाणातील स्त्री, पुरुष आणि लेकी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपावर विश्वास ठेवतात. काँग्रेसने शक्य ते सर्व मार्ग अवलंबले, मात्र हरियाणाच्या जनतेने दाखवून दिलं की आता ते काँग्रेसच्या आणि शहरी नक्षल कटकारस्थानांना बळी पडणार नाहीत.

मित्रांनो,

काँग्रेसने नेहमीच “फोडा आणि राज्य करा” या नीती नुसार वाटचाल केली आहे. कॉंग्रेस एक बेजबाबदार पक्ष असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. देशाचे विभाजन करण्याच्या हेतूने काँग्रेस सतत वेगवेगळ्या गोष्टी रचत आहे. कॉंग्रेसने नेहमीच मतदारांची दिशाभूल केली आहे. काँग्रेसची सूत्रे स्पष्ट आहेत — मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करा, त्यांना मतपेढी बनवा आणि काळाबरोबर आपली मतपेढी मजबूत करा. पण मुस्लिम समाजातील जातीभेदांबद्दल काँग्रेसमधील कुठलाही नेता कधीही बोलत नाही. मुस्लिम जातींचा मुद्दा येताच कॉंग्रेसचे नेते मौन बाळगतात. आणि जशी हिंदू समाजाविषयी चर्चा होते, काँग्रेस लगेच जातीयवादाचा मुद्दा समोर आणते. हिंदूंच्या एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभे करणे, ही काँग्रेसची युक्ती आहे. कारण त्यांना माहित आहे की हिंदू समाज जितका विभागला जाईल, तितका त्यांचा जास्त फायदा होईल. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस हिंदू समाजात अस्थिरता निर्माण करू पाहते आहे. हा फॉर्म्युला ते देशभरातील प्रत्येक निवडणुकीत वापरत आहे. काँग्रेसने मते मिळवण्याच्या उद्देशाने समाजात विष पसरविण्याचे सर्व मार्ग वापरत आहे. काँग्रेस संपूर्णपणे धार्मिक आणि जातीय राजकारणात गुंतली आहे. हिंदू समाजाचे विभाजन करून आपला सत्ता प्राप्तीचा मार्ग मोकळा करणे हाच काँग्रेसच्या राजकारणाचा मूलाधार आहे. काँग्रेसने “सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय” या तत्त्वाचा आणि सनातन परंपरेचा गळा दाबला आहे. देशावर अनेक वर्षे राज्य केल्यानंतर आज काँग्रेस सत्तालालसेने इतकी पछाडलेली आहे की ते दररोज द्वेषाचे राजकारण करत आहेत. काँग्रेसमधील वरिष्ठ नेतेही आज त्यांच्या पक्षाच्या अवस्थेमुळे हतबल आणि निराश झाले आहेत. आज काँग्रेस पक्ष द्वेषाची सर्वात मोठी फॅक्टरी बनण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्यानंतरच महात्मा गांधींनी या पक्षाचे खरे स्वरूप ओळखले होते, म्हणूनच त्यांनी काँग्रेस विसर्जित झाली पाहिजे असे म्हटले होते. काँग्रेस विसर्जित तर झालीच नाही, पण आज ती देशाचे नुकसान करण्यावरच आपली उर्जा खर्च करत आहे. म्हणूनच, आपल्याला सतर्क राहायला हवे.

बंधूंनो आणि भगिनींनो,

मला पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्राची जनता समाजात फूट पाडण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडेल. महाराष्ट्रातील जनता राष्ट्रीय विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत, एकत्र येऊन भाजप आणि महायुतीला मतदान करेल, याची मला खात्री आहे.

हरियाणा जिंकल्यानंतर आता आपल्याला महाराष्ट्रात अजून मोठा विजय मिळवायचा आहे.

मित्रांनो,

गेल्या 10 वर्षांमध्ये देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधाविकासाचे भव्य अभियान आपण सुरू केले आहे. आज आपण केवळ इमारती बांधत नाही तर आपण एका सुदृढ आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत. एकाच वेळी 10 नव्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन ही केवळ संस्था उभारण्याची गोष्ट नाही, तर ती लाखो लोकांचे जीवन सुधारण्याच्या महायज्ञाचा प्रारंभ आहे. ठाणे-अंबरनाथ, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली येथे उभारण्यात येत असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयांचा लाभ या जिल्ह्यांतील तसेच आसपासच्या भागातील लाखो कुटुंबांना मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश 900 ने वाढतील, आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण प्रवेश संख्या सुमारे 6,000 वर पोहोचेल. देशाने या वर्षी लाल किल्ल्यावरून वैद्यकीय पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमात 75,000 नव्या जागांची भर घालण्याचा संकल्प केला आहे. आजचा हा कार्यक्रम त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

मित्रांनो, 

आपण वैद्यकीय शिक्षणाची उपलब्धता अधिक सुलभ केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील युवकांसाठी संधींची नवी दारे उघडली आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील अधिकाधिक मुलांनी डॉक्टर बनून आपली स्वप्ने पूर्ण करावीत, याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. एकेकाळी वैद्यकीय शिक्षणासाठी मातृभाषेतील पाठ्यपुस्तकांचा अभाव ही मोठी अडचण होती. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आम्ही ही तफावत दूर केली आहे. आता महाराष्ट्रातील युवक मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतात. मराठीतून अभ्यास केल्यामुळे त्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न सहज पूर्ण करता येईल.

मित्रांनो,

जनतेचे जीवन सुलभ करणे, ही आमच्या सरकारची गरीबीविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी ताकद आहे. काँग्रेससारख्या पक्षांनी गरिबीचा वापर राजकारणासाठी इंधन म्हणून केला, म्हणूनच त्यांनी गरीबांना कायम गरीबच ठेवले. मात्र, गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेखालून बाहेर काढले आहे. यामागे आरोग्यसेवेत झालेला आमूलाग्र बदल हा सर्वात मोठा घटक आहे. आज प्रत्येक गरीब व्यक्तीकडे मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड आहे. आता 70 वर्षांवरील सर्व नागरिकांनाही मोफत आरोग्यसेवा मिळत आहे. जनऔषधी केंद्रांवर अत्यावश्यक औषधे अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. हृदयात बसवले जाणारे स्टेंट्स 80 ते 85 टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत. कर्करोग उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमतींमध्येही मोठी घट केली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची संख्या वाढल्याने वैद्यकीय उपचार अधिक स्वस्त झाले आहेत. आज देशातील अगदी सर्वात गरीब नागरिकालाही मजबूत सामाजिक सुरक्षा कवच मिळाले आहे, आणि हे मोदी सरकारमुळे शक्य झाले आहे.

मित्रांनो,

जग केवळ त्याच देशावर विश्वास ठेवते जिथले युवक विश्वासाने भरलेले असतात. आज भारतातील युवकांचा आत्मविश्वास देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन कथा लिहित आहे. जगातील प्रमुख राष्ट्रे आज भारताकडे मानवी संसाधनांचे प्रमुख केंद्र म्हणून पाहत आहेत. शिक्षण, आरोग्य, सॉफ्टवेअर अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या युवकांसाठी अपार संधी आहेत. म्हणूनच आम्ही देशातील युवकांना जागतिक निकषांनुसार कौशल्यपूर्ण बनवत आहोत. आज महाराष्ट्रात विद्या समीक्षा केंद्रासारख्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येत आहे. मुंबईत आजच भारतीय प्रशिक्षण संस्थेचेही उद्घाटन झाले आहे. या संस्थेत युवकांना भविष्योन्मुख प्रशिक्षण दिले जाईल. बाजाराच्या मागणीनुसार युवकांमध्ये कौशल्य विकास केला जाईल. आमच्या सरकारने युवकांसाठी मानधनासह अंतर्वासिता योजना देखील सुरू केली आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आता युवकांना अंतर्वासितेदरम्यान 5,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. हजारो कंपन्या या उपक्रमात सहभागी होत असून, तरुणांना प्रशिक्षण आणि संधी देण्यासाठी नोंदणी करत आहेत. ही योजना युवकांचा पाया मजबूत करेल, त्यांना नवे अनुभव देईल आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवे दरवाजे उघडेल.

बंधूंनो आणि भगिनींनो,

भारतीय युवकांसाठी चाललेल्या या प्रयत्नांचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. आज आपल्या शिक्षणसंस्था जगातील सर्वोत्तम संस्थांच्या बरोबरीने उभ्या आहेत. कालच प्रसिद्ध झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार, भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनाची गुणवत्ता सातत्याने सुधारत आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण जग भारताकडे लक्षपूर्वक पाहत आहे. भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य आता भारताशी जोडले गेले आहे. या आर्थिक प्रगतीमुळे देशात नव्या संधींचा वर्षाव होत आहे. काँग्रेसने अनेक दशकांपासून दुर्लक्षित ठेवलेल्या अनेक क्षेत्रांत आज प्रचंड संधी निर्माण होत आहेत. पर्यटन हे त्यापैकीच एक क्षेत्र आहे. महाराष्ट्राकडे अमूल्य सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. निसर्गसंपदा, डोंगर, समुद्रकिनारे आणि अध्यात्मिक स्थळे, असे वरदान महाराष्ट्राला लाभले आहे. या स्थळांभोवती अब्जावधी रुपयांची अर्थव्यवस्था उभारली जाऊ शकली असती, पण काँग्रेस सरकारांने त्या संधींकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. त्यांना “विकास” आणि “वारसा” दोन्हींतही रस नव्हता. आमच्या सरकारच्या कार्यकाळात मात्र विकास आणि वारसा दोन्ही हातात हात घालून पुढे जात आहेत. आम्ही उज्ज्वल भविष्याची निर्मिती करत आहोत, आणि त्या भविष्याचा प्रेरणास्रोत आपला समृद्ध भूतकाळ आहे. आज आपण शिर्डी विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन केले, नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू केले आणि महाराष्ट्रभर अनेक विकासकामे सातत्याने सुरू आहेत. शिर्डी विमानतळावरील नवे टर्मिनल श्री साईबाबांच्या भक्तांसाठी अत्यंत सोयीचे ठरेल. देशभरातून आणि विदेशातून लाखो भाविक शिर्डीत सहज येऊ शकतील. काही दिवसांपूर्वीच मी सोलापूर विमानतळाच्या अद्यतनीकरणाचेही उद्घाटन केले. जेव्हा भाविक एका तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी येतील, तेव्हा ते शनी शिंगणापूर, तुळजाभवानी, कैलास मंदिर यांसारख्या इतर स्थळांना देखील अवश्य भेट देतील. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

मित्रांनो,

आमच्या सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक योजना एका ध्येयासाठी समर्पित आहे, ते म्हणजे ‘विकसित भारत’! या ध्येयासाठी आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे - गरीब, शेतकरी, युवक आणि महिला यांचे कल्याण. म्हणूनच आमच्या प्रत्येक विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे — गाव, गरीब, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाचा विकास. शिर्डी विमानतळावर बांधला जाणारा स्वतंत्र कार्गो कॉम्प्लेक्स शेतकऱ्यांसाठी मोठा मदतगार ठरेल. याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पादने देशभर आणि विदेशात पाठवली जाऊ शकतील. शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक परिसरातील शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल. त्यांची कांदे, द्राक्षे, शेवग्याच्या शेंगा, पेरू, डाळिंब यांसारखी उत्पादने मोठ्या बाजारपेठांपर्यंत सहज पोहोचतील.

बंधूनो आणि भगिनींनो,

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असणारे निर्णय सातत्याने घेत आहे. बासमती तांदळावरील किमान निर्यात किंमत आम्ही रद्द केली आहे. बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी देखील उठवली आहे. अर्ध-उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क निम्मे केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून कांद्यावरील निर्यात कर देखील आम्ही निम्मा केला आहे. तसेच, देशातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या किमती मिळाव्यात म्हणून आम्ही काही आयातींवर शुल्क वाढवले आहे. खाद्यतेलांच्या आयातीवर 20% कर लावला आहे. रिफाईंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर सीमाशुल्क मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. याचा फायदा कोणाला होईल? याचा फायदा आपल्या देशातील शेतकरी बांधवांना होईल. त्यांना मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल यांसारख्या पिकांसाठी चांगला बाजारभाव मिळेल. वस्त्रोद्योग क्षेत्राला मिळालेल्या सरकारी पाठबळामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा लाभ झाला आहे.

मित्रांनो,

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, महा-आघाडी सत्तेसाठी महाराष्ट्राला कमजोर बनवू पाहते आहे, तर महायुतीचा संकल्प आहे — महाराष्ट्राला मजबूत बनवण्याचा! मला आनंद आहे की आज महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाच्या विकासाच्या मार्गदर्शनासाठी पुढे सरसावला आहे. या सर्व विकास उपक्रमांसाठी मी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

आपल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

टीप: हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांच्या भूमिपूजनावेळी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद आहे. पंतप्रधानांनी हिंदीत भाषण केले होते. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2178971) Visitor Counter : 7