पंतप्रधान कार्यालय
झारखंडमधील हजारीबाग येथील विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
Posted On:
02 OCT 2024 4:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2024
नमस्कार (जोहार)
झारखंडचे माननीय राज्यपाल संतोष गंगवार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुआल ओराम जी, माझे सहकारी मंत्री आणि या भूमीची कन्या, अन्नपूर्णा देवी जी, संजय सेठ जी, दुर्गदास उईके जी, या मतदारसंघाचे खासदार श्री मनीष जयस्वाल जी, सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो!
आज, मला पुन्हा एकदा झारखंडच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच मी जमशेदपूरला भेट दिली होती. मी झारखंडच्या हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे, जमशेदपूर येथून उद्घाटन केले. झारखंडमधील हजारो गरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांची स्वतःची कायमची घरे मिळाली. आणि काही दिवसांतच मी आता पुन्हा येथे आलो आहे. आज, झारखंडमध्ये 80,000 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे किंवा त्यांची पायाभरणी होत आहे. हे प्रकल्प आदिवासी समुदायाच्या कल्याण आणि उन्नतीशी संबंधित आहेत. हे प्रकल्प देशभरातील आदिवासी समुदायासाठी भारत सरकार देत असलेल्या प्राधान्यक्रमाचे प्रतीक आहेत. या विकास उपक्रमांसाठी मी झारखंड आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांचे मनापासून अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज पूज्य बापू महात्मा गांधी यांची जयंती आहे. आदिवासी विकासाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि विचार हे आपल्यासाठी एक अमूल्य संचित आहे. आदिवासी समुदायाची वेगाने प्रगती झाली; तरच भारताचा विकास होऊ शकतो असे गांधीजी मानत असत. आज आपले सरकार आदिवासी समुदायाच्या उन्नतीवर पूर्वीपेक्षा जास्त लक्ष केंद्रित करत आहे याचा मला आनंद होत आहे. मी नुकतीच एक व्यापक मोहीम, धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केली आहे. या योजनेवर सुमारे 80,000 कोटी रुपये खर्च केले जातील. धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत 550 जिल्ह्यांतील सुमारे 63,000 आदिवासी बहुल गावांचा विकास केला जाईल. या आदिवासी बहुल गावांमधील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. या उपक्रमाचा देशभरातील माझ्या 5 कोटींहून अधिक आदिवासी बंधू-भगिनींना लाभ होईल. झारखंडमधील आदिवासी समुदायालाही या उपक्रमाचा मोठा लाभ होईल.
मित्रांनो,
भगवान बिरसा मुंडा यांच्या भूमीतून धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आरंभ होत आहे याचा मला आनंद होत आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमध्येही पंतप्रधान-जनमान योजना सुरू करण्यात आली. पुढील महिन्यात, आपण 15 नोव्हेंबर रोजी जनजातिय गौरव दिनाच्या दिवशी पंतप्रधान-जनमान योजनेचा पहिला वर्धापन दिन साजरा करू. एकेकाळी मागास असलेल्या या भागात पंतप्रधान-जनमान योजनेच्या माध्यमातून, आता या आदिवासी भागात विकास पोहोचत आहे, जिथे कोणीही लक्ष दिले नव्हते. आज, पंतप्रधान-जनमान योजनेअंतर्गत, सुमारे 1300 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत या सर्वात मागासलेल्या आदिवासी भागात जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षण, आरोग्यसेवा आणि रस्ते सुविधा पुरविल्या जातील.
बंधू आणि भगिनींनो,
फक्त एका वर्षात, झारखंडमध्ये पंतप्रधान-जनमान योजनेने अनेक टप्पे गाठले आहेत. 950 हून अधिक मागासलेल्या गावांमध्ये, प्रत्येक घरात पाणी पुरवण्याचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात पस्तीस वन धन विकास केंद्रांनाही मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, दुर्गम आदिवासी भागांना मोबाईल कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे काम सुरू आहे. हा विकास, हा बदल, आपल्या आदिवासी समुदायाला प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देईल.
मित्रांनो,
जेव्हा आदिवासी तरुणांना दर्जेदार शैक्षणिक संधी उपलब्ध होतील, तेव्हाच आपल्या आदिवासी समाजाची प्रगती होईल. आमचे सरकार या संदर्भात आदिवासी भागात एकलव्य निवासी शाळा बांधण्याच्या मोहिमेवर परिश्रमपूर्वक कार्य करत आहे. आज येथे 40 एकलव्य निवासी शाळांचे उद्घाटन करण्यात आले. 25 नवीन एकलव्य शाळांची पायाभरणी देखील करण्यात आली. आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रत्येक शाळेला दिल्या जाणाऱ्या निधीची रक्कम दुप्पट केली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
योग्य प्रयत्न केले तर त्याचे योग्य परिणाम दिसून येतात. मला विश्वास आहे की आपले आदिवासी तरुण प्रगती करतील आणि देशाला त्यांच्या क्षमतेचा भरपूर लाभ होईल.
मित्रांनो,
मी येथे फार लांबलचक भाषण करणार नाही, कारण मी लवकरच येथून सुमारे 3-4 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी समुदायाच्या एका मोठ्या मेळाव्याला जाणार आहे. मी मनमोकळेपणाने आणि उत्साहाने बोलेन. या सरकारी कार्यक्रमाच्या शिष्टाचारांचा आदर करून, हे भाषण लांबवणार नाही. तथापि, अशा सरकारी कार्यक्रमातही, जर इतके लोक जमले तर ते म्हणतील, "अरे व्वा!... कार्यक्रम तर खूप मोठा होता." पण सरकारी कार्यक्रमासाठी केलेली ही फक्त एक छोटीशी व्यवस्था होती; मोठा कार्यक्रम लवकरच होईल. जर हा कार्यक्रम इतका मोठा होत असेल, तर कल्पना करा की दुसरा कार्यक्रम किती भव्य असेल. आज, मी इथे आल्यावर, झारखंडमधील माझ्या बंधू आणि भगिनींचे विस्मयकारक प्रेम आणि पाठिंबा यांचे दर्शन मला झाले. हे प्रेम आणि आशीर्वाद मला आदिवासी समुदायाची अधिक जोमाने सेवा करण्याची शक्ती देतील. या भावनेने, पुन्हा एकदा, या विकासकामांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुमचे खूप खूप आभार मानतो. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण तिथेही नक्कीच याल आणि मला अनेक मुद्द्यांवर बोलण्याची संधी मिळेल.
जय जोहार!!
* * *
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178920)
Visitor Counter : 4
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam