पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वाराणसी येथील आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 20 OCT 2024 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2024

 

हर-हर महादेव !

श्री कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य, पूज्य जगतगुरु शंकर विजयेंद्र सरस्वती, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, शंकर आय फाउंडेशनचे आर.व्ही. रमणी, डॉ. एस.व्ही. बालासुब्रमण्यन, मुरली कृष्णमूर्ती, रेखा झुनझुनवाला, संस्थेशी संबंधित इतर सर्व सदस्य, बंधू आणि भगिनींनो,

या पवित्र महिन्यात काशीला येणे म्हणजे एक पुण्य प्राप्तीचा अनुभव घेण्याची संधी आहे. येथे केवळ आपले काशीवासीच नाहीत, तर संत आणि परोपकारी लोकांचा सहवास देखील आहे. यापेक्षा आनंददायी संयोग काय असू शकतो! मला अलिकडेच परमपूज्य शं‍कराचार्यांना भेटण्याचा, प्रसाद स्वीकारण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभले. त्यांच्या आशीर्वादामुळेच काशी आणि पूर्वांचलला आणखी एक आधुनिक रुग्णालय मिळाले आहे. भगवान शंकराच्या नगरीत, आर जे शंकरा नेत्र रुग्णालय आजपासून जनतेला समर्पित होत आहे. मी काशी आणि पूर्वांचलमधील सर्व कुटुंबांचे मनापासून अभिनंदन करतो.

मित्रहो,

आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे - ‘तमसो मा ज्योतिर्गमय’. म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करा. हे आरजे शंकरा नेत्र रुग्णालय वाराणसी आणि परिसरातील अनेक लोकांच्या जीवनातील अंधःकार दूर करेल आणि त्यांना प्रकाशाकडे घेऊन जाईल. मी आत्ताच हे नेत्र रुग्णालय पाहून आलो आहे. हा एक प्रकारे अध्यात्म आणि आधुनिकता यांचा संगम आहे. हे रुग्णालय ज्येष्ठ नागरिकांची सेवा करेल आणि मुलांना नवा प्रकाश देईल. मोठ्या संख्येने गरीब लोकांना येथे मोफत उपचार मिळतील. या नेत्र रुग्णालयामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी येथे इंटर्नशिप आणि प्रॅक्टिस करू शकतील. अनेक जणांना येथे सहाय्यक कर्मचारी म्हणूनही काम मिळेल.

मित्रहो,

शंकरा आय फाउंडेशनच्या या उदात्त कार्यात सहभागी होण्याची संधी मला यापूर्वीही मिळाली आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना तिथे शंकरा नेत्र रुग्णालय उघडण्यात आले होते. आणि तुमच्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मला ते काम करण्याची संधी मिळाली होती. आणि आज तुमच्या उपस्थितीत मला हे काम करण्याची संधी मिळाली आहे, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. तसे पाहिले तर पूज्य स्वामीजींनी मला हे देखील सांगितले, की मला आणखी एक सौभाग्य लाभले आहे. श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगतगुरू शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती महास्वामीगल यांचा मला आशीर्वाद लाभला. परमाचार्य यांच्या चरणी बसण्याचे भाग्य मला अनेकदा लाभले. परमपूज्य जगतगुरु शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामीगल यांच्याकडून मला खूप स्नेह मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक कामे केली आहेत, आणि आता मला जगतगुरू शंकराचार्य शंकर विजेंद्र सरस्वती यांचे मार्गदर्शनही मिळत आहे. एकप्रकारे तीन गुरु परंपरांशी जोडले जाणे, यापेक्षा आयुष्यात मोठे सौभाग्य काय असू शकते? माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही खूप आनंदाची बाब आहे. आज, जगतगुरू माझ्या संसदीय मतदारसंघात या कार्यक्रमासाठी खास वेळ काढून आले, येथील लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमचे स्वागत करतो आणि तुमचे आभारही मानतो.

मित्रहो,

आजच्या दिवशी माझे सहकारी राकेश झुनझुनवाला यांची आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे. व्यावसायिक जगात त्याची प्रतिमा सर्वज्ञात आहे आणि त्याची व्यापक चर्चा आहे. मात्र सेवाकार्यात ते कसे सहभागी झाले हे आज येथे दिसून येते. आता त्यांचे कुटुंब हा वारसा पुढे नेत आहे. रेखाजी खूप वेळ देत आहेत आणि मला आनंद आहे की आज मला राकेशजी यांच्या संपूर्ण कुटुंबाला भेटण्याची संधी मिळाली. मला आठवतंय, मी शंकरा आय हॉस्पिटल आणि चित्रकूट आय हॉस्पिटल या दोघांनाही वाराणसीला येण्याची विनंती केली होती. काशीच्या जनतेच्या विनंतीचा आदर केल्याबद्दल मी दोन्ही संस्थांचा आभारी आहे. माझ्या मतदारसंघातील हजारो लोकांनी यापूर्वी चित्रकूट नेत्र रुग्णालयात उपचार घेतले आहेत. आता, येथील लोकांना वाराणसीमध्ये दोन नवीन आधुनिक सुविधा मिळणार आहेत.

मित्रहो,

काशीला अनादी काळापासून धर्म आणि संस्कृतीची राजधानी म्हणून ओळखले जाते. आता, उत्तर प्रदेशात, पूर्वांचल प्रदेशात काशी हे एक प्रमुख आरोग्य केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होत आहे. बीएचयू मधील ट्रॉमा सेंटर असो, सुपर स्पेशालिटी रुग्णालय असो, दीनदयाळ उपाध्याय रुग्णालय आणि कबीर चौरा रुग्णालय येथील सुविधा असो, वृद्ध आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष रुग्णालय असो, वैद्यकीय महाविद्यालय असो, काशीमध्ये गेल्या दशकभरात अशी अनेक कामे झाली आहेत. आज बनारसमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी आधुनिक रुग्णालयही आहे. पूर्वी ज्या रुग्णांना दिल्ली आणि मुंबईला जावे लागत होते, त्यांना आता येथे चांगले उपचार मिळू लागले आहेत. आज बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि देशाच्या इतर भागातूनही हजारो लोक येथे उपचारासाठी येतात. आपली मोक्ष देणारी काशी आता नवी ऊर्जा, नवी संसाधने घेऊन नवी जीवनवाहिनीही बनत आहे.

मित्रहो,

मागील सरकारांच्या काळात, वाराणसीसह पूर्वांचलमध्ये आरोग्य सुविधांची खूप उपेक्षा करण्यात आली होती. 10 वर्षांपूर्वी पूर्वांचलमध्ये मेंदूज्वराच्या उपचारासाठी प्रभाग स्तरावर कोणतेही उपचार केंद्र नव्हते. बालकांचा मृत्यू होत असे, माध्यमांमध्ये खळबळ उडत असे. मात्र आधीच्या सरकारांनी काहीच केले नाही. गेल्या दशकभरात केवळ काशीच नाही तर पूर्वांचलच्या संपूर्ण क्षेत्रात आरोग्य सुविधांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे, याचे मला समाधान आहे. आज पूर्वांचलमध्ये मेंदूज्वराच्या उपचारासाठी अशी शंभरहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. गेल्या 10 वर्षात पूर्वांचलच्या प्राथमिक आणि सामुदायिक केंद्रांमध्ये 10 हजारांहून अधिक नवीन खाटा जोडल्या गेल्या आहेत. गेल्या 10 वर्षात पूर्वांचलमधल्या गावांमध्ये साडे पाच हजाराहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे उभारण्यात आली आहेत. 10 वर्षांपूर्वी पूर्वांचलच्या जिल्हा रुग्णालयात डायलिसिसची कोणतीही सुविधा नव्हती. आज 20 पेक्षा जास्त डायलिसिस युनिट्स कार्यरत आहेत. या ठिकाणी रुग्णांना ही सुविधा मोफत मिळत आहे.

मित्रहो,

21 व्या शतकातील नव्या भारताने आरोग्यसेवेकडे पाहण्याचा जुना विचार आणि दृष्टिकोन बदलला आहे. आज भारताच्या आरोग्याशी संबंधित धोरणाचे पाच आधार स्तंभ आहेत. पहिला- प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, म्हणजे रोग होण्यापूर्वीचे संरक्षण. दुसरा- रोगाचे वेळेवर निदान. तिसरा- मोफत आणि स्वस्त उपचार, स्वस्त औषधे. चौथा- लहान शहरांमध्ये चांगले उपचार, डॉक्टरांची कमतरता दूर करणे. आणि पाचवा- आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा विस्तार.

मित्रहो,

कोणत्याही व्यक्तीला आजारापासून वाचवणे, हे भारताच्या आरोग्य धोरणाचे प्रथम प्राधान्य आहे, आरोग्य क्षेत्राचा पहिला आधार स्तंभ आहे. आजारपण गरिबांना आणखी गरीब बनवते. तुम्हाला माहित आहे की गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीमधून बाहेर आले आहेत. एखादा गंभीर आजार त्यांना पुन्हा गरिबीच्या दलदलीत ढकलू शकतो. म्हणूनच सरकार आजार रोखण्यावर खूप भर देत आहे. म्हणूनच आमचे सरकार स्वच्छता, योग-आयुर्वेद, पौष्टिक आहार या सर्व विषयांवर विशेष लक्ष देत आहे. लसीकरण मोहीम आम्ही जास्तीत जास्त घरांपर्यंत नेली आहे. 10 वर्षांपूर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती की, देशात लसीकरणाची व्याप्ती, केवळ 60 टक्क्यांच्या आसपास होती. म्हणजेच कोट्यवधी बालके लसीकरणाच्या कक्षेतच आली नव्हती. आणि लसीकरणाची ही व्याप्ती दरवर्षी केवळ एक ते दीड टक्के, या गतीने वाढत होती. हे असेच सुरू राहिले असते तर प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक बालकाला लसीकरणाच्या कक्षेत आणण्यासाठी 40-50 वर्षे लागली असती. देशाच्या नव्या पिढीवर केवढा मोठा अन्याय होत होता याची तुम्ही कल्पना करू शकता. म्हणूनच, सरकार स्थापन केल्यानंतर, आम्ही मुलांचे लसीकरण आणि त्याची व्याप्ती वाढवण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले. आम्ही मिशन इंद्रधनुष सुरू केले, अनेक मंत्रणालयांना एकाच वेळी या कामात सहभागी करून घेतले. याचा परिणाम असा झाला की केवळ लसीकरणाचा दर वाढला नाही तर कोट्यावधी गर्भवती महिला आणि कोट्यावधी मुलांचे  लसीकरण करण्यात आले, जे यापूर्वी लसीकरणापासून वंचित राहिले होते. भारताने लसीकरणावर जो भर दिला, त्याचा फायदा आपल्याला कोरोनाच्या काळात दिसून आला. आज देशभरात वेगाने लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे.

मित्रहो,

रोगापासून बचाव करण्याबरोबरच रोगाचे वेळेवर निदान होणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणूनच देशभरात लाखो आयुष्मान आरोग्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे कर्करोग आणि मधुमेह यासारख्या अनेक आजारांचे प्राथमिक अवस्थेतच निदान करणे शक्य झाले आहे. आज देशात क्रिटिकल केअर ब्लॉक्स आणि आधुनिक प्रयोगशाळांचे जाळेही तयार केले जात आहे. आरोग्य क्षेत्राचा हा दुसरा आधारस्तंभ लाखो लोकांचे प्राण वाचवत आहे.

मित्रहो,

आरोग्याचा तिसरा आधारस्तंभ आहे - स्वस्त दरात उपचार, स्वस्त दरात औषधे. आज प्रत्येक नागरिकाचा आजाराच्या उपचारांवर होणारा सरासरी खर्च 25 टक्क्यांनी कमी झाला आहे. पीएम जन औषधी केंद्रांवर लोकांना 80% सवलतीसह औषधे मिळत आहेत. हार्ट स्टेंट असो, गुडघा प्रत्यारोपण असो, कर्करोगाची औषधे असो, त्यांच्या किंमती खूप कमी करण्यात आल्या आहेत. गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान योजना त्यांच्यासाठी संजीवनी ठरली आहे. आतापर्यंत देशातील 7.5 कोटींहून अधिक रुग्णांनी मोफत उपचारांचा लाभ घेतला आहे. आणि आता ही सुविधा देशातील प्रत्येक कुटुंबातील वृद्धांना देखील उपलब्ध झाली आहे.

मित्रहो,

आरोग्य क्षेत्राचा चौथा आधारस्तंभ उपचारासाठी दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांवरील अवलंबित्व कमी करणार आहे. एम्स असोत, वैद्यकीय महाविद्यालये असोत किंवा सुपर स्पेशालिटी रुग्णालये असोत, गेल्या दशकभरात आम्ही अशा रुग्णालयांचा विस्तार छोट्या शहरांपर्यंत केला आहे. देशात डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी गेल्या दशकात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हजारो नवीन जागा वाढवण्यात आल्या आहेत. आता आम्ही ठरवले आहे की येत्या पाच वर्षांत आणखी 75 हजार जागा वाढवल्या जातील.

मित्रहो,

आरोग्य क्षेत्राचा पाचवा आधारस्तंभ आहे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा अधिकाधिक सुलभ करणे. आज डिजिटल आरोग्य ओळखपत्र तयार केले जात आहे. ई-संजीवनी अॅपसारख्या विविध माध्यमांद्वारे रुग्णांना घरी बसून वैद्यकीय सल्लामसलत सुविधा पुरवली जात आहे. ई-संजीवनी अॅप च्या सहाय्याने 30 कोटींहून अधिक लोकांनी वैद्यकीय सल्लामसलत सेवेचा लाभ घेतला आहे, याचा मला आनंद आहे. आम्ही आरोग्य सेवांना ड्रोन तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

मित्रहो,

एक निरोगी आणि सक्षम तरुण पिढी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करणार आहे. या मिशन मध्ये पूज्य शंकराचार्यजी यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत याचा मला खूप आनंद आहे. निरोगी आणि मजबूत भारताचे हे ध्येय आणखी मजबूत होत राहो अशी मी बाबा विश्वनाथांना प्रार्थना करतो. आणि आज ज्यावेळी मी पूज्य शंकराचार्य यांच्या चरणी बसलो आहे, त्यावेळी मला माझ्या बालपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत. आम्ही लहान असताना, माझ्या गावातील एक डॉक्टर एका महिन्यासाठी काही लोकांना बिहारला घेऊन जायचे. बिहारमध्ये ते डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करायचे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेची मोठी मोहीम राबवायचे. ते दरवर्षी एक महिना देत असत. माझ्या गावातील अनेक लोक स्वयंसेवक म्हणून तेथे जात असत. मी लहानपणी या गोष्टींशी परिचित होतो आणि बिहारमध्ये याची किती गरज आहे, हे मला त्यावेळी माहित होते. म्हणून आज मी पूज्य शंकराचार्यजींना जाहीरपणे विनंती करतो, की आपण बिहारमध्येही असेच एक शंकरा नेत्र रुग्णालय उभारावे, कारण माझ्या बालपणीच्या त्या आठवणी, मला वाटते की बिहारच्या लोकांसाठी ही एक उत्तम सेवा असेल आणि महाराजजींचा देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा मानसही आहे. त्यामुळे कदाचित बिहारला नक्कीच प्राधान्य मिळेल, बिहारला तुमचे आशीर्वाद मिळतील आणि बिहारच्या लोकांची सेवा करणे हा देखील एक मोठा सन्मान आहे. खूप कष्टाळू लोक आहेत, खूप मेहनती लोक आहेत, आणि जर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले तर आपल्यालाही आयुष्यात खूप समाधान मिळेल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, विशेषत: आपले डॉक्टर मित्र, निमवैद्यकीय कर्मचारी आणि सर्व बंधू-भगिनींना खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि पूज्य जगतगुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन, त्यांच्या आशीर्वादासाठी, त्यांच्या सहवासासाठी मनापासून प्रार्थना करून, कृतज्ञता व्यक्त करून, मी माझे भाषण संपवतो. हर- हर महादेव!

 

* * *

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2178603) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam