पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्राशी संबंधित 12,850 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि कोनशिला बसवण्यात आली
आरोग्यसेवा संबंधित पायाभूत सुविधा वाढविण्याला आमचे प्राधान्य आहे, आज सुरू झालेल्या या क्षेत्राशी संबंधित उपक्रमांमुळे नागरिकांना उच्च दर्जाच्या आणि परवडणाऱ्या सुविधा उपलब्ध होतील: पंतप्रधान
आज 150 हून अधिक देशांमध्ये आयुर्वेद दिन साजरा केला जाणे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे: पंतप्रधान
सरकारने आरोग्य धोरणाचे पाच स्तंभ निश्चित केले आहेत: पंतप्रधान
आता देशातील 70 वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात मोफत उपचार मिळतील, अशा वृद्धांना आयुष्मान वय वंदना कार्ड वितरीत केले जाईल: पंतप्रधान
प्राणघातक आजार रोखण्यासाठी सरकार मिशन इंद्रधनुष मोहीम राबवत आहे: पंतप्रधान
आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून आपले सरकार देशवासीयांच्या पैशाची बचत करीत आहे: पंतप्रधान
Posted On:
29 OCT 2024 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
धन्वंतरी जयंती आणि 9 व्या आयुर्वेद दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA) येथे आरोग्य क्षेत्राशी संबंधित सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले तसेच पायाभरणी आणि कोनशिला बसवली.
पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना धन्वंतरी जयंती आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. बहुतेक जण त्यांच्या घरांसाठी काहीतरी नवीन खरेदी करत असतात यासाठी त्यांनी देशातील सर्व व्यावसायिकांचे शुभचिंतन केले तसेच आगामी दिवाळी निमित्त शुभेच्छाही दिल्या.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की ही दिवाळी ऐतिहासिक आहे कारण अयोध्येतील भगवान श्री राम यांचे मंदिर हजारो दिव्यांनी उजळून निघेल, ज्यामुळे हा उत्सव अभूतपूर्व सिद्ध होईल. "या वर्षीच्या दिवाळीत भगवान राम पुन्हा एकदा आपल्या निवासस्थानी परतले आहेत", असे म्हणत पंतप्रधानांनी 14 वर्षांची नाही तर 500 वर्षांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे असे सांगितले.
मोदी म्हणाले की, यावर्षीचा धनतेरस हा उत्सव समृद्धी आणि आरोग्याची एकात्मिकता असणे हा केवळ योगायोग नाही तर भारताच्या संस्कृतीचे आणि जीवन तत्वज्ञानाचे प्रतीक आहे. ऋषीमुनी आणि संतांचे उद्धरण देत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आरोग्य ही सर्वोच्च संपत्ती मानली जाते आणि ही प्राचीन संकल्पना योगाच्या रूपात जगभरात स्वीकारली जात आहे. मोदी यांनी 150 हून अधिक देशांमध्ये आज आयुर्वेद दिवस साजरा केला जात आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. आयुर्वेदाबाबत वाढत्या आकर्षणाचा आणि प्राचीन काळापासून भारताने जगाला दिलेल्या योगदानाचा हा पुरावा आहे असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की गेल्या दशकात, आयुर्वेदाच्या ज्ञानाचा आधुनिक औषधांशी संयोग होऊन देशाने आरोग्य क्षेत्रात एका नवीन अध्यायाची सुरुवात अनुभवली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था या अध्यायाचा केंद्रबिंदू राहिली. मोदी यांनी सांगितले की सात वर्षांपूर्वी आयुर्वेद दिनी, संस्थेचा पहिला टप्पा देशाला समर्पित करण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि आज भगवान धन्वंतरी यांच्या आशीर्वादाने ते संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करत आहेत. या संस्थेत आयुर्वेद आणि वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील प्रगत संशोधनासह पंचकर्म सारख्या प्राचीन तंत्रांचा आधुनिक तंत्रज्ञानासह वापर होत असल्याचे पाहता येईल, असे त्यांनी नमूद केले. या प्रगतीबद्दल मोदी यांनी भारतीय नागरिकांचे अभिनंदन केले.
राष्ट्राची प्रगती ही त्याच्या नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असते हे लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी असलेली सरकारची प्राथमिकता अधोरेखित केली आणि आरोग्यविषयक धोरणाचे पाच स्तंभ विषद केले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, आजारांचे लवकर निदान, मोफत आणि कमी खर्चाचे उपचार आणि औषधे, लहान शहरांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता आणि शेवटी आरोग्य सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा विस्तार अशी पाच स्तंभांची यादी त्यांनी नमूद केली. "भारत आरोग्य क्षेत्राकडे समग्र आरोग्यसेवा म्हणून पाहत आहे", असे मोदी म्हणाले. आजचे प्रकल्प या पाच स्तंभांची झलक दाखवतात असे त्यांनी पुढे सांगितले. 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी आयुष आरोग्य योजनेअंतर्गत 4 उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती, ड्रोनच्या वापराने आरोग्य सेवांचा विस्तार, ऋषिकेश येथील एम्समध्ये हेलिकॉप्टर सेवा, नवी दिल्ली येथील एम्स आणि बिलासपूर येथील एम्समध्ये नवीन पायाभूत सुविधा, देशातील इतर पाच एम्समध्ये सेवांचा विस्तार, वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, परिचारक महाविद्यालयांचे भूमिपूजन आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित इतर प्रकल्पांचा उल्लेख केला. श्रमिकांच्या उपचारांसाठी अनेक रुग्णालये स्थापन होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि ते श्रमिकांसाठी उपचार केंद्र बनेल असे सांगितले. प्रगत औषधे आणि उच्च दर्जाचे स्टेंट आणि अवयव प्रत्यारोपणे तयार करण्यात आणि भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फार्मा युनिट्सच्या उद्घाटनाबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.
पंतप्रधानांनी नमूद केले की आपल्यापैकी बहुतेक जण अशा पार्श्वभूमीतून येतात जिथे आजार म्हणजे संपूर्ण कुटुंबावर वीज कोसळणे आणि विशेषतः गरीब कुटुंबात जर एखादी व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर त्याचा खोलवर परिणाम होत असे. ते पुढे म्हणाले की एक काळ असा होता जेव्हा लोक उपचारांसाठी आपले घर, जमीनजुमला, दागदागिने सर्वकाही विकायचे आणि खिशातून होणारा मोठा खर्च सहन करण्यास असमर्थ असायचे तर गरीब लोकांना आरोग्यसेवा आणि कुटुंबाच्या इतर प्राधान्यांमध्ये निवड करावी लागत असे. गरिबांच्या निराशेवर मात करण्यासाठी, आपल्या सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली, जिथे सरकार गरिबांच्या रुग्णालयात दाखल होण्याचा 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्च उचलेल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशातील सुमारे 4 कोटी गरीब लोकांना एकही रुपया न भरता उपचार घेण्यासाठी आयुष्मान योजनेचा फायदा झाला आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. देशातील विविध राज्यांमध्ये आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतल्यावर या योजनेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी, मग तो डॉक्टर असो किंवा निमवैद्यकीय कर्मचारी असो, ही योजना वरदान ठरत असल्याचे पाहून आपल्याला अतीव समाधान मिळते असे मोदी यांनी नमूद केले.
आयुष्मान योजनेच्या विस्ताराबद्दल समाधान व्यक्त करताना मोदी म्हणाले की, प्रत्येक वयस्कर व्यक्ती याची आतुरतेने वाट पाहत होती की 70 वर्षांवरील सर्व वृद्धांना आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणण्याची निवडणूक हमी तिसऱ्यांदा निवडून आल्यावर पूर्ण होईल. ते असेही म्हणाले की, देशातील 70 वर्षांवरील प्रत्येक वयस्कर व्यक्तीला आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे रुग्णालयात मोफत उपचार मिळतील. मोदी यांनी हे कार्ड सार्वत्रिक असल्याचे अधोरेखित केले आणि गरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा उच्चवर्गीय असो, याचे लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नसल्याचे सांगितले. ही योजना सार्वत्रिक लागू होण्याच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरेल अशी माहिती देत, मोदी यांनी सांगितले की, घरातील वृद्धांसाठी आयुष्मान वय वंदना कार्डमुळे, स्वतःच्या खिशातून करावयाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात घट होईल. त्यांनी या योजनेबद्दल सर्व देशवासीयांचे अभिनंदन केले तसेच दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये ही योजना लागू झालेली नाही अशी माहिती दिली.
गरीब असो वा मध्यमवर्गीय, उपचारांचा खर्च कमी करणे हे सरकारचे प्राधान्य आहे याचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी देशभरात 14,000 हून अधिक पीएम जनऔषधी केंद्रे सुरू केल्याचा उल्लेख केला जिथे 80 टक्के सवलतीत औषधे उपलब्ध आहेत. स्वस्त औषधांच्या उपलब्धतेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना 30,000 कोटी रुपयांची बचत करण्यात यश आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. स्टेंट आणि गुडघे रोपण यासारख्या उपकरणांच्या किमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांचे 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान टाळता आले आहे, असेही त्यांनी सांगितले. प्राणघातक आजार रोखण्यासाठी आणि गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे जीवन वाचवण्यासाठी मोफत डायलिसिस योजना आणि मिशन इंद्रधनुष मोहिमेचाही त्यांनी उल्लेख केला. देशातील गरीब आणि मध्यमवर्ग महागड्या उपचारांच्या ओझ्यातून मुक्त होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
आजारांशी संबंधित जोखीम आणि गैरसोयी कमी करण्यासाठी वेळेवर निदानाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्वरित निदान आणि उपचार सुलभ करण्यासाठी देशभरात दोन लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे स्थापन करण्यात आली आहेत यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की ही आरोग्य मंदिरे कोट्यवधी नागरिकांना कर्करोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांची सहज तपासणी करण्यास सक्षम करतात. ते म्हणाले की वेळेवर निदान झाल्याने त्वरित उपचार होतात, ज्यामुळे रुग्णांचा खर्च वाचतो. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की सरकार ई-संजीवनी योजनेअंतर्गत आरोग्यसेवा वाढविण्यासाठी आणि नागरिकांचे पैसे वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे जिथे 30 कोटींहून अधिक लोकांनी ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. "डॉक्टरांकडून मोफत आणि अचूक सल्लामसलत केल्याने आरोग्यसेवा खर्चात लक्षणीय घट झाली आहे", असे ते म्हणाले. मोदी यांनी यू-विन मंच सुरू करण्याची घोषणा केली जी भारताला आरोग्य क्षेत्रात तांत्रिकदृष्ट्या प्रगत सेतूजोडणी प्रदान करेल. "साथीच्या आजारादरम्यान आपल्या को-विन प्लॅटफॉर्मचे यश जगाने पाहिले आणि यूपीआय प्रदान प्रणालीचे यश जागतिक स्तरावर एक गाथा बनले आहे," असे त्यांनी सांगितले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे आरोग्यसेवा क्षेत्रात हे यश पुन्हा मिळवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे असे ते पुढे म्हणाले,
गेल्या दशकात भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीवर पंतप्रधानांनी भर दिला. मागील सहा ते सात दशकांमधील मर्यादित कामगिरीशी याची तुलना केली आणि ते म्हणाले की, “गेल्या 10 वर्षांत, आपण विक्रमी संख्येने नवीन एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालये स्थापन होताना पाहिली आहेत.” आजच्या प्रसंगाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी कर्नाटकात नरसापूर आणि बोम्मासंद्रा, मध्य प्रदेशात पिठमपूर, आंध्र प्रदेशात अचितपुरम आणि हरियाणात फरिदाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केल्याचाही उल्लेख केला. “याव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील मेरठ येथे नवीन ईएसआयसी रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे आणि इंदूरमध्ये एका नवीन रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे”, असे ते म्हणाले. रुग्णालयांची वाढती संख्या वैद्यकीय जागांमध्ये प्रमाणबद्ध वाढ दर्शवते यावर पंतप्रधानांनी भर दिला. कोणत्याही गरीब मुलाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंग होणार नाही आणि भारतात पर्यायांच्या कमतरतेमुळे कोणत्याही मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला परदेशात शिक्षण घेण्यास भाग पाडले जाणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली. गेल्या 10 वर्षांत एमबीबीएस आणि एमडीच्या जवळपास 1 लाख नवीन जागा वाढल्या आहेत आणि येत्या पाच वर्षांत आणखी 75,000 जागा घोषित करण्याबाबतची वचनबद्धता त्यांनी पुन्हा जाहीर केली.
पंतप्रधानांनी माहिती दिली की 7.5 लाख नोंदणीकृत आयुष चिकित्सक देशाच्या आरोग्यसेवेत आधीच योगदान देत आहेत. त्यांनी ही संख्या आणखी वाढवण्यावर भर दिला आणि भारतात वैद्यकीय आणि उपचार पर्यटनाची वाढती मागणी अधोरेखित केली. तरुणांनी आणि आयुष चिकित्सकांनी भारत आणि परदेशात प्रतिबंधात्मक हृदयरोग, आयुर्वेदिक अस्थिव्यंग चिकित्सा आणि आयुर्वेदिक पुनर्वसन केंद्रे यासारख्या क्षेत्रांचा विस्तार करण्यासाठी तयारी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. "आयुष चिकित्सकांसाठी प्रचंड संधी निर्माण होत आहेत. आपले तरुण या संधींमधून केवळ स्वतःची प्रगतीच करणार नाहीत तर मानवतेची उत्तम सेवा देखील करतील", असे ते म्हणाले.
21 व्या शतकात वैद्यकशास्त्रातील जलद प्रगती आणि पूर्वी असाध्य असलेल्या आजारांवरील उपचारांमध्ये झालेल्या प्रगतीची पंतप्रधान मोदी यांनी नोंद घेतली. ते म्हणाले, “जग उपचारांसोबतच आरोग्यालाही महत्त्व देत असताना भारताकडे या क्षेत्रात हजारो वर्षांपूर्वीपासूनचे ज्ञान आहे.” आयुर्वेद तत्त्वांचा वापर करणाऱ्या व्यक्तींसाठी आदर्श जीवनशैली आणि जोखीम विश्लेषण संरचना करण्याच्या उद्देशाने प्रकृती परीक्षा अभियान सुरू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. हा उपक्रम जागतिक स्तरावर आरोग्यसेवा क्षेत्राची पुनर्परिभाषा करू शकतो आणि संपूर्ण जगासाठी एक नवीन दृष्टीकोन प्रदान करू शकतो यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधान मोदी यांनी उच्च-प्रभावी वैज्ञानिक अभ्यासांद्वारे अश्वगंधा, हळद आणि काळी मिरी यासारख्या पारंपरिक औषधी वनस्पतींचे प्रमाणीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आपल्या पारंपरिक आरोग्यसेवा प्रणालींचे प्रयोगशाळेतील प्रमाणीकरण केवळ या औषधी वनस्पतींचे मूल्य वाढवेलच असे नाही तर एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ देखील निर्माण करेल”, असे त्यांनी नमूद केले. अश्वगंधा जी या दशकाच्या अखेरीस 2.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे अशा औषधी वनस्पतींच्या वाढत्या मागणीकडे त्यांनी लक्ष वेधले.
आयुषच्या यशामुळे केवळ आरोग्य क्षेत्रच नाही तर अर्थव्यवस्थेतही परिवर्तन होत आहे हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की आयुष उत्पादन क्षेत्र 2014 मध्ये 3 अब्ज डॉलर्सवरून आज जवळजवळ 24 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे, ज्यात केवळ 10 वर्षांत 8 पटीने वाढ झाली आहे. भारतात 900 हून अधिक आयुष स्टार्ट-अप्स आता कार्यरत आहेत, ज्यामुळे तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत असे ते पुढे म्हणाले. पंतप्रधानांनी 150 देशांमध्ये आयुष उत्पादनांच्या जागतिक निर्यातीवर प्रकाश टाकला, ज्यामुळे स्थानिक औषधी वनस्पती आणि उत्कृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे जागतिक वस्तूंमध्ये रूपांतर करून भारतीय शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यांनी गंगा नदीकाठी नैसर्गिक शेती आणि औषधी वनस्पती लागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या नमामि गंगे प्रकल्पासारख्या उपक्रमांकडेही लक्ष वेधले.
आरोग्य आणि कल्याणासाठी भारताची वचनबद्धता प्रतिबिंबित करताना मोदी म्हणाले की, आयुष हा भारताच्या राष्ट्रीय चारित्र्याचा आणि सामाजिक रचनेचा आत्मा आहे. गेल्या 10 वर्षात सरकारने देशाची धोरणे 'सबका साथ, सबका विकास' या तत्वज्ञानाशी जुळवून घेतली आहेत यावर त्यांनी भर दिला. "पुढील 25 वर्षांत, हे प्रयत्न विकसित आणि निरोगी भारतासाठी एक मजबूत पाया रचतील", असे मोदी यांनी शेवटी सांगितले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री जे. पी. नड्डा आणि कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
पार्श्वभूमी
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या प्रमुख योजनेत एक मोठी भर म्हणून पंतप्रधानांनी 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवेचा विस्तार सुरू केला. यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नासंबंधी कोणतीही अट न ठेवता आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल.
देशभरात दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याचा पंतप्रधानांचा सतत प्रयत्न राहिला आहे. आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी अनेक आरोग्यसेवा संस्थांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
पंतप्रधानांनी भारतातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. यामध्ये पंचकर्म रुग्णालय, औषध निर्मितीसाठी आयुर्वेदिक फार्मसी, क्रीडा औषध युनिट, केंद्रीय ग्रंथालय, आयटी आणि इन्क्युबेशन केंद्र स्टार्ट-अप्सआणि 500 आसनांचे सभागृह यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात मंदसौर, नीमच आणि सिवनी येथे तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे त्यांनी उद्घाटन केले. शिवाय, हिमाचल प्रदेशात बिलासपूर, पश्चिम बंगालमधील कल्याणी, बिहारमधील पटना, उत्तर प्रदेशात गोरखपूर, मध्य प्रदेशात भोपाळ, आसाममधील गुवाहाटी आणि नवी दिल्ली येथील विविध एम्समध्ये सुविधा आणि सेवा विस्तारांचे उद्घाटन त्यांनी केले, ज्यामध्ये जन औषधी केंद्राचाही समावेश आहे. पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉक आणि ओदिशात बारगड येथे क्रिटिकल केअर ब्लॉकचे उद्घाटन केले.
मध्य प्रदेशात शिवपुरी, रतलाम, खंडवा, राजगड आणि मंदसौर येथे पाच नर्सिंग कॉलेजची; तसेच आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (PM-ABHIM) अंतर्गत हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, तामिळनाडू आणि राजस्थान येथे 21 क्रिटिकल केअर ब्लॉक्स आणि नवी दिल्लीतील एम्स आणि हिमाचल प्रदेशात बिलासपूर येथे अनेक सुविधा आणि सेवा विस्तार प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे ईएसआयसी रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले आणि हरियाणात फरीदाबाद, कर्नाटकात बोम्मासंद्र आणि नरसापूर, मध्य प्रदेशात इंदूर, उत्तर प्रदेशात मेरठ आणि आंध्र प्रदेशात अच्युतपुरम येथे ईएसआयसी रुग्णालयांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे सुमारे 55 लाख ईएसआय लाभार्थ्यांना आरोग्यसेवा लाभ मिळतील.
पंतप्रधान विविध क्षेत्रांमध्ये सेवा वितरण वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे खंबीर समर्थक आहेत. आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने सेवा वितरण वाढविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर करून, पंतप्रधानांनी 11 तृतीयक आरोग्य सेवा संस्थांमध्ये ड्रोन सेवा सुरू केल्या. यामध्ये उत्तराखंडमधील एम्स ऋषिकेश, तेलंगणातील एम्स बिबीनगर, आसाममधील एम्स गुवाहाटी, मध्य प्रदेशातील एम्स भोपाळ, राजस्थानमधील एम्स जोधपूर, बिहारमधील एम्स पटना, हिमाचल प्रदेशातील एम्स बिलासपूर, उत्तर प्रदेशातील एम्स रायबरेली, छत्तीसगडमधील एम्स रायपूर, आंध्र प्रदेशातील एम्स मंगलागिरी आणि मणिपूरमधील आरआयएमएस इम्फाळ यांचा समावेश आहे. एम्स ऋषिकेश येथून आपत्कालीन वैद्यकीय हेलिकॉप्टर सेवा देखील ते सुरू करणार आहेत, ज्यामुळे जलद वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.
पंतप्रधानांनी U-WIN पोर्टल सुरू केले. लसीकरण प्रक्रियेचे पूर्णपणे डिजिटलीकरण करून गर्भवती महिला आणि बालकांना याचा फायदा होईल. यामुळे गर्भवती महिला आणि मुलांना (जन्मापासून ते 16 वर्षे वयोगटातील) 12 लसींपासून बचाव करता येणाऱ्या आजारांविरुद्ध जीवनरक्षक लसी वेळेवर मिळतील याची हमी मिळेल. याशिवाय, पंतप्रधानांनी सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिक आणि संस्थांसाठी एक पोर्टल देखील सुरू केले आहे. ते विद्यमान आरोग्यसेवा व्यावसायिक आणि संस्थांचे केंद्रीकृत डेटाबेस म्हणून काम करेल.
देशातील आरोग्यसेवा परिसंस्था सुधारण्याच्या उद्देशाने संशोधन आणि विकास आणि चाचणी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी अनेक उपक्रम सुरू केले. पंतप्रधानांनी ओदिशातील भुवनेश्वरमधील गोठापटना येथे केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.
ओदिशातील खोरधा आणि छत्तीसगडमधील रायपूर येथे योग आणि निसर्गोपचार या दोन केंद्रीय संशोधन संस्थांची पायाभरणी त्यांनी केली. गुजरातमधील राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयपीइआर)अहमदाबाद येथे वैद्यकीय उपकरणांसाठी, तेलंगणातील एनआयपीइआर हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांसाठी, आसाममधील एनआयपीइआर गुवाहाटीमध्ये फायटो फार्मास्युटिकल्ससाठी आणि पंजाबमधील एनआयपीइआर मोहाली येथे चार उत्कृष्टता केंद्रांची पायाभरणीही त्यांनी केली.
पंतप्रधानांनी बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था येथे मधुमेह आणि चयापचय विकारांसाठी उत्कृष्टता केंद्र; आयआयटी दिल्ली येथे रासौषधींसाठी प्रगत तंत्रज्ञानात्मक उपाय, स्टार्ट-अप सहाय्य आणि नेट झिरो शाश्वत उपायांसाठी शाश्वत आयुष उत्कृष्टता केंद्र; लखनऊ येथील सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयुर्वेदातील मूलभूत आणि अनुवादात्मक संशोधनासाठी उत्कृष्टता केंद्र; आणि नवी दिल्लीतील जेएनयू येथे आयुर्वेद आणि प्रणाली औषध केंद्राचे उत्कृष्टता केंद्र सुरू केले.
आरोग्यसेवा क्षेत्रात मेक इन इंडिया उपक्रमाला मोठी चालना देण्यासाठी गुजरातमधील वापी, तेलंगणातील हैदराबाद, कर्नाटकातील बेंगळुरू, आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि हिमाचल प्रदेशातील नालागड येथे वैद्यकीय उपकरणे आणि मोठ्या प्रमाणात औषधांसाठी उत्पादन जोडलेल्या प्रोत्साहन (PLI) योजनेअंतर्गत पंतप्रधानांनी पाच प्रकल्पांचे उद्घाटन केले. हे युनिट्स विपुल प्रमाणातील महत्त्वपूर्ण औषधांसह अवयव प्रत्यारोपण आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी उपयुक्त उपकरणे यांसारखी उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे तयार करतील.
"देश का प्रकृती परीक्षण अभियान" ही देशव्यापी मोहीम देखील पंतप्रधानांनी सुरू केली, याचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता वाढवणे आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राज्य-विशिष्ट कृती आराखडा देखील त्यांनी सुरू केला जो हवामान-प्रतिरोधक आरोग्य सेवा विकसित करण्यासाठी अनुकूल धोरणे तयार करण्यास सहाय्यभूत ठरेल .
* * *
नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178566)
Visitor Counter : 4
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam