पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील कच्छ येथे दिवाळीनिमित्त सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

प्रविष्टि तिथि: 31 OCT 2024 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2024

 

भारतमातेचा विजय असो !

देशाच्या सीमेवरील, कच्छच्या भूमीवर, सर खाडीजवळ, देशाच्या सशस्त्र दलांसोबत आणि सीमा सुरक्षादलाच्या जवानांसोबत, दिवाळी साजरी करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. तुम्हा प्रत्येकाला या दिपावलीनिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करतो, तेव्हा माझा या सणाचा आनंद द्विगुणित होतो आणि यावर्षी या दिवाळीला विशेष महत्त्वही आहे. तुम्हाला वाटेल की प्रत्येक दिवाळीला स्वतःचे महत्त्व आहे, यावेळी विशेष काय आहे?. भगवान राम 500 वर्षांनंतर आता अयोध्येतील त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. मी तुम्हा सर्वांना आणि  भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या प्रत्येक सैनिकाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या शुभेच्छांना 140 कोटी देशवासीयांची कृतज्ञता देखील समाविष्ट आहे. 

मित्रांनो, 

मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळणे हे खरोखरच एक सौभाग्य आहे. ही सेवा जराही सोपी नाही. ती मातृभूमीला आपले सर्वस्व मानणाऱ्यांच्या श्रध्देचे प्रतिबिंब आहे. हे  भारतमातेच्या शूर पुत्र आणि कन्यांच्या त्यागाचे आणि समर्पणाचे प्रतिक आहे. हिमालयातील गोठवणारे तापमान वा हिमनद्या असो, कडक थंड रात्री असो, वाळवंटातील उष्णता असो, धगधगता सूर्य असो, धुळीने भरलेली वाळूची वादळ असो, दलदलीच्या प्रदेशातील आव्हाने असो किंवा खवळलेला समुद्र असो- ही श्रद्धा आपल्या सैनिकांना पोलादासारखी मजबूत करते आणि ती शत्रूंच्या हृदयात भीती निर्माण करते. जेव्हा शत्रू तुमच्याकडे पाहतो तेव्हा त्यांना कळते की इतक्या गंभीर परिस्थितीतही अढळ राहणाऱ्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही. तुमचा कठोर दृढनिश्चय, अमर्याद धाडस आणि सर्वोच्च शौर्य आपल्या देशाच्या सुरक्षिततेचे  आणि शांतीचे प्रतीक आहे. जगासमोर तुम्ही भारताच्या पराक्रमाचे प्रतिनिधित्व करता आणि आमच्या शत्रूंसमोर तुम्ही त्यांच्या भयानक योजनांचा नाश करता. जेव्हा तुम्ही उत्साहाने गर्जना करता तेव्हा दहशतवादी शक्ती घाबरतात. हे आपल्या सैन्याचे, आपल्या सशस्त्र दलांचे शौर्य आहे. आपल्या सैनिकांनी प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीत आपले पराक्रम दाखवले आहेत, याचा मला खूप अभिमान आहे.

मित्रांनो, 

आज जेव्हा मी कच्छमध्ये उभा आहे, तेव्हा येथे आपल्या नौदलाचा उल्लेख होणेही तितकेच स्वाभाविक आहे. गुजरातचा हा समुद्रकिनारा देशाची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही सागरी सीमा भारतविरोधी कटांचा केंद्रबिंदू बनली आहे. भारताच्या सार्वभौमत्वतेचे प्रतीक असलेले सर क्रीक हे येथे कच्छमध्ये आहे. भूतकाळात, या भागाचे युद्धभूमीत रूपांतर करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत. शत्रूची द्वेषपूर्ण नजर सर क्रीकवर दीर्घकाळ कशी टिकून होती, हे राष्ट्राला चांगलेच माहिती आहे. पण तुम्ही सुरक्षितपणे तैनात आहात म्हणून देशही निश्चिंत आहे.1971 च्या युद्धात तुम्ही कसा चोख प्रत्युत्तर दिले हे शत्रूलाही माहीत आहे. त्यामुळे आमच्या नौदलाच्या उपस्थितीत आता कोणीही सर क्रीक आणि कच्छकडे डोळे फिरवण्याचे धाडस करत नाही.

मित्रांनो,

आज, आपल्या देशात असे सरकार आहे जे देशाच्या सीमेच्या एका इंचावरही तडजोड करण्यास नकार देते. एक काळ असा होता जेव्हा, राजनैतिकतेच्या नावाखाली, सर क्रीक ताब्यात घेण्यासाठी फसव्या धोरणांचा वापर केला जात होता. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून, मी आपल्या देशासाठी आवाज उठवला होता आणि ही माझी या प्रदेशातील पहिली भेट नाही. मला हा परिसर चांगला माहित आहे; मी येथे अनेक वेळा आलो आहे आणि खूप प्रवास केला आहे. आता, आपण जबाबदारी घेतो आहोत, आपली धोरणे आपल्या सैन्याच्या दृष्टिकोनाशी जुळत आहेत. आपण आपल्या शत्रूंच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही तर आपल्या सैन्याच्या दृढनिश्चयावर विश्वास ठेवतो.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन, आपण आपल्या सशस्त्र दलांना आधुनिक संसाधनांनी सुसज्ज करत आहोत. आपण आपल्या सैन्याला जगातील सर्वात प्रगत सैन्याच्या श्रेणीत आणत आहोत. या प्रयत्नांचा पाया संरक्षण क्षेत्रात भारताला स्वावलंबी करणे हा आहे. अलिकडेच, गुजरातमधील वडोदरा येथे C 295 कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. आज आपल्याकडे विक्रांत विमानवाहू जहाजासारखी स्वदेशी ('मेड इन इंडिया') जहाजे आहेत आणि आपण आपल्या स्वतःच्या पाणबुड्या तयार करत आहोत. आपले तेजस लढाऊ विमान हवाई दलाला बळकटी देत आहेत आणि तंत्रज्ञानाच्या पाचव्या जनरेशनमधील लढाऊ विमान विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. एकेकाळी शस्त्रास्त्रांच्या आयातीवर अवलंबून असलेला देश म्हणून पाहिले जाणारा भारत आता जगभरातील राष्ट्रांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे. गेल्या दहा वर्षांत, आपली संरक्षण निर्यात तीस पटीने वाढली आहे.

मित्रांनो,

सरकारचे ध्येय साकार करण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले सुरक्षा दल महत्त्वाची भूमिका बजावतात. मी देशाच्या लष्कराचे, देशाच्या सुरक्षा दलांचे अभिनंदन करतो की त्यांनी 5 हजारांहून अधिक लष्करी उपकरणांची यादी तयार केली आहे, जी ते यापुढे परदेशातून खरेदी करणार नाहीत. यामुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत अभियानाला नवी गती मिळाली आहे.

मित्रांनो,

आज, आपण आधुनिक काळातील युद्धाबद्दल बोलत असताना, ड्रोन तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे साधन झाले  आहे. युद्धात सामील असलेले देश आज ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना आपण पाहत आहोत. ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे, ड्रोनद्वारे गुप्तचर माहिती गोळा केली जात आहे. एखादी व्यक्ती किंवा ठिकाण ओळखण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. ड्रोन वस्तू पोहोचवण्यात मदत करत आहेत. ड्रोनचा वापर शस्त्र म्हणूनही केला जात आहे. याव्यतिरिक्त, ड्रोन पारंपारिक हवाई संरक्षणासाठी नवीन आव्हाने निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीत भारतही ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले सैन्य, आपले सुरक्षा दल सक्षम करत आहे. सरकार तिन्ही दलांसाठी प्रिडेटर ड्रोन खरेदी करत आहे आणि ड्रोन तैनातीसाठी विशेष धोरणे तयार केली जात आहेत. अनेक भारतीय कंपन्या पूर्णपणे स्वदेशी ड्रोन विकसित करत आहेत आणि अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात प्रवेश करत आहेत, हे पाहताना मला अतिशय आनंद होत आहे. 

मित्रांनो,

आज, युद्धाचे स्वरूप बदलत आहे आणि नवीन सुरक्षा आव्हाने उदयास येत आहेत. आपल्या तिन्ही सशस्त्र दलांच्या आणि सुरक्षा दलांच्या क्षमता एकत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण भविष्यातील संघर्ष अधिक गुंतागुंतीचे असतील, म्हणून विशेष करून आपल्या तिन्ही दलांसाठी, हे एकीकरण त्यांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करेल. मी कधीकधी म्हणतो की जेव्हा आपण एखादा सैन्यदल, हवाई दल आणि नौदल यांचा संयुक्त सराव होतो, तेव्हा ते व्हा एक एक नाही, तर एकशे अकरा दिसतात. या आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनासह, संरक्षण प्रमुख (सीडीएस) यांची नियुक्ती करण्यात आली, जे आपल्या सशस्त्र दलांना बळकट करण्यात मोठी भूमिका बजावत आहेत. आता, आपण एकात्मिक थिएटर कमांडकडे वाटचाल करत आहोत. या कमांडसाठी एक संरचित यंत्रणा तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे सैन्याच्या तिन्ही शाखांमध्ये समन्वय साधला जाईल.

मित्रांनो, 

*राष्ट्र प्रथम, राष्ट्र प्रथम* हे आमचे ब्रीदवाक्य आहे. राष्ट्राची सुरुवात त्याच्या सीमेपासून होते, म्हणून सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आमच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. सीमा रस्ता संघटनेने (BRO) 80,000  किलोमीटरहून अधिक रस्ते बांधले आहेत, ज्यात लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते समाविष्ट आहेत. गेल्या दशकात, BRO ने सुमारे 400 मोठे पूल बांधले आहेत. आपल्या सशस्त्र दलांसाठी दुर्गम भागात सर्व प्रकारच्या हवामानात संपर्कासाठी बोगद्यांचे किती महत्त्व आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परिणामी, गेल्या 10 वर्षांत, अटल आणि सेला बोगद्यांसारखे अनेक महत्त्वाचे बोगदे पूर्ण झाले आहेत. BRO देशाच्या विविध भागांमध्ये बोगद्यांवर काम वेगाने करत आहे.

मित्रांनो, 

सीमावर्ती गावांना "सीमेवरील शेवटचे गाव" म्हणून पाहण्याचा दृष्टिकोनही आपण आता बदलला आहे. आज आपण त्यांना देशातली पहिली गावे असे म्हणतो. समृद्ध गाव (व्हायब्रंट व्हिलेज) योजनेअंतर्गत, ही पहिली गावे सीमेवरील चैतन्यशील समुदाय म्हणून विकसित केली जात आहेत जिथे एखाद्याला चैतन्यशील भारताची पहिली झलक पाहता येते. आपले राष्ट्र भाग्यवान आहे, कारण आपल्या अनेक सीमावर्ती भागात अद्वितीय नैसर्गिक खजिने आहेत,ज्यामुळे पर्यटनासाठी प्रचंड क्षमता निर्माण होते. आपण या क्षमतेचे संगोपन आणि विकास केला पाहिजे. यामै, या गावांमध्ये राहणाऱ्यांचे जीवन सुधारेल आणि नवीन संधी निर्माण होतील. व्हायब्रंट व्हिलेज मोहिमेद्वारे आपण हे परिवर्तन झालेले पाहत आहोत. तुमच्या जवळील दुर्गम गावांमध्ये, ज्यांना पूर्वी " सीमेवरील  शेवटचे गाव" म्हटले जात होते परंतु आता ते पहिले गाव म्हणून ओळखले जाते, तुमच्या डोळ्यांसमोर समुद्री शैवाल या व्यवसायासारखे अनेक उद्योग भरभराटीला येत आहेत. यामुळे एक महत्त्वपूर्ण नवे आर्थिक क्षेत्र उदयास येत आहे. आम्ही येथील खारफुटींच्या संवर्धनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत, जे आपल्या पर्यावरणासाठी एक आशादायक पाऊल आहे.  येथे विकसित होणारी खारफुटीची जंगले पर्यटकांना आकर्षित करतील आणि धोर्डोच्या 'रण उत्सवा'ने ज्या प्रकारे देश आणि जगाला मोहित केले आहे, त्याचप्रमाणे हे क्षेत्र लवकरच पर्यटकांसाठी स्वर्ग बनण्यास सज्ज होत आहे. हे सर्व तुमच्या  नजरेसमोर घडताना तुम्ही पहाल.

मित्रांनो,

या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी, आपल्या सरकारमधील मंत्री सीमेवरील समृद्ध (व्हायब्रंट) गावांना भेटी देत आहेत, ते या गावांमध्ये राहतात आणि त्यांचा बराचसा वेळ तिथे घालवतात. यामुळे आपल्या देशातील लोकांमध्ये या भागांबद्दल उत्सुकता आणि कुतूहल वाढले आहे.

मित्रांनो,

राष्ट्रीय सुरक्षेचा आणखी एक पैलू आहे ज्याची क्वचितच चर्चा होते - तो म्हणजे सीमावर्ती भागातील पर्यटन. कच्छमध्ये यासाठी प्रचंड क्षमता आहे, त्याला  समृद्ध वारसा आहे, विविध श्रद्धास्थाने आणि निसर्गाच्या अद्भुत देणग्या या प्रदेशाला मिळाल्या आहेत.कच्छची खारफुटीची जंगले आणि गुजरातमधील खंभातचे आखात हे यादृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत, जी सागरी जैवविविधता आणि किनारी वनस्पतींनी परीपूर्ण अशी परिसंस्था आहे. सरकारने या खारफुटीच्या जंगलांचा विस्तार करण्यासाठी भरीव पावले उचलली आहेत आणि गेल्या वर्षी सुरू झालेल्या मिष्टी योजनेवर सरकार जलदगतीने काम करत आहे.

मित्रांनो,

हजारो वर्षांपासून आपल्या राष्ट्राच्या सामर्थ्याचे प्रतीक असलेले आपले धोलावीरा, हे ठिकाण  आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाले आहे. धोलावीरा येथे मिळालेले सिंधू संस्कृतीचे अवशेष आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या त्या शहराच्या काटेकोर नियोजनाचे दर्शन घडवतात. समुद्रापासून थोड्या अंतरावर, लोथलसारख्या व्यापारी केंद्रांनी एकेकाळी भारताच्या समृद्धीत मोठी भूमिका बजावली होती. गुरु नानक देवजींच्या पावलांचे ठसे लखपतमध्ये आहेत.  कच्छमध्ये कोटेश्वर महादेव मंदिर, माता आशापुराचे मंदिर, काला डुंगर टेकडीवरील भगवान दत्तात्रेयांचे मंदिर, रण उत्सव आणि सर क्रीकचे अशी अनेक प्रेक्षणीय धार्मिक स्थळे आहेत. कच्छ या एकाच जिल्ह्यात पर्यटनाची क्षमता इतकी प्रचंड आहे की  पर्यटकांसाठी एक आठवडा पुरेसा ठरणार नाही. उत्तर गुजरातच्या सीमेवर असलेल्या नादाबेट सीमावर्ती भागातील पर्यटनाचे लोभस  आकर्षण ठरलेले आपण पाहिले आहे. आपण या सर्व शक्यता प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत. जेव्हा देशाच्या विविध भागांतून पर्यटक अशा ठिकाणी भेट देतात तेव्हा ते भारताच्या विविध प्रदेशांना एकमेकांशी जोडतात. हे पर्यटक त्यांच्यासोबत राष्ट्रीय एकतेची भावना घेऊन जातात आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला मूर्त रूप देतात. ते त्यांच्या स्वतःच्या समुदायात परतल्यावर ही भावना जिवंत ठेवतात, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा भक्कम पाया रचतात. म्हणूनच आपण कच्छ आणि इतर सीमावर्ती प्रदेशांना विकासाच्या नव्या उंच पातळीवर नेले पाहिजे. आपले सीमावर्ती क्षेत्र विकसित होत असताना आणि नवीन सुविधा उदयास येत असताना, येथे तैनात असलेल्या सैनिकांचा अनुभव देखील विकसित होईल.

मित्रांनो,

आपले राष्ट्र एक सजग अस्तित्व आहे, ज्याला  भारतमाता,असे म्हणत आदरणीय मानले जाते. आपल्या सैनिकांच्या त्याग आणि समर्पणामुळेच आज आपला देश सुरक्षित आहे.आपल्या लोकांची सुरक्षा त्यांच्यावर अवलंबून आहे, कारण केवळ  सुरक्षित राष्ट्रच प्रगती करू शकते. विकसित भारताच्या आपल्या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करत असताना, तुम्ही या ध्येयाचे रक्षणकर्ते आहात. आज, प्रत्येक नागरिक तुमच्यावर असलेल्या श्रध्देमुळेच या देशाच्या प्रगतीत मनापासून योगदान देत आहे. मला विश्वास आहे, की तुमचे धैर्य भारताच्या विकासाला चालना देत राहील. या श्रद्धेसह, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो!

खूप खूप धन्यवाद!

माझ्यासोबत म्हणा,...

भारत माता की जय!भारत माता की जय!भारतमाता की जय!

वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम!

 

* * *

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2177447) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam