पंतप्रधान कार्यालय
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थे (AIIA) मधल्या विविध प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2024 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
या कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, जगत प्रकाश नड्डा जी, मनसुख मांडविय जी, प्रतापराव जाधव जी, अनुप्रिया पटेल जी, आणि शोभा करंदलाजे जी, या क्षेत्राचे माझे खासदार सहकारी रामवीर सिंह बिधुरी जी, विविध राज्यांतून दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले गेलेले माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, खासदार, आमदार, इतर सर्व आदरणीय प्रतिनिधी, देशाच्या विविध भागांतल्या आरोग्य संस्थांशी संबंधित डॉक्टर, आयुर्वेद आणि आयुषचे अभ्यासक तसेच आरोग्य व्यावसायिक... आरोग्य व्यवस्थेशी निगडित बंधू आणि भगिनींनो, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी,
महोदय आणि महोदया!
आज संपूर्ण देश धनत्रयोदशी आणि भगवान धन्वंतरी यांची जयंती साजरी करत आहे. मी तुम्हा सर्वांना धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या दिवशी देशभरात अनेक लोक आपल्या घरासाठी काहीतरी नवीन खरेदी करतात. मी विशेषतः आमच्या व्यापारी वर्गाला शुभेच्छा देतो. मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्याही आगाऊ शुभेच्छा देतो. आपल्यापैकी अनेकांनी अनेक दिवाळसणांचा अनुभव घेतला असेल, पण कितीही दिवाळ्यांचा अनुभव घेतला असला तरी, यंदाची दिवाळी ऐतिहासिक आहे. तुम्हाला वाटेल की इतक्या दिवाळ्या पाहून आमचे केस पांढरे झाले, आणि मोदीजींनी ही ऐतिहासिक दिवाळी कुठून
आणली? असा योग 500 वर्षांनंतर आला आहे. अयोध्येत रामलल्लांच्या जन्मस्थानी असलेल्या मंदिरात हजारो दिवे प्रज्वलित केले जातील, तेव्हा एक अद्भुत उत्सव साजरा होईल. ही आपले राम पुन्हा एकदा घरी परतल्यानंतरची दिवाळी असेल. आणि यावेळी ही प्रतीक्षा 14 वर्षांनी नाही, तर 500 वर्षांनी संपत आहे.
मित्रांनो,
धनत्रयोदशीला भाग्य आणि आरोग्याचा उत्सव साजरा करणे हा केवळ एक योगायोग नाही. हे भारतीय संस्कृतीतील जीवनदर्शनाचे प्रतीक आहे. आपल्या ऋषींनी म्हटले आहे – आरोग्यम् परमम् भाग्यम्! म्हणजे, आरोग्य हेच सर्वात मोठे भाग्य, सर्वात मोठी संपत्ती आहे. असे म्हटले जाते की – ‘हेल्थ इज वेल्थ’. हा प्राचीन विचार आता ‘आयुर्वेद दिन’ म्हणून जागतिक स्तरावर प्रचलित होत आहे. आज 150 हून अधिक देशांमध्ये आयुर्वेद दिन साजरा केला जात आहे, ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. हे आयुर्वेदाकडे जग अधिकाधिक आकृष्ट होत असल्याचे लक्षण आहे ! आणि आजचा नवा भारत आपल्या प्राचीन अनुभवांनी जगाला कसे महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो, हेच यातून दिसून येते.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षांत, देशाने आयुर्वेदाच्या ज्ञानाला आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोडून आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था याचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. सात वर्षांपूर्वी, याच दिवशी मला या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा सन्मान मिळाला होता. आज, भगवान धन्वंतरी जयंतीच्या दिवशी मला याच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लाभले आहे. येथे पंचकर्मासारख्या प्राचीन पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम पाहायला मिळेल. आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात प्रगत संशोधनही होईल. यासाठी मी देशातील सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
एखाद्या देशाचे नागरिक जितके निरोगी असतील, तितकाच त्या देशाचा विकास वेगवान होतो. हे लक्षात घेऊन, केंद्र सरकारने आपल्या नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आरोग्य धोरणाचे पाच स्तंभ निश्चित केले आहेत. पहिला म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, म्हणजे आजार होण्यापूर्वीच प्रतिबंध... दुसरा म्हणजे आजाराचे वेळेवर निदान... तिसरा म्हणजे मोफत आणि परवडणारे उपचार, स्वस्त औषधे... चौथा म्हणजे लहान शहरांमध्ये चांगले उपचार उपलब्ध करुन देणे, डॉक्टरांची कमतरता दूर करणे… आणि पाचवा म्हणजे आरोग्य सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा विस्तार. भारत आता आरोग्य क्षेत्राकडे समग्र आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून पाहतो आहे. आजच्या या कार्यक्रमात या पाचही स्तंभांची एक सशक्त झलक पाहायला मिळत आहे. इथे सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा पायाभरणी झाली आहे. ‘आयुषस्वास्थ्य योजने’ अंतर्गत चार उत्कृष्टता केंद्रे... ड्रोनद्वारे आरोग्य सेवांचा विस्तार... एम्स ऋषिकेश येथे
हेलिकॉप्टर सेवा... एम्स दिल्ली आणि एम्स बिलासपूर येथे नवीन पायाभूत सुविधा... इतर पाच एम्समध्ये सेवांचा विस्तार... वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना... नर्सिंग महाविद्यालयांची पायाभरणी... देशातील आरोग्य सेवांच्या परिवर्तनाशी संबंधित अनेक उपक्रम आज सुरू झाले आहेत. मला आनंद आहे की, यातील अनेक रुग्णालये आपल्या कामगार बंधू- भगिनींच्या उपचारांसाठी बांधण्यात आली आहेत. ही रुग्णालये आपल्या कामगार वर्गासाठी एक केंद्र म्हणून काम करतील. आज ज्या औषधनिर्मिती युनिट्सचे उद्घाटन झाले आहे, ते देशात प्रगत औषधे, उच्च दर्जाचे स्टेंट आणि इम्प्लांट्स तयार करतील. ही युनिट्स भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्राच्या विकासाला आणखी गती देतील.
मित्रांनो,
आपल्यापैकी बहुतेकजण अशा कुटुंबातले आहेत, जिथे आजारपण म्हणजे संपूर्ण कुटुंबावर कोसळलेले संकट वाटते. जेव्हा एखाद्या गरीब घरात कोणी गंभीर आजारी पडते, तेव्हा त्याचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर होतो. एक काळ असा होता, जेव्हा कुटुंबांना उपचारासाठी घर, जमीन आणि दागिने विकावे लागत होते. गंभीर आजारांच्या उपचाराचा खर्च ऐकूनच एखाद्या गरीब माणसाचा आत्मा कापत असे. वृद्ध आई विचार करायची की, उपचारावर खर्च करायचा की नातवंडांच्या शिक्षणावर; तर आरोग्यावर खर्च करायचा की घराचा खर्च चालवायचा, ही चिंता वडिलांना असायची. त्यामुळे, गरीब कुटुंबातील वडीलधारी मंडळी अनेकदा एकच मार्ग अवलंबत: मूकपणे दुःख सहन करणे, वेदना सोसणे आणि शांतपणे मृत्यूची वाट पाहणे. पैशाअभावी उपचार घेऊ न शकण्याची असहाय्यता गरिबांना चिरडून टाकत होती. माझ्या गरीब बंधू-भगिनींना या असहाय्य अवस्थेत मी पाहू शकत नव्हतो. त्याच सहानुभूतीतून, त्याच वेदनेतून आणि त्या दुःखातून, माझ्या देशवासियांसाठी पूर्ण समर्पणाने ‘आयुष्मान भारत’ योजनेचा जन्म झाला. सरकारने गरिबांच्या रुग्णालयातील उपचारासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. आज मला समाधान आहे की, देशातील सुमारे 4 कोटी गरीब लोकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे 4 कोटी गरीब लोक रुग्णालयात दाखल झाले, काहींना वेगवेगळ्या आजारांसाठी अनेकवेळा उपचार मिळाले, तेही एक रुपयाही खर्च न करता. जर आयुष्मान योजना नसती, तर या गरीब लोकांना आपल्या खिशातून सुमारे 1.25 लाख कोटी रुपये खर्च करावे लागले असते. मी अनेकदा देशातील
विविध राज्यांमध्ये आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांना भेटतो, त्यांची सुख-दुःखे ऐकतो, त्यांचे अनुभव ऐकतो आणि बोलताना त्यांच्या डोळ्यांतून येणारे आनंदाश्रू हे आयुष्मान योजनेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक पॅरामेडिकल स्टाफसाठी एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नाहीत. यापेक्षा मोठा आशीर्वाद असूच शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा; लोकांना अशा संकटातून बाहेर काढणारी योजना यापूर्वी कधीही तयार झाली नाही. आज मला या गोष्टीचे खूप समाधान आहे की, आयुष्मान योजनेचा विस्तार होत आहे. देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाकडे आशेने पाहत आहे. निवडणुकीदरम्यान मी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात 70 वर्षांवरच्या सर्व ज्येष्ठांना आयुष्मान योजनेत समाविष्ट केले जाईल, असे आश्वासन दिले होते... आज धन्वंतरी जयंतीच्या दिवशी हे आश्वासन पूर्ण होत आहे. आता देशातल्या 70 वर्षांवरच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतील. या ज्येष्ठांना ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ दिले जाईल. 70 वर्षांवरच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला लवकरात लवकर ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही – गरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत, प्रत्येकजण याचा लाभ घेऊ शकतो. ज्याचे वय सत्तर वर्षांपेक्षा जास्त आहे असा या देशाचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने चिंतामुक्त होऊन सन्मानाने निरोगी जीवन जगावे, हे ध्येय साध्य करण्यासाठी ही योजना एक मैलाचा दगड ठरेल. आयुष्मान वय वंदना कार्डमुळे घरातला खर्चही कमी होईल आणि त्यांच्या चिंताही कमी होतील. मी या योजनेसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो आणि इथूनच 70 वर्षांवरच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार करतो. मात्र, मी दिल्ली आणि पश्चिम बंगालमधल्या 70 वर्षांवरच्या ज्येष्ठांची माफी मागतो, कारण मी तुमची सेवा करू शकणार नाही. तुम्हाला मदत करू शकत नसल्याबद्दल क्षमस्व. मला तुमच्या दुःखाबद्दल कळेल, मला माहिती मिळेल, पण मी तुम्हाला मदत करू शकणार नाही, आणि याचे कारण म्हणजे दिल्ली आणि पश्चिम बंगालमधली सरकारे त्यांच्या राजकीय स्वार्थामुळे या आयुष्मान योजनेशी जोडली जात नाहीत. आपल्याच राज्यातल्या आजारी लोकांना त्रास देण्याची ही वृत्ती माणुसकीच्या दृष्टिकोनातून स्वीकारार्ह नाही. त्यामुळे, मी पश्चिम बंगाल आणि दिल्लीतल्या ज्येष्ठांची माफी मागतो. मी माझ्या देशवासियांची सेवा करू शकतो, पण राजकीय स्वार्थाच्या भिंती मला दिल्ली आणि पश्चिम बंगालमधल्या ज्येष्ठांची सेवा करण्यापासून रोखतात. माझ्यासाठी हा केवळ राजकीय मुद्दा नाही; मी जिथून बोलत आहे, तिथल्या दिल्लीतले ज्येष्ठ नागरिकही माझे ऐकत आहेत, याचे मला खूप दुःख होते. मी माझ्या दुःखाची तीव्रता शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
मित्रांनो,
गरीब असो वा मध्यमवर्गीय, प्रत्येकासाठी उपचाराचा खर्च कमी करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य राहिले आहे. आज देशभरातील 14,000 हून अधिक पंतप्रधान जनऔषधी केंद्रे आमचे सरकार किती संवेदनशीलतेने काम करत आहे, याची साक्षीदार आहेत. या केंद्रांवर औषधे 80 टक्के सवलतीने उपलब्ध आहेत. जर ही जनऔषधी केंद्रे नसती, तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना औषधांवर अतिरिक्त 30,000 कोटी रुपये खर्च करावे लागले असते, ते त्यांनी या केंद्रांमधून 80 टक्के सवलतीत औषधे मिळाल्यामुळे वाचवले आहेत. आम्ही स्टेंट आणि गुडघा प्रत्यारोपण स्वस्त केले आहे हे तुम्हाला माहितच आहे. जर आम्ही
हे निर्णय घेतले नसते, तर ज्यांनी या शस्त्रक्रिया केल्या आहेत, त्यांना अतिरिक्त 80,000 कोटी रुपये खर्च करावे लागले असते. आमच्या प्रयत्नांमुळे त्यांचे 80,000 कोटी रुपये वाचले आहेत. मोफत डायलिसिस योजनेमुळे लाखो रुग्णांचे हजारो कोटी रुपये वाचले आहेत. आमचे सरकार जीवघेण्या आजारांना रोखण्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष’; अभियान चालवत आहे. यामुळे गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे केवळ प्राणच वाचत नाहीत, तर त्यांचे गंभीर आजारांपासून संरक्षणही होते. मी माझ्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना महागड्या उपचारांच्या ओझ्यातून मुक्त करीन आणि देश याच दिशेने पुढे जात आहे.
मित्रांनो,
तुम्हाला माहीत आहे की, आजारपणामुळे होणारा त्रास आणि धोका कमी करण्यासाठी वेळेवर निदान होणे आवश्यक आहे. कोणी आजारी पडले, तर त्याला त्वरित तपासणी आणि वेळेवर उपचार मिळायला हवेत. हे सुलभ करण्यासाठी, देशभरात 2 लाखांहून अधिक ‘आयुष्मान आरोग्य मंदिरे’ उघडण्यात आली आहेत. आज कोट्यवधी लोक या आरोग्य मंदिरांमध्ये कर्करोग, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांची तपासणी सहजपणे करून घेत आहेत. तपासणीच्या या सुविधेमुळे उपचार वेळेवर सुरू होत आहेत आणि लोकांचे पैसे वाचत आहेत. आमचे सरकार आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून नागरिकांचे पैसे वाचवत आहे. ‘ई-संजीवनी’ योजनेअंतर्गत 30 कोटी लोकांनी—हा आकडा लहान नाही—आदरणीय डॉक्टरांकडून ऑनलाइन सल्ला घेतला आहे. डॉक्टरांच्या मोफत आणि अचूक सल्ल्यामुळे त्यांचे बरेच पैसे वाचले आहेत. आज आम्ही यू-विन प्लॅटफॉर्म देखील सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे भारताला स्वतःचा तंत्रज्ञानाने प्रगत असा इंटरफेस मिळेल. कोविड-19 महामारीच्या काळात आमच्या को-विन प्लॅटफॉर्मचे यश जगाने पाहिले आहे. यूपीआय मोबदला प्रणालीचे यशही एक जागतिक कहाणी बनले आहे. भारत आता डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) द्वारे आरोग्य क्षेत्रात तेच यश पुन्हा मिळवत आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतरच्या 6-7 दशकांत आरोग्य क्षेत्रात जे काम झाले नाही, ते गेल्या 10 वर्षांत पूर्ण झाले आहे. गेल्या दशकात देशात विक्रमी संख्येने नवीन एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली आहेत. आज याच कार्यक्रमात कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतील अनेक रुग्णालयांचे उद्घाटन झाले आहे. कर्नाटकच्या नरसपूर आणि बोम्मासंद्रा, मध्य प्रदेशात पिथमपूर, आंध्र प्रदेशात अच्युतापुरम आणि हरियाणाच्या फरिदाबादमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाले आहे. उत्तर प्रदेशात मेरठमध्ये नवीन ईएसआयसी रुग्णालयाचे बांधकामही सुरू झाले आहे. इंदूरमध्येही एका रुग्णालयाचे उद्घाटन झाले आहे. वाढत्या रुग्णालयांची संख्या वैद्यकीय जागांची संख्याही वेगाने वाढत असल्याचे निदर्शक आहे. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोणत्याही गरीब मुलाचे स्वप्न भंग होऊ नये असे मला वाटते. कोणत्याही तरुणाचे स्वप्न चिरडले जाऊ नये, यातच सरकारचे यश आहे असे मी मानतो. स्वप्नांमध्ये स्वतःची एक शक्ती असते आणि स्वप्ने कधीकधी प्रेरणास्रोत बनू शकतात. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही मध्यमवर्गीय मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जावे लागू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच, गेल्या 10 वर्षांपासून भारतात वैद्यकीय जागा वाढवण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या दशकात सुमारे 1 लाख नवीन एमबीबीएस आणि एमडी जागा वाढवण्यात आल्या आहेत. यावर्षी मी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की, आम्ही पुढील पाच वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात आणखी 75,000 नवीन जागा वाढवू. विचार करा, गावांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता किती वाढेल.
मित्रांनो,
आज आपल्या देशात 7.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत आयुष व्यावसायिक आहेत. आपल्याला ही संख्या आणखी वाढवायची आहे. या दिशेने काम सुरू आहे. जग आता भारताकडे वैद्यकीय आणि वेलनेस पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून पाहत आहे. जगभरातून लोक योग, पंचकर्म आणि ध्यानासाठी भारतात येतात. येत्या काळात ही संख्या वेगाने वाढेल. आपले तरुण आणि आपले आयुष व्यावसायिक यासाठी तयार असले पाहिजेत. प्रतिबंधात्मक हृदयविकारविज्ञान, आयुर्वेदिक अस्थिशल्यचिकित्सा, आयुर्वेदिक क्रीडा वैद्यक आणि आयुर्वेदिक पुनर्वसन केंद्रे—अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे केवळ भारतातच नव्हे,
तर विविध देशांमध्येही आयुष व्यावसायिकांसाठी प्रचंड संधी आहेत. या संधींद्वारे आपले तरुण केवळ प्रगतीच करणार नाहीत, तर मानवतेची मोठी सेवाही करतील.
मित्रांनो,
21 व्या शतकात विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. एकेकाळी असाध्य मानल्या जाणाऱ्या आजारांवर आता उपचार उपलब्ध आहेत. जग उपचारांसोबतच निरोगी आयुष्यालाही महत्त्व देत आहे. निरोगीपणा आणि आरोग्य या विषयांत भारताला हजारो वर्षांचा अनुभव आहे. आता आपले प्राचीन ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच मी सतत पुरावा-आधारित आयुर्वेदावर भर देतो. आयुर्वेदाकडे वैयक्तिक उपचार पद्धतींचे सखोल ज्ञान आहे; तथापि, या क्षेत्रात आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून ठोस काम झालेले नाही. देश या दिशेने एक महत्त्वपूर्ण अभियान सुरू करत आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे अभियान आहे ‘प्रकृती परीक्षण अभियान’ कारण आपण पाहतो की, जेव्हा एखादा रुग्ण आयुर्वेदाने बरा होतो, तेव्हा परिणाम दिसतात, पण पुरावे उपलब्ध नसतात. जागतिक आरोग्यासाठी आमच्याकडे औषधी वनस्पती आहेत हे जगाला दाखवण्यासाठी आपल्याला परिणाम आणि पुरावे दोन्ही हवे आहेत. या अभियानांतर्गत, आपण आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित प्रत्येक व्यक्तीसाठी एक आदर्श जीवनशैली तयार करू शकतो. आजार होण्यापूर्वीच आपण व्यक्तींसाठी धोका विश्लेषण करू शकतो. या दिशेने सकारात्मक प्रगती झाली तर आपल्या आरोग्य क्षेत्राची व्याख्या पूर्णपणे बदलू शकते असा मला विश्वास आहे. आपण जगाला आरोग्यसेवेचा एक नवीन दृष्टिकोन देऊ शकतो.
मित्रांनो,
आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या यशाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक सिद्धांताचे प्रयोगशाळेत प्रमाणीकरण. आपल्या पारंपरिक आरोग्य प्रणालीनेही हा निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अश्वगंधा, हळद, काळी मिरी पाहा—पिढ्यानपिढ्या आपण कितीतरी औषधी वनस्पती विविध उपचारांसाठी वापरल्या आहेत. आता, उच्च-प्रभावी अभ्यासातून त्यांची उपयुक्तता सिद्ध होत आहे. परिणामी, जगभरात अश्वगंधासारख्या औषधी वनस्पतींची मागणी वेगाने वाढत आहे. या दशकाच्या अखेर, अश्वगंधा अर्काची बाजारपेठ सुमारे 2.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तुम्ही कल्पना करू शकता की, प्रयोगशाळेतील प्रमाणीकरणामुळे आपण या औषधी वनस्पतींचे मूल्य कितीतरी पटीने वाढवू शकतो! आपण एक मोठी बाजारपेठ तयार करू शकतो!
म्हणूनच मित्रांनो,
आयुषच्या (AYUSH) यशाचा प्रभाव केवळ आरोग्य क्षेत्रापुरता मर्यादित नाही. आयुष भारतात नवी संधी निर्माण करत आहे आणि जागतिक कल्याणाच्या प्रयत्नांनाही हातभार लावत आहे. दहा वर्षांत, आयुष देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक बनले आहे. 2014 मध्ये, आयुषशी संबंधित उत्पादन क्षेत्राचे मूल्य 3 अब्ज डॉलर्स होते; आज ते सुमारे 24 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे. म्हणजे दहा वर्षांत 8 पटीने वाढ. म्हणूनच आज देशातले तरुण नवीन आयुष स्टार्टअप्स सुरू करत आहेत. देशात सध्या पारंपरिक उत्पादने, तंत्रज्ञानावर आधारित नवीन उत्पादने आणि नवीन सेवांवर 900 हून अधिक आयुष स्टार्टअप्स कार्यरत आहेत. आज भारत 150 देशांना अब्जावधी डॉलर्सच्या आयुष उत्पादनांची निर्यात करत आहे. याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होतो. ज्या औषधी वनस्पती आणि सुपरफूड्स एकेकाळी स्थानिक बाजारपेठांपुरती मर्यादित होती, ती आता जागतिक बाजारपेठेत पोहोचत आहेत.
मित्रांनो,
या बदलत्या परिस्थितीचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी सरकार वनस्पती उत्पादनालाही प्रोत्साहन देत आहे.’नमामि गंगे’ प्रकल्पांतर्गत, गंगेच्या काठावर नैसर्गिक शेती आणि वनस्पती उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे.
मित्रांनो,
आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचे आणि सामाजिक रचनेचे सार या एका वाक्यात सामावलेले आहे: “सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः” अर्थात, सर्व सुखी होवोत; सर्व निरोगी राहोत. गेल्या दहा वर्षांत, ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राचे पालन करत आम्ही ही भावना देशाच्या धोरणांशी जोडली आहे. येत्या 25 वर्षांत, आरोग्य क्षेत्रातले आमचे प्रयत्न ‘विकसित भारता’ चा एक मजबूत पाया रचतील. मला विश्वास आहे की, भगवान धन्वंतरींच्या आशीर्वादाने आपण ‘विकसित भारता’ सोबत ‘निरामय भारता’ चे स्वप्न नक्कीच पूर्ण करू.
आणि मित्रांनो,
जेव्हा मी परिणाम आणि पुराव्यांबद्दल बोलतो, तेव्हा आयुर्वेदाशी संबंधित आपल्या देशाचा विशाल हस्तलिखित वारसा जपण्यासाठी आम्ही मोठे प्रयत्न करणार आहोत. अशी हस्तलिखिते अनेक ठिकाणी विखुरलेली आहेत. आता हा वारसा जपण्यासाठी देश मिशन मोडवर काम करणार आहे. हा ज्ञानाचा खजिना दगडांवर कोरलेला असेल, ताम्रपटांवर लिहिलेला असेल किंवा हस्तलिखित ग्रंथांमध्ये आढळेल. हे सर्व गोळा करून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात, त्याला तंत्रज्ञानाशी जोडून त्या ज्ञानातून नवीन निष्कर्ष काढण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही त्या दिशेने मोठे प्रयत्न सुरू करत आहोत.
मित्रांनो,
या प्रसंगी, मी पुन्हा एकदा देशातल्या 70 वर्षांवरच्या सर्व आदरणीय ज्येष्ठांना वंदन करतो आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.
धन्यवाद!
* * *
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2177397)
आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Gujarati
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Telugu
,
Kannada