पंतप्रधान कार्यालय
पद्म विभूषण पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या निधनामुळे भारतीय संगीत जगताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना पंतप्रधानांनी केली व्यक्त
पंडित छन्नुलाल मिश्र यांनी बनारस घराण्याची संगीत परंपरा नव्या उंचीवर नेलीः पंतप्रधान
पंडित छन्नुलाल मिश्र यांनी काशीतील प्रत्येक उत्सवाला आपल्या गायनाने समृद्ध केलेः पंतप्रधान
भारतातील प्रत्येक संगीत प्रेमी व्यक्तिला पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या जीवनातून प्रेरणा मिळत राहील : पंतप्रधान
त्याच्या कुटुंबियाचे दुःख हे माझे वैयक्तिक दुःख आहेः पंतप्रधान
Posted On:
02 OCT 2025 3:44PM by PIB Mumbai
पद्म विभूषण पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंडित छन्नुलाल मिश्र यांच्या निधनामुळे भारतीय संगीत जगताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंडित छन्नुलाल मिश्र यांनी आपले संपूर्ण जीवन कला आणि संस्कृतीसाठी समर्पित केले. त्यांनी बनारस घराण्याच्या संगीत परंपरेला नवी उंची मिळवून देण्याचे कार्य केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंडित मिश्र यांनी त्यांच्या गायनातून काशीची परंपरा आणि उत्सव समृद्ध केले असे मोदी यांनी नमूद केले. मणिकर्णिका घाटावरील होळी असो अथवा श्रावण महिन्यातील कजरीचे सादरीकरण, त्यांचे संगीत काशीमध्ये निरंतर गुणगुणत राहील. महत्त्वाच्या लोकपरंपरांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यात मिश्र यांनी दिलेल्या योगदानाची दखल पंतप्रधानांनी घेतली.
त्यांच्याविषयीचा वैयक्तिक अनुभव सामाईक करताना, पंतप्रधान म्हणाले की, पंडित मिश्र यांना अनेकदा भेटण्याचे आणि त्यांचा स्नेह लाभण्याचे भाग्य आपल्याला लाभले. 2014च्या निवडणुकांमध्ये पंडित छन्नुलाल मिश्र त्यांच्या प्रस्तावकांपैकी एक असल्याच्या आठवणीला उजाळा देताना, पंतप्रधान म्हणाले की, पंडित मिश्र यांचे काशीशी विलक्षण भावनिक बंध होते.
पंडित मिश्र यांनी काशीच्या विकास आणि परंपरांविषयी अनेकदा मोलाच्या सूचना केल्या होत्या, असे पंतप्रधानांनी सांगितले. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्ताने, त्यांनी त्यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीची आठवण मोदी यांनी व्यक्त केली. गांधी जयंतीच्या दिवशी हा संदेश लिहिताना ही आठवण अधिक ठळकपणे आठवते, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंडित मिश्र आज शारीरिकदृष्ट्या हयात नसले तरी, भारतातील प्रत्येक संगीतप्रेमी व्यक्तीला त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळत राहिल आणि काशीच्या प्रत्येक उत्सवात त्यांच्या भजनांतून त्यांची आठवण कायम राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंडित मिश्र यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, पंडित मिश्र यांच्या कुटुंबियांचे दुःख हे आपले वैयक्तिक दुःख आहे. बाबा विश्वनाथ, पंडित छन्नुलाल मिश्र यांना आपल्या चरणी स्थान देवो आणि त्यांच्या हितचिंतकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली.
***
सोनाली काकडे / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174214)
Visitor Counter : 7