पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित करणारे विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकापूर्वी झालेली स्थापना ही प्रत्येक युगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रकट झालेल्या राष्ट्रीय चेतनेच्या चिरस्थायी भावनेचे प्रतिबिंब आहे: पंतप्रधान
परमपूज्य डॉ. हेडगेवार यांना मी आदरांजली अर्पण करतो: पंतप्रधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देशसेवेसाठी आणि समाजाच्या सक्षमीकरणासाठी अथक परिश्रम घेत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
आज जारी करण्यात आलेले विशेष टपाल तिकीट 1963 सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अभिमानाने सहभागी झालेल्या संघ स्वयंसेवकांना दिलेली मानवंदना असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्थापनेपासून राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे: पंतप्रधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा ही प्रेरणास्थान आहे, जिथे 'मी' ते 'आपण' असा प्रवास सुरू होतो: पंतप्रधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शतकभराचे कार्य राष्ट्रउभारणीचे ध्येय, वैयक्तिक विकासाचा स्पष्ट मार्ग आणि शाखेच्या ऊर्जामय आचरणावर आधारित असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'राष्ट्र प्रथम' आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या एकाच तत्वाने प्रेरित होऊन असंख्य त्याग केले आहेत: पंतप्रधान
संघाचे स्वयंसेवक संवैधानिक मूल्यांवरील विश्वासाने समजाप्रति निश्चल आणि वचनबद्ध राहतात: पंतप्रधान
संघ हे देशभक्ती आणि सेवेचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
इतरांचे दुःख कमी करण्यासाठी वैयक्तिक त्याग करणे ही संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाची ओळख असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
संघाने सर्व स्तरातील लोकांमध्ये स्वाभिमान आणि सामाजिक जाणीव निर्माण केली: पंतप्रधान
पंच परिवर्तन प्रत्येक स्वयंसेवकाला राष्ट्रासमोरील आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यावर मात करण्याची प्रेरणा देते: पंतप्रधान
Posted On:
01 OCT 2025 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या, आणि आज महानवमी आणि देवी सिद्धिदात्रीचा दिवस असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, उद्या विजयादशमीचा भव्य उत्सव आहे. हा दिवस, अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि अधःकारावर प्रकाशाचा विजय, हे भारतीय संस्कृतीचे कालातीत सत्य अधोरेखित करतो.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, अशा पवित्र प्रसंगी शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती, आणि हा केवळ योगायोग नव्हता. ते म्हणाले की, हजारो वर्षांच्या प्राचीन परंपरेचे हे पुनरुज्जीवन असून, या ठिकाणी प्रत्येक युगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय चेतना नव्या स्वरूपात प्रकट होते. आजच्या युगात, संघ हा त्या शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा एक सदाचारी अवतार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे साक्षीदार होणे हे स्वयंसेवकांच्या आजच्या पिढीसाठी भाग्याची गोष्ट असल्याचे अधोरेखित करून, राष्ट्रसेवेच्या संकल्पासाठी समर्पित असंख्य स्वयंसेवकांना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आदरणीय आदर्श असलेले डॉ. हेडगेवार यांना आदरांजली वाहिली. संघाच्या 100 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे स्मरण म्हणून, भारत सरकारने विशेष टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित केल्याची घोषणा त्यांनी केली. या 100 रुपयांच्या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आहे, आणि दुसऱ्या बाजूला, वरद मुद्रेमधील भारतमातेची सिंहासह भव्य प्रतिमा, आणि तिला स्वयंसेवक वंदन करत आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात बहुधा प्रथमच भारतीय चलनावर भारतमातेची प्रतिमा उमटली आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे सांगितले की या नाण्यावर संघाचे मार्गदर्शक ब्रीदवाक्य देखील लिहिलेले आहे: "राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदम् न मम."
आज प्रकाशित करण्यात आलेल्या स्मृतीपर टपाल तिकिटाचे महत्त्व अधोरेखित करत, त्याची ऐतिहासिक प्रासंगिकता लक्षात घेऊन पंतप्रधानांनी 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे महत्त्व अधोरेखित केले, आणि ते म्हणाले की, 1963 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, देशभक्तीपर स्वरांच्या तालावर मोठ्या अभिमानाने या संचलनामध्ये सहभागी झाले होते. हे टपाल तिकीट त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
"हे टपाल तिकीट राष्ट्र सेवेसाठी आणि समाजाला सक्षम बनवण्यासाठी काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या अढळ समर्पणाचे प्रतिबिंब आहे", पंतप्रधानांनी अधोरेखित केले, आणि हे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाच्या प्रकाशनाबद्दल भारतातील नागरिकांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले की, महानद्या ज्याप्रमाणे आपल्या काठावरील मानवी संस्कृतीचे संगोपन करतात, त्याच प्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असंख्य लोकांचे जीवन समृद्ध केले आहे. भूमीला, गावांना आणि प्रदेशाला समृद्ध करणारी नदी, आणि भारतीय समाजाच्या प्रत्येक क्षेत्राला आणि देशाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील साम्य अधोरेखित करत, अखंड समर्पण आणि शक्तिशाली राष्ट्रीय प्रवाहाचे हे फलित असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वेगवेगळ्या प्रदेशांना पोषण देणाऱ्या अनेक प्रवाहांमध्ये वाहणाऱ्या नदीची समांतरता दाखवत पंतप्रधानांनी सांगितले की संघाचा प्रवास हेच प्रतिबिंबित करतो. त्याच्या विविध संलग्न संघटना शिक्षण, शेती, समाजकल्याण, आदिवासी उत्थान, महिला सक्षमीकरण, कला आणि विज्ञान आणि कामगार क्षेत्र अशा जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये राष्ट्रीय सेवेत समर्पित आहेत. संघाचा अनेक प्रवाहांमध्ये विस्तार झाला असूनही, त्यांच्यात कधीही फूट पडली नाही असे मोदींनी अधोरेखित केले. "प्रत्येक प्रवाह, विविध क्षेत्रात काम करणारी प्रत्येक संघटना, एकच उद्देश आणि भावना सामायिक करते: राष्ट्र प्रथम", यावर पंतप्रधानांनी भर दिला.
"स्थापनेपासूनच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रनिर्माण हे एक भव्य उद्दिष्ट - साधले आहे," असे मोदी म्हणाले. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी, संघाने राष्ट्रीय विकासाचा पाया म्हणून वैयक्तिक विकासाचा मार्ग निवडला यावर भर दिला. या मार्गावर सातत्याने पुढे जाण्यासाठी, संघाने एक शिस्तबद्ध कार्यपद्धती स्वीकारली ती म्हणजे शाखांचे दैनंदिन आणि नियमित आयोजन.
"पूज्य डॉ. हेडगेवार यांना हे समजले होते की जेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या जबाबदारीबद्दल जागृत होईल तेव्हाच राष्ट्र खरोखरच बलवान होईल; जेव्हा प्रत्येक नागरिक राष्ट्रासाठी जगायला शिकेल तेव्हाच भारताचा उदय होईल", असे पंतप्रधानांनी नमूद केले. म्हणूनच डॉ. हेडगेवार वैयक्तिक विकासासाठी वचनबद्ध राहिले आणि त्यांनी एक अद्वितीय दृष्टिकोन स्वीकारला. मोदी यांनी डॉ. हेडगेवार यांचे मार्गदर्शक तत्व उद्धृत केले: "लोकांना जसे आहेत तसे, स्वीकार, त्यांनि जसे असावे तसे त्यांना घडवा." त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या सार्वजनिक सहभागाच्या पद्धतीची तुलना कुंभारासोबत केली - सामान्य मातीपासून सुरुवात करणे, त्यावर परिश्रमपूर्वक काम करणे, त्याला आकार देणे आणि शेवटी विटांचा वापर करून एक भव्य रचना बांधणे. त्याचप्रमाणे, डॉ. हेडगेवार यांनी सामान्य व्यक्तींची निवड केली, त्यांना प्रशिक्षण दिले, त्यांना दूरदृष्टी दिली आणि त्यांना राष्ट्रासाठी समर्पित स्वयंसेवक बनवले. संघाबद्दल असे म्हटले जाते की सामान्य लोक असाधारण आणि अभूतपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये वैयक्तिक विकासाची उदात्त प्रक्रिया सतत वाढत आहे यावर प्रकाश टाकत, मोदी यांनी शाखा मैदानाचे वर्णन प्रेरणेचे पवित्र स्थान म्हणून केले, जिथे स्वयंसेवक सामूहिक भावनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या "मी" पासून "आम्ही" पर्यंतचा प्रवास सुरू करतो. या शाखा चारित्र्यनिर्मितीच्या त्यागाच्या प्रेरणा स्त्रोत आहेत, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला चालना देतात असे त्यांनी म्हटले. पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले की शाखांमध्ये, राष्ट्रीय सेवेची भावना आणि धैर्य मूळ धरते, त्याग आणि समर्पण नैसर्गिक बनते, वैयक्तिक श्रेयाची इच्छा कमी होते आणि स्वयंसेवक सामूहिक निर्णय घेण्याची आणि संघभावना ही मूल्ये आत्मसात करतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा प्रवास तीन पायाभूत स्तंभांवर आधारित आहे - राष्ट्र उभारणीचे भव्य स्वप्न, वैयक्तिक विकासाचा स्पष्ट मार्ग आणि शाखांच्या स्वरूपात एक साधी पण गतिमान कार्यपद्धती, यावर भर देऊन, मोदी म्हणाले की या स्तंभांवर उभे राहून, संघाने लाखो स्वयंसेवक घडवले आहेत जे समर्पण, सेवा आणि राष्ट्रीय उत्कृष्टतेच्या वचनबद्ध प्रयत्नांद्वारे विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती करत आहेत.
स्थापनेपासून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या प्राधान्यक्रमांना राष्ट्राच्या प्राधान्यांशी जुळवून घेतले आहे हे पुष्टी देऊन, मोदी म्हणाले की प्रत्येक युगात, संघाने देशासमोरील प्रमुख आव्हानांना तोंड दिले आहे. स्वातंत्र्यलढ्याची आठवण करून देताना त्यांनी नमूद केले की आदरणीय डॉ. हेडगेवार आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता, ज्यामध्ये डॉ. हेडगेवार यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला होता. संघाने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना पाठिंबा दिला होता, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले होते. त्यांनी चिमूरमधील 1942 च्या चळवळीचा उल्लेख केला, जिथे अनेक स्वयंसेवकांनी ब्रिटिशांच्या कठोर अत्याचारांना तोंड दिले असे पंतप्रधानांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर, संघाने आपले बलिदान चालू ठेवले, असे त्यांनी नमूद केले. हैदराबादमधील निजामाच्या जुलूमाचा प्रतिकार करण्यापासून ते गोवा आणि दादरा आणि नगर हवेलीच्या मुक्ततेत योगदान देण्यापर्यंत. संपूर्ण काळात, मार्गदर्शक भावना "राष्ट्र प्रथम" राहिली आणि अटल ध्येय "एक भारत, श्रेष्ठ भारत" होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रीय सेवेच्या प्रवासात हल्ले आणि कटांना तोंड द्यावे लागले आहे हे मान्य करून, मोदी यांनी स्वातंत्र्यानंतरही संघाला दडपण्याचे आणि मुख्य प्रवाहात त्यांचे एकीकरण रोखण्याचे प्रयत्न कसे केले गेले याची आठवण करून दिली. पूज्य गुरुजींना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवण्यात आले यावर त्यांनी प्रकाश टाकला. तरीही, त्यांची सुटका झाल्यावर, गुरुजींनी संयमाने उत्तर दिले, "कधीकधी जीभ दाताखाली अडकते आणि चिरडली जाते. पण आम्ही दात मोडत नाही, कारण दात आणि जीभ दोन्ही आपले आहेत." पंतप्रधानांनी यावर भर दिला की गंभीर छळ आणि विविध प्रकारचे अत्याचार सहन करूनही, गुरुजींनी कोणताही राग किंवा द्वेषभावना मनात बाळगली नाही. त्यांनी गुरुजींचे ऋषीसारखे व्यक्तिमत्व आणि वैचारिक स्पष्टता हे प्रत्येक स्वयंसेवकासाठी मार्गदर्शक प्रकाश असल्याचे वर्णन केले, जे समाजाप्रती एकता आणि सहानुभूतीची मूल्ये बळकट करते. त्यांनी पुष्टी केली की बंदी, कट किंवा खोटे खटले असले तरीही स्वयंसेवकांनी कधीही कटुतेला जागा दिली नाही, कारण त्यांना समजले की ते समाजापासून वेगळे नाहीत - समाज त्यांच्यापासून बनलेला आहे. जे चांगले आहे ते त्यांचे आहे आणि जे कमी चांगले आहे ते देखील त्यांचे आहे.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही कटुता बाळगली नाही याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकाचा लोकशाही व घटनात्मक संस्थांवरील अढळ विश्वास. आणीबाणीच्या काळात याच विश्वासाने स्वयंसेवकांना धैर्य दिले आणि लढण्याची ताकदही दिली. समाजाशी एकरूपता आणि घटनात्मक संस्थांवरील श्रद्धा, हे दोन मूलभूत मूल्यं प्रत्येक संकटात स्वयंसेवकांना शांत ठेवतात आणि समाजाच्या गरजांच्या प्रति संवेदनशील बनवतात. अनेक आव्हानं असूनही संघ आजही विशाल वटवृक्षासारखा ठाम उभा राहून राष्ट्र व समाजाची सेवा करत आहे.
मोदी म्हणाले की स्थापनेपासूनच संघ देशभक्ती आणि सेवाभावाचे प्रतीक राहिला आहे. फाळणीच्या काळात लाखो कुटुंबं विस्थापित झाली, तेव्हा अल्प साधनांवरही स्वयंसेवक निर्वासितांच्या सेवेसाठी पुढे आले. ही केवळ मदत नव्हती, तर राष्ट्राच्या आत्म्याला बळकट करण्याची प्रक्रिया होती.
1956 मध्ये गुजरातच्या अंजारला भीषण भूकंप झाला, तेव्हा स्वयंसेवक मदत व बचावकार्यांत अग्रेसर होते. त्या वेळी गुरुजींनी गुजरातप्रमुख वकील साहेबांना पत्र लिहून सांगितलं होतं की “दुसऱ्यांच्या दु:खासाठी स्वतः कष्ट सहन करणं हे उदात्त हृदयाचं लक्षण आहे.”
मोदींनी 1962 च्या युद्धाचा उल्लेख केला, जेव्हा स्वयंसेवकांनी सैन्याला मदत केली, त्यांचं मनोबल वाढवलं आणि सीमेवरील गावांपर्यंत सहाय्य पोहोचवलं. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानातून लाखो निर्वासित भारतात आले, तेव्हा स्वयंसेवकांनी अन्न, निवारा, आरोग्यसेवा पुरवल्या, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्यांचे दु:ख वाटून घेतलं. 1984 च्या दंगलीतही स्वयंसेवकांनी अनेक शीख बांधवांना आसरा दिला.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नानाजी देशमुखांच्या चित्रकूट आश्रमात पाहिलेल्या सेवा कार्याने अचंबित झाले होते, तर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी नागपूर भेटीत संघाचं शिस्तबद्ध व साधेपणाचं रूप पाहून प्रभावित झाले होते.
पंतप्रधानांनी सांगितले की आजही पंजाबमधील पूर, हिमाचल-उत्तराखंडमधील आपत्ती किंवा केरळच्या वायनाडमधील दुर्घटना असो — स्वयंसेवक नेहमी पहिल्या रांगेत उभे राहतात. कोविड-19 महामारीत तर जगाने संघाचा सेवाभाव आणि धैर्य प्रत्यक्ष अनुभवले.
संघाच्या शताब्दी प्रवासातले सर्वात मोठे योगदान म्हणजे स्वाभिमान व आत्मभान जागे करणे. देशाच्या सर्वात दुर्गम, आदिवासी भागांत संघाने कार्य केले आहे. जवळपास दहा कोटी आदिवासी बांधवांच्या संस्कृती, सण, भाषा आणि परंपरांना संघाने प्राधान्य दिलं. सेवा भारती, विद्या भारती, वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या संस्था आदिवासी सबलीकरणाचे स्तंभ बनल्या आहेत. आज आदिवासी समाजात वाढतं आत्मविश्वास त्यांचं जीवन बदलत आहे.
मोदींनी लाखो स्वयंसेवकांच्या कार्याची प्रशंसा करत सांगितलं की त्यांनी आदिवासी समाजाच्या जीवनमान उंचावण्यात आणि राष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचं जतन करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. संपूर्ण इतिहासात आदिवासी विषयक चाललेले आव्हानात्मक आणि भ्रामक प्रचार लक्षात घेत पंतप्रधानांनी सांगितलं की संघाने शांतपणे, सातत्याने त्याग करून राष्ट्राचं रक्षण केलं आणि आपलं कर्तव्य निभावलं.
जातीभेद आणि जुन्या प्रतिगामी चालीरिती यासारख्या समाजात खोलवर रुजलेल्या अनिष्ट प्रथा हे हिंदू समाजासमोरचं खरं आव्हान आहे, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या आव्हानांवर मात करण्याचे प्रयत्न नेहमीच केल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. महात्मा गांधीनी वर्ध्यातील संघाच्या शिबिराला दिलेल्या भेटीची आठवण करुन देत पंतप्रधान म्हणाले की, संघाच्या समता, बंधुभाव आणि ऐक्याच्या विचारांची गांधीजींनी जाहीरपणे प्रशंसा केली. पंतप्रधान म्हणाले की, डॉ. हेडगेवारांपासून आतापर्यंत सरसंघचालक आणि संघाचा प्रत्येक वरिष्ठ सदस्य जातीभेद आणि अस्पृश्यतेविरोधात लढला आहे. आदरणीय गुरुजींनी “न हिंदू पतितो भवेत” म्हणजेच ‘प्रत्येक हिंदू एका कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्यांच्यातील कोणीही कनिष्ठ किंवा दलित नाही,’ याच भावनेचा सातत्यानं पुरस्कार केला असं त्यांनी सांगितलं. पूज्य बाळासाहेब देवरस म्हणत असत, जर अस्पृश्यता हे पाप नसेल; तर जगात कुठलीच गोष्ट पाप नाही, असं मोदी म्हणाले. सरसंघचालक म्हणून आपल्या कार्यकाळात पूज्य राजू भैय्या आणि पूज्य सुदर्शनजी यांनीही हीच भावना पुढे कायम जपली. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सामाजिक सलोख्यासाठी एक उद्दीष्ट समाजासमोर ठेवले आहे. ते म्हणजे, ‘एक गांव, एक मंदिर आणि एक स्मशानभूमी.’ देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत हा संदेश पोहोचवून संघानं भेदाभेद, गटतट आणि तणावमुक्त समाजाला चालना दिली आहे. हा सामाजिक सलोख्याचा पाया आणि सर्वसमावेशक समाजाचा निर्धार आहे. संघ सतत नव्या जोमानं या निर्धाराला बळ देत असल्याचं ते म्हणाले.
शंभर वर्षांपूर्वी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, त्यावेळच्या गरजा आणि संघर्ष वेगळा होता, असं मोदी म्हणाले. त्यावेळी देश आपल्या सांस्कृतिक मूल्यांचं रक्षण करण्यासाठी आणि पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी संघर्ष करत होता. आज विकसित देश बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू आहे आणि लवकरच भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल. आता देशासमोरची आव्हानं बदलली आहेत. लोकसंख्येचा एक मोठा भाग गरीबीवर मात करत आहे, युवा पिढीसाठी संधीची नवनवी क्षेत्रं खुली होत आहेत आणि राजकारणापासून हवामान धोरणापर्यंत अनेक क्षेत्रांत भारत आपलं मत जगासमोर स्पष्टपणे मांडत आहे. इतर देशांवरील आर्थिक अवलंबत्व, राष्ट्रीय ऐक्याला बाधा आणणारी कटकारस्थानं आणि लोकसंख्येच्या बळावर केले जाणारे अनुचित प्रकार ही आजच्या काळातली आव्हानं आहेत, असं ते म्हणाले. या आव्हानांचा सामना सरकार तत्परतेनं करत आहे याबद्दल पंतप्रधान म्हणून आपल्याला समाधान आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ही आव्हानं केवळ वेळीच ओळखली नाहीत; तर त्यावर मात करण्याचा मजबूत पथदर्शी आराखडा तयार केला याचा संघाचा स्वयंसेवक म्हणून अभिमान वाटतो, असं त्यांनी सांगितलं.
स्वत्त्वाची ओळख, सामाजिक सलोखा, कुटुंबाचे उत्थान, नागरी शिस्त आणि पर्यावरणाबाबत संवेदनशीलता, या संघाच्या पाच निर्धारांमध्ये बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे आणि राष्ट्रासमोरील आव्हानांचा सामना करण्याचं बळ स्वयंसेवकांना देणारी जबरदस्त प्रेरणा त्यामध्ये आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. याबाबत सविस्तर बोलताना ते म्हणाले की, स्वत्वाची ओळख म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता आणि देशाची संस्कृती, मातृभाषा यांचा अभिमान! स्वत्वाची ओळख म्हणजेच स्वदेशीचा स्वीकार. आत्मनिर्भरता हा आता एक पर्याय नसून ती गरज आहे. स्वदेशीच्या मंत्राचा सर्वांनीच निर्धार करावा असं आवाहन करुन ‘व्होकल फॉर लोकल’ अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकानं सर्वशक्तिनिशी प्रयत्न करावा अशी विनंती त्यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नेहमीच सामाजिक सलोख्याला प्राधान्य दिलं आहे, असं सांगून दुर्लक्षित राहिलेल्या समाज घटकांना प्राधान्य देऊन सामाजिक समानता प्रस्थापित करणे आणि देशाचे ऐक्य वाढवणे म्हणजेच सामाजिक सलोखा असं पंतप्रधान म्हणाले. देश आता अशा काही आव्हानांचा सामना करत आहे; ज्याचा परिणाम थेट एकता, संस्कृती आणि सुरक्षेवर होत आहे. फुटीरतावाद, क्षेत्रवाद ते जातीयवाद, भाषावाद आणि बाह्य शक्तींकडून भडकवल्या जाणाऱ्या भावना अशा विविध पातळ्यांवरची ही आव्हानं आहेत, याकडे मोदींनी लक्ष वेधले. ‘विविधतेत एकता’ हा भारतीयत्वाचा गाभा आहे. या गाभ्याला धक्का पोहोचला तर भारताचे सामर्थ्य नाहीसे होईल. म्हणूनच या मूलभूत तत्त्वाला सातत्यानं बळ देत राहणं गरजेचं आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं.
सामाजिक सलोख्याला आज सर्वात मोठा धोका घुसखोरी आणि लोकसंख्येच्या बळावर केलं जाणारं भावनिक आवाहन यांचा आहे. त्यांचा थेट परिणाम अंतर्गत सुरक्षा आणि शांतता यावर होतो, असं पंतप्रधान म्हणाले. यामुळेच आपण लाल किल्ल्यावरुन जनगणनेची घोषणा केली असं त्यांनी सांगितलं. सामाजिक सलोख्याला असलेल्या या धोक्याचा सामना करण्यासाठी सतर्क राहण्याचं आणि त्याला निष्प्रभ करण्यासाठी निर्धारपूर्वक कृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
कौटुंबिक उत्थान ही काळाची गरज आहे, असं मोदी म्हणाले. भारतीय संस्कृतीचा पाया असलेली, भारतीय मूल्यांवर आधारलेली कुटुंबव्यवस्था बळकट करणे म्हणजे कौटुंबिक उत्थान असल्याचं ते म्हणाले. कुटुंबाच्या तत्त्वाचे पावन, ज्येष्ठांचा आदर, महिलांचं सक्षमीकरण, युवा पिढीत मूल्यं रुजवणं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणं महत्त्वाचं असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. याबाबत कुटुंबात आणि समाजात जागरुकता निर्माण करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
प्रत्येक युगात प्रगती करणाऱ्या राष्ट्राने नागरी शिस्तीच्या मजबूत पायावर ते साध्य केले आहे हे अधोरेखित करुन पंतप्रधान म्हणाले की नागरी शिस्त म्हणजे स्वतःमध्ये कर्तव्याची भावना जोपासणे आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या जबाबदारीची जाणीव असल्याची खात्री करणे. स्वच्छतेचा प्रसार, राष्ट्रीय मालमत्तेविषयी आदर आणि कायदे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी त्यांची कर्तव्ये पार पाडावीत हा संविधानाचा आत्मा आहे आणि ही संवैधानिक मूल्ये सतत बळकट केली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करणे हे वर्तमान काळातील आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अत्यावश्यक असून ते थेट मानवतेच्या भविष्याशी निगडित आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आपल्याला केवळ अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर पर्यावरणावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. जलसंवर्धन, हरित ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा यांसारख्या अभियानांनी या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे ते म्हणाले.
स्व बोध, सामाजिक सौहार्द, कुटुंब प्रबोधन, नागरी शिस्त आणि पर्यावरणाविषयी जागरूकता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंच परिवर्तन संकल्प आहेत. राष्ट्राचे सामर्थ्य वाढवण्यात, भारताला विविध पातळ्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करण्यात आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात ते आधारस्तंभ म्हणून कार्य करतील, असे पंतप्रधान म्हणाले.
2047 मधील भारत हे तत्त्वज्ञान, विज्ञान, सेवा आणि सामाजिक समरसतेने साकारलेले समृद्ध राष्ट्र असेल. हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन आहे, सर्व स्वयंसेवकांचे सामूहिक ध्येय आहे आणि त्यांचा दृढ संकल्प आहे असे त्यांनी सांगितले. देशाप्रती असलेल्या अढळ श्रद्धेच्या पायावर संघाची उभारणी झाली असून समर्पण भावनेने प्रेरित आहे, त्याग आणि तपश्चर्येच्या यज्ञकुंडात रचला आहे तर मूल्य आणि शिस्त यांनी घडला आहे तर राष्ट्रीय कर्तव्यालाच आपल्या जीवनाचे सर्वोच्च कर्तव्य मानण्याच्या भावनेवर दृढ आहे, भारत मातेच्या सेवेच्या भव्य स्वप्नाशी संघ अतूटपणे जोडला आहे, असे ते म्हणाले.
भारतीय संस्कृतीचा मूलाधार अधिकाधिक बळकट करणे आणि खोलवर रुजवणे हा संघाचा आदर्श आहे. समाजात आत्मविश्वास आणि अभिमानाची भावना जागृत करण्याचे संघाचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक हृदयात समाज सेवेची ज्योत जागृत करणे हे संघाचे ध्येय आहे. भारतीय समाज सामाजिक न्यायाचा मूर्तिमंत आदर्श असावा हा त्यांचा दृष्टिकोन आहे. भारताचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवणे हे त्यांचे अभियान आहे. राष्ट्राला एक झळाळते आणि सुरक्षित भविष्य प्रदान करणे हा संघाचा संकल्प आहे, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि या ऐतिहासिक प्रसंगाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह (सरकार सरचिटणीस) दत्तात्रेय होसबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
स्वयंसेवक संघाच्या शतकमहोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून आरएसएसने राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारे विशेषत्वाने तयार केलेले स्मृती टपाल तिकीट आणि नाण्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झाले.
1925 मध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर, येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, नागरिकांमध्ये सांस्कृतिक जागरूकता, शिस्त, सेवा आणि सामाजिक जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने स्वयंसेवक-आधारित संघटना म्हणून केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय पुनर्बांधणीसाठी एक अद्वितीय लोक-संवर्धन चळवळ आहे. शतकानुशतके परकीय राजवटीला प्रतिकार म्हणून संघाचा उदय पाहिला गेला आहे. संघाची सातत्यपूर्ण वाढ धर्मात रुजलेल्या भारताच्या राष्ट्रीय गौरवाच्या दृष्टिकोनाच्या भावनिक अनुनादामुळे झाली आहे.
संघाचा मुख्य भर देशभक्ती आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीवर आहे. मातृभूमीची भक्ती, शिस्त, आत्मसंयम, धैर्य आणि वीरता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात येतो. संघाचे अंतिम ध्येय भारताची "सर्वंगीण उन्नती" (सर्वांगीण विकास) हे आहे. या ध्येयासाठी प्रत्येक स्वयंसेवक स्वतःला समर्पित करतो.
गेल्या शतकात, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आणि आपत्ती निवारणात राष्ट्रीय स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पूर, भूकंप आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये संघ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संलग्न संघटनांनी युवक, महिला आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी, सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना बळकटी देण्यासाठी योगदान दिले आहे.
शताब्दी उत्सव केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक प्रवासात आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशात त्यांनी दिलेल्या चिरस्थायी योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आहे.
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/सोनल तुपे/नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/राजश्री आगाशे/हेमांगी कुलकर्णी/गजेंद्र देवडा/सुरेखा जोशी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173846)
Visitor Counter : 5