पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्र्यांचा बिहारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ लाभार्थींशी संवाद – मराठी अनुवाद

Posted On: 26 SEP 2025 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2025

 

प्रस्तुतकर्ता – आता मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या निवडलेल्या लाभार्थींनी आपले अनुभव सांगायचे आहेत. मी सर्वप्रथम पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रंजीता काजी दीदींना विनंती करतो की त्या आपला अनुभव सांगावेत.

लाभार्थी (रंजीता काजी) – माननीय पंतप्रधान भाऊ आणि माननीय मुख्यमंत्री भाऊ यांना माझा सादर प्रणाम. माझे नाव रंजीता काजी आहे. मी पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहा दोन प्रखंडातील वाल्मीकि वन क्षेत्रातील आहे. मी आदिवासी आहे आणि जीविका स्वयं-सहायता गटाशी जोडलेली आहे. आमचा भाग जंगल परिसराचा आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आमच्या भागात रस्ता, वीज, पाणी, शौचालय आणि शिक्षणाची सोय होईल. पण आज त्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी मी माननीय मुख्यमंत्री भाऊ यांचे कोटी-कोटी आभार मानते. आपण आम्हा महिलांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम केलेत. महिलांसाठी वेगळे आरक्षण दिल्यामुळे आज सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि पंचायती राज संस्थांमध्ये मोठ्या संख्येने महिला दिसतात. सायकल योजना, पोशाख योजना आपण आधीच लागू केली होती. खूप छान वाटते, जेव्हा मुली पोशाख घालून आणि सायकल घेऊन शाळेकडे जातात. माननीय पंतप्रधान भाऊ, आपल्या उज्ज्वला योजनेमुळे महिलांना कमी किमतीत गॅस सिलेंडर मिळतो, त्यामुळे आमच्या महिला आता धुरात स्वयंपाक करत नाहीत. आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. आवास योजनेमुळे, आपल्या आशीर्वादाने, आज आम्ही पक्क्या घरात राहतो. माननीय मुख्यमंत्री भाऊ,आपण अलीकडेच 125 युनिट वीज मोफत केली आणि 400 वरून 1100 रुपयांपर्यंत पेन्शन वाढवली, यामुळे आमच्या महिलांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेतून 2 लाख आणि 10 हजार रुपयांची रक्कम जी महिलांच्या खात्यात येणार आहे, त्याने महिला खूप आनंदी आहेत आणि मीही आनंदी आहे. माझ्या खात्यात जेव्हा 10,000 रुपये येतील, तेव्हा मी पंपसेट घेईन, कारण मी शेतीशी जोडलेली आहे आणि मी ज्वारी, बाजरीची शेती करेन. आणि त्यानंतर 2 लाख रुपयांची रक्कम आमच्या खात्यात आली की, त्यातून मी ज्वारी-बाजरीपासून बनवलेल्या पिठाचा व्यवसाय सुरू करेन. यामुळे स्वदेशी विचाराला चालना मिळेल. असंच तुमचं हात आमच्या डोक्यावर राहिलं तर आमच्या रोजगाराला चालना मिळेल, आम्ही पुढे जाऊ आणि ‘लखपती दीदी’ बनू. आमच्या दीदी या काळात खूप आनंदी आहेत. या नवरात्र उत्सवाबरोबरच माननीय मुख्यमंत्री रोजगार योजना आम्ही उत्सवासारखी साजरी करत आहोत. मी माझ्या पूर्ण पश्चिम चंपारणच्या दीदींच्या वतीने माननीय पंतप्रधान भाऊ आणि माननीय मुख्यमंत्री भाऊ यांचे मनःपूर्वक कोटी-कोटी आभार मानते, मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद.

प्रस्तुतकर्ता – धन्यवाद दीदी. आता मी भोजपूर जिल्ह्यातील रीता देवी दीदींना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव सांगावेत.

लाभार्थी (रीता देवी) – माननीय पंतप्रधान भाऊ आणि मुख्यमंत्री भाऊ यांना आरा जिल्ह्याच्या वतीने मी प्रणाम करते. माझे नाव रीता देवी आहे. मी मोहम्मदपूर गाव, दौलतपूर पंचायत, कोयला पोलीस ठाणे, आरा जिल्ह्याची रहिवासी आहे. 2015 साली मी स्वयं-सहायता गटाची सदस्य झाले. सदस्य झाल्यावर पहिल्या टप्प्यात 5000 रुपये घेऊन चार बकऱ्या घेतल्या आणि त्यातून माझा रोजगार सुरू केला. त्यातून जी कमाई झाली, त्यातून 50 कोंबड्या घेतल्या आणि अंड्याचा व्यवसाय सुरू केला. अंडी 15 रुपयांना विकली. कोंबडीचे अंडे उबवून मी दिव्याच्या उष्णतेत पिलांची पैदास करू लागले आणि त्यातून आमच्या घरची आर्थिक स्थिती खूप सुधारली. मी ‘लखपती दीदी’ झाले आणि ‘ड्रोन दीदी’ देखील झाले, आणि आमचा खूप विकास झाला. आरा जिल्ह्यातील सर्व दीदींच्या वतीने पुन्हा एकदा पंतप्रधान भाऊ आणि मुख्यमंत्री भाऊ यांचे मनःपूर्वक आभार मानते की मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आल्यापासून गावात खूपच उत्साह आहे, जणू आनंदाला पार नाही. अनेक दीदी सांगतात की आम्ही गाय, बकरी पाळली, कोणी चूडीची दुकान उघडली. माझ्या खात्यात 10,000 रुपयांचा पहिला हप्ता आला तेव्हा मी आणखी 100 कोंबड्या घेतल्या, कारण थंडीत अंड्याची मागणी वाढते. आता आणखी 100 कोंबड्या घेऊन माझा व्यवसाय वाढवला आहे. जेव्हा 2 लाख मिळतील तेव्हा मी पोल्ट्री फार्म सुरू करून त्यात यंत्रणा लावेन, माझा रोजगार वाढवेन. पंतप्रधान आवास योजनेमुळे आम्ही आता पक्क्या घरात राहतो. आधी आम्ही मातीच्या घरात राहत होतो, पावसात पाणी झिरपायचे. आता सगळ्या घरात पक्की घरे आहेत. शौचालयाबाबत बोलायचं तर आधी आम्हाला शेतात जावं लागायचं, लाज वाटायची, पण आता प्रत्येक घरात शौचालय आहे. नळ-जल योजनेमुळे शुद्ध पाणी मिळतंय, त्यामुळे रोगराईपासूनही मुक्ती मिळाली. उज्ज्वला गॅस योजनेखाली गॅस कनेक्शन मिळाल्याने आम्ही चुलीवर स्वयंपाक करणं बंद केलं. चुलीचा धूर डोळ्यांना त्रास देत असे. आता आम्ही गॅसवर स्वयंपाक करतो आणि आनंदी आहोत. आयुष्मान आरोग्य कार्डमुळे आम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. एक रुपयाही लागत नाही. गावात 125 युनिटपर्यंत वीज मोफत मिळते. आधी संध्याकाळी अंधार व्हायचा, आता चारही बाजूंनी प्रकाश आहे. आधी आम्ही मुलांना लवकर लाईट बंद करायला सांगायचो, आता मुले निर्धास्तपणे लाईटमध्ये अभ्यास करतात. महिलांना योजनांचा फायदा झाल्याने त्यांच्या मुलांनाही त्याचा लाभ होतो. आधी मुलींना दूर शाळेत जावं लागायचं, पण आता त्यांना शाळेसाठी सायकल मिळते. पोशाखात जेव्हा सगळे मुले एकाच रंगाची गणवेश घालून रस्त्यावर जातात तेव्हा खूप छान वाटतं. मी शिकत असताना मलाही सायकल आणि पोशाख मिळाला होता. मी पोशाख घालून सायकलने शाळेत जायचे. यामुळेच मी पूर्ण आरा जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान भैया आणि नीतीश भैया तसेच सर्व दीदी, सर्व महिलांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद देते. (सूचना – आरा जिल्ह्याच्या लाभार्थी रीता देवी यांनी स्थानिक भाषेत संवाद साधला होता, येथे त्याचा हिंदी भावानुवाद मराठीत दिला आहे.)

पंतप्रधान – रीता दीदी, तुम्ही खूप सुपरफास्ट बोलता, आणि सगळ्या योजनांची नावेही सांगितलीत. खूप छान बोललात, खूप छानपणे मांडलं तुम्ही. तुमचं शिक्षण कितपत झालं आहे रीता दीदी?

लाभार्थी (रीता दीदी) – भाऊ, मी जीविका (स्वयं-सहायता गट) मध्ये येऊन शिकायला सुरुवात केली, मॅट्रिक केले, इंटर केले, बीए केले. आता मी एमए मध्ये प्रवेश घेतला आहे.

पंतप्रधान – अरे वा!

लाभार्थी (रीता दीदी) – मी आता जीविकेमार्फत शिकत आहे. भाऊ , मी आधी शिक्षित नव्हते.

पंतप्रधान – चालेल, तुम्हाला खूप शुभेच्छा!

लाभार्थी (रीता दीदी) – भाऊ, तुम्हाला सर्व दीदींच्या वतीने खूप खूप आशीर्वाद.

प्रस्तुतकर्ता – धन्यवाद रीता देवी दीदी. आता मी गया जिल्ह्यातील नूरजहां खातून दीदींना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव सांगावेत.

लाभार्थी – माननीय पंतप्रधान भैय्या! यांना माझा नमस्कार. माननीय मुख्यमंत्री भैय्या! यांना माझा नमस्कार. माझे नाव नूरजहां खातून आहे. मी झिकटिया गाव, झिकटिया प्रखंड बोधगया, जिल्हा गया येथील रहिवासी आहे. मी गुलाब जी विकास बचत गटाची अध्यक्ष आहे. सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की सर्व महिलांना रोजगार करण्यासाठी जो 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे हे ऐकून महिलावर्ग खूप आनंदात आहे आणि सर्वांच्या घरात, परिसरात, गावात यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. सर्व महिला एकत्र येऊन चर्चा करत आहेत की आता आपल्याला आपल्या इच्छेनुसार रोजगार मिळवता येईल. सर्वत्र आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. आम्हाला जो पहिला 10 हजार रुपयांचा हप्ता मिळेल त्यातून मी देखील माझ्या शिलाई दुकानात एक मोठे काउंटर तयार करणार आहे. त्या काउंटरवर मी आपले सामान ठेवून त्याची विक्री करणार आहे. माझे शिलाईचे दुकान पूर्वीपासूनच आम्ही चालवत आहोत. पूर्वी माझे पती इतरांकडे शिलाई काम करत होते. मात्र आता मी माझ्या पतीला माझ्याच दुकानात बोलवले असून आता आम्ही दोघे पती-पत्नी याच दुकानात बसून आपला व्यवसाय चालवणार आहोत. मी स्वतःचा व्यवसाय तर चालवतच आहे, त्यासोबतच मी इतर 10 जणांना रोजगार मिळवून दिला आहे. भविष्यासाठी माझा असा विचार आहे की जर मला ते 2 लाख रुपये मिळाले तर त्यातून आम्ही आपला व्यवसाय आणखी वाढवू, दुकानातील मशीनची संख्या देखील वाढवू, याशिवाय आणखी 10 लोकांना रोजगार देखील मिळवून देऊ. 

मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री भैय्या आहेत, ते आम्हा स्त्रियांसाठी ते खूपच मोठे काम करत आहेत. महिला वर्गांच्या अडचणी ते कायम लक्षात ठेवतात आणि आजही ते आम्हा स्त्रियांची प्रगती व्हावी यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. पूर्वी आम्ही स्त्रिया आपल्या घरात कंदील किंवा बत्तीच्या उजेडात स्वयंपाक घरात काम करत होतो. आता मात्र, जेव्हापासून 125 युनिट पर्यंत विजेचे बिल माफ करण्यात आले आहे तेव्हापासून मला आजवर विजेचे बिल आले नाही. यामुळे आमच्या पैशांची जी बचत होत आहे, ते पैसे आम्ही आमच्या मुलांच्या ट्युशन फी साठी, शिक्षणावर खर्च करत आहोत. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे, अत्यंत गरीब स्त्रिया विजेचे बिल भरावे लागत होते म्हणून विजेची जोडणीच घेत नव्हत्या. आज मात्र मला वाटते की 100% अत्यंत गरीब महिलांनी देखील आपल्या घरात विजेची जोडणी घेतली आहे आणि त्यांच्या घरांमध्ये देखील विजेचा दिवा आपला प्रकाश फैलावत आहे, त्यांची मुले रात्री बल्ब लावून त्या उजेडात अभ्यास करत आहेत. आणि भैय्या, पूर्वी जेव्हा बचत गट नव्हते तेव्हा आम्ही स्त्रिया घराच्या बाहेर पडतच नव्हतो, पण बचत गटांची स्थापना झाल्यावर आम्ही स्त्रिया जेव्हा घरातून बाहेर पडू लागलो, तेव्हा घरातून बऱ्याच वेळा आम्हाला ओरडा ऐकावा लागला. काही स्त्रियांच्या पतीने तर त्यांना मारहाण देखील केली, म्हणून इतरजणी देखील घाबरून घराबाहेर पडत नव्हत्या. मात्र, आज असे दिवस आले आहेत की जर कोणी पुरुष अथवा कोणीही आम्हाला भेटायला आमच्या घरी येते, तेव्हा आमचे पती असो किंवा परिवारातील कोणीही सदस्य असो सर्वात आधी आम्हाला सांगतात की ‘बाहेर जाऊन पहा, तुम्हाला भेटण्यासाठी कुणीतरी आले आहे’. आता जेव्हा आम्ही स्त्रिया घराबाहेर पडतो तेव्हा आमच्या कुटुंबातील लोकांना खूप आनंद होतो की आपल्या घरातील स्त्रिया कामानिमित्त आता बाहेर जात आहेत. घराबाहेर पडून रोजगार मिळवणे आणि काम करणे आम्हाला खूपच आवडत आहे. मला असे वाटते की आपले काम आणखीन वाढवावे आणि अनेक स्त्रियांना रोजगार द्यावा, त्यांना शिक्षण द्यावे, त्यांना काम शिकवावे आणि प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून त्याही पुढे जातील. माझे पती जे की ऑल राऊंडर टेलर मास्टर आहेत. खरं सांगायचं तर पूर्वी आम्ही स्त्रिया आमच्या पतीलाच आपली संपत्ती समजत होतो, मात्र आज आमचे पती देखील आम्हा स्त्रियांना लखपती समजत आहेत आणि ‘या आमच्या घरातील लखपती’ अशी अत्यंत अभिमानाने आमची ओळख करून देत आहेत. आणि भैय्या, आमचे कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीतून येथवर आले आहे. पूर्वी आम्ही कुडाच्या घरात राहत होतो. पण आता मात्र आम्ही त्या कुडाच्या घरात देखील खूप आनंदाने राहत आहोत कारण आता आम्ही त्याला महाल बनवले आहे. मी गया जिल्ह्यातील महिलांच्या वतीने आपल्या पंतप्रधान भैय्यांचे हृदयपूर्वक आभार मानते आहे. मुख्यमंत्री भैय्यांचे देखील मी गया जिल्ह्यातील सर्व भगिनींच्या वतीने आभार मानते. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172294) Visitor Counter : 6