पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमधील बांसवाडा येथे विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
25 SEP 2025 6:11PM by PIB Mumbai
माँ त्रिपुर सुंदरी की जय! बेणेश्वर धाम की जय! मानगढ़ धाम की जय!
आपणा सर्वांना जय गुरु! राम-राम! राज्यपाल श्रीमान हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधराराजे जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, आमच्यासोबत जोधपूरहून उपस्थित असणारे बंधू गजेंद्र सिंह शेखावत जी आणि अश्विनी वैष्णव जी, बीकानेरहून आमच्या सोबत असणारे अर्जुन राम मेघवाल जी, येथे उपस्थित उप मुख्यमंत्री प्रेम चंद बैरवा जी, दिया कुमारी जी, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मदन राठौड़ जी, राजस्थान सरकार मधले मंत्री, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,
आज, नवरात्रीच्या चौथ्या दिवशी, मला बांसवाडा येथील माँ त्रिपुर सुंदरीच्या भूमीला भेट देण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी कांठल आणि वगडची गंगा मानल्या जाणाऱ्या माही मातेचेही दर्शन घेतले. माहीचे पाणी आपल्या आदिवासी बंधू-भगिनींच्या संघर्षाचे आणि लवचिकतेचे प्रतीक आहे. माहीचे पवित्र पाणी महान नेते गोविंद गुरुजींच्या प्रेरणादायी नेतृत्वाने जागृत झालेल्या महागाथेचे साक्षीदार आहे. मी माँ त्रिपुर सुंदरी आणि माही माता यांना आदरपूर्वक वंदन करतो.
मित्रहो,
भक्ती आणि शौर्याच्या या भूमीवरून, मी महाराणा प्रताप आणि राजा बंसिया भिल यांचे आदराने स्मरण करतो आणि त्यांच्याप्रति आदर भावना व्यक्त करतो.
मित्रहो,
नवरात्रीच्या काळात आपण शक्तीच्या नऊ रूपांची पूजा करतो आणि आज, ऊर्जा शक्तीशी संबंधित, म्हणजेच वीज उत्पादनाशी संबंधित असा भव्य कार्यक्रम येथे होतो आहे. राजस्थानच्या भूमीवरून भारताच्या वीज क्षेत्रातील सामर्थ्याचा एक नवा अध्याय लिहिला जातो आहे. आज राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे वीज प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे एकाच वेळी उद्घाटन होते आहे, यावरून, देश विजेच्या वेगाने पुढे जात आहे आणि या वेगामध्ये देशाच्या सर्व भागांचा समावेश आहे, हे दिसून येते. प्रत्येक राज्याला प्राधान्य दिले जाते आहे. येथे राजस्थानमध्ये, स्वच्छ ऊर्जा प्रकल्प आणि ट्रान्समिशन लाईन्सची पायाभरणी करण्यात आली आहे. बांसवाडा येथे राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील करण्यात आले, म्हणजेच देश सौर ऊर्जेपासून अणुऊर्जेपर्यंत आपली वीज निर्मिती क्षमता नवीन उंचीवर नेत आहे.
मित्रहो,
आज तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या या युगात, विकासाचे वाहन विजेवर चालते. वीज असेल तर प्रकाश असतो! वीज असेल तर वेग असतो! वीज असेल तर प्रगती असते! वीज असेल तर अंतर कमी होते! आणि वीज असेल तर जग असते.
पण माझ्या बंधू आणि भगिनींनो,
आपल्या देशातील काँग्रेस सरकारने विजेच्या महत्त्वाकडे लक्ष दिले नाही. 2014 साली तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली आणि मी जबाबदारी स्वीकारली तेव्हा देशात 2.5 कोटी घरे होती, जिथे वीज जोडणी नव्हती. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही देशातील 18,000 गावांमध्ये विजेचे खांब नव्हते. देशातील मुख्य शहरांमध्ये तासनतास वीजपुरवठा खंडित होत असे. गावांमध्ये 4-5 तास वीजपुरवठा असणे ही मोठी गोष्ट मानली जात असे; आणि त्यावेळी लोक विनोद करायचे की आमच्या भागात वीज जाते, ती बातमी नाही. लोक म्हणायचे की वीज परत आली, ती बातमी होती. लोक एकमेकांचे अभिनंदन करायचे, आणि म्हणायचे, आज एक तास वीज आली. अशी परिस्थिती होती आणि वीजेअभावी कारखाने चालू शकत नव्हते. नवीन उद्योग उभारता येत नव्हते. राजस्थानसह देशभरात ही परिस्थिती होती.
मित्रहो,
2014 मध्ये आमच्या सरकारने ही परिस्थिती बदलण्याचा संकल्प केला. आम्ही देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवली. आम्ही 2.5 कोटी घरांना मोफत वीज जोडणी दिली. आणि जिथे जिथे वीजवाहिन्या पोहोचल्या, तिथे तिथे वीज पोहोचली, ज्यामुळे लोकांचे जीवन सोपे झाले आणि तिथे नवीन उद्योग भरभराटीला आले.
मित्रहो,
एकविसाव्या शतकात, जो देश वेगाने विकास करू इच्छितो त्याला आपले वीज उत्पादन वाढवावे लागेल, आणि स्वच्छ ऊर्जेचे नेतृत्व करणारे देश हे सर्वात यशस्वी देश असतील. म्हणूनच, आमचे सरकार स्वच्छ ऊर्जा मोहिमेला लोकचळवळ बनवण्याचे काम करत आहे. आम्ही पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली. आज, या योजनेअंतर्गत, शहरे आणि गावांमध्ये छतावर सौर पॅनेल बसवले जात आहेत. आपल्या शेतकऱ्यांना परवडणारी वीज मिळावी यासाठी, पंतप्रधान-कुसुम योजनेअंतर्गत शेतात सौर पंपही बसवले जात आहेत. आजघडीला अनेक राज्यांमध्ये सौर प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांचा लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. यामध्ये घरी मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान-सूर्यघर मोफत वीज योजना आणि शेतात मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान-कुसुम योजना यांचा समावेश आहे. काही काळापूर्वी, मी पंतप्रधान-कुसुम योजनेचे लाभार्थी असलेल्या माझ्या अनेक शेतकरी बंधू-भगिनींशी बोलत होतो. मी महाराष्ट्रातील शेतकरी बंधू-भगिनींशीही बोलत होतो आणि त्यांचे अनुभव खूप उत्साहवर्धक होते. सौर ऊर्जेपासून मिळणारी मोफत वीज त्यांच्यासाठी एक मोठे वरदान ठरत आहे.
मित्रहो,
आज भारत विकासाच्या दिशेने वेगाने काम करत आहे आणि राजस्थान देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज राजस्थानच्या जनतेसाठी 30,000 कोटी रुपये खर्चाचे इतर प्रकल्प देखील सुरू करण्यात आले आहेत. पाणी–वीज–आरोग्य, यांच्याशी संबंधित या प्रकल्पांमुळे तुमच्या सुविधा वाढणार आहेत. मी आत्ताच वंदेभारतसह तीन नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. सध्या देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचे मोठे अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज राजस्थानमधील 15 हजार तरुणांना शासकीय नोकऱ्यांच्या नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. या जीवनप्रवासाच्या नव्या टप्प्यासाठी मी त्या सर्व तरुणांना शुभेच्छा देतो. तसेच राजस्थानच्या जनतेला विकासाच्या या प्रकल्पांसाठीही शुभेच्छा देतो.
मित्रहो,
मला आनंद आहे की आज राजस्थानचे भाजपा सरकार राज्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. काँग्रेसने राजस्थानची लूट केल्यामुळे झालेल्या जखमा भरून काढण्याचे काम आमचे सरकार करत आहे. काँग्रेसच्या राजवटीत राजस्थान हे पेपरफुटीचे केंद्र बनले होते. जल जीवन मिशनलाही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराने पोखरले होते. महिलांवरील अत्याचार शिगेला पोहचले होते, बलात्काऱ्यांना संरक्षण दिले जात होते. काँग्रेसच्या राजवटीत बांसवाडा, डुंगरपूर, प्रतापगढ अशा भागांत गुन्हेगारी आणि अवैध दारूचा व्यापार बोकाळला होता. पण इथे तुम्ही भाजपाला संधी दिली, तेव्हा आम्ही कायदा–सुव्यवस्था बळकट केली, योजनांना गती दिली. आम्ही इथे मोठमोठे प्रकल्प उभे केले आहेत. आज राजस्थानमध्ये महामार्ग, एक्सप्रेस मार्ग याचे जाळे उभारले जात आहे. आज भाजपा सरकार राजस्थानला, दक्षिण राजस्थानला जलद विकासाच्या मार्गावर पुढे नेत आहे.
मित्रहो,
आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. त्यांनी आपल्याला ‘अंत्योदय’ ही संकल्पना दिली होती. अंत्योदय म्हणजे समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीचा उत्कर्ष! त्यांचा हा दृष्टिकोन आज आमचे ध्येय बनले आहे. आज आम्ही अत्यंत सेवाभावाने गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, सर्वांच्या हितासाठी काम करतो आहोत. “सबका साथ, सबका विकास” या मंत्रानं आम्ही वाटचाल करत आहोत.
मित्रहो,
काँग्रेसने आदिवासी समाजाकडे नेहमीच दुर्लक्ष केले, त्यांच्या गरजा कधी समजूनच घेतल्या नाहीत. भाजपा सरकारने आदिवासींच्या कल्याणाला प्राधान्य देत वेगळे मंत्रालय निर्माण केले. अटलजींचे सरकार आले तेव्हा पहिल्यांदाच आदिवासी मंत्रालय स्थापन झाले. त्याआधी इतकी दशके गेली, इतके मोठे नेते झाले, पण आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण झाले नाही. अटलजी आल्यावरच ते शक्य झाले. काँग्रेसच्या काळात आदिवासी भागात इतके मोठे प्रकल्प येतील, याची कल्पनाही करता आली नसती! आज भाजपा सरकारने ते शक्य करून दाखवले आहे. नुकतेच आम्ही मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात एक मोठे “पंतप्रधान मित्र” पार्क सुरू केले आहे आणि हासुद्धा आदिवासी भागच आहे. याचा मोठा फायदा आदिवासी शेतकऱ्यांना, तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
मित्रहो,
भाजपाच्या प्रयत्नांमुळेच आज गरीब आदिवासी कुटुंबातील कन्या आदरणीय द्रौपदी मुर्मू जी देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. राष्ट्रपतीनींच आदिवासी समाजातल्या अति–मागास गटांचा मुद्दा मांडला होता. त्यांच्याच प्रेरणेने आम्ही “पंतप्रधान जनमन योजना” सुरू केली आहे. त्याअंतर्गत आदिवासी समाजातल्या अति–मागास घटकांना प्राधान्य दिले जात आहे. “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना” अंतर्गत आदिवासी खेड्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे. भगवान बिरसा मुंडा यांना लोक “धरती आबा” म्हणून ओळखतात. या अभियानाचा फायदा 5 कोटींपेक्षा जास्त आदिवासींपर्यंत पोहोचणार आहे. आज देशभर शेकडो एकलव्य मॉडेल आदिवासी शाळा सुरू केल्या जात आहेत. आम्ही वनवासीयांना आणि अनुसूचित जमातींना त्यांच्या वनहक्कांची मान्यताही दिली आहे.
मित्रहो,
तुम्हाला माहीतच आहे, आपले आदिवासी बांधव हजारो वर्षांपासून जंगलातल्या साधनसंपत्तीचा उपयोग करत आले आहेत. ही वनसंपत्ती त्यांच्या प्रगतीचे साधन ठरावी, यासाठी आम्ही “वनधन योजना” सुरू केली. जंगलातल्या उत्पन्नांवरचा किमान हमीभाव वाढवला. आदिवासी समाजाच्या उत्पादनांना आम्ही बाजारपेठेशी जोडले. परिणामी, आज देशात जंगलउत्पन्नात विक्रमी वाढ झाली आहे.
मित्रहो,
आदिवासी समाजाला स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळावी, ही आमची बांधिलकी आहे. त्यांचा विश्वास, त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची संस्कृती जपणे, हा आमचा संकल्प आहे.
मित्रहो,
जेव्हा देशातील सामान्य माणसाचे जीवन सोपे होते, तेव्हा तो स्वतःहून पुढे येऊन देशाच्या प्रगतीचे नेतृत्व करतो. 11 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात परिस्थिती किती वाईट होती हे तुम्हाला आठवतच असेल, आणि ती एवढी वाईट का होती? कारण काँग्रेस सरकार देशवासीयांच्याच शोषणात गुंतले होते, काँग्रेस सरकार लोकांची लूट करत होते. काँग्रेसच्या राजवटीत कर आणि महागाई आभाळाला भिडले होते. तुम्ही जेव्हा मोदींना आशीर्वाद दिलात, तेव्हा आमच्या सरकारने काँग्रेसची लूट थांबवली.
मित्रहो,
हे लोक हल्ली माझ्यावर खूप रागावलेले असतात, त्यामागचे कारणही हेच आहे.
मित्रहो,
2017 मध्ये आम्ही वस्तू आणि सेवा कर लागू करून देशाला कर आणि टोलच्या जंजाळातून मुक्त केले. नुकत्याच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वस्तू आणि सेवा करात आणखी मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. त्याचा परिणाम असा की आज संपूर्ण भारत “जीएसटी बचत उत्सव” साजरा करत आहे. रोजच्या वापरातल्या बहुतेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. इथे इतक्या मोठ्या संख्येनं माताभगिनी आल्या आहेत आणि मी जेव्हा जीपमधून येत होतो, तेव्हा सर्व माताभगिनी आशीर्वाद देत होत्या. घरातल्या माताभगिनींसाठी स्वयंपाकाचा खर्च कमी झाला आहे.
मित्रहो,
वर्ष 2014 पूर्वी जर तुम्ही साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथपावडर असे रोजच्या वापराचे सामान शंभर रुपयांचे खरेदी केले असते, तर ते शंभर रुपयांचे सामान तुम्हाला 131 रुपयांना पडायचे. सामानाचे मूल्य शंभर, पण द्यावे लागायचे 131 रुपये. ही गोष्ट मी 2014 पूर्वीची सांगतोय. आजकाल काही नेते वेगवेगळ्या प्रकारचे खोटे प्रचार करत आहेत. त्याकाळी काँग्रेस सरकार 100 रुपयांच्या खरेदीवर 31 रुपये कर घेत होते. 2017 मध्ये जेव्हा प्रथमच आम्ही जीएसटी लागू केला, तेव्हा हेच शंभर रुपयांचे सामान फक्त 18 रुपये कर वाढून 118 रुपयात मिळू लागले. म्हणजे काँग्रेस सरकारपासून भाजप सरकार आल्यावर शंभर रुपयांच्या खरेदीवर 13 रुपयांची बचत झाली. आता 22 सप्टेंबरला आम्ही पुन्हा जीएसटीत सुधारणा केली आणि त्या नंतर 2014 पूर्वी ज्या शंभर रुपयांच्या सामानासाठी 131 रुपये द्यावे लागत होते, ते आता शंभर रुपयांच्या खरेदीवर फक्त 5 रुपये कर बसतो, म्हणजे 105 रुपये द्यावे लागतात. कुठे 31 रुपये आणि कुठे फक्त 5 रुपये. म्हणजे काँग्रेसच्या तुलनेत आज शंभर रुपयांच्या खरेदीवर 26 रुपयांची बचत होत आहे. आई-बहिणी तर घरखर्चाचा सगळा हिशोब ठेवतात. या हिशोबाने दरमहा आता शेकडो रुपयांची बचत होणार आहे.
मित्रहो,
बूट-चप्पल ही सगळ्यांचीच गरज असते. काँग्रेसच्या राजवटीत जर तुम्हाला 500 रुपयांचे बूट घ्यायचे असते, तर त्यावर बिल यायचे 575 रुपये. म्हणजे 500 रुपयांचे बूट आणि त्यावर 75 रुपये कर काँग्रेस सरकार तुमच्याकडून घेत असे. आम्ही जीएसटी लागू केला तेव्हा हा कर 15 रुपयांनी कमी झाला. आता नव्या जीएसटीनंतर ह्याच बुटांवर 50 रुपयांनी कमी पैसे द्यावे लागतात. आधी 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बुटांवर आणखी जास्त कर बसत होता. आम्ही तो 500 रुपयांचा टप्पाही काढून टाकला. आता आम्ही 2500 रुपयांपर्यंतच्या बुटांवरचा करसुद्धा कमी केला आहे.
मित्रहो,
साध्या कुटुंबाचे स्वप्न असते की त्यांच्याकडे एक स्कूटर किंवा मोटारसायकल असावी. काँग्रेसच्या काळात हेही अवघड होते. 60 हजार रुपयांच्या दुचाकीवर काँग्रेस 19 हजारांहून जास्त कर घेत असे. विचार करा, 60 हजारांवर 19 हजारांपेक्षा जास्त कर! 2017 मध्ये आम्ही जीएसटी आणल्यावर हा कर दोन-अडीच हजारांनी कमी केला. आता 22 सप्टेंबरला आम्ही जे दर लागू केले, त्यानुसार 60 हजारांच्या दुचाकीवर आता फक्त 10 हजार रुपये कर आहे. म्हणजे 2014 च्या तुलनेत जवळपास 9 हजार रुपयांचा फायदा झाला आहे.
मित्रहो,
काँग्रेसच्या राजवटीत स्वतःचे घर बांधणेही खूप महागडे होते. 300 रुपयांच्या सिमेंटच्या पोत्यावर काँग्रेस सरकार 90 रुपयांहून अधिक कर घेत असे. 2017 मध्ये जीएसटी आल्यानंतर हा कर सुमारे 10 रुपयांनी कमी झाला आणि आता 22 सप्टेंबरपासून जीएसटी सुधारणा केल्यानंतर त्याच पोत्यावर फक्त 50 रुपये कर बसतो. म्हणजे प्रत्येक पोत्यावर 2014 च्या तुलनेत आज 40 रुपयांची बचत होते. म्हणजे काँग्रेसच्या काळात लूटच लूट होती, आणि आज भाजप सरकारमध्ये बचतच बचत आहे. म्हणून तर देशभरात जीएसटी बचत उत्सव साजरा होत आहे.
पण बंधूंनो आणि भगिनींनो,
हा जीएसटी बचत उत्सव चालू आहे, पण आमचे एक अजून मोठे ध्येय आहे, आत्मनिर्भर भारताचे. आपण कोणावरही अवलंबून न राहणे खूप आवश्यक आहे आणि त्याचा मार्ग स्वदेशीच्या मंत्रातूनच जातो. म्हणून स्वदेशीचा मंत्र विसरायचा नाही. मी तुमच्यापैकी प्रत्येकाला, राजस्थानमध्ये आणि देशभरात मला ऐकणाऱ्यांना, विशेषत: माझ्या व्यापारी बांधवांना विनंती करतो, आपण जे विकू, ते स्वदेशीच विकू आणि देशवासीयांनीही ठरवावे की, आपण जे खरेदी करू, ते स्वदेशीच खरेदी करू. आपण दुकानदाराला विचारू, हे स्वदेशी आहे का नाही?
माझी स्वदेशीची व्याख्या खूप सोपी आहे, कंपनी कोणत्याही देशाची असो, ब्रँड कोणत्याही देशाचा असो, पण ते उत्पादन भारतात बनलेले हवे, भारताच्या युवकांच्या मेहनतीने बनलेला हवे, त्यात आपल्या लोकांच्या घामाचा सुगंध हवा, आपल्या मातीचा सुगंध हवा. माझ्यासाठी तेच स्वदेशी आहे. त्यामुळे मी सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो, दुकानावर फलक लावा, अभिमानाने म्हणा, हे स्वदेशी आहे.
जेव्हा आपण स्वदेशी विकत घेतो, तेव्हा तो पैसा देशाच्या कारागिरांकडे, कामगारांकडे, व्यापाऱ्यांकडे जातो. तो पैसा बाहेर जात नाही, तर देशाच्या विकासाला लागतो, त्यातून नवे महामार्ग बनतात, नवे रस्ते बनतात, शाळा उभ्या राहतात, रुग्णालये बनतात, गरीबांना घरे मिळतात. म्हणूनच मित्रहो, स्वदेशी आपला स्वाभिमान बनवायचा आहे.
मी आवाहन करतो, सणांच्या या काळात आपण सारे मिळून स्वदेशी खरेदी करण्याचा संकल्प करूया. या संकल्पासह मी पुन्हा एकदा विकास आणि रोजगाराशी संबंधित अनेक प्रकल्पांसाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.
भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!
धन्यवाद!
***
शिल्पा पोफळे / माधुरी पांगे / निखिलेश चित्रे / नितीन गायकवाड / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2171603)
Visitor Counter : 6