गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची मुंबईत पार पडलेल्या फायनान्शियल एक्सप्रेसच्या इंडियाज बेस्ट बँक्स पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती, उपस्थितांनाही केले संबोधित
भारताने संरचनात्मक सुधारणा, प्रक्रियात्मक सुधारणा, डिजिटल प्रशासन आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून आपली विकास गाथा रचण्याची प्रक्रिया राखली आहे - अमित शाह
भारताच्या बँकिंग क्षेत्राने आता आपली व्याप्ती वाढवण्याचे उद्दिष्ट बाळगले पाहिजे तसेच आपल्या बँकांनी जगातील पहिल्या 10 बँकांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे शाह यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
25 SEP 2025 11:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2025
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वतीने आयोजित इंडियाज बेस्ट बँक्स पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधितही केले.
रामनाथ गोएंका यांच्यापासून ते विवेक गोएंका यांच्यापर्यंत, एक्सप्रेस समुहाने देशाच्या सार्वजनिक जीवनातील एकसंधता टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या कामाची संपूर्ण राष्ट्राने दखल घेतली पाहिजे असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी, विशेषतः इथल्या युवा वर्गासाठी 2047 पर्यंत देशाला पूर्ण विकसित राष्ट्र बनवण्याचे आणि जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करणारा देश म्हणून ओळख निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याची बाब त्यांनी नमूद केले. आता हे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाचा, विशेषतः युवा वर्गाचा संकल्प बनला आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. देशाच्या युवा पिढीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संकल्प 2047 पूर्वीच साध्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विविध जागतिक समस्यांमध्ये एक चमकता तारा म्हणून भारताचा होणारा उदय ही आपल्यासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे, असे अमित शाह म्हणाले. भारताने राजकीय स्थैर्य, विश्वासार्ह नेतृत्त्व, चैतन्यशील आर्थिक कामगिरी आणि लोकशाहीसाठी एक भक्कम पाया स्थापन केला आहे. या चार स्तंभावर आधारित दीर्घ कालीन या चार स्तंभांवर आधारित दीर्घकालीन धोरणांचा वापर करून, आपल्या अर्थव्यवस्थेने गेल्या 11 वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे चार स्तंभ भारताची खरी ताकद आहेत यावर शाह यांनी भर दिला.
कित्येक विकसित राष्ट्रे 1 ते 2 टक्के विकास दराने प्रगती करत असताना, भारताने 7 ते 8 टक्के विकास दर राखला आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले. परकीय थेट गुंतवणुकीतही भारताने 14 टक्के विकास दर राखला आहे. धोरणात्मक सुधारणा, प्रक्रियात्मक सुधारणा, डिजिटल प्रशासन आणि कल्याणकारी योजनांच्या 100% अमंलबजावणीतून आपली विकासाची यशोगाथा कायम राखणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक आर्थिक विश्लेषकांना भारताच्या विकासगाथेची दखल घेण्यास भाग पाडले गेले आहे, असे शाह म्हणाले. आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूकदारांचा प्रबळ विश्वास आहे, ग्राहकांमध्ये उत्साह आणि ऊर्जा आहे आणि सर्वसमावेशक विकासाचे एक स्पष्ट प्रतिबिंब आहे. देशाच्या प्रत्येक भागात आज विश्वास आणि आत्मविश्वासाचे वातावरण दिसून येत आहे, असे शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, 2014 मध्ये आपल्या देशातील बँकिंग क्षेत्राची स्थिती वाईट होती. 2008 ते 2014 या काळात एकूण 52 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले, त्यामुळे बुडीत कर्जाची मोठी समस्या निर्माण झाली. ते म्हणाले की, भारताचे बँकिंग क्षेत्र नोंदी ठेवण्यामधील निष्काळजीपणा, पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचाराने ग्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणल्याचे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आर्थिक समावेशन हा आपल्या संविधानाचा पाया आहे, मात्र देशात असे 60 कोटी लोक होते, ज्यांच्या कुटुंबांचे एकही बँक खाते नव्हते. गेल्या 10 वर्षांत मोदी सरकारने 53 कोटी बँक खाती उघडली आहेत, ज्यामुळे गरीबातील गरीब व्यक्तीही बँकिंग व्यवस्थेशी जोडली गेली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, 1999 मध्ये देशातील एकूण अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) 16 टक्के इतकी होती. 2004 मध्ये, अटलजींच्या सरकारच्या काळात, ते 7.8 टक्क्यांपर्यंत खाली आले, मात्र विरोधी पक्षाच्या राजवटीत पुढील दहा वर्षांत ते 19 टक्क्यांपर्यंत वाढले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत बुडीत कर्जे 19 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांवर आली. पारदर्शक शासन कसे परिवर्तन घडवते, याचे हे उदाहरण आहे. शाह म्हणाले की, आम्ही बँकिंग क्षेत्रासाठी 4-आर धोरण तयार केले- ओळख, पुनर्प्राप्ती, पुनर्भांडवलीकरण, आणि सुधारणा, आणि या आधारावर देशाच्या अर्थव्यवस्थेत फार मोठे परिवर्तन घडले. त्यांनी पुढे नमूद केले की मिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून आमच्या सरकारने बँकांमध्ये सुमारे 3.10 लाख कोटी रुपयांचे भांडवल ओतले. शाह म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या केवळ 10 वर्षांत एकट्या बँकिंग क्षेत्रात 86 मोठ्या सुधारणा केल्या.
पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडियाच्या माध्यमातून धोरणात्मक बदल घडवून आणले आहेत आणि भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्यात यश मिळवले आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. आपली निर्यात वाढत आहे आणि मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत, आम्ही उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. उत्पादन आधारित प्रोत्साहन, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक्स पार्क आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत, असे ते म्हणाले. येत्या काळात ही उदयोन्मुख क्षेत्रे भारताच्या विकासाचा प्रवास अधिक बळकट करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ बँकिंग क्षेत्रच नाही तर मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मागील सरकारमध्ये धोरणात्मक अडथळे होते, परंतु आम्ही ते बदलले आहे आणि भारताला धोरण-आधारित राष्ट्रात रूपांतरित केले आहे, असे त्यांनी सांगितले.
यानंतर, जीएसटी हा आपला उपक्रम असल्याचा दावा विरोधक करतात, मग तो कधीही का लागू केला गेला नाही? असा सवाल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारांना 14 टक्के वाढीचे आश्वासन दिले तेव्हाच जीएसटी लागू करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. जीएसटी संकलन 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्यानंतर, सरकारने लोकांना जीएसटीतून दिलासा देण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान मोदींइतकी मोठी कर कपात कोणीही केलेली नाही, असे शहा यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये, मोदी सरकारने केवळ विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात कौशल्य विकासाचा समावेश केला नाही तर अभ्यासाच्या प्रत्येक क्षेत्रात कौशल्य निर्माण करण्यासाठी जागा निर्माण केली, असे अमित शहा म्हणाले. भारतात प्रतिभावान किंवा कष्टाळू लोकांची कमतरता नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कौशल्यातील तफावत भरून काढण्यासाठी भारत सरकारने अतिशय प्रभावी धोरणे लागू केली आहेत, असेही त्यांनी सांगितले. लवकरच, कौशल्य, संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात, भारत जागतिक स्तरावर आपले स्थान निश्चित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/भक्ती सोनटक्के/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2171521)
आगंतुक पटल : 27