आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाची बिहारमधील एनएच-139 डब्ल्यूच्या साहेबगंज-अरेराज-बेतिया खंडाच्या चौपदरीकरणाच्या कामाला हायब्रीड ॲन्युइटी मोडवर मंजुरी, 3822.31 कोटी रुपये खर्चाने 78.942 किमी लांबीचा एकूण प्रकल्प उभारणार

Posted On: 24 SEP 2025 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2025

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बिहारमधील एनएच-139 डब्ल्यूच्या साहेबगंज-अरेराज-बेतिया खंडाच्या चौपदरीकरणाच्या कामाला मंजुरी दिली. 3822.31 कोटी रुपये खर्चाने एकूण 78.942 किमी लांबीचा हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे बांधकाम हायब्रीड ॲन्युइटी मोड अंतर्गत केले जाईल.

राज्याची राजधानी पाटणा आणि बेतिया यांच्यात कनेक्टिव्हिटी सुधारणे हा प्रस्तावित चौपदरी  ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे उत्तर बिहारमधील वैशाली, सारण, सिवान, गोपालगंज, मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण आणि पश्चिम चंपारण या जिल्ह्यांना भारत-नेपाळ सीमेलगतच्या भागांशी जोडले जाईल. तसेच, हा प्रकल्प लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीला मदत करेल, महत्त्वाच्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोच सुलभ करेल आणि कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्रे व सीमापार व्यापार मार्गांना उत्तम कनेक्टिव्हिटी देऊन प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देईल.

हा प्रकल्प सात पीएम गतिशक्ती आर्थिक नोड्स, सहा सामाजिक नोड्स, आठ लॉजिस्टिक नोड्स, आणि नऊ प्रमुख पर्यटन व धार्मिक केंद्रांना जोडेल. यामुळे केसरिया बुद्ध स्तूप (साहेबगंज), सोमेश्वरनाथ मंदिर (अरेराज), जैन मंदिर आणि विश्व शांती स्तूप (वैशाली), तसेच महावीर मंदिर (पाटणा) यांसारख्या प्रमुख वारसास्थळे आणि बौद्ध पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. परिणामी, बिहारमधील बौद्ध सर्किट आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाची क्षमता वाढण्यास मदत होईल.

हा नवीन एनएच-139W महामार्ग सध्याच्या गर्दीच्या आणि खराब रस्त्यांना एक चांगला, वेगवान पर्याय म्हणून नियोजित केला गेला आहे. हा मार्ग शहरी भागातून न जाता एनएच -31, एनएच -722, एनएच -727, एनएच -27 आणि एनएच -227ए या महामार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल.

या नवीन ग्रीनफिल्ड मार्गावर वाहनांचा सरासरी वेग 80 किमी/तास राखला जाईल. यामुळे साहेबगंज आणि बेतिया यांच्यातील प्रवासाचा वेळ 2.5 तासांवरून कमी होऊन फक्त 1 तासावर येईल. हा मार्ग प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांसाठी सुरक्षित, जलद आणि अखंडित कनेक्टिव्हिटी देईल.

78.94 किमी लांबीच्या या प्रकल्पामुळे सुमारे 14.22 लाख मनुष्य-दिवसांचा प्रत्यक्ष रोजगार आणि 17.69 लाख मनुष्य-दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. तसेच, या कॉरिडॉरच्या आसपास आर्थिक उपक्रम वाढल्यामुळे  रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील.

Project Alignment Map for Sahebganj-Areraj-Bettiah section of NH-139W

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2170919) Visitor Counter : 5