शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी विकसित भारत बिल्डेथॉन 2025 चा केला प्रारंभ


विकसित भारत बिल्डेथॉन 2025 नवोन्मेष पुनर्जागरणाला चालना देईल आणि आत्मनिर्भर भारताचे चालक म्हणून युवा नवोन्मेषकांना सक्षम बनवेल - धर्मेंद्र प्रधान

जानेवारी 2026 मध्ये निकाल आणि 1,000 हून अधिक विजेत्यांच्या सत्कारासह बिल्डेथॉनची होईल सांगता

Posted On: 23 SEP 2025 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज विकसित भारत बिल्डेथॉन 2025 चा प्रारंभ केला. ही एक अभूतपूर्व राष्ट्रव्यापी नवोन्मेष चळवळ आहे, जी संपूर्ण देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी सज्ज आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग , शिक्षण मंत्रालयाने अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग आणि एआयसीटीई यांच्या सहकार्याने ‘विकसित भारत बिल्डेथॉन 2025’ चे आयोजन केले आहे. कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी विकसित भारत बिल्डथॉनचे लघुगीत आणि बोधचिन्ह (जिंगल आणि लोगो) प्रसिध्‍द केले.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार; पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा; एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम; एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे; एआयएम, नीति आयोगाचे मिशन संचालक दीपक बागला; शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव धीरज साहू; मंत्रालय, केव्हीएस आणि एनव्हीएसचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना,केंद्रीय मंत्री म्हणाले की, विकसित भारत बिल्डेथॉन हे आतापर्यंतचे सर्वात मोठे शालेय हॅकेथॉन आहे जे विद्यार्थ्यांना चार विषयांवर कल्पना मांडण्यास आणि उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहित करून तळागाळात नवोन्मेष संस्कृती अधिक बळकट करेल.

“लोकलसाठी व्होकल, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, आणि समृद्धी.” ते पुढे म्हणाले की हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देईल, देशात नवनिर्मितीची क्रांती घडवून आणेल आणि तरुण पिढी समृद्धी, विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे प्रमुख चालक बनतील याची खात्री करेल.

बिल्डेथॉनचा उद्देश राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक विचारसरणीला प्रेरणा देणे, आत्मनिर्भरता आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा आहे. हा उपक्रम स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन 2024 च्या यशावर आधारित आहे, ज्यामुळे स्टुडंट इनोव्हेटर प्रोग्राम (SIP) आणि स्टुडंट एंट्रप्रेन्योरशिप प्रोग्राम (SEP) सारखे कार्यक्रम सुरू झाले. तसेच, अटल टिंकरिंग लॅब मधून अनेक पेटंट्स आणि स्टार्टअप उपक्रम उदयास आले.

विकसित भारत बिल्डेथॉनचा प्रवास आज, 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांना विकसित भारत बिल्डेथॉन पोर्टलवर (https://vbb.mic.gov.in/) नोंदणी करण्यासाठी 23 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी तयारीचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या कल्पना आणि नमुने पोर्टलवर सादर करतील. बिल्डेथॉनचा गाभा असलेला, ‘लाइव्ह सिंक्रोनाइज्ड इनोव्हेशन इव्हेंट’ 13 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाईल. या कार्यक्रमानंतर, विद्यार्थी 13 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात त्यांच्या अंतिम प्रवेशिका सादर करतील. त्यानंतर, 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत तज्ञांचे एक मंडळ सादर केलेल्या प्रवेशिकांचे मूल्यांकन करेल. जानेवारी 2026 मध्ये बिल्डेथॉनची सांगता होईल, ज्यामध्ये 1,000+ विजेत्यांची घोषणा आणि त्यांचा सत्कार केला जाईल.

विकसित भारत बिल्डेथॉन 2025 याविषयीचा एक व्हिडिओ देखील प्रदर्शित करण्यात आला, ज्यात त्याचे विषय आणि उद्दिष्ट्ये अधोरेखित केली होती.

 

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2170280)