पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशात इटानगर इथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 22 SEP 2025 3:28PM by PIB Mumbai

भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!

जय हिंद! जय हिंद! जय हिंद!

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल के. टी. परनायक, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री पेमा खांडू, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी किरेन रिजिजू, राज्य सरकारचे मंत्री, संसदेतले माझे सहकारी नाबम रेबिया, तापिर गाओ, सर्व आमदार, अन्य लोकप्रतिनिधी आणि अरुणाचलमधल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो,

बॉम येरुंग, बॉम येरुंग दोनी पोलो! सर्वशक्तीमान दोनी पोलो यांची आम्हा सर्वांवर कृपादृष्टी असो!

मित्रांनो,

हेलिपॅडवरुन इथं मैदानापर्यंत येणे, वाटेत इतक्या सगळ्या लोकांना भेटणे, लहान-लहान मुला-मुलींच्या हातात असलेला तिरंगा; अरुणाचलमधल्या या स्वागताने माझे ह्रदय आनंदाने, अभिमानाने भरुन आले आहे! आणि हे स्वागत इतके भव्य होते की मला इथे पोहोचायला उशीर झाला. उशीरा आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.  अरुणाचलची ही भूमी सुर्योदयाची धरती आहेच; देशभक्तीच्या लाटेचीही धरती आहे. तिरंग्यावरचा पहिला रंग जसा केशरी आहे; तसाच अरुणाचलचा पहिला रंगदेखील केशरी आहे. इथला प्रत्येक माणूस शौर्याचे प्रतीक आहे, साधेपणाचे प्रतीक आहे. मी अरुणाचलमध्ये बरेच वेळा आलो आहे. राजकारणात सत्तेच्या प्रवाहात नव्हतो, तेव्हाही इथे आलो आहे; म्हणूनच इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आठवून मलाही आनंद होतो. तुमच्या सगळ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आठवण असते. तुमचं  इतकं प्रेम मला लाभलं; जीवनात यासारखं कोणतंही मोठं सुख नाही असे मी मानतो. तवांग मठ ते नमसाईतल्या सुवर्ण पगोडापर्यंतची ही अरुणाचलची भूमी शांती आणि संस्कृती यांचा संगम आहे. भारत मातेचा अभिमान आहे, या पुण्यभूमीला माझा सश्रद्ध नमस्कार.

मित्रांनो,

आज माझं अरुणाचलमध्ये येणं तीन कारणांसाठी खास आहे. पहिलं म्हणजे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मला इतक्या सुंदर पर्वतांचं दर्शन घडलं. नवरात्रीत आजच्या दिवशी आपण माता शैलपुत्रीची पूजा करतो आणि शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची मुलगी. दुसरे कारण म्हणजे, आजपासून देशात पुढच्या टप्प्यातल्या जीएसटी सुधारणा लागू झाल्या, जीएसची बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या या काळात जनतेला हा दुप्पट लाभ मिळाला आहे. आजच्या या शुभ दिनी अरुणाचलमधे सुरू होणारे नवीन विकास प्रकल्प हे तिसरे कारण. आज अरुणाचल प्रदेशात उर्जा, दळणवळण, पर्यटन आणि आरोग्य याबरोबरच अनेक क्षेत्रांशी संबंधित विकास प्रकल्प सुरू होत आहेत. बीजेपीच्या डबल इंजिन सरकारच्या डबल फायद्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अरुणाचलच्या रहिवाशांना या प्रकल्पांसाठी माझ्याकडून अनेक शुभेच्छा. इथं या मंचावर येण्याआधी मला इथल्या छोट्या मोठ्या सर्व व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या दुकानातली त्यांची उत्पादनं पाहता आली. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचा उत्साह, आनंद अनुभवता आला. व्यापाऱ्यांमध्ये, वेगवेगळ्या वस्तू तयार करणाऱ्या कारागीरांमध्ये आणि इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या जनतेमध्ये मला बचत उत्सवाचा उत्साह दिसत आहे.   

मित्रांनो,

आपल्या अरुणाचल प्रदेशात सूर्याचे किरण सर्वात आधी पोहोचतात; मात्र दुर्दैवानं विकासाची किरणं इथंपर्यंत पोहोचायला कित्येक दशकं जावी लागली. मी 2014 च्या आधीही इथं बरेच वेळा आलो आहे. तुमच्यात राहिलो आहे. अरुणाचलला निसर्गानं इतकं भरभरुन दिलं आहे; ही धरती, इथले कष्टाळू लोक, इथली ताकद, इथं इतकं सगळं आहे; मात्र त्यावेळी जे लोक दिल्लीत बसून देशाचा कारभार चालवत होते त्यांनी नेहमीच अरुणाचलकडे दुर्लक्ष केलं. अरुणाचलमध्ये इतके कमी लोक आहेत, लोकसभेच्या दोनच जागा आहेत तर कशाला अरुणाचलकडे लक्ष द्यायचं असा विचार काँग्रेससारखे राजकीय पक्ष करत होते. काँग्रेसच्या या विचासरणीमुळे संपूर्ण ईशान्य भारताचं नुकसान झालं. विकासाच्या प्रवाहात ईशान्य भारत खूप मागे राहिला.

मित्रांनो,

जेव्हा 2014 मध्ये तुम्ही मला देशसेवा करण्याची संधी दिली; तेव्हा काँग्रेसच्या या विचारसरणीतून देशाला मुक्त करण्याचा निर्धार मी केला. कुठल्याही राज्यात किती मतसंख्या आहे, किती जागा आहेत याचा आम्ही विचार करत नाही. राष्ट्र सर्वप्रथम, देश सर्वोपरी ही आमची भावना आहे. ‘नागरिक देवो भव’ हा आमचा एकच मंत्र आहे. ज्यांना कधी कुणी विचारलं नाही त्यांची विचारपूस मोदी करतो. म्हणूनच काँग्रेसने आपल्या काळात दुर्लक्ष केलेल्या ईशान्य भारताला 2014 नंतर आम्ही विकासाचं प्राधान्य केंद्र बनवलं. संपूर्ण ईशान्य भारताच्या विकासासाठी आम्ही अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली. शेवटच्या गावापर्यंत दळणवळणाच्या सुविधा आणि शेवटच्या गावापर्यंत सेवा पोहोचवणारं सरकार, अशी आम्ही आमच्या सरकारची ओळख निर्माण केली. एवढंच नाही तर आम्ही ठरवलं की, सरकारचं काम दिल्लीत बसून करायचं नाही. अधिकारी, मंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळा ईशान्य भारतात आलं पाहिजे, इथं रात्रीचा मुक्काम केला पाहिजे.   

मित्रांनो,

काँग्रेस सरकारच्या काळात 2-3 महिन्यांत एखाद वेळेस कोणी मंत्री ईशान्य भारतात येत असे. बीजेपी सरकारच्या काळात आतापर्यंत 800 पेक्षा जास्त वेळा केंद्रिय मंत्री ईशान्य भारतात आले आहेत. असंही नाही की आले आणि परत गेले. आमचे मंत्री येतात तेव्हा ते दूरवरच्या दुर्गम भागातही जातील, जिल्ह्यांत, तालुक्यांत जातील आणि किमान एक रात्र मुक्काम करुन मग परत जातील असा आमचा प्रयत्न असतो. मी स्वतःच पंतप्रधान म्हणून 70 पेक्षा जास्त वेळा ईशान्य भागात आलो आहे. गेल्याच आठवड्यात मी मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये आलो होतो आणि मी रात्री गुवाहाटीमध्ये राहिलो होतो. 

ईशान्य भारत मला मनापासून आवडतो. म्हणूनच आम्ही मनामनांमधील दरी दूर केली आहे, दिल्लीला तुमच्याजवळ घेऊन आलो आहोत.

मित्रांनो,

ईशान्य भारतामधील आठही राज्ये आम्हाला अष्टलक्ष्मीप्रमाणे पूज्य आहेत; त्यामुळे या भागाला विकासात मागे ठेवणे शक्यच नाही. या प्रदेशाच्या विकासासाठी केंद्र सरकार शक्य तितका जास्त निधी खर्च करत आहे. मी एक उदाहरण देतो, देशात जो कर जमा होतो त्यातील एक हिस्सा राज्यांना दिला जातो. काँग्रेस सरकारच्या दहा वर्षांत अरुणाचल प्रदेशला या केंद्रीय करातून फक्त सहा हजार कोटी रुपये मिळाले. पण आमच्या भाजपा सरकारच्या दहा वर्षांत अरुणाचलला एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. म्हणजेच भाजपा सरकारने अरुणाचलला तब्बल 16 पट अधिक पैसा दिला आहे. आणि हा फक्त करातील हिस्सा आहे. याशिवाय विविध योजनांअंतर्गत भारत सरकार जो खर्च करते आहे, जे मोठमोठे प्रकल्प इथे उभारले जात आहेत, ते वेगळेच आहेत. त्यामुळेच आज अरुणाचलमध्ये इतका व्यापक आणि झपाट्याने होणारा विकास आपण पाहत आहात.

मित्रांनो,

जेव्हा काम मनापासून, प्रामाणिक हेतूने केले जाते, तेव्हा त्याचे परिणामही स्पष्ट दिसतात. आज आपला ईशान्य भारत, हा देशाच्या विकासाचा मुख्य प्रेरक घटक बनत आहे. येथे शासनप्रणालीत सुशासन आणि उत्तम राज्यकारभार यांवर विशेष भर दिला जात आहे. आमच्या सरकारसाठी नागरिकांचे हित सर्वांत महत्त्वाचे आहे. तुमचे जीवन सुलभ व्हावे, अधिक सोपे व्हावे म्हणून सुकर जीवन (ईझ ऑफ लिव्हिंग), प्रवासात अडचण येऊ नये म्हणून सुखद प्रवास (ईझ ऑफ ट्रॅव्हल), उपचारांत त्रास होऊ नये म्हणून विनासायास वैद्यकीय उपचार (ईझ ऑफ मेडीकल ट्रीटमेंट), मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत म्हणून सहज शिक्षण (ईझ ऑफ एज्युकेशन), व्यापार उदीम  सुरळीत चालावा म्हणून व्यवसायस्नेही वातावरण (ईझ ऑफ डुईंग बिझनेस), ही सर्व ध्येय साधण्यासाठी येथे डबल इंजिनाचे भाजपा सरकार (देश आणि राज्याची भाजपा सरकारे) काम करत आहे. ज्या भागात पूर्वी रस्त्यांची कल्पनाही करता येत नव्हती, तिथे आज उत्कृष्ट महामार्ग उभे राहत आहेत. काही वर्षांपूर्वी सेला बोगदा ही केवळ कल्पनाच वाटली असती, पण आज तो अरुणाचलची ओळख बनला आहे.

मित्रांनो,

केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की अरुणाचलसह ईशान्य भारतातील दुर्गम भागांमध्ये हेलीपोर्ट (हेलीकॉप्टर तळ) उभारले जावेत. यासाठी या भागांना ‘उडान’ योजनेशी जोडण्यात आले आहे. इथल्या होलोंगी विमानतळावर आता विमानतळाची नवीन वास्तू उभी राहिली आहे. इथून थेट दिल्लीला विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे केवळ प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटक यांनाच फायदा होत नाही, तर येथील शेतकरी आणि लघुउद्योगांनाही मोठा लाभ होत आहे. येथून देशातील मोठ्या बाजारपेठांपर्यंत फळे-भाज्या आणि इतर शेतमाल पोहोचवणे आता अधिक सोपे झाले आहे.

मित्रांनो,

आपण सर्वजण 2047 पर्यंत देशाला विकसित बनवण्याच्या ध्येयाने पुढे जात आहोत; आणि भारत तेव्हाच विकसित होईल, जेव्हा देशातील प्रत्येक राज्य प्रगत होईल. भारत तेव्हाच विकसित बनेल, जेव्हा प्रत्येक राज्य देशाच्या ध्येयांसोबत खांद्याला खांदा लावून पुढे जाईल.

मला आनंद वाटतो की, देशाची ही मोठी ध्येय साध्य करण्यात ईशान्य भारतात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत आहे. ऊर्जा क्षेत्र त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॉट वीज अपारंपरिक स्रोतांमधून निर्माण करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. हे उद्दिष्ट सौरऊर्जा, वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा, तसेच पाण्यापासून निर्माण होणाऱ्या विजेद्वारे साध्य केले जाणार आहे.

आपला अरुणाचल प्रदेश या प्रवासात देशाच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. आज ज्या दोन उर्जा प्रकल्पांचा शिलान्यास झाला आहे, ते अरुणाचलची वीज उत्पादक म्हणून ताकद आणखी वाढवतील. या प्रकल्पांमुळे अरुणाचलमधील हजारो युवकांना रोजगार मिळेल आणि येथील विकासकामांसाठी स्वस्त वीज उपलब्ध होईल. काँग्रेसची एक जुनी सवय आहे की, विकासाची जी कामे अवघड असतात, त्या कामांना ते कधी हातही लावत नाहीत…उलट त्यापासून पळ काढतात. काँग्रेसच्या या सवयीमुळे ईशान्य भारताला, अरुणाचललाही खूप नुकसान सहन करावे लागले आहे. जे दुर्गम भाग असतील – डोंगरांच्या कुशीतले, भर जंगलातले – जिथे विकासकाम करणे एक मोठे आव्हान होते, त्या भागांना काँग्रेस, मागास घोषित करून विसरून जात असे. यामध्ये देशातील आदिवासी क्षेत्रे, ईशान्य भारतातील जिल्हे सर्वाधिक होते. सीमेलगत असलेल्या गावांना काँग्रेसने “देशातील शेवटची गावे” असे म्हणत हात झटकले. अशा रीतीने काँग्रेस आपल्या अपयशांना  लपवत आली. ह्यामुळेच आदिवासी भागांतून, सीमावर्ती प्रदेशांतून लोक सतत स्थलांतर करत राहिले.

मित्रांनो,

आमच्या सरकारने, भाजपाने या दृष्टिकोनात बदल केला. ज्या भागांना काँग्रेस मागास जिल्हे म्हणायची, त्यांना आम्ही आकांक्षी जिल्हे म्हणून ओळख दिली आणि तिथे विकासाला प्राधान्य दिले. ज्या सीमावर्ती गावांना काँग्रेस “देशातील शेवटची गावे” म्हणायची, त्यांना आम्ही देशाची पहिली गावे मानली. त्याचे चांगले परिणाम आज आपण पाहत आहोत. आज सीमा भागातील गावांमध्ये विकासाची नवी गती दिसत आहे. ‘व्हायब्रंट व्हिलेज’ (सदैव कार्यरत गावे) कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे लोकांचे जीवन अधिक सोपे झाले आहे. अरुणाचल प्रदेशातील 450 पेक्षा जास्त सीमावर्ती गावांमध्ये देखील वेगाने विकास सुरू झाला आहे. तिथे रस्ते, वीज आणि आंतरजाल (इंटरनेट) सारख्या सुविधा पोहोचल्या आहेत. पूर्वी सीमेकडून शहरांकडे स्थलांतर होत असे, पण आता या गावांचा विकास होत असून ती पर्यटनाची नवी केंद्र बनत आहेत.

मित्रांनो,

अरुणाचलमध्ये पर्यटनासाठी मोठ्या संधी आहेत. जसजसे संपर्क व्यवस्था- दळणवळणाने नवीन भाग जोडले जात आहेत, तसतसे येथे पर्यटन वाढत आहे. मला आनंद वाटतो की गेल्या दशकात येथे पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे.

पण अरुणाचलचे सामर्थ्य केवळ निसर्ग आणि संस्कृतीशी निगडित पर्यटनापेक्षा कितीतरी जास्त आहे. आजकाल जगभरात परिषदा आणि सांगीतिक पर्यटनाचीही मोठी लाट आली आहे, हे खूप वाढत आहे. त्यामुळे तवांगमध्ये उभारले जाणारे आधुनिक अधिवेशन संकुल, अरुणाचलच्या पर्यटनाला एक नवा पैलू देणार आहे. अरुणाचलला भारत सरकारच्या गतीमान ‘ग्राम-वायब्रंट व्हिलेज’ अभियानातूनही मोठी मदत मिळणार आहे. हे अभियान आपल्या सीमावर्ती खेड्यांसाठी एक मैलाचा दगड ठरत आहे.

बंधूंनो आणि भगिनींनो,
आज अरुणाचलमध्ये विकासाचा वेग यामुळे आहे कारण, दिल्ली आणि ईटानगर, दोन्हीकडे भाजप सरकार आहे. केंद्र व राज्य, दोन्हींची ऊर्जा विकासाकडे वळली आहे. इथे कर्करोग संशोधन संस्थेचे काम सुरू झाले आहे, वैद्यकीय महाविद्यालये उभी राहत आहेत, आयुष्मान योजनेतून अनेकांना मोफत उपचार मिळाले आहेत. हे सगळे केंद्र आणि राज्याच्या दुहेरी इंजिनमुळे शक्य झाले आहे.

बंधूंनो आणि भगिनींनो,

दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळेच अरुणाचल आता शेती आणि बागायतीत पुढे जात आहे. येथील कीवी फळ, संत्री, वेलची, अननस हे अरुणाचलला नवी ओळख देत आहेत. ‘पीएम किसान सन्मान’ निधीचे पैसे इथल्या शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी ठरत आहेत.

बंधूंनो आणि भगिनींनो,
माता-भगिनी-मुलींचे सशक्तीकरण ही आपली मोठी प्राधान्याची गोष्ट आहे. देशात तीन कोटी ‘लखपती दीदी’ घडवणे, हे एक मोठे अभियान आहे. मला आनंद आहे की, पेमा खांडूजी आणि त्यांचा संच या अभियानालाही गती देत आहे. इथे मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या महिलांची वसतीगृहे उभारली जात आहेत, त्यामुळे महिलांना फार मोठा लाभ होईल.

बंधूंनो आणि भगिनींनो,

इथे मोठ्या संख्येने माताभगिनी आल्या आहेत. मी तुम्हाला `जीएसटी बचत उत्सवा`च्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. पुढच्या पिढीला जीएसटी सुधारणांचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला आता दर महिन्याला घरगुती आर्थिक तरतुदीमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. स्वयंपाकघरातील सामान असो, मुलांच्या अभ्यासाचे साहित्य असो, बूट-कपडे असो, हे सगळे आता स्वस्त झाले आहे.

बंधूंनो आणि भगिनींनो,

तुम्ही 2014 पूर्वीचे दिवस आठवा, किती अडचणी होत्या. महागाई गगनाला भिडली होती, चारही बाजूला महाघोटाळे होत होते, आणि त्या वेळीची काँग्रेस सरकार जनतेवर कराचा भार टाकतच होती. त्या काळी वर्षाला दोन लाख रुपये उत्पन्नावरही प्राप्ती कर लागू होत होता. हे मी 11 वर्षांपूर्वीचे सांगतो आहे. फक्त 2 लाख रुपये कमावले तरी प्राप्ती कर द्यावा लागत होता आणि दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तूंवर काँग्रेस सरकार 30 टक्क्यांहून अधिक कर आकारत होती. मुलांच्या गोळ्यांवर देखील एवढा कर लावला जात होता.

बंधूंनो आणि भगिनींनो,
तेव्हा मी म्हटले होते की, तुमची मिळकत आणि तुमची बचत, दोन्ही वाढवण्याचे काम मी करणार. गेलेल्या वर्षांमध्ये देशासमोर मोठ- मोठ्या आव्हानांचा डोंगर आला. पण आम्ही सतत प्राप्ती कर कमी करत गेलो. विचार करा, 11 वर्षांपूर्वी 2 लाखांवर कर होता, आणि याच वर्षी आम्ही 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले आहे; आणि आजपासून जीएसटी आम्ही फक्त दोन टप्प्यांमध्ये आणला आहे, 5 टक्के आणि 18 टक्के. अनेक वस्तू आता करमुक्त झाल्या आहेत, आणि बाकी वस्तूंवरही कर खूपच कमी झाला आहे. तुम्ही आता निर्धास्तपणे नवे घर बांधू शकता, स्कूटर- दुचाकी घेऊ शकता, बाहेर जेवायला जाऊ शकता, फिरायला जाऊ शकता, हे सगळे आधीपेक्षा स्वस्त झाले आहे. हा जीएसटी बचत उत्सव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे. 

बंधूंनो आणि भगिनींनो,

मी अरुणाचल प्रदेशाचे नेहमी कौतुक करतो की, तुम्ही सर्वजण नमस्कारच्या आधी ‘जय हिंद’ म्हणता. तुम्ही लोक देशाला स्वतःहूनही आधी महत्त्व देता. आज आपण सगळे मिळून विकसित भारत घडवण्यासाठी इतके परिश्रम घेत आहोत, तर देशाचीही आपल्याकडून एक अपेक्षा आहे, आत्मनिर्भरतेची. भारत विकसित तेव्हाच होईल, जेव्हा भारत आत्मनिर्भर होईल. आणि भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी स्वदेशीचा मंत्र आवश्यक आहे. आजची गरज आहे, देशाची मागणी आहे की, आपण स्वदेशी स्वीकारावे. विकत घ्या तेच, जे देशात तयार झाले आहे, विक्री करा तेच, जे देशात तयार झाले आहे, आणि अभिमानाने म्हणा, हे स्वदेशी आहे. माझ्यासोबत म्हणाल का? मी म्हणेन ‘गर्वाने म्हणा’, तुम्ही म्हणा ‘हे स्वदेशी आहे’. गर्वाने म्हणा..., हे स्वदेशी आहे, गर्वाने म्हणा...., हे स्वदेशी आहे, गर्वाने म्हणा..., हे स्वदेशी आहे. या मंत्रावर चालत देशाचा विकास होईल, अरुणाचलचा, ईशान्य भारताचा विकास वेगाने होईल.

एकदा पुन्हा तुम्हाला या विकास प्रकल्पांसाठी अनेक शुभेच्छा देतो. आज नवरात्रीचे पवित्र पर्व आहे, बचत उत्सवही आहे. देव उत्सवात सहभागी होण्यासाठी माझी एक विनंती आहे, आपले मोबाइल फोन बाहेर काढा,`फ्लॅशलाइट` सुरू करा, सगळ्यांनी मोबाइलचा `फ्लॅशलाइट` सुरू करा आणि हात वर करा. हे आहे बचत उत्सवाचे दृष्य, ही आहे बचत उत्सवाची शक्ती. हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे, बघा, प्रकाशच प्रकाश पसरला आहे, आणि अरुणाचलचा हा प्रकाश संपूर्ण देशभर पसरत आहे. सगळीकडे बघा, ताऱ्यांसारखा तेजोमय प्रकाश दिसत आहे.

माझ्याकडून आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद!

***

ShilpaPhopale/SurekhaJoshi/AshutoshSave/NitinGaikwad/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2169969)