पंतप्रधान कार्यालय
हरयाणात पानिपत इथे विकास कामांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
Posted On:
09 DEC 2024 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2024
भारत मातेचा विजय असो !
भारत मातेचा विजय असो !
भारत मातेचा विजय असो !
हरयाणातील हरीच्या ठिकाणीं सर्व भगिनी बंधूंना, राम राम !
हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, इथले लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री. नायब सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी निर्मला सीतारामन जी आणि इथले सुपुत्र आणि खासदार, माजी मुख्यमंत्री आणि सरकारमधील माझे सहकारी श्री. मनोहरलाल जी, श्री कृष्ण पाल जी, हरयाणा सरकारच्या मंत्री श्रुती जी, आरती जी, खासदार, आमदार... देशातील अनेक जीवन विमा महामंडळ (एल आय सी) केंद्रांशी संबंधित सर्व मित्र आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो.
आज महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भारत आणखी एक भक्कम पाऊल टाकत आहे. आजचा दिवस इतर कारणांसाठीही विशेष आहे. आज 9 तारीख आहे. शास्त्रामध्ये 9 हा अंक खूप शुभ मानला गेला आहे. नवाचा आकडा नवदुर्गेच्या नऊ शक्तींशी संबंधित आहे. आपण सर्वजण वर्षातील नवरात्रीचे 9 दिवस शक्तीची उपासना करतो. आजचा दिवस देखील स्त्री शक्तीच्या पूजना सारखाच आहे.
मित्रांनो,
आजच 9 डिसेंबर रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. ज्या वेळी देश संविधानाच्या 75 वर्षांचा महोत्सव साजरा करत आहे, त्याच वेळी 9 डिसेंबर ही तारीख आपल्याला समानता आणि सर्व अंगांना स्पर्श करणारा विकास साधण्याची प्रेरणा देते.
मित्रांनो,
जगाला नैतिकता आणि धर्माचे ज्ञान देणाऱ्या महान भूमीवर आज येणे अधिक आनंददायी आहे. सध्या कुरुक्षेत्रात आंतरराष्ट्रीय गीता जयंती महोत्सवही सुरू आहे. गीतेच्या या भूमीला मी नमस्कार करतो, वंदन करतो. मी संपूर्ण हरयाणा आणि येथील देशभक्त जनतेला राम राम करतो. ‘एक आहोत तर सुरक्षित आहोत' हा मंत्र हरयाणाने ज्या प्रकारे अंगीकारला तो संपूर्ण देशासाठी एक वस्तुपाठ ठरला आहे.
मित्रांनो
माझे हरयाणाशी असलेले नाते आणि प्रेम कुणापासून लपून राहिलेले नाही. तुम्ही सर्वांनी आम्हा सर्वांना एवढा आशीर्वाद दिला, हरयाणात सलग तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार स्थापन केले, यासाठी मी हरयाणातील प्रत्येक कुटुंबाला सलाम ठोकतो. सैनीजींचे नवे सरकार येऊन खरं तर काही आठवडेच झाले आहेत आणि देशभरातून त्यांचे कौतुक होत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर इथे लगेचच ज्या प्रकारे हजारो तरुणांना कुठलाही खर्च न करता आणि कुठल्याही शिफारशीं विना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या, हे देशाने पाहिले आहे. आता इथे डबल इंजिन सरकार दुप्पट वेगाने काम करत आहे.
मित्रांनो,
निवडणुकीदरम्यान तुम्ही सर्व माता भगिनींनी- म्हारा हरयाणा, नॉन स्टॉप हरियाणा (माझा हरयाणा- अखंड वाटचाल करणारा हरयाणा) असा नारा दिला होता. हा नारा, आम्ही सर्वांनीच संकल्प बनवला आहे. हाच संकल्प घेऊन आज मी तुम्हा सर्वांना भेटायला इथे आलो आहे. आणि मी पाहतोय, जिथे जिथे माझी नजर पोहोचते, तिथे एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी दिसत आहेत.
मित्रांनो,
देशातील भगिनींना रोजगार मिळावा यासाठी अलीकडेच इथे विमा सखी योजना सुरू करण्यात आली आहे. येथील कन्यांना नुकतीच विमा सखी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. मी देशातील सर्व भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
काही वर्षांपूर्वी मला पानिपत इथून, कन्या वाचवा-कन्यांना शिकवा (बेटी बचाओ-बेटी पढाओ) मोहिमेची सुरुवात करण्याचे भाग्य लाभले होते. त्याचा सकारात्मक परिणाम हरयाणासह संपूर्ण देशात जाणवला, एकट्या हरयाणामध्ये गेल्या दशकात हजारो मुलींचे प्राण वाचले आहेत. आता 10 वर्षांनंतर पानिपतच्या याच भूमीतून बहिणी आणि मुलींसाठी विमा सखी योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजे आपले पानिपत हे एक प्रकारे स्त्रीशक्तीचे प्रतीक बनले आहे.
मित्रांनो,
आज भारत 2047 पर्यंत विकास साधण्याच्या संकल्पाने पुढे जात आहे. 1947 पासून आजपर्यंतच्या काळात प्रत्येक वर्गाची आणि प्रत्येक क्षेत्राची ऊर्जा भारताला या उंचीवर घेऊन आली आहे. परंतु 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला उर्जेच्या अनेक नवनवीन स्रोतांची आवश्यकता आहे. असाच एक उर्जेचा स्त्रोत म्हणजे आपला पूर्व भारत, आपला ईशान्य भारत ! आणि असाच एक महत्त्वाचा उर्जेचा स्त्रोत म्हणजे आपल्या देशाची स्त्री शक्ती, भारताची स्त्री शक्ती! भारताचा विकास करण्यासाठी आपली अतिरिक्त ऊर्ज, या आपल्या कोट्यवधी माता-भगिनी आहेत, आपली स्त्री शक्ती आहे, त्याच आपला प्रेरणास्रोत बनणार आहेत. आज हे महिला बचत गट,या विमा सखी, बँक सखी, कृषी सखी आहेत… त्या विकसित भारताच्या खूप मोठ्या आधारस्तंभ बनणार आहेत.
मित्रांनो
महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना पुढे जाण्याकरता भरपूर संधी मिळणे आणि त्यांच्यासमोरील प्रत्येक अडथळे दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांना जेव्हा पुढे जाण्याची संधी मिळते, तेव्हा त्या देशासाठी संधींची नवी कवाडे उघडतात. खूप काळापर्यंत, आपल्या देशात अशी अनेक कामे होती जी महिलांसाठी त्याज्य होती, महिलांना ती कामे करण्याची अनुमतीच नव्हती. आमच्या भाजपा सरकारने, मुलींसमोरील प्रत्येक अडथळे दूर करण्याचा ठाम निर्धार केला. आज तुम्ही पाहताय की, मुलींना लष्करात तैनात केले जात आहे. आपल्या मुली आता मोठ्या संख्येने योद्धा वैमानिक (फायटर पायलट) बनत आहेत. पोलिसातही आज मोठ्या प्रमाणात मुली भर्ती होत आहेत. आपल्या मुली आज मोठमोठ्या कंपन्या सांभाळत आहेत….. कंपन्यांचे नेतृत्व आमच्या मुली करत आहेत. देशात शेतकरी…पशुपालकांचे असे 1200 उत्पादक संघ किंवा सहकारी संस्था आहेत, ज्यांचे नेतृत्व महिला करतात. खेळाचे मैदान असो की अभ्यास, प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. गर्भवती महिलांसाठीची रजा 26 आठवड्यांपर्यंत वाढवल्याने देखील लाखो मुलींना फायदा झाला आहे.
मित्रांनो,
असे अनेकदा होते की, जेव्हा आपण एखाद्या खेळाडूला पदक मिळवून अभिमानाने वावरताना पाहतो, तेव्हा त्या खेळाडूने, ते पदक मिळवण्यासाठी किती वर्षे मेहनत घेतली असेल याचा विचार आपण सहसा करत नाही. एखाद्याचा एव्हरेस्ट वरील तिरंग्या सोबत चा फोटो पाहून आपल्याला आनंद होतो परंतु तिथे पोहोचण्यासाठी त्याने किती संघर्ष केला असेल त्याचा आपल्याला विसर पडतो. आज येथे सुरू होणाऱ्या 'बीमा सखी' कार्यक्रमाच्या पायाभरणीतही अनेक वर्षांची मेहनत आणि तपस्या आहे.
स्वातंत्र्यानंतर 60-65 वर्षांनंतरही बहुतांश महिलांचे स्वतःचे बँक खाते नव्हते. म्हणजेच, संपूर्ण बँकिंग व्यवस्थेपासूनच महिला दूर होत्या. म्हणूनच आमच्या सरकारने सर्वप्रथम मातांचे आणि बहिणींचे जनधन बँक खाते उघडले आणि आज मला अभिमान आहे की जनधन योजनेमुळे 30 कोटींहून अधिक बहिणी-मुलींची बँक खाती उघडली गेली आहेत. विचार करा, जर ही जनधन खाती नसती, तर काय झाले असते? गॅस अनुदानाचे पैसे थेट खात्यात आले नसते, कोरोना काळातील आर्थिक मदत मिळाली नसती, किसान कल्याण निधीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले नसते.
जनधन खात्यामुळे महिलांना सुकन्या समृद्धी योजना, मुद्रा योजना आणि घरबांधणीसाठी थेट पैसे मिळत आहेत. महिलांना त्यांच्या बँक खात्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली.
मित्रांनो,
गावागावात बँकिंग सुविधा पोहोचवण्यात आपल्या बहिणींनी मोठी भूमिका बजावली आहे. ज्यांचे पूर्वी बँक खाते नव्हते, त्या आता 'बँक सखी' म्हणून लोकांना बँकेशी जोडत आहेत. बचत, कर्ज, बँकिंग प्रक्रियेबाबत माहिती देत आहेत. अशा लाखो बँक सख्या आज गावागावांत सेवा देत आहेत.
त्याचप्रमाणे, पूर्वी महिलांचे विमा कवच नव्हते. पण आता बीमा सखीच्या अंतर्गत लाखो महिला विमा एजंट म्हणून काम करण्यास सुरुवात करत आहेत. ज्या सेवेतून त्या वंचित राहिल्या, तीच सेवा आज त्या इतरांपर्यंत पोहोचवत आहेत. या योजनेतून 2 लाख महिलांना रोजगार मिळणार आहे. त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, आर्थिक सहाय्य आणि मानधनही दिले जाईल. एका एलआयसी एजंटचे सरासरी मासिक उत्पन्न 15,000 रुपये आहे. अशा प्रकारे, बीमा सख्या दरवर्षी 1.75 लाखांपेक्षा जास्त कमाई करू शकतील.
मित्रांनो,
बीमा सख्यांचे महत्त्व केवळ त्यांच्या उत्पन्नापुरते मर्यादित नाही, तर 'इन्शुरन्स फॉर ऑल' या मिशनसाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. जीवन ज्योति बीमा योजना आणि सुरक्षा बीमा योजनांद्वारे, अनेकांना किफायतशीर दरात विमा मिळतो आहे. आजपर्यंत या योजनांद्वारे 20,000 कोटी रुपयांची रक्कम वितरित झाली आहे. अशा कठीण काळात हा विमा अनेक कुटुंबांसाठी आधार ठरला आहे.
गेल्या 10 वर्षांत ग्रामीण महिलांसाठी क्रांतिकारी धोरणे लागू झाली आहेत. बीमा सखी, बँक सखी, कृषि सखी, पशु सखी, ड्रोन दीदी, लखपती दीदी यांसारख्या नावांनी भारतातील ग्रामीण भागातील महिलांचा सशक्तिकरणाचा प्रवास घडला आहे.
मित्रांनो,
'सेल्फ हेल्प' ग्रुपच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या आणि उत्पन्नाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज देशभरातील 10 कोटी महिलांनी सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणला आहे. गेल्या 10 वर्षांत महिलांना 8 लाख कोटी रुपयांहून अधिक मदत मिळाली आहे.
मी देशभरातील सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडलेल्या बहिणींना सांगू इच्छितो की, तुमची भूमिका असामान्य आहे. तुमचे योगदान अतुलनीय आहे.
भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्यासाठी तुम्ही सर्वजण काम करत आहात. यामध्ये प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक कुटुंबातील भगिनी सहभागी आहेत. यामध्ये सर्वांना संधी मिळत आहे. म्हणजेच बचतगटांची ही चळवळ सामाजिक समरसता आणि सामाजिक न्यायाला देखील बळ देत आहे. आपल्याकडे म्हटले जाते की एक मुलगी शिकते तेव्हा दोन कुटुंबे शिकतात. तसेच बचत गटामुळे केवळ एका महिलेचे उत्पन्न वाढते, असे नाही तर एका कुटुंबाचा आत्मविश्वास वाढतो, संपूर्ण गावाचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही सगळेजण इतके काम , एवढे मोठे काम करत आहात.
मित्रांनो,
मी लाल किल्ल्यावरून 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याची घोषणा केली आहे. आत्तापर्यंत देशभरात 1 कोटी 15 लाखांहून अधिक लखपती दीदी बनल्या आहेत. या भगिनी दरवर्षी एक लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत. सरकारच्या नमो ड्रोन दीदी योजनेमुळे लखपती दीदी अभियानालाही बळ मिळत आहे. हरियाणात तर नमो ड्रोन दीदीची बरीच चर्चा आहे. हरियाणा निवडणुकीदरम्यान मी काही भगिनींच्या मुलाखती वाचल्या होत्या. त्यात एका बहिणीने सांगितले की ड्रोन पायलट म्हणून तिने प्रशिक्षण कसे घेतले आणि तिच्या गटाला ड्रोन मिळाले. त्या ताईने सांगितले की, गेल्या खरीप हंगामात त्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे काम मिळाले. त्यांनी सुमारे 800 एकर शेतीमध्ये ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी केली. यातून त्यांना किती पैसे मिळाले माहीत आहे का? यातून त्यांना तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. म्हणजे अवघ्या एका हंगामात लाखोंची कमाई होत आहे. या योजनेमुळे शेती आणि बहिणींचे जीवन, दोन्ही बदलत आहे.
मित्रांनो,
आज देशात हजारो कृषी सखींना आधुनिक शेती, नैसर्गिक शेती याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. सुमारे 70 हजार कृषी सखींना प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. या कृषी सखींमध्ये दरवर्षी 60 हजार रुपयांहून अधिक कमाई करण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे 1.25 लाखांहून अधिक पशुसखी आज पशुसंवर्धनाबाबत जनजागृती मोहिमेचा भाग बनल्या आहेत. कृषी सखी, पशु सखी, ही केवळ रोजगाराची माध्यमे नाहीत, तर तुम्ही सर्वजण मानवतेची मोठी सेवा करत आहात. रुग्णाला नवजीवन देण्यात जसे एका परिचारिकेचे मोठे योगदान असते, त्याचप्रमाणे आपल्या कृषी सखी भावी पिढ्यांसाठी धरती मातेचे संरक्षण करण्याचे काम करत आहेत. नैसर्गिक शेतीबद्दल जनजागृती करून त्या मातीची, आपल्या शेतकऱ्यांची आणि धरती मातेची सेवा करत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या पशुसखी देखील प्राण्यांची सेवा करून मानव सेवेचे मोठे काम करत पुण्य कमवत आहेत.
मित्रांनो,
प्रत्येक गोष्टीला राजकारणाच्या, मतपेढीच्या तराजूत तोलणारे लोक आजकाल खूप हैराण आणि त्रस्त आहेत. त्यांना समजत नाहीये की प्रत्येक निवडणुकीनंतर मोदींच्या खात्यात माता, भगिनी आणि मुलींचे आशीर्वाद का वाढत चालले आहेत. ज्या लोकांनी माता-भगिनींना केवळ व्होट बँक मानले आणि निवडणुकीच्या वेळी केवळ घोषणा करण्याचे राजकारण केले, ते हे मजबूत नाते समजू शकणार नाहीत . मोदींना आज माता-भगिनींचा इतका स्नेह आणि प्रेम का मिळते, हे समजून घेण्यासाठी त्यांना गेल्या 10 वर्षांचा प्रवास आठवावा लागेल. 10 वर्षांपूर्वी कोट्यवधी भगिनींकडे एकही शौचालय नव्हते. मोदींनी देशात 12 कोटींहून अधिक शौचालये बांधली. 10 वर्षांपूर्वी कोट्यवधी भगिनींकडे गॅस जोडणी नव्हती , मोदींनी त्यांना उज्ज्वलाची मोफत जोडणी दिली आणि सिलिंडर स्वस्त केले. भगिनींच्या घरांमध्ये पाण्याचे नळ नव्हते, आम्ही घरा -घरात नळाद्वारे पाणी पोहचवायला सुरुवात केली. पूर्वी महिलांच्या नावावर कुठलीही मालमत्ता नव्हती, आम्ही कोट्यवधी भगिनींना कायमस्वरूपी घराचे मालक बनवले.महिलांना विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के आरक्षण मिळावे अशी दीर्घ काळापासून महिलांची मागणी होत होती. तुमच्या आशीर्वादाने आम्हाला ही मागणी पूर्ण करण्याचे भाग्य लाभले. जेव्हा चांगल्या हेतूने असे प्रामाणिक प्रयत्न केले जातात, तेव्हाच भगिनींचे आशीर्वाद मिळतात.
मित्रांनो,
आमचे डबल इंजिनचे सरकारही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. पहिल्या दोन कार्यकाळात हरियाणाच्या शेतकऱ्यांना एमएसपी म्हणून 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. येथे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर धान, बाजरी आणि मूग उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपी म्हणून 14 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देखील 800 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला आहे.
आपणा सर्वांना माहीत आहे की हरियाणाला हरित क्रांतीचा नेता बनवण्यात चौधरी चरणसिंग विद्यापीठाने मोठी भूमिका बजावली आहे. आता 21 व्या शतकात हरियाणाला फळे आणि भाजीपाला क्षेत्रात अग्रेसर बनवण्यात महाराणा प्रताप विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका असेल. आज महाराणा प्रताप फळबाग विद्यापीठाच्या नवीन संकुलाची पायाभरणी करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणांना नवीन सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आज मी पुन्हा एकदा हरियाणाच्या तमाम जनतेला, सर्व भगिनींना आश्वासन देत आहे की, राज्याचा विकास वेगाने होईल, डबल इंजिनचे सरकार तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगाने काम करेल. आणि यात इथल्या नारीशक्तीची भूमिका अशीच निरंतर वाढत राहील. तुमचे प्रेम, तुमचे आशीर्वाद असाच आमच्यावर कायम राहू दे. या शुभेच्छासह, पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप-खूप शुभेच्छा. माझ्याबरोबर म्हणा -
भारत माता की जय !
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप-खूप धन्यवाद !
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/आशुतोष सावे/गजेंद्र देवडा/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169961)
अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam