पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा येथे भेट देणार
अरुणाचल प्रदेशच्या विशाल जलविद्युत क्षमतेचा वापर करण्यासाठी पंतप्रधान इटानगरमध्ये 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन प्रमुख जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करणार
जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने दळणवळण, आरोग्य आणि इतर विकास उपक्रमांशी संबंधित प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार
पंतप्रधान त्रिपुरामध्ये माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलाच्या विकास कामाचे उद्घाटन करणार
Posted On:
21 SEP 2025 9:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा येथे भेट देणार आहेत. यावेळी ते इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करतील.
त्यानंतर, ते त्रिपुरा येथे भेट देतील. आपल्या दौऱ्यात ते माताबारी येथील 'माता त्रिपुरा सुंदरी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील, आणि मंदिर संकुला'च्या विकास कामाचे उद्घाटन करतील.
पंतप्रधानांचा अरुणाचल प्रदेश दौरा
अरुणाचल प्रदेशाच्या प्रचंड जलविद्युत क्षमतेचा वापर करून, या प्रदेशातील शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी, पंतप्रधान इटानगरमध्ये 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन प्रमुख जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील. अरुणाचल प्रदेशाच्या सियोम उप-खोऱ्यात हियो जलविद्युत प्रकल्प (240 मेगावॅट) आणि तातो-1 जलविद्युत प्रकल्प (186 मेगावॅट) विकसित केले जातील.
पंतप्रधान तवांग येथे अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी देखील करतील. तवांगच्या सीमावर्ती जिल्ह्यात 9,820 फूट उंचीवर असलेले हे केंद्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा, सांस्कृतिक महोत्सव आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यासाठी एक महत्वाची सुविधा म्हणून भूमिका बजावेल. 1,500 हून अधिक प्रतिनिधींना आमंत्रित करण्याची क्षमता असलेले हे केंद्र जागतिक मानके पूर्ण करेल आणि या प्रदेशाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक क्षमतेला पाठबळ देईल.
कनेक्टिव्हिटी (दळणवळण), आरोग्य, अग्निसुरक्षा, नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे यासह विविध क्षेत्रांना पूरक ठरणाऱ्या 1,290 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचाही पंतप्रधान शुभारंभ करतील. या उपक्रमांमुळे या प्रदेशात आर्थिक घडामोडींना चालना मिळेल, जीवनमान सुधारेल आणि कनेक्टिव्हिटी वाढेल अशी अपेक्षा आहे.
व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्याच्या आणि गतिमान उद्योजक परिसंस्थेला चालना देण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला अनुसरून, पंतप्रधान स्थानिक करदाते, व्यापारी आणि उद्योग प्रतिनिधींशी संवाद सधतील आणि नुकत्याच झालेल्या जीएसटी दर सुसूत्रीकरणाच्या परिणामांवर चर्चा करतील.
पंतप्रधानांचा त्रिपुरा दौरा
भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधान तीर्थक्षेत्र कायापालट आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम (प्रसाद) योजने अंतर्गत माताबारी येथील 'माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुल'च्या विकास कामाचे उद्घाटन करतील. हे त्रिपुरामधील गोमती जिल्ह्यातील उदयपूर शहरात वसलेल्या प्राचीन 51 शक्तीपीठांपैकी एक आहे.
उंचावरून कासवाच्या आकारात दिसणाऱ्या या प्रकल्पात मंदिराच्या आवारात सुधारणा, नवीन मार्ग, नूतनीकरण केलेले प्रवेशद्वार आणि कुंपण, सांडपाणी व्यवस्था, स्टॉल्स, ध्यान कक्ष, अतिथी निवास, कार्यालयीन खोल्या, या, आणि इतर सुविधांचा समावेश आहे. हा प्रकल्प पर्यटनाला चालना देण्यात, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यामध्ये आणि या प्रदेशाच्या एकूण सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल.
***
यश राणे / राजश्री आगाशे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169202)