पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार- ‘द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्स्चिया मिराबिलिस स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 10 JUL 2025 6:20AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2025

 

महामहिम  राष्ट्राध्यक्षा,

उप-राष्ट्राध्यक्ष,

पंतप्रधान,

नामिबियाचे माननीय मंत्री,

उपस्थित मान्यवर,

नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, “द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्स्चिया मिराबिलिस” राष्ट्राध्यक्षांकडून स्वीकारणे ही  माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. 

मी नामिबियाच्या  राष्ट्राध्यक्षा, सरकार आणि नागरिकांचे मनापासून आभार मानतो. आणि हा सन्मान,  मी 140 कोटी भारतीयांच्या वतीने नम्रपणे स्वीकारतो. 

मित्रांनो,

नामिबियामधली “वेल्विट्स्चिया” वनस्पती, ज्याचे नाव या पुरस्काराला देण्यात आले आहे, ती सामान्य वनस्पती नाही. ती कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांसारखी आहे, ज्यांनी काळ बदलताना पाहिला आहे. ही वनस्पति  नामिबियाच्या लोकांच्या संघर्षाचे, धैर्याचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. ती भारत आणि नामिबियामधील अतूट मैत्रीचे प्रतीक आहे.

आणि, आज मी त्याच्याशी जोडलो गेलो आहे,  याचा मला खूप अभिमान आहे. मी हा सन्मान नामिबिया आणि भारताच्या नागरिकांना, त्यांच्या निरंतर  होणाऱ्या प्रगती आणि विकासाला आणि आपल्या अतूट मैत्रीला समर्पित करतो. 

मित्रांनो,

कठीण काळातच आपल्याला आपले खरे मित्र कोण आहेत ते समजते. भारत आणि नामिबियाने आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून एकमेकांना पाठिंबा दिला आहे. आपली मैत्री राजकारणावर आधारित नाही तर संघर्ष, सहकार्य आणि परस्पर विश्वासावर आधारित आहे. 

आपल्या समान लोकशाही मूल्यांनी आणि उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नांनी आपले संबंध मजबूत केले आहेत. भविष्यातही, आपण विकासाच्या मार्गावर एकत्र पुढे जात राहू. 

मित्रांनो,

नामिबिया हा जगातील सर्वात मोठ्या हिरे उत्पादकांपैकी एक आहे. आणि भारतात सर्वात मोठा हिरा पॉलिशिंग उद्योग आहे- तो ही माझ्या मूळ राज्य गुजरातमध्ये! मला खात्री आहे की, भविष्यात आपली भागीदारी हिऱ्यांइतकीच तेजस्वीपणे चमकत राहील.

तर, आपण सर्व एकत्र येऊन राष्ट्राध्यक्षांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी, नामिबियाच्या नागरिकांच्या आनंदासाठी आणि समृद्धीसाठी, तसेच भारत आणि नामिबियामधील दीर्घकालीन मैत्रीसाठी शुभेच्छा देऊया. 

खूप खूप धन्यवाद.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2168165) Visitor Counter : 7