माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेवा पर्व सोहळ्याचा भाग म्हणून डीडी नॅशनल आणि डीडी न्यूज वरील विशेष कार्यक्रमांचा केला शुभारंभ
माहितीपटांमधून पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्र उभारणीप्रति आजीवन समर्पण आणि कर्मयोगाची भावना प्रतिबिंबित होते: अश्विनी वैष्णव
भारताच्या ग्रामीण परिवर्तनावर आधारित माहितीपट आणि 'मेरा गाव आज' मालिकेचे या विशेष कार्यक्रमात विमोचन
Posted On:
17 SEP 2025 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा पर्व सोहळ्याचा भाग म्हणून डीडी नॅशनल आणि डीडी न्यूज वरील विशेष कार्यक्रमांचा शुभारंभ केला. उद्घाटन समारंभात माहितीपटांची झलक दाखवणारे प्रोमोही प्रसारित करण्यात आले.

कार्यक्रमाला संबोधित करताना, अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केले की, दूरदर्शन आणि प्रसार भारतीने प्रकाशित केलेले माहितीपट पंतप्रधान मोदी यांची कर्मयोगाची भावना आणि आजीवन समर्पण प्रतिबिंबित करतात. पंतप्रधानांनी सुरुवातीपासूनच वैयक्तिक हित बाजूला सारत स्वतःला राष्ट्र आणि समाजाच्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित केले आहे, आणि ते राष्ट्र उभारणीच्या अभियानासाठी अथक परिश्रम घेत आहेत. ही वचनबद्धता देशासाठी एक मोठे वरदान असून, ते आज भारतभर दिसत असलेल्या लक्षणीय परिवर्तनाची साक्ष देत आहे, असे त्यांनी नमूद केले.

वैष्णव म्हणाले की, भारताने गेल्या अकरा वर्षांमध्ये आपल्या दुर्गम गावांमध्येही लक्षणीय प्रगती पाहिली असून, ज्यासाठी पूर्वी अनेक दशके लागली होती, ती केवळ एका दशकात साध्य झाली आहे. भारताने जागतिक स्तरावर तंत्रज्ञान, सर्जनशीलता, सामाजिक न्याय आणि समावेशक विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये एक नवीन ओळख आणि मान्यता मिळवली आहे. त्यांनी सेवा पर्वादरम्यान सर्वांना सेवाभाव साजरा करण्यासाठी आमंत्रित केले, आणि सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. या निमित्ताने रक्तदान करून आपण दिवसाची सुरुवात केल्याचे त्यांनी नमूद केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाने केलेल्या परिवर्तनकारी प्रवासावर प्रकाश टाकला, तसेच या काळात जनसेवा आणि सुशासन ही मार्गदर्शक तत्वे राहिल्याचे अधोरेखित केले. देशाच्या सर्व भागातून प्रगती आणि विकासाच्या गाथा उदयाला येत आहेत असे त्यांनी नमूद केले, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून 2047 साला पर्यंत विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने भारताने केलेल्या लक्षणीय प्रगतीचे प्रतिबिंब दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

सेवा पर्व अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सेवा भावनेचे दर्शन घडेल, तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्र उभारणीप्रति असलेली वचनबद्धता अधोरेखित होईल. दूरदर्शनवरील विशेष कार्यक्रम सार्वजनिक सेवा, विकास आणि सामूहिक जबाबदारीच्या प्रेरणादायी कथा प्रेक्षकांसमोर सादर करेल. डीडी न्यूज वाहिनी राष्ट्रीय स्तरावर तीन माहितीपट, तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील खेड्यांनी साधलेला विकास आणि परिवर्तनाची कथा सांगणारा ‘मेरा गांव आज’ ही मालिका प्रसारित करेल. डीडी नॅशनलवर 'स्व से समग्र तक' हा माहितीपट दाखवला जाईल. डीडी न्यूजच्या प्रादेशिक वाहिन्यांवर प्रादेशिक भाषांमध्ये देखील हे माहितीपट प्रदर्शित केले जातील.
या कार्यक्रमाला पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा; प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल; प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी; आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम युनिटचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रारंभ झालेले माहितीपट/मालिका
- संकल्प की शक्ती, सुशासन का सामर्थ्य: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत भारतातील प्रशासनात बदल झाला असून नागरिकांना सक्षम बनवण्यात आले आहे आणि त्यांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. सरकार जनतेचा विशेषतः गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांचा सर्वांगीण, समावेशक विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन "सुधारणा, कामगिरी, परिवर्तन" या तत्त्वाचे पालन करते. हा माहितीपट 2047 पर्यंत विकसित भारतासाठीच्या या व्यापक दृष्टिकोनावर आणि भारताच्या आकांक्षेवर प्रकाश टाकतो.
- विश्व पटल पर नेतृत्व का शंखनाद: गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान मोदी जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत, त्यांनी ग्लोबल साऊथच्या हिताचे समर्थन केले आहे, हवामान बदलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि सतत शांततेचा पुरस्कार केला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांच्या आघाडीसह अनेक जागतिक उपक्रम सुरू केले आहेत. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून स्वीकारला गेल्याने पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेतृत्वाला अधिक उजाळा मिळाला आहे. त्यांच्या दृष्टिकोनाची जगभरात होणारी प्रशंसा या माहितीपटात आहे.
- कर्मयोग - एक अंतहीन यात्रा: हा माहितीपट म्हणजे पंतप्रधान मोदींचे कठोर परिश्रम, समर्पण आणि भारताच्या परिवर्तनात प्रतिबिंबित झालेल्या वचनबद्धतेच्या अथक प्रवासाला दिलेली मानवंदना आहे. यात गेल्या 11 वर्षांतील अवकाश, स्टार्ट-अप्स, सौर ऊर्जा, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक पुनरुज्जीवन, अध्यात्म आणि इतर क्षेत्रातील कामगिरी दाखवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या मुलाखतींमधील काही भाग भारताच्या विकासासंदर्भातील त्यांच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्यासाठी समाविष्ट केले आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय विकासासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांची कहाणी दर्शविली आहे.
- स्व से समग्र तक: ही कंगना रणौत प्रस्तुत आणि डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित दोन भागांची विशेष मालिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला समर्पित केली आहे. वडनगरच्या गल्ल्यांपासून ते ऐतिहासिक लाल किल्ल्यापर्यंतची ही एका दूरदर्शी नेत्याची कहाणी आहे ज्याने आपल्या प्रगतीशील नेतृत्वाद्वारे राष्ट्र उभारणीचा प्रेरणादायी प्रवास साकार केला आहे.
- प्रादेशिक स्तरावरील माहितीपट: डीडी न्यूजच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून अनेक प्रादेशिक माहितीपट प्रसारित केले जातील, जे गेल्या 11 वर्षांतील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील राज्य-विशिष्ट आर्थिक आणि सामाजिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करतील.
- मेरा गाव आज: "मेरा गाव आज" ही मालिका गेल्या 11 वर्षांतील भारतातील गावांमध्ये झालेल्या परिवर्तनाची कहाणी सांगते. या मालिकेत 75 गावांमधील प्रत्यक्ष अहवाल सादर केले आहेत, ज्यात सरपंच, गावातील अधिकारी आणि हा बदल प्रत्यक्ष पाहिलेले रहिवासी यांचा सहभाग आहे. यामध्ये संचारसंपर्क, संधी आणि एकूण प्रगतीमधील सुधारणा टिपल्या आहेत, ज्यामुळे भारतातील गावे पूर्वीपेक्षा किती वेगाने बदलत आहेत, हे दिसून येते.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167816)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam