पंतप्रधान कार्यालय
बिहारमधील पूर्णिया येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
15 SEP 2025 7:26PM by PIB Mumbai
भारत माता की जय.
भारत माता की जय.
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी,लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार जी, मंचावर बसलेले इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
मी आपणा सर्वांना नमस्कार करतो.पूर्णिया माँ पूरण देवीचे भक्त प्रल्हाद, महर्षी मेंही बाबा यांचे हे कर्मस्थान आहे. या भूमीतच फणीश्वरनाथ रेणू, सतीनाथ भादुरी यांसारख्या कादंबरीकारांचा जन्म झाला आहे. विनोबा भावेंसारख्या कर्मयोगींची ही कर्मभूमी आहे. या भूमीला मी मनोमन नमन करतो.
मित्रांनो,
कोलकात्यातील माझ्या कार्यक्रमाला थोडा जास्त अवधी लागला आणि त्यामुळे मला इथे पोहोचण्यास विलंब झाला, त्याबद्दल सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो,तरीही तुम्ही सर्वजण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहात, तुम्ही इतका वेळ थांबून राहिलात,याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा उशिरा आल्याबद्दल,जनता जनार्दन हो, आपल्या चरणी क्षमायाचना करतो.
मित्रांनो,
आज बिहारच्या विकासासाठी सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली आहे. रेल्वे, विमानतळ, वीज, पाणी या प्रकल्पांमुळे सीमांचलच्या लोकांची स्वप्ने पूर्ण होतील.आज, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चाळीस हजारांहून अधिक लाभार्थ्यांना पक्के घर मिळाले आहे. आज, या चाळीस हजार कुटुंबांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. धनत्रयोदशी, दिवाळी आणि छठपूजापूर्वी स्वतःच्या कायमस्वरूपी घरात प्रवेश करणे हे खूप भाग्याचे लक्षण आहे. मी या कुटुंबांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आजचा दिवस हा माझ्या बेघर बंधू-भगिनींना विश्वास देण्याची एक संधीही आहे. एक दिवस त्यांनाही कायमचे घर मिळेल,ही मोदींची गॅरेंटी आहे. आमच्या सरकारने गरिबांसाठी गेल्या 11 वर्षात चार कोटींहून अधिक पक्की घरे बांधली आहेत. आता आम्ही तीन कोटी नवीन घरे बांधण्याचे काम करत आहोत. प्रत्येक गरिबाला कायमचे घर मिळेपर्यंत मोदी थांबणार नाहीत. मागासवर्गियांना प्राधान्य, गरिबांची सेवा, हेच मोदींचे उद्दिष्ट आहे.
मित्रांनो,
आजच्या दिवशी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण अभियंता दिन साजरा करतो. विकसित भारत आणि विकसित बिहारच्या उभारणीत अभियंत्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मी या दिवशी देशातील सर्व अभियंत्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. अभियंत्यांची मेहनत आणि त्यांचे कौशल्य आजच्या कार्यक्रमातूनही दिसून येते. पूर्णिया विमानतळाची टर्मिनल इमारत पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बांधण्यात आली आहे. आज या टर्मिनलचे उद्घाटन झाले आहे आणि पहिल्या व्यावसायिक उड्डाणालाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. तसेच आपले विमान वाहतूक मंत्री नायडूजी देखील आपल्यामध्ये आहेत, कृपया त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा,ते इथूनच विमान उडवत आहेत . नवीन विमानतळामुळे, पूर्णिया आता देशाच्या विमान वाहतूक नकाशावर आला आहे. आता पूर्णिया आणि सीमांचलचा देशातील मोठ्या शहरांशी आणि मोठ्या व्यावसायिक केंद्रांशी थेट संपर्क होऊ लागेल.
मित्रांनो,
एनडीए सरकारकडून हा संपूर्ण प्रदेश आधुनिक हाय-टेक रेल्वेसेवांनी जोडला जात आहे. आज मी वंदे भारत, अमृत भारत, प्रवासी गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. आज अररिया-गलगलिया नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. विक्रमशिला-कटरिया या नवीन रेल्वे मार्गाची पायाभरणी देखील करण्यात आली आहे.
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वीच, भारत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बक्सर-भागलपूर अतिवेगवान क्षेत्राच्या (हाय-स्पीड कॉरिडॉर) मोकामा-मुंगेर विभागाला मंजुरी देण्यात आली आहे. याचा मुंगेर-जमालपूर-भागलपूर सारख्या औद्योगिक केंद्रांना मोठा लाभ होईल. सरकारने भागलपूर-दुमका-रामपूरहाट रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणालाही मान्यता दिली आहे.
मित्रांनो,
देशाच्या विकासासाठी बिहारचा विकास आवश्यक आहे. आणि बिहारच्या विकासासाठी पूर्णिया आणि सीमांचलचा विकास आवश्यक आहे. राजद आणि काँग्रेस सरकारच्या कुशासनामुळे या प्रदेशाला खूप नुकसान सहन करावे लागले आहे. पण आता एनडीए सरकार परिस्थिती बदलत आहे. आता हा प्रदेश विकासाच्या केंद्रस्थानी आहे.
मित्रांनो,
बिहारला ऊर्जा क्षेत्रातही स्वावलंबी बनवण्याचे कार्य सुरू आहे. भागलपूरमधील पीरपैंती येथे 2400 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला आहे.
मित्रांनो,
बिहारचे डबल इंजिन सरकार येथील शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. आज, कोसी-मेची आंतरराज्य नदी जोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी देखील करण्यात आली. यामुळे पूर्व कोसीच्या मुख्य कालव्याचा विस्तार होईल. यामुळे लाखो हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा मिळेल आणि पुराच्या आव्हानाला तोंड देणे देखील सोपे होईल.
मित्रांनो,
बिहारमधील शेतकऱ्यांसाठी कमलबीजांची (मखाण्यांची) शेती हे सुद्धा उत्पन्नाचे एक साधन आहे. परंतु, मागील सरकारांनी मखाणे आणि मखाना उत्पादक शेतकऱ्यांकडेही दुर्लक्ष केले. आणि मी निक्षून सांगतो, की आजकाल इथे जे फेऱ्या मारतात; त्यांनी मी येण्यापूर्वी मखाण्यांचे नावही ऐकलेले नसेल.आमच्या सरकारनेच मखाण्यांच्या शेतीला प्राधान्य दिले आहे.
मित्रांनो,
मी बिहारच्या लोकांना वचन दिले होते, की राष्ट्रीय मखाना बोर्ड स्थापन केले जाईल. काल केंद्र सरकारने या राष्ट्रीय मखाना बोर्डाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. मखाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या मखाण्यांना आता चांगला भाव मिळावा, तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, यासाठी राष्ट्रीय मखाना बोर्ड निरंतर काम करेल. आमच्या सरकारने मखाना क्षेत्राच्या विकासासाठी सुमारे पावणेपाचशे कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे.
मित्रांनो,
बिहारच्या विकासाची ही गती, बिहारची ही प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपते .ज्यांनी दशकानुदशके बिहारचे शोषण केले, या भूमीशी विश्वासघात केला, ते आज बिहारही नवीन विक्रम करू शकतो यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. तुम्ही पहा, बिहारच्या प्रत्येक भागात हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांवर काम सुरू आहे. बिहारच्या राजगीरमध्ये हॉकी आशिया कपसारखा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, बिहारमध्ये औंटा-सिमरिया पुलासारखी ऐतिहासिक बांधकामे झाली होती, बिहारमध्ये बनवलेले रेल्वे इंजिन आफ्रिकेला निर्यात केले जात आहे , परंतु हे सर्व काँग्रेस आणि राजदच्या लोकांना सहन होत नाही. बिहार जेव्हा जेव्हा पुढे जातो तेव्हा हे लोक बिहारचा अपमान करण्यात धन्यता मानतात.
आत्ताच तुम्ही पाहिले असेल की राष्ट्रीय जनता दलाचा सहकारी असलेला काँग्रेस पक्ष समाज माध्यमांवर बिहारची तुलना विडीशी करत होता. या लोकांना बिहारबद्दल इतका तिरस्कार आहे, या लोकांनी घोटाळे आणि भ्रष्टाचार करून बिहारच्या प्रतिष्ठेचे खूप नुकसान केले आहे.आता बिहार राज्य विकास पावत आहे हे पाहून काँग्रेस-राजद यांनी पुन्हा बिहारची बदनामी बदनामी करायचे ठरवले आहे.
बंधू-भगिनींनो,
अशा मानसिकतेचे लोक कधीच बिहारचे भले करू शकत नाहीत. ज्यांना स्वतःची तिजोरी भरण्याचीच काळजी लागून राहिलेली असते ते गरीबाच्या घराची काळजी का करतील? कॉंग्रेसच्याच एका पंतप्रधानांनी हे मान्य केले होते की जेव्हा काँग्रेस सरकार 100 पैसे पाठवते तेव्हा 85 पैसे मधल्यामध्ये लुटले जातात. तुम्ही मला सांगा, काँग्रेस- राजदच्या सरकारमध्ये गरिबांच्या खात्यात थेट पैसे येऊ शकत होते? कंदील लावून हे लोक त्या पैशांवर हातपाय मारत असत आणि 85 पैसे लुटून घेत. कोरोना काळापासूनच प्रत्येक गरिबाला मोफत शिधा मिळत आहे. काँग्रेस-राजद सरकारच्या राज्यात तुम्हाला मोफत धान्य मिळू शकले असते? आज आयुष्मान भारत योजनेमुळे प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाण्याची सोय आहे. ज्या लोकांनी तुमच्यासाठी रुग्णालये देखील उभारली नाहीत, ते तुम्हाला मोफत उपचाराची सुविधा देतील? मी तुम्हाला विचारू इच्छितो..ते लोक मोफत उपचाराची सुविधा देऊ शकले असते का? तुमची काळजी घेऊ शकले असते का?
मित्रांनो,
काँग्रेस-राजदपासून केवळ बिहारची प्रतिष्ठाच नव्हे तर बिहारची ओळख देखील धोक्यात आहे. आज सीमांचल आणि पूर्व भारतातील घुसखोरांमुळे लोकसंख्याशास्त्रविषयक केवढे मोठे संकट उभे ठाकले आहे. बिहार, बंगाल, आसाम अशा कित्येक राज्यांतील लोक त्यांच्या लेकी-भगिनींच्या सुरक्षिततेबद्दल चिंतीत आहेत. म्हणूनच मी लाल किल्यावरुन लोकसंख्याशास्त्र मोहिमेची घोषणा केली आहे. पण वोट बँकेसाठीचा स्वार्थ पहा, काँग्रेस-राजद आणि त्यांच्या वर्तुळातील लोक घुसखोरांची वकिली करण्यात गुंतले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी झटत आहेत, आणि अत्यंत निर्लज्जपणे ते परदेशातून आलेल्या घुसखोरांना वाचवण्यासाठी घोषणा देत आहेत, मोर्चे काढत आहेत. हे लोक बिहार आणि देशाची साधनसंपत्ती तसेच सुरक्षा या दोन्ही बाबी पणाला लावू इच्छितात. मात्र, पूर्णियाच्या या भूमीवरुन मी या लोकांना आज एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की, ही राजद-काँग्रेसवाल्यांच्या या जातवाल्यांनो, माझे बोलणे जरा कान उघडून ऐका. जे घुसखोर आहेत त्यांना देशाबाहेर जावेच लागेल. घुसखोरीवर संपूर्ण बंदी घालणे ही रालोआची मोठी जबाबदारी आहे. जे नेते त्यांच्या बचावासाठी उभे आहेत, जे घुसखोरांना वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत त्यांना मी आव्हान देतो. तुम्ही घुसखोरांना वाचवण्यासाठी कितीही नेटाने प्रयत्न करा, आम्ही त्या घुसखोरांना हाकलून लावण्याच्या निर्धारासह काम करत राहू. जे लोक घुसखोरांची संरक्षक ढाल बनले आहेत त्यांनी ऐकून घ्या, भारतात भारताचाच कायदा चालेल, घुसखोरांची मनमानी चालणार नाही. ही मोदींची हमी आहे -घुसखोरांवर कारवाई देखील होईल आणि देशाला त्याचा चांगला परिणाम झालेला देखील बघायला मिळेल. घुसखोरीच्या समर्थनार्थ काँग्रेस-राजद वाले जो मुद्दा उकरून काढत आहेत त्यांना बिहार आणि देशाची जनता चोख प्रत्युत्तर देणार आहे.
मित्रांनो,
काँग्रेस आणि राजद हे पक्ष गेली दोन दशके बिहारच्या सत्तेबाहेर आहेत. आणि निसंशयपणे यात सर्वात मोठे योगदान बिहारच्या माझ्या माता-भगिनींचे आहे, मी आज बिहारच्या माता-भगिनींना विशेष वंदन करतो. राजदच्या सत्ताकाळात उघडपणे हत्या, बलात्कार आणि खंडणी यांसारख्या गुन्ह्यांचा सर्वाधिक त्रास बिहारच्या माझ्या माता-भगिनींना, येथील महिलांनाच भोगावा लागलेला आहे. दुहेरी इंजिनच्या सरकारमध्ये याच महिला लखपती दीदी आणि ड्रोन दीदी होऊ लागल्या आहेत, या महिलांना ड्रोन दीदी बनवण्याचे कार्य आज आम्ही करत आहोत. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून या महिला इतकी मोठी क्रांती घडवत आहेत. विशेषतः नितीशजींच्या नेतृत्वाखाली येथे जीविका दीदी अभियानाला जे अभूतपूर्व यश मिळाले त्यामुळे बिहार राज्य संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनले आहे.
मित्रांनो,
आज देखील आमच्या या भगिनींसाठी येथे सुमारे 500 कोटी रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी जारी करण्यात आला आहे, 500 कोटी रुपये. ही रक्कम समूह स्तरावरील संस्थांपर्यंत पोहोचवली जाईल जेथून ती गावागावांतील स्वयंसहाय्यता गटांपर्यंत पोहोचून त्यांना बळकट करेल. यातून महिलांना त्यांची ताकद वाढवण्याची संधी मिळेल.
मित्रांनो,
राजद आणि काँग्रेस साठी स्वतःच्या कुटुंबांची काळजी करणे हेच मुख्य काम आहे. हे लोक कधीही तुमच्या कुटुंबांची काळजी करणार नाही. मात्र या मोदीसाठी तुम्ही सर्वजणच माझे कुटुंबीय आहात. आणि यासाठी मोदी म्हणतात – ‘सर्वांची सोबत, सर्वांचा विकास.’ आणि हे लोक काय करतात, तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची सोबत करतात आणि त्यांच्याच कुटुंबाचा विकास करतात.
म्हणूनच बंधू आणि भगिनींनो,
मोदी तुमच्या खर्चाची चिंता वाहतो, तुमच्या बचतीची काळजी करतो. येत्या काळात अनेक उत्सव आणि सण येत आहेत. यावर्षी दिवाळी आणि छठच्या आधीच आमच्या सरकारने गरीब आणि मध्यमवर्गासाठी एक खूप मोठा उपहार दिला आहे. आज 15 सप्टेंबर आहे आणि आजपासून बरोब्बर आठवड्यानंतर नवरात्रीचा पहिला दिवस येणार, आणि त्याच दिवशी 22 सप्टेंबर पासून देशात जीएसटी एकदम कमी होणार आहे. तुमच्या दैनंदिन गरजांपैकी बहुतेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. विशेषतः येथे आलेल्या माझ्या माता-भगिनींना मी सांगू इच्छितो की जीएसटी कमी झाल्यामुळे या माता-भगिनींचा स्वयंपाकघरातील वस्तूंवरील खर्च एकदम कमी होणार आहे. दंतमंजन, साबण, शाम्पूपासून तूप आणि इतर विविध खाद्य उत्पादने अधिक स्वस्त होणार आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती देखील कमी होणार आहेत. या सणासुदीला मुलांसाठी नवे कपडे आणि नवी पादत्राणे खरेदी करणे देखील सोपे होणार आहे कारण या गोष्टी देखील स्वस्त होणार आहेत. जेव्हा गरिबांची काळजी घेणारे सरकार सत्तेत असते तेव्हा ते अशीच गरिबांच्या भल्यासाठीची कामे करते.
मित्रांनो,
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पूर्णियाच्या सुपुत्रांनी इंग्रजांना भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले होते, आज पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरमधून आपण देशाच्या त्याच सामर्थ्याची चुणूक शत्रूला दाखवली आहे. आणि या ऑपरेशनच्या धोरणात्मक कार्यवाहीमध्ये पूर्णियाच्या धाडसी सुपुत्राची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची होती. देशाची सुरक्षा असो अथवा देशाचा विकास, देशाच्या या प्रगतीमध्ये बिहार राज्याने प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आपल्याला बिहारच्या विकास अभियानाला देखील अशाच प्रकारे वेग द्यायचा आहे. या सर्व विकास प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा बिहारमधील माझ्या बंधू-भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो. नितीशजींच्या नेतृत्वाचे अभिनंदन करतो, तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद देतो. संपूर्ण ताकदीनिशी माझ्या सोबत बोला – भारत मातेचा विजय असो. भारत मातेचा विजय असो. भारत मातेचा विजय असो.
***
SushamaKane/SampadaPatgaonkar/SanjanaChitnisDineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167054)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam