गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनऊ, तिरुवनंतपुरम, त्रिची, कोझिकोड आणि अमृतसर विमानतळांवर ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम’ चे दूरदृष्‍य प्रणालीव्दारे केले उद्घाटन

Posted On: 11 SEP 2025 3:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दूरदृष्‍य प्रणालीच्या माध्‍यमातून लखनऊ, तिरुवनंतपुरम, त्रिची, कोझिकोड आणि अमृतसर विमानतळांवर फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रामचे (‘एफटीआय-टीटीपी’) उद्घाटन केले. याप्रसंगी केंद्रीय गृहसचिव आणि गुप्तचर विभागाचे संचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ही  सुविधा फक्त  प्रवाशांची सोय वाढवण्यापुरती मर्यादित नाही तर यातून त्यांना देशात होत असलेल्या बदलांचा परिचय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  कामाचा  वेग, व्याप्ती आणि वाव याबाबतच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असा हा प्रवाशांना दिल्या जाणा-या सुविधांचा पुढचा टप्पा आजपासून कार्यान्वित  होत आहे.

यावेळी अमित शाह  म्हणाले की, ‘एफटीआय-टीटीपी’ म्हणजेच ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम’ द्वारे, आजपासून विमानतळांवर अखंड इमिग्रेशन सुविधा उपलब्ध होईल. सरकारच्या मते केवळ सुविधा देणे पुरेसे नाही तर; जास्तीत जास्त प्रवाशांना त्याचा फायदा होईल याची खात्री आपण केली पाहिजे. हे साध्य करण्यासाठी, पासपोर्ट आणि ‘ओसीआय’ कार्ड जारी करताना नोंदणी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते म्हणाले की,  जर हे अंमलात आणता आले तर प्रवाशांना बोटांचे ठसे किंवा कागदपत्रांसाठी परत जाण्याची आवश्यकता राहणार नाही.  आणि प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार पारपत्राचा वापर करून प्रवास करता येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, ‘एफटीआय-टीटीपी’ हा एक असा कार्यक्रम आहे ज्यामुळे सुविधाही होते  आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्‍यासही  मदत होते. ते म्हणाले की, हा कार्यक्रम 2024 मध्ये दिल्ली येथून सुरू करण्यात आला होता, त्यानंतर मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, कोची आणि अहमदाबाद विमानतळांवर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि आज पाच नवीन विमानतळे जोडण्यात आली आहेत.  गृहमंत्री अमित  शाह म्हणाले की, ही प्रक्रिया आता एकूण 13 विमानतळांवर एकाच वेळी कार्यरत आहे. गृह मंत्रालयाने हा कार्यक्रम आगामी  नवी मुंबई आणि जेवर विमानतळांशी राबवण्याची योजना आखली आहे. आतापर्यंत ज्यांनी या सुविधेचा वापर केला आहे त्यांनी त्याचे कौतुक केले आहे. प्रवाशांना आता लांब रांगा लावण्‍याची  किंवा मॅन्युअल   तपासणीची गरज पडत नाही, त्यांना फक्त 30  सेकंदात,  अजिबात विलंब न होता ‘इमिग्रेशन क्लिअरन्स’ मिळतो. ते म्हणाले की, या पोर्टलवर अंदाजे 3 लाख प्रवाशांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी 2.65 लाख प्रवाशांनी प्रवासादरम्यान त्याचा वापर केला आहे आणि ही संख्या सतत वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. ते म्हणाले की, 2014 मध्ये परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या 3.54  कोटी होती,  ही संख्‍या 2024 मध्‍ये अंदाजे 73 टक्क्यांनी वाढून 6.12 कोटी झाली. त्याचप्रमाणे, 2014मध्ये भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांची संख्या 1.53  कोटी होती, ती संख्‍या  2024  मध्ये सुमारे 31 टक्क्यांनी वाढून अंदाजे  दोन कोटी झाली. ते म्हणाले की, दोन्ही आकडे एकत्रित केल्यास, 2014  मध्ये एकूण 5.07 प्रवाशांची संख्या  कोटी होती,  वाढून 2024 मध्ये 8.12 कोटी झाली. ही आकडेवारी परदेशातून आलेल्या किंवा परदेशात  प्रवास करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते. यामध्‍ये  एकूण 60 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.

सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165831) Visitor Counter : 2