पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशात पूर आणि मुसळधार पावसामुळे प्रभावित भागाची केली हवाई पाहणी
पंतप्रधानांनी कांगडा येथे बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला आणि मूल्यांकन केले
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील पूर आणि पर्जन्यवृष्टीमुळे प्रभावित भागांसाठी 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली
पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह मदत जाहीर केली
पंतप्रधानांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले
पंतप्रधान एनडीआरएफ, एसडीआरएफचे कर्मचारी आणि आपदा मित्र स्वयंसेवकांनाही भेटले आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले
केंद्र सरकारने बाधित भागातील पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले
Posted On:
09 SEP 2025 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
हिमाचल प्रदेशात ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी हिमाचल प्रदेशला भेट दिली.
पंतप्रधानांनी सर्वप्रथम हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली . त्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी कांगडा येथे एक अधिकृत बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांनी मदत आणि पुनर्वसन उपाययोजनांचा आढावा घेतला तसेच हिमाचल प्रदेशात झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांनी हिमाचल प्रदेशसाठी 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. एसडीआरएफ आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दुसरा हप्ता आगाऊ जारी केला जाईल.
पंतप्रधानांनी संपूर्ण प्रदेश आणि लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन बाळगण्याची सूचना केली. हे अनेक मार्गांनी केले जाईल, जसे की पंतप्रधान आवास योजनेद्वारे घरांची पुनर्बांधणी, राष्ट्रीय महामार्गांचे पुनर्संचयितकरण, शाळांची पुनर्बांधणी, पंतप्रधान राष्ट्रीय निधी अंतर्गत मदतीची तरतूद तसेच पशुधनासाठी मिनी किट वितरित केले जातील.
कृषी समुदायाला मदत करण्याची अत्यंत महत्त्वाची गरज ओळखून, सध्या वीज जोडणी नसलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत पुरवली जाईल.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, नुकसानग्रस्त घरांचे जिओटॅगिंग केले जाईल. यामुळे नुकसानीचे अचूक मूल्यांकन आणि बाधितांपर्यंत मदत जलद पोहोचण्यास मदत होईल.
शिक्षणात व्यत्यय येणार नाही याची काळजी घेण्यासाठी, शाळा नुकसानीची नोंद आणि जिओटॅगिंग करू शकतील, ज्यामुळे समग्र शिक्षा अभियानांतर्गत वेळेवर मदत मिळू शकेल.
पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी आणि साठवण्यासाठी पाणी पुनर्भरण संरचनांचे बांधकाम केले जाईल. या प्रयत्नांमुळे भूजल पातळी सुधारेल आणि चांगल्या जल व्यवस्थापनाला बळ मिळेल.
केंद्र सरकारने नुकसानीच्या व्याप्तीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके हिमाचल प्रदेशमध्ये आधीच पाठवली आहेत आणि त्यांच्या विस्तृत अहवालाच्या आधारे पुढील मदतीबाबत विचार केला जाईल.
पंतप्रधानांनी या आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांचीही भेट घेतली. या आपत्तीत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आणि तीव्र दुःख व्यक्त केले. या कठीण काळात केंद्र सरकार राज्य सरकारसोबत एकत्र काम करेल आणि शक्य ती सर्व मदत करेल असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी पूर आणि नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.
आपत्ती व्यवस्थापन नियमांनुसार राज्यांना आगाऊ वाटपासह सर्व मदत केली जात आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, राज्य प्रशासन आणि इतर सेवा-केंद्रित संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत आणि बचाव कार्यात केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. केंद्र सरकार राज्याच्या निवेदनाच्या आधारे तसेच केंद्रीय पथकांच्या अहवालाच्या आधारे मूल्यांकनाचा पुढील आढावा घेईल.
पंतप्रधानांनी परिस्थितीच्या गांभीर्याची दखल घेतली आणि केंद्र सरकार परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165071)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam