वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत एकसंघपणे ठाम उभा आहे; स्वदेशी तसेच आत्मनिर्भर भारत यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
Posted On:
08 SEP 2025 3:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
जागतिक पातळीवर कितीही मोठी समस्या उभी ठाकली तरी भारत एक देश म्हणून एकजुटीने उभा आहे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज 56 व्या ईईपीसी भारत राष्ट्रीय पारितोषिक वितरण समारंभात केलेल्या भाषणादरम्यान केले. ते पुढे म्हणाले की कोणत्याही संकटावर मात करण्याचे सामर्थ्य आपल्या देशात आहे. व्यापार उद्योगांनी स्वदेशी उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण त्यायोगे भारताच्या विकासाला मदत होण्यासोबतच, देशाची आर्थिक सुरक्षितता देखील अधिक मजबूत होईल हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, कोणत्याही देश भारताच्या बाबतीत निर्यातीवर निर्बंध घालतो आहे अथवा महत्त्वाची उत्पादने भारतापर्यंत पोहोचण्याला प्रतिबंध करतो आहे याबाबत सावधानतेचा इशारा देत केंद्रीय मंत्री म्हणाले की यामुळे व्यापारांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आता आत्मनिर्भर भारतावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. याला कृती करण्यासाठीचे आवाहन असे संबोधत ते म्हणाले की प्रत्येकाने ते स्वीकारले पाहिजे.
देशातील व्यवसायांचा कणा असलेल्या व्यापार तसेच एमएसएमई या क्षेत्रांमध्ये भारताचे सामर्थ्य दडले आहे हे गोयल यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की भारताचा आत्मविश्वास इतका मजबूत झाला आहे की भारत यापुढे आणखी ताकदवान होत जाणार आहे आणि कोणाच्याही समोर आपला देश आता झुकणार नाही. ईईपीसीच्या वाटचालीचा संदर्भ देत त्यांनी निर्देश केला की 1955 मध्ये देशातून 10 दशलक्ष डॉलर्स मूल्याची निर्यात होत होती, मात्र आजघडीला देशाचे निर्यातमूल्य 116 अब्ज डॉलर्स इतके झाले आहे. कालपरत्वे, अभियांत्रिकी क्षेत्र देखील आणखी मोठी उद्दिष्ट्ये आणि अधिक सामर्थ्यासह वाढेल असा विश्वास केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला.
“झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट” या मंत्रासह भारताची अधिकाधिक वृद्धी होत राहील असा दृढ विश्वास आपल्याला असल्याचे गोयल यांनी सांगितले. भारतात उत्तम दर्जाची उत्पादने तयार होतील आणि त्यांची जगभरात विक्री होईल याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की संपूर्ण जग आज भारताला विश्वसनीय भागीदार मानू लागले आहे आणि ती स्थिती आपण कायम राखणे महत्त्वाचे आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाच असुरक्षित अर्थव्यवस्थांतील समावेशाकडून स्थित्यंतर करत जगातील पहिल्या पाच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. गेली चार वर्ष भारत सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरला आहे याची त्यांनी नोंद घेतली. शेवटच्या तिमाहीत, देशाने जीडीपीमध्ये 7.8 टक्के वाढ साध्य केली आहे आणि हा जागतिक विक्रम आहे असे ते म्हणाले.
अलीकडेच केलेली जीएसटी दरांतील कपात आणि सुलभीकरण यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत मागणीला चालना दिली आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले. यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील आणि त्याद्वारे उत्पन्नात देखील वाढ होईल याची त्यांनी नोंद घेतली. ते पुढे म्हणाले की जेव्हा आर्थिक प्रणालीच्या सशक्त पायावर पायाभूत सुविधांवर अधिक खर्च केला जातो आणि ग्राहकांकडून मागणीत वाढ होते तेव्हा जगातील कोणतीही ताकद भारताला जागतिक शक्ती होण्यापासून रोखू शकत नाही.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164661)
Visitor Counter : 2