पंतप्रधान कार्यालय
अहमदाबाद येथील कन्या वसतिगृह - सरदारधाम दुस-या टप्प्याच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
24 AUG 2025 11:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2025
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, गुजरात सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, सरदारधामचे प्रमुख गगजी भाई, विश्वस्त व्ही. के. पटेल, आणि इतर सर्व मान्यवर, आणि माझ्या प्रिय बंधून भगिनींनो, विशेषत्वाने प्रिय कन्या !!
सरदारधाम हे नाव जितके पवित्र आहे, तितकेच त्याचे कामही पवित्र आहे. आज या कन्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी एका वसतिगृहाचे लोकार्पण केले जात आहे. ज्या कन्या या वसतिगृहामध्ये वास्तव्य करतील, त्यांच्या अनेक आकांक्षा असतील, अनेक स्वप्ने असतील, त्यांना आपली स्वप्ने, आकांक्षा पूर्ण करण्याच्या अनेक संधी इथे मिळतील. आणि इतकेच नाही; तर या मुली, ज्यावेळी आपल्या पायावर उभ्या राहतील, सामर्थ्यवान बनतील, त्यावेळी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यामध्येही त्या प्रमुख भूमिका स्वाभाविकतेने निभावतील. त्यांचे कुटुंबही समर्थ बनेल. म्हणूनच सर्वात प्रथम मी या वसतिगृहामध्ये वास्तव्य करण्यासाठी ज्यांना- ज्यांना संधी मिळत आहे, त्या सर्व कन्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
या कन्या वसतिगृहाच्या दुस-या टप्प्यातील कामाची आधारशिला ठेवण्याचे सद्भाग्य मला आज लाभत आहे, तुम्ही मला हे कार्य करण्याची संधी दिली आहे. आज समाजाने केलेल्या भगीरथ प्रयत्नांतून तीन हजार कन्यांसाठी उत्तम व्यवस्था, उत्तम सुविधा यांच्याबरोबरच भव्य वास्तू या मुलींना मिळत आहे. बडोद्यामध्येही दोन हजार विद्यार्थिनींसाठी एका वसतिगृहाचे काम सुरू आहे. आणि हे काम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असेही मला आज सांगण्यात आले. सूरत, राजकोट, मेहसाणा या शहरांमध्येही अशाच प्रकारे शिक्षणासाठी, प्रशिक्षणासाठी अनेक केंद्रे तयार करण्यात येत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर असे प्रयत्न करण्यासाठी जे लोक आपले योगदान देत आहेत, ते सर्वजण अभिनंदनाचे अधिकारी आहेत. कारण आपला देश हा समाजाच्या शक्तीतूनच पुढे मार्गक्रमण करीत असतो. आजच्या या प्रसंगी मी सरदार साहेबांच्या चरणी वंदन करतो. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी मी नेहमी म्हणत होतो की, भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास होण्याची आवश्यकता आहे. आणि आज योगायोग असा बनला आहे की, गुजरातने मला जे जे काही शिकवले आहे, गुजरातमध्ये जे काही मी शिकलो आहे, ते ते सर्व मला देशाचे कार्य करताना उपयोगी पडत आहे. तुम्हा सगळ्या मंडळींना माहिती आहे की, 25 -30 वर्षांपूर्वी आपल्या या गुजरातमध्ये अनेक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विशिष्ट मापदंड लावून त्याची गणना केली तर स्थिती चिंताजनक होती. गुजरातला विकासाबरोबरच सामाजिक क्षेत्रांमध्येही अनेक संकटांना तोंड देण्यासाठी आपली शक्ती खर्च करावी लागत होती. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत होते. आणि त्यामध्ये ज्यावेळी मी नव्याने आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलो होतो, त्यावेळी काम करताना पहिल्यांदा माझ्या लक्षात आले की, आपल्या राज्यातल्या मुली शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मागे आहेत. आणि या गोष्टीचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. अनेक कुटुंबामध्ये मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. ज्या मुलींचे शाळेत नाव घातले जात होते, त्यापैकी बहुतांश मुली खूपच लवकर शाळा सोडून देत होत्या. मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण खूप जास्त होते. अशी परिस्थिती असताना, 25 वर्षांपूर्वी तुम्ही सर्व लोकांनी मला खूप सहकार्य केले आणि या इथली सर्व परिस्थितीच बदलून टाकण्यात यश मिळाले. तुम्हा सर्वांना स्मरत असेल की, आपण सर्वांनी मिळून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले जावे, यासाठी एक खास ‘मुलींच्या शिक्षणाची रथयात्रा काढत होतो. मला तर चांगले आठवते की, अगदी 40 -42 अंश सेल्सियस तापमान असायचे. 13, 14,15 जून या दिवसांना गावांगावांना भेटी द्यायच्या म्हणजे द्यायच्याच. इतकेच नाही तर गावातल्या प्रत्येक घराला भेट द्यायची म्हणजे द्यायचीच. लहान- लहान मुलींचे अगदी बोट धरून त्यांना शाळेत घेवून आणण्याचे काम करायचे म्हणजे करायचे. आपण हे काम सर्वांनी मिळून केले. शाळा प्रवेशोत्सवाचे कितीतरी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन या काळामध्ये आपण करत होतो. आणि माझे सद्भाग्य असे आहे की, या कार्याने खूप मोठा लाभ आपल्याला दिला. याच कारणाने आज गरज पडली तर शाळेसाठी पायाभूत सुविधा बनविण्यात आल्या आहेत. शाळांनाही आधुनिक काळातल्या सुविधा मिळत आहे. सर्व प्रकारच्या व्यवस्था विकसित झाल्या आहेत. शिक्षकांची भर्ती झाली आहे आणि समाजानेही उत्साहाने सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडली आहे. आणि त्याचा परिणाम आज पहायला मिळत आहे. ज्या मुलांचे, कन्यांचे आम्ही शाळेत नाव घातले, तीच मुले, कन्या आज डॉक्टर, अभियंते बनले आहेत. राज्याचे शाळा गळतीचे गुणोत्तर कमी झाले आहे. इतकेच नाही तर संपूर्ण गुजरातच्या काना-कोप-यामध्ये शिक्षणाचे वातावरण तयार झाले आहे. मुलांची शिक्षणाची भूख जागृत झाली.
राज्याविषयी दुसरी एक चिंता होती ती म्हणजे भ्रूण हत्येच्या पापाची! हा इतका मोठा कलंक आपल्यावर लागला होता. अनेकवेळा तर आपल्या समाजामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. या विषयावरही समाजाने मला समर्थन दिले आणि आंदोलन उभे राहिले. आम्ही सूरतमध्ये भ्रूण हत्येविरोधात यात्रा काढली होती. उमिया मातेच्या स्थानापर्यंत ही यात्रा नेण्यात आली होती. मुलगा-मुलगी एक समान आहेत, ही भावना समाजामध्ये दृढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आपला गुजरात तर शक्तीची उपासना करणारा आहे. इथे आपल्याकडे उमिया माता असो, मॉं खोडल असो, कालीमाता असो, माता अंबा असो, माता बहुचर असो आणि अशा अनेक मातांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. अशा समाजामध्ये कन्याभ्रूण हत्या होणे हा एक कलंक होता. ही भावना ज्यावेळी समाजामध्ये जागृत झाली त्यावेळी सर्वाचे समर्थन मिळायला लागले. त्यावेळेपासून ते आजपर्यत आता गुजरातमध्ये मुलगा-मुलगी यांच्या प्रमाणातील गुणोत्तरामध्ये जे खूप मोठे अंतर होते, ते हळूहळू कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळाले आहे.
मित्रांनो,
मोठे उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ज्यावेळी प्रयत्न केले जातात आणि प्रयत्नांच्या मागे पवित्र भावना असते, समाजाच्या भल्याचा हेतू असतो, त्यावेळी ईश्वरसुद्धा अशा कार्याला सहकार्य करतो. आणि ईश्वररूपी समाजही चांगले सहकार्य करतो. अर्थातच त्यामुळे अशा कार्याचे चांगले परिणाम दिसून येतात. आज समाजामध्ये एक नवीन जागृती निर्माण झाली आहे. काही गोष्टींमध्ये समाजातील मंडळी स्वतःहून पुढाकार घेत आहोत. आपल्या कन्यांना शिकविण्याची गोष्ट असो, त्यांचा मान-सन्मान वाढविणे असो, त्यांच्यासाठी आम्ही सुविधा तयार करीत आहोत. भव्य वसतिगृहांची निर्मिती केली जात आहे. आम्ही गुजरातमध्ये जे बीज रोवले होते, तेच आज संपूर्ण देशामध्येही कार्य करीत आहोत. कन्या वाचविण्याची, मुलींना शिकवण्याविषयीची ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ ही आता लोकचळवळ बनली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी, महिला सशक्तीकरणासाठी देशामध्ये ऐतिहासिक म्हणता येईल, अशा स्वरूपामध्ये काम केले जात आहे. ऑपरेशन सिंदूर याविषयी ज्यावेळी चर्चा केली जाते, त्यावेळी आमच्या धाडसी कन्यांचा आवाज ऐकायला मिळतो. त्यांच्या सामर्थ्याची चर्चा आपल्या कानांपर्यंत पोहोचते. गावांमध्ये लखपती दीदी बनविण्याचे 3 कोटींचे लक्ष्य निश्चित केले आहे. आत्तापर्यंत देशातील 2 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. ड्रोन दीदी गावांगावांमध्ये कार्यरत आहेत. ते पाहून गावांमध्येही आता भगिनींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. बॅंक सखी, विमा सखी, अशा अनेक योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आमची मातृशक्ती कार्यरत आहे.
मित्रांनो,
शिक्षणाचा सर्वात मोठा उद्देश्य आहे तो म्हणजे, समाजामध्ये सकारात्मक योगदान देणा-या लोकांना घडवणे- निर्माण करणे. अशाच पद्धतीने लोकांची योग्यता वाढवली पाहिजे. सर्व गोष्टी खूप वेगाने झाल्या पाहिजेत, असे ज्यावेळी आम्ही म्हणतो, त्यावेळी ही गोष्ट प्रासंगिक बनते आणि केली जाते. आता आपल्यात कौशल्यांबद्दलची स्पर्धा व्हायला हवी, प्रतिभेची स्पर्धा व्हायला हवी. तसेही समाजाची ताकद कौशल्यच तर असते. आज संपूर्ण जगभरात भारताच्या कुशल मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. दशकांपर्यंत भूतकाळात सरकारांनी डळमळीत भूमिका शिक्षण पद्धतीबद्दल बाळगली, आम्ही त्यात मोठे परिवर्तन घडवून आणले, जुन्या पद्धतीतून बाहेर पडून आम्ही ती परिस्थिती बदलत आहोत. आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आम्ही लागू केले आहे, या राष्ट्रीय शिक्षण धोरणात सर्वात मोठा भर कौशल्यावर आहे, प्रतिभेवर आहे. कौशल्य भारत अभियान आम्ही सुरू केले आहे. याअंतर्गत, कोट्यवधी तरुणांना, विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार व्हावे, यावर आम्ही काम करत आहोत. जगात मोठी मागणी आहे– आज जगातील सर्वात मोठा भाग वृद्धत्वाच्या समस्येने ग्रासलेला आहे, त्यांना तरुणांची गरज आहे, आणि भारताकडे जगाला देण्यासाठी हे सामर्थ्य आहे. आपला युवा वर्ग कुशल असेल तर त्यांच्यासाठी रोजगाराच्या अनेक शक्यता तयार होतात. त्यांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, त्यासाठीचे सामर्थ्य त्यातून येते. सरकारचा भर युवा वर्गाला रोजगार, अधिकाधिक रोजगार देण्यासाठी संधी तयार करण्याचा आहे. 11 वर्षांपूर्वी आपल्या देशात मोजकेच स्टार्ट अप्स होते, आज भारतात स्टार्ट अप्सची संख्या जवळपास 2 लाखांपर्यंत पोहोचणार आहे. यातही टियर 2, टियर 3 आपल्याकडे छोट्या-छोट्या शहरांमध्ये हे स्टार्ट अप्स सुरू होऊ लागले आहेत. आम्ही एक मुद्रा योजना सुरू केली, बँकेतून कर्ज मिळावे, विना हमी कर्ज मिळावे, ज्यामुळे 33 लाख कोटी रुपये, विचार करा 33 लाख कोटी रुपये तरुण वर्गाच्या हाती स्वयंरोजगारासाठी दिले गेले आहेत, याचच परिणाम म्हणजे आज लाखो तरुण स्वतः आत्मनिर्भर बनले आहेत आणि स्वतःच्या सोबत एक, दोन अन्य लोकांनाही रोजगार देत आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे, या वेळी 15 ऑगस्टला मी म्हटले होते आणि एका योजनेची घोषणा केली होती, आणि 15 ऑगस्टच्या दिवशी ती लागूही झाली. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही 1 लाख कोटी रुपयांची योजना आहे. याअंतर्गत खासगी क्षेत्रात तुम्ही कोणालाही नोकरी देता, तेव्हा पहिल्या वेतनामध्ये 15 हजार रुपये सरकार त्याला देईल.
मित्रहो,
आज देशात पायाभूत सुविधा विकासाचे जे काम सुरू आहे, विक्रमी गतीने सुरू आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, याअंतर्गत सौर यंत्रणा लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतात ड्रोन आणि संरक्षण उद्योगात सातत्याने वाढ होत आहे. आणि सरकारचा सर्वात मोठा भर, जोर मिशन मेन्युफेक्चरिंगवर आहे. ही सर्व अभियाने गुजरातमध्येही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतात.
मित्रहो,
जग आज भारताच्या श्रमासोबतच भारताच्या प्रतिभेलाही खूप चांगले मानते, त्याचे महत्त्व जाणून आहेत. त्यामुळे जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक संधी तयार होत आहेत. आपला युवा वर्ग आरोग्यसेवा, शिक्षण, अवकाश अशा अनेक क्षेत्रात आपल्या प्रतिभेने जगाला अचंबित करत आहेत.
मित्रहो,
या वेळी स्वातंत्र्यदिनी मी लाल किल्ल्यावरून स्वदेशीवर खूप भर दिला आहे, खूप आवाहन केले आहे, भारत आत्मनिर्भर बनला पाहीजे बंधुंनो. आणि आज समाजातील सर्व लोक माझ्यासमोर बसले आहेत. भूतकाळात मी तुम्हा सर्वांना जी कामे सांगितली, कामे सांगण्याचे भलेही मला पुण्य मिळाले असेल, पण मला आज हे सांगितले पाहीजे की तुम्ही सर्व कामे केली आहेत आणि मला ती सर्व कामे पूर्ण करून दाखवली आहेत. आणि 25 वर्षांचा माझा अनुभव आहे की माझी कोणतीही अपेक्षा तुम्ही पूर्ण केली नसाल असे कधीच झाले नाही, त्यामुळे माझी भूकही थोडी वाढत जाते. प्रत्येक वेळी काही ना काही काम सोपवण्याची इच्छा वाढत जाते. आज मी खास गोष्ट बोलू इच्छितो, की आजच्या जगात जी अस्थिरता आहे, त्यात भारतासाठी उत्तमोत्त मार्ग आहेत - आत्मनिर्भर बनण्याचे. आत्मनिर्भर बनण्याचा अर्थ आहे, आपण स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरणारे व्हावे. मेक इन इंडियासाठी आपला उत्साह वाढायला हवा.
स्वदेशीची चळवळ 100 वर्षे जुनी नाही आहे, आपल्या भविष्याला बळकटी देणारी चळवळ आहे. आणि त्याचे नेतृत्व तुम्ही करायला हवे. आपल्या समाजातील तरुणांनी मुला-मुलींना करायला हवे. याची सुनिश्चित करायला हवी की आता आपल्या कुटुंबामध्ये, घरात एकही परदेशी वस्तू येणार नाही. मी मधे वेड इन इंडिया म्हटले होते, तेव्हा अनेक लोकांनी परदेशातील आपले विवाह रद्द करून भारतात येऊन, सभागृह आरक्षित करून इथे लग्न केले होते. एकदा विचार केल्यावर देशासाठी भावना आपोआप जागृत होते. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यात आपल्या सर्वांचे यश आहे, आपल्या सर्वांची ताकद आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य आहे त्यात. त्यामुळे तुम्ही निश्चित करा मित्रहो कायमच आणि एकदा भारतीय वस्तू घ्यायला सुरुवात कराल, तेव्हा त्यात गुणवत्तेत आपोआप सुधारणा होईल. कारण बाजारात टिकून राहण्यासाठी सर्व दर्जेदार बनवतील, चांगले पॅकेजिंग करतील, स्वस्त देतील. त्यामुळेच आपला रुपया बाहेर जाणे ही आपल्यासाठी चांगली बाब नाही. आणि मला विश्वास आहे की हे जे छोटेसे कार्य मी तुम्हाला सोपवले आहे, समाजात जागृती आणून तुम्ही त्या कामाला पूर्ण कराल आणि देशाला नवीन ताकद द्याल.
व्यापाऱ्यांनाही माझी विनंती आहे, आता आपला समाज फक्त शेतकऱ्यांचा राहिला नाही आहे, व्यापारीही बनला आहे. व्यापारी म्हणून मला म्हणायचे आहे की आपण एक फलक लावू या की माझ्या दुकानात फक्त स्वदेशी वस्तू मिळतात, ज्यांना स्वदेशी वस्तू विकत घ्यायच्या आहेत, त्यांनी आमच्याकडे यावे आणि आम्हीही स्वदेशी वस्तूमालच विकायला हवा. ही सुद्धा देशभक्तीच आहे. फक्त ऑपरेशन सिंदूर देशभक्ती आहे असे नाही आहे, ही सुद्धा देशभक्ती आहे. मी माझी ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, तुम्ही वचन द्या, तुम्ही यात आपले योगदान देऊन हे नक्कीच पूर्ण कराल. तुम्ही सर्वांसमोर येण्याची मला संधी मिळाली आहे, मी खूप आभारी आहे. तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मुलींना खूप-खूप आशीर्वाद. नमस्कार.
* * *
आशिष सांगळे/सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160836)
Visitor Counter : 9
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam