पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तामिळनाडूतील तूतीकोरिन येथे विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी केलेले पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 26 JUL 2025 11:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2025

 

वनक्कम !

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवीजी,  केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी किंजारापू राममोहन नायडूजी, डॉ. एल. मुरुगनजी, तामिळनाडूचे मंत्री  थंगम तेन्नारासू जी, डॉ. टी. आर. बी. राजाजी,  पी. गीता जीवनजी,  अनिता आर. राधाकृष्णनजी, खासदार कनिमोळीजी, तामिळनाडू भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार नयनार नागेंद्रनजी, तसेच तामिळनाडूतील माझे बंधू आणि भगिनी!

आज कारगिल विजय दिवस आहे. सर्वप्रथम मी कारगिलच्या वीरांना वंदन करतो आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतो.

मित्रहो,

चार दिवसांच्या परदेश वास्तव्यांनंतर थेट भगवान रामेश्वरांच्या पावन भूमीवर येण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे. परदेशात असताना भारत आणि इंग्लंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला. हे भारतावरील जगाच्या वाढत्या विश्वासाचे आणि भारताच्या नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. या आत्मविश्वासाच्या बळावर आपण विकसित भारत तसेच विकसित तामिळनाडू घडवू. आजही भगवान रामेश्वर आणि भगवान तिरुचेंदुर मुरुगन यांच्या आशीर्वादाने तूतीकोरिनमध्ये विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे. 2014 मध्ये तामिळनाडूला विकासाच्या शिखरावर नेण्याचा जो प्रवास सुरू झाला आहे, तूतीकोरिन त्याचा साक्षीदार आहे.

मित्रहो,

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मी येथे व्ही. ओ. चिदंबरनार बंदरासाठी बाह्य बंदर कंटेनर टर्मिनलची पायाभरणी केली होती. त्यावेळी शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटनही झाले होते. सप्टेंबर महिन्यात मी नवीन तूतीकोरिन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केले. आज पुन्हा सुमारे ४८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, बंदरे आणि रेल्वे यांचे प्रकल्प तसेच ऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. या निमित्ताने मी तामिळनाडूच्या जनतेचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

कोणत्याही राज्याच्या विकासाचा कणा म्हणजे पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्र. गेल्या 11 वर्षांत  पायाभूत सुविधा आणि ऊर्जेवर आपण लक्ष केंद्रित करत तामिळनाडूच्या विकासाला आपण प्राधान्य दिले आहे. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमुळे तूतीकोरिन व तामिळनाडू हे जोडणी, स्वच्छ ऊर्जा आणि नवनवीन संधींचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

मित्रहो

तामिळनाडू व तूतीकोरिनच्या या भूमी आणि जनतेचे सक्षम भारताच्या निर्मितीत शतकानुशतके समृद्ध  योगदान  राहिले आहे. याच भूमीत दूरदर्शी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म झाला. गुलामगिरीच्या काळातही त्यांनी सागरी व्यापाराचे महत्त्व ओळखले आणि स्वदेशी जहाजे चालवून ब्रिटिशांना आव्हान दिले. याच भूमीत वीरपांडिया कट्टाबोम्मन आणि आळगु मुथु कोन यांनी स्वतंत्र आणि सामर्थ्यवान भारताचे स्वप्न पहिले. राष्ट्रीय कवी सुबरमण्यम भारती यांचा जन्मही इथेच झाला. तुम्हाला माहीतच आहे की, सुबरमण्यम भारतीजींचा तूतीकोरिनशी घट्ट संबंध होता आणि त्यांचा माझ्या संसदीय मतदारसंघ असलेल्या काशीशीही तितकाच घनिष्ट संबंध होता. काशी-तामिळ संगमम् सारख्या कार्यक्रमांमुळे आपण आपली सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट करत आहोत.

मित्रहो,

मला आठवतं,  गेल्याच वर्षी मी बिल गेट्स यांना तूतीकोरिनच्या प्रसिद्ध मोत्यांची भेट दिली होती. त्यांना हे मोती अत्यंत आवडले. पांड्यांच्या मोत्यांनी एकेकाळी भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे जगभरात प्रतीक निर्माण केले होते.

मित्रांनो,

आज आपल्या प्रयत्नांमुळे आपण विकसित तमिळनाडू आणि विकसित भारत या दृष्टिकोनाला पुढे नेत आहोत. ब्रिटन आणि भारत यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आहे. हा एफटीए या दृष्टिकोनाला नवे बळ देतो. आज जग भारताच्या विकासात स्वतःचा विकास पाहत आहे. या करारामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल. यामुळे आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या गतीला आणखी वेग मिळेल.

मित्रांनो,

या एफटीए करारानंतर ब्रिटनमध्ये विकल्या जाणाऱ्या 99% भारतीय उत्पादनांवर कर राहणार नाही. जर भारतीय उत्पादने ब्रिटनमध्ये स्वस्त झाली, तर तिथे मागणी वाढेल आणि इथे भारतात त्या उत्पादनांच्या निर्मितीला अधिक संधी मिळतील.

मित्रांनो,

तमिळनाडूचे तरुण, आपली लघुउद्योग क्षेत्रे, एमएसएमई आणि स्टार्टअप यांना भारत-ब्रिटन एफटीए मधून सर्वाधिक फायदा होईल. उद्योग असो, मच्छीमार बांधव असोत किंवा संशोधन आणि नवोन्मेष असो, हा करार सगळ्यांसाठी फायदेशीर आहे.

मित्रांनो,

आज भारत सरकार भारतामध्ये निर्मीती करणे - `मेक इन इंडिया` आणि निर्मीतीचे अभियान - `मिशन मॅन्यूफॅक्चरिंग` यावर मोठा भर देत आहे. आपण सर्वांनी नुकतेच ऑपरेशन सिंदूरमध्ये `मेक इन इंडिया`ची ताकद पाहिली. भारतात निर्मित शस्त्रांनी दहशतवाद्यांची ठिकाणे नष्ट करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. `मेड इन इंडिया` शस्त्रांनी आजही दहशतवाद्यांच्या `आकां`ची झोप उडवली आहे.

मित्रांनो,

तमिळनाडूची क्षमता पूर्णपणे वापरता यावी म्हणून भारत सरकार तमिळनाडूच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. येथे बंदरांची पायाभूत सुविधा उच्च तंत्रज्ञानाने युक्त केली जात आहे. तसेच विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे यांना एकमेकांशी जोडले जात आहे. आज तुतिकोरीन विमानतळाच्या नव्या प्रगत टर्मिनलचे उद्घाटन हे या दिशेने आणखी एक मोठे पाऊल आहे. सुमारे 450 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधलेले हे टर्मिनल आता दरवर्षी 20 लाखांहून अधिक प्रवाशांची सेवा करेल. यापूर्वी त्याची वार्षिक क्षमता फक्त 3 लाख प्रवाशांची होती.

मित्रांनो,

नवीन टर्मिनलमुळे तुतिकोरीनची देशातील अनेक मार्गांशी अधिक चांगली जोडणी होईल. तमिळनाडूमधील व्यावसायिक प्रवास, शैक्षणिक केंद्रे, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांना याचा अधिक फायदा होईल. त्याचबरोबर या भागाच्या पर्यटन क्षमतेलाही नवीन ऊर्जा मिळेल.

मित्रांनो,

आज आपण तमिळनाडूतील दोन मोठ्या रस्ते प्रकल्पांचेही जनतेला समर्पण केले आहे. सुमारे 2,500 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधलेले हे रस्ते चेन्नईच्या दोन मोठ्या विकास क्षेत्रांना जोडणार आहेत. या रस्त्यांमुळे चेन्नईची त्रिभुजाकृती प्रदेशातील  जिल्ह्यांशी जोडणी आणखी सुधारली आहे.

मित्रांनो,

या प्रकल्पांमुळे तुतिकोरीन बंदराची जोडणीही खूप सुधारली आहे. हे रस्ते संपूर्ण प्रदेशातील सुलभ जीवनमान वाढवतील आणि व्यापार व रोजगाराच्या नव्या वाटा उघडतील.

मित्रांनो,

आपले सरकार देशाच्या रेल्वेला औद्योगिक विकास आणि आत्मनिर्भर भारताची जीवनरेखा मानते. म्हणूनच मागील 11 वर्षांत देशाच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. तमिळनाडू हे या आधुनिकीकरण मोहिमेचे एक प्रमुख केंद्र आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत आपले सरकार तमिळनाडूमधील 77 स्थानकांचा पुनर्विकास करत आहे. आधुनिक वंदे भारत गाड्यांमुळे तमिळनाडूच्या जनतेला नवा अनुभव मिळत आहे. देशाचा पहिला आणि अद्वितीय उभा उचलणारा रेल्वे पूल, पंबन पूल हा तमिळनाडूतच बांधला आहे. पंबन पुलामुळे व्यवसाय सुलभता आणि प्रवास सुलभता,  दोन्ही वाढले आहे.

मित्रांनो,

आज देशात विशाल आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये उद्घाटन झालेला चिनाब पूल हा अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना आहे. या पुलामुळे जम्मूची श्रीनगरशी रेल्वे मार्गे प्रथमच जोडणी झाली आहे. त्याशिवाय देशाचा सर्वात लांब समुद्र पूल अटल सेतू बांधला गेला, आसाममध्ये बोगीबील पूल बांधला गेला, 6 किमी लांबीचा सोनमार्ग बोगदा बांधला गेला, एनडीए सरकारने असे अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. यामुळे हजारो रोजगार निर्माण झाले आहेत.

मित्रांनो,

आज तमिळनाडूत आपण समर्पित केलेल्या रेल्वे प्रकल्पांमुळे दक्षिण तमिळनाडूमधील लाखो लोकांना फायदा होईल. मदुराई ते बोडी-नायक्कनूर मार्गाच्या विद्युतीकरणामुळे वंदे भारतसारख्या गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे रेल्वे प्रकल्प तमिळनाडूच्या वेगालाही आणि विकासाच्या प्रमाणालाही नवी चालना देणार आहेत.

मित्रांनो,

आज इथे 2000 मेगावॅट कुडनकुलम आण्विक ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित ट्रान्समिशन प्रकल्पाची पायाभरणीही झाली आहे. सुमारे 550 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधले जाणारे हे तंत्रज्ञान पुढील काही वर्षांत देशाला स्वच्छ ऊर्जा पुरवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे. हा ऊर्जा प्रकल्प भारताच्या जागतिक ऊर्जा उद्दिष्टे आणि पर्यावरणीय बांधिलकी पूर्ण करण्याचे साधन ठरेल. वीज निर्मिती वाढली की तमिळनाडूतील उद्योग आणि घरगुती वापरकर्त्यांनाही याचा मोठा लाभ होईल.

मित्रांनो,

मला आनंद आहे की पीएम सूर्य घर मोफत विद्युत योजना तमिळनाडूत वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सरकारला सुमारे 1 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत आणि 40000 सौर छतावरील प्रकल्प पूर्ण झाले आहेत. ही योजना मोफत व स्वच्छ वीज देत आहेच, पण हजारो हरित रोजगारही निर्माण करत आहे.

मित्रांनो,

तमिळनाडूचा विकास, विकसित तमिळनाडूचे स्वप्न हे आमचे मुख्य बांधिलकी आहे. आम्ही सतत तमिळनाडूच्या विकासाशी संबंधित धोरणांना प्राधान्य दिले आहे. गेल्या दशकात केंद्र सरकारनेअनुदानवाटपाच्या माध्यमातून तमिळनाडूला 3 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. ही रक्कम मागील यूपीए सरकारने पाठवलेल्या रकमेच्या तीन पट आहे. या 11 वर्षांत तमिळनाडूला 11 नवी वैद्यकीय महाविद्यालये मिळाली आहेत. किनारपट्टी भागातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित समुदायांबाबत इतकी काळजी प्रथमच एखाद्या सरकारने दाखवली आहे. मत्स्यक्रांती - ब्लू रेव्होल्यूशनच्या माध्यमातून आम्ही किनारपट्टी अर्थव्यवस्था वाढवत आहोत.

मित्रांनो,

आज तुतिकोरीनची ही भूमी विकासाचा नवा अध्याय लिहित आहे. जोडणी, ऊर्जा वहन, पायाभूत सुविधा यांचे हे सर्व प्रकल्प विकसित तमिळनाडू आणि विकसित भारतासाठी मजबूत पाया घालणार आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तमिळनाडूतील सर्व कुटुंबीयांचे अभिनंदन करतो. खूप आभार. माझी अजून एक विनंती आहे, आज मी पाहतोय की तुम्ही सर्व खूप उत्साही आहात, एक काम करा, आपला मोबाईल फोन बाहेर काढा आणि आपल्या मोबाईलच्या प्रकाशदीपाने या नव्या विमानतळाचा गौरव वाढवा.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

खूप आभार.

वनक्कम !

 

* * *

आशिष सांगळे/ नितीन गायकवाड/ राज दळेकर /दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160396) Visitor Counter : 5