पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन


राष्ट्रीय अंतराळ दिन हा भारताच्या तरुणांसाठी उत्साहाचा आणि प्रेरणेचा प्रसंग बनला आहे, जी देशासाठी अभिमानाची बाब आहे; या निमित्ताने अंतराळ क्षेत्राशी संबंधित सर्व शास्त्रज्ञांना आणि तरुण नागरिकांना मी शुभेच्छा देतो: पंतप्रधान

अंतराळ क्षेत्रात एकापाठोपाठ एक यश मिळवणे, हा आता भारत आणि इथल्या शास्त्रज्ञांचा एक नैसर्गिक गुण बनला आहे: पंतप्रधान

भारत सेमी-क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती करत आहे आणि लवकरच, आपल्या शास्त्रज्ञांच्या समर्पित प्रयत्नांनी भारत ‘गगनयान’ मोहीम सुरू करेल आणि येत्या काही वर्षांत स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करेल: पंतप्रधान

अंतराळ तंत्रज्ञान भारतात शासन प्रणालीचा भाग बनत आहे – मग ते पीक विमा योजनेतील उपग्रह-आधारित मूल्यांकन असो, मच्छिमारांसाठी उपग्रहाद्वारे माहिती आणि सुरक्षा असो, आपत्ती व्यवस्थापन प्रयत्न असोत किंवा ‘पीएम गती शक्ती राष्ट्रीय महायोजने’मध्ये भू-स्थानिक माहितीचा वापर असो: पंतप्रधान

अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती आता थेट सामान्य नागरिकांचे जीवन सुकर बनवण्यात योगदान देत आहे: पंतप्रधा

Posted On: 23 AUG 2025 11:57AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय अंतराळ दिन 2025 च्या निमित्ताने व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या वर्षीची संकल्पना “आर्यभट्ट ते गगनयान” अशी असून, ती भारताचा भूतकाळातील आत्मविश्वास आणि भविष्यातील निश्चय या दोहोंचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

राष्ट्रीय अंतराळ दिन हा अल्पावधीतच भारताच्या तरुणांसाठी उत्साह आणि आकर्षणाचा एक महत्त्वाचा प्रसंग बनला आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी या क्षेत्राशी संबंधित सर्व व्यक्तींना, विशेषतः शास्त्रज्ञ आणि तरुणांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, नुकतेच  भारतात खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीवर आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात साठहून अधिक देशांचे सुमारे 300 तरुण सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत अनेक भारतीय सहभागींनी पदके जिंकल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हे ऑलिंपियाड अंतराळ क्षेत्रात भारताच्या उदयास येत असलेल्या जागतिक नेतृत्वाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. तरुणांमध्ये अंतराळ क्षेत्राविषयी आवड आणखी वाढवण्यासाठी इस्रोने इंडियन स्पेस हॅकॅथॉन आणि रोबोटिक्स चॅलेंज सारखे उपक्रम सुरू केल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्याचें आणि सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मोदी म्हणाले की, “अंतराळ क्षेत्रात एकापाठोपाठ एक यश मिळवणे, हा आता भारत आणि इथल्या शास्त्रज्ञांचा नैसर्गिक गुण बनला आहे.” दोन वर्षांपूर्वी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनून इतिहास रचला, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, अंतराळात डॉकिंग-अनडॉकिंग क्षमता  असलेला भारत जगातील चौथा देश बनला आहे, यावरही त्यांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून टाकत, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये आपला तिरंगा फडकवणाऱ्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी नुकतीच तीन दिवसांपूर्वी त्यांची भेट झाली. ते पुढे म्हणाले की जेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी त्यांना तो तिरंगा दाखवला, तेव्हा त्या ध्वजाला स्पर्श करण्याची भावना शब्दातीत होती. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधताना, नव्या भारतातील तरुणांचे अमर्याद धैर्य आणि अगणित स्वप्ने यांचे दर्शन घडले याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. भारत ‘ऍस्ट्रोनॉट पूल ’ उभारत आहे अशी घोषणा त्यांनी केली. अंतराळ दिनानिमित्त, त्यांनी तरुण भारतीयांना यामध्ये  सहभागी होण्याचे आणि भारताच्या आकांक्षांना पंख देण्यासाठी मदत करण्याचे आमंत्रण दिले.

भारत आता क्रायोजेनिक इंजिन्स आणि इलेक्ट्रिक प्रॉपल्शन यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानांच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे लवकरच भारत गगनयान मोहीम सुरु करेल आणि येत्या काही वर्षांत भारत देखील स्वतःचे अंतराळ  स्थानक उभारेल,” पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की भारत यापूर्वीच चंद्रावर आणि मंगळावर पोहोचला आहे आणि आता देशाने अवकाशातील आणखी गहन भागांचा शोध घ्यायला हवा. या अज्ञात भागांमध्ये मानवतेच्या भविष्याची रहस्ये दडलेली आहेत यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले, “आकाशगंगांच्या पलीकडे आपले क्षितीज आहे!”

पंतप्रधान मोदी म्हणाले की अंतराळाचा  अमर्याद विस्तार आपल्याला सतत स्मरण करून देतो  की कोणतेही ध्येय  अंतिम नसते. त्याच पद्धतीने अंतराळ क्षेत्रात धोरणात्मक स्तरावरील प्रगतीत देखील कोणतेही अंतिम लक्ष्य असायला नको यावर त्यांनी भर दिला. लाल किल्ल्यावरुन नुकत्याच केलेल्या भाषणाची आठवण काढत पंतप्रधानांनी सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन हा भारताचा मार्ग असल्याचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान म्हणाले की गेल्या 11 वर्षांत देशाने अवकाश क्षेत्रात महत्त्वाच्या सुधारणांची मालिका राबवली आहे. एके काळी, अंतराळासारख्या भविष्यवेधी क्षेत्राला असंख्य निर्बंधांच्या जाचात अडकवून ठेवण्यात आले होते याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले की आता हे निर्बंध उठवण्यात आले असून खासगी क्षेत्राला अंतराळा तंत्रज्ञान क्षेत्रात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजघडीला देशात 350 हून अधिक स्टार्ट अप्स अंतराळा तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष आणि वेगवर्धनाची प्रेरक शक्ती म्हणून उदयाला येत असून आजच्या कार्यक्रमात देखील त्यांचा सक्रीय सहभाग आहे हे त्यांनी अधोरेखित केले. खासगी क्षेत्राने उभारलेले पहिले पीएसएलव्ही रॉकेट लवकरच प्रक्षेपित करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. भारताचा पहिला खासगी, दूरसंचार उपग्रह देखील विकसित होत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, सरकारी-खासगी भागीदारीतून पृथ्वी निरीक्षक उपग्रह तारामंडळचे  प्रक्षेपण करण्यासाठी तयारी सुरु आहे. “अंतराळा क्षेत्रात भारताच्या तरुणांसाठी प्रचंड संख्येने संधी निर्माण होत आहेत,” असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित केले होते, त्याचे स्मरण करून त्यांनी सांगितले की प्रत्येक क्षेत्राला आपापले उद्दिष्ट निश्चित करण्यास प्रोत्साहित केले गेले आहे.

भारताच्या अंतराळ स्टार्टअप्सना आव्हान देत पंतप्रधान मोदी यांनी विचारले, "पुढील पाच वर्षांत आपण अंतराळ क्षेत्रात पाच युनिकॉर्न तयार करू शकतो का?” सध्या भारतातून दरवर्षी होणाऱ्या 5-6 मोठ्या प्रक्षेपणांचे आपण साक्षिदार होत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. खाजगी क्षेत्राने पुढे येऊन भारताला अशा टप्प्यावर नेले पाहिजे की जेणेकरून पुढील पाच वर्षात दरवर्षी 50 रॉकेट प्रक्षेपित करण्याची क्षमता साध्य करावी , अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. हे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील पिढीतील सुधारणा अंमलात आणण्यासाठी सरकारकडे निर्धार आणि इच्छाशक्ती दोन्ही आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी अंतराळ समुदायाला आश्वासन दिले की सरकार प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे.

भारत अंतराळ तंत्रज्ञानाकडे केवळ वैज्ञानिक शोधाचे साधन म्हणून नव्हे तर जीवनमान सुलभ करण्याचे एक साधन म्हणून पाहतो, असेही ते म्हणाले. "अंतराळ  तंत्रज्ञान भारतातील शासकीय कारभाराचा एक अविभाज्य भाग बनत आहे", असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी पंतप्रधानांनी पिक विमा योजनांमध्ये उपग्रह आधारित मूल्यांकन, मच्छीमारांसाठी उपग्रह आधारित  माहिती आणि सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापनातील उपयोग तसेच पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनमध्ये भू-स्थानिक  माहितीचा वापर ही काही उदाहरणे दिली  . अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती नागरिकांचे दैनंदिन जीवन सुलभ करण्यात थेट योगदान देत आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अंतराळ तंत्रज्ञान वापराला  अधिक चालना देण्यासाठी काल ‘राष्ट्रीय संमेलन  2.0’ आयोजित करण्यात आले होते , अशी माहिती त्यांनी दिली. असे उपक्रम सुरू राहावेत आणि त्यांचा विस्तार व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सना सार्वजनिक सेवेसाठी नवीन उपाय आणि नवकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. भारताचा अंतराळ प्रवास आगामी काळात नवे शिखर गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि सर्वांना पुन्हा एकदा राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, इस्रोचे अधिकारी, वैज्ञानिक आणि अभियंते या कार्यक्रमात उपस्थित होते.

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2160133) Visitor Counter : 7