पंतप्रधान कार्यालय
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या महत्वावर दिला भर
कझानमध्ये गेल्या वर्षी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांमधील स्थिर आणि सकारात्मक प्रगतीचे पंतप्रधानांनी केले स्वागत
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्याचे राष्ट्रपती शी यांचे निमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले
स्थिर, अंदाज वर्तवण्याजोगे आणि रचनात्मक द्विपक्षीय संबंध प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील असे पंतप्रधानांकडून अधोरेखित
Posted On:
19 AUG 2025 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2025
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
वांग यी यांनी तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेसाठी राष्ट्रपती शी यांचा संदेश आणि निमंत्रण पंतप्रधानांना दिले.त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीबद्दल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत सहअध्यक्षपद भूषविलेल्या विशेष प्रतिनिधींच्या 24 व्या बैठकीबद्दलचे त्यांचे सकारात्मक मूल्यांकन देखील सामायिक केले.
पंतप्रधानांनी सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि सीमा प्रश्नाच्या निष्पक्ष, तर्कसंगत आणि परस्पर स्वीकारार्ह निराकरणाप्रति भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
गेल्या वर्षी कझान येथे राष्ट्रपती शी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थिर आणि सकारात्मक प्रगती झाल्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले. हे संबंध परस्पर आदर, परस्पर हित आणि परस्पर संवेदनशीलता यावर आधारित आहेत ज्यामध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा समावेश देखील आहे.
पंतप्रधानांनी एससीओ शिखर परिषदेच्या निमंत्रणाबद्दल राष्ट्रपती शी यांचे आभार मानले आणि त्याचा स्वीकार केला. त्यांनी चीनच्या एससीओ शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाला पाठिंबा दर्शवला आणि तियानजिनमध्ये राष्ट्रपती शी यांना भेटण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. भारत आणि चीनमधील स्थिर, अंदाज वर्तवण्याजोगे आणि रचनात्मक द्विपक्षीय संबंध प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील यावर पंतप्रधानांनी भर दिला.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158198)