अर्थ मंत्रालय
एस अँड पी ने स्थिर आउटलुकसह भारताच्या मानांकनात बीबीबी अशी केली सुधारणा, आर्थिक लवचिकता आणि शाश्वत वित्तीय एकत्रीकरणावर दिला भर
Posted On:
14 AUG 2025 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
स्टँडर्ड अँड पुअर्स (एस अँड पी) जागतिक मानांकन संस्थेने स्थिर आउटलुकसह भारताच्या दीर्घकालीन सार्वभौम पत मानांकनात ‘बीबीबी निगेटिव्ह’ वरून ‘बीबीबी’ तर अल्पकालीन मानांकनात ‘A-3’ वरून ‘A-2’ अशी सुधारणा केली असून अर्थ मंत्रालयाने याचे स्वागत केले आहे. मानांकनात सुधारणा ही भारताची सुरु असलेली आर्थिक वाटचाल आणि विवेकी वित्तीय व्यवस्थापनाला दिलेला महत्त्वपूर्ण दुजोरा आहे. एस अँड पी ने मागील 18 वर्षांमध्ये देशाच्या सार्वभौम पत मानांकनात केलेली ही पहिली सुधारणा आहे, यापूर्वी 2007 मध्ये भारताला बीबीबी गुंतवणूक श्रेणीत उन्नत करण्यात आले होते. मे 2024 मध्ये, एजन्सीने भारताबद्दलचा आपला दृष्टिकोन सुधारून ‘स्थिर’ वरून ‘सकारात्मक’ असा केला.
एस अँड पीच्या आज प्रकाशित इंडिया सॉवरेन रेटिंग आढावानुसार, हे उन्नतीकरण भारताची जलद आणि गतिमान आर्थिक वाढ, वित्तीय एकत्रीकरणाप्रति सरकारची निरंतर वचनबद्धता, सार्वजनिक खर्चाची विशेषतः भांडवली खर्च आणि पायाभूत सुविधांवरील खर्चाची सुधारित गुणवत्ता आणि मजबूत कॉर्पोरेट, वित्तीय आणि बाह्य ताळेबंद यासारख्या प्रमुख घटकांचा समावेश प्रतिबिंबित करते. विश्वासार्ह चलनवाढ व्यवस्थापन आणि वाढती धोरणात्मक पूर्वानुमान क्षमतेने देखील यात मध्यवर्ती भूमिका बजावली आहे.
एस अँड पीने त्यांच्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रमुख सकारात्मक घटकांचा तपशील दिला आहे, ज्यामुळे भारताची गणना जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक अशी होत आहे,यात आर्थिक वर्ष 22 ते आर्थिक वर्ष 24 दरम्यान वास्तविक जीडीपी वृद्धीदर सरासरी 8.8 टक्के राहिला जो आशिया-प्रशांत क्षेत्रात सर्वाधिक आहे. पतधोरण विषयक सुधारणा, विशेषतः महागाई-लक्ष्य निर्धारित करण्याची प्रणाली अवलंबल्यामुळे , महागाई कमी करण्याबाबत अपेक्षा अधिक प्रभावीपणे पूर्ण झाल्या आहेत, असे एजन्सीने म्हटले आहे. एस अँड पी ने नमूद केले आहे की जागतिक अडचणी आणि किमतीतील चढउतार असूनही, भारताने एकूणच किंमत स्थिरता राखून लवचिकता दाखवली आहे. देशांतर्गत भांडवली बाजारांच्या विद्यमान विकासासह चलनविषयक सुधारणांमुळे एकूण आर्थिक परिस्थितीसाठी अधिक स्थिर आणि पूरक वातावरण निर्माण झाले आहे. अहवालात निरीक्षण नोंदवले आहे की भारताची बाह्य आणि आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि लोकशाही संस्था धोरणात्मक सातत्य आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरता सुनिश्चित करत आहेत.
भविष्याचा विचार करून एस अँड पी ने आर्थिक वर्ष 26 मध्ये जीडीपी वृद्धिदर 6.5 टक्के आणि पुढील तीन वर्षांत ही गती कायम राखण्याचा अंदाज वर्तवला आहे. एजन्सीने असे सुचवले आहे की वित्तीय तूट कमी करणे आणि सार्वजनिक गुंतवणूक चालू ठेवल्यामुळे सकारात्मक मानांकनाला आणखी मदत होऊ शकते. अहवालात असेही नमूद केले आहे की भारताचा मोठा आणि लवचिक देशांतर्गत खप लक्षात घेता अमेरिकेने अलीकडेच लादलेल्या शुल्काचा परिणाम मर्यादित राहण्याची अपेक्षा आहे.
अलीकडेच, मॉर्निंग स्टार डीबीआरएस या आणखी एका मानांकन संस्थेने देखील भारताला "बीबीबी " दर्जा दिला आहे.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156591)