पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे खासदारांसाठी नव्याने बांधलेल्या सदनिकांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 11 AUG 2025 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2025

 

कार्यक्रमाला उपस्थित ओम बिर्ला जी, मनोहर लाल जी, किरेन रिजिजू जी, महेश शर्मा जी, संसदेचे सर्व सन्मानित सदस्यगण, लोकसभेचे महासचिव, स्त्री आणि पुरुषगण !

काही दिवसांपूर्वीच, मी कर्तव्य पथावर केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीचे म्हणजेच कर्तव्य भवनचे लोकार्पण  केले. आणि आज मला संसदेतील माझ्या सहकाऱ्यांसाठी या निवासी संकुलाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. हे जे चार टॉवर्स आहेत, त्यांची नावे देखील किती सुंदर आहेत - कृष्णा, गोदावरी, कोसी, हुगळी, भारताच्या  चार महान नद्या, ज्या कोट्यवधी लोकांसाठी  जीवनदायिनी आहेत. आता त्यांच्या प्रेरणेने आपल्या लोकप्रतिनिधींच्या आयुष्यात देखील आनंदाचा नवीन झरा वाहेल. काही लोकांना त्रास देखील होईल, कोसी नदी नाव ठेवले आहे, त्यामुळे त्यांना कोसी नदी दिसणार नाही, त्यांना बिहारच्या निवडणुका दिसतील. अशा संकुचित विचारसरणीच्या लोकांच्या चिंता  लक्षात घेत  मी निश्चितपणे म्हणेन की नद्यांची नावे ठेवण्याची ही परंपरा आपल्याला देशाच्या एकतेच्या धाग्यात गुंफते. दिल्लीत आपल्या खासदारांचे जीवनमान उंचावेल ,दिल्लीत आपल्या खासदारांसाठी सरकारी घरांची उपलब्धता आता आणखी वाढेल. मी सर्व खासदारांचे अभिनंदन करतो. या सदनिकांच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि  श्रमिकांचे देखील अभिनंदन करतो, ज्यांनी मेहनत आणि जिद्दीने हे काम पूर्ण केले आहे.  

मित्रहो, 

आमचे खासदार मित्र ज्या नवीन घरात प्रवेश करणार आहेत, त्याचा नमुना फ्लॅट पाहण्याची संधी मला नुकतीच मिळाली. मला  खासदारांची जुनी घरे पाहण्याचीही संधी मिळाली आहे. जुन्या घरांची अवस्था अतिशय वाईट होती, खासदारांना दररोज ज्याप्रमाणे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, आता नवीन घरांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना यापासून मुक्ती  मिळेल. हे खासदार मित्र आपल्या समस्यांमधून मुक्त झाले की नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता अधिक वेळ आणि ऊर्जा वापरू शकतील. 

मित्रहो,

तुम्हा सर्वांना माहित आहे, पहिल्यांदाच जिंकून आलेल्या खासदारांना दिल्लीत घरे मिळवून देण्यात किती अडचणी येत होत्या.  नवीन इमारतींमुळे ही समस्याही सुटेल. या बहुमजली इमारतींमध्ये 180  हून अधिक खासदार एकत्र राहतील. त्याचबरोबर या नवीन घरांची एक मोठी आर्थिक बाजू देखील आहे. आता नुकतेच कर्तव्य भवनाच्या लोकार्पण प्रसंगी मी म्हटले होते, अनेक मंत्रालये जी भाड्याने घेतलेल्या इमारतींमधून चालत होती, त्यांचे भाडे देखील वार्षिक सुमारे 1,500 कोटी रुपये होते. हा देशाच्या निधीचा थेट अपव्यय होता. त्याचप्रमाणे खासदारांसाठी पुरेशी घरे उपलब्ध नसल्यामुळे सरकारी खर्चात भर पडत असे.तुम्ही कल्पना करू शकता, खासदारांसाठी निवासस्थानांची कमतरता असूनही, 2004 ते 2014 या काळात लोकसभा खासदारांसाठी एकही नवीन निवासस्थान बांधण्यात आले नाही. म्हणूनच 2014 नंतर, आमच्या सरकारने हे काम एखाद्या ध्येयाप्रमाणे हाती घेतले. 2014 पासून आतापर्यंत, या सदनिका धरून खासदारांसाठी सुमारे साडेतीनशे घरे  बांधण्यात आली आहेत. म्हणजेच एकदा ही घरे बांधून झाली, आता जनतेच्या पैशांची देखील बचत होणार आहे. 

मित्रहो,

21 व्या शतकातील भारत विकसित बनण्यासाठी जितका उत्सुक आहे तितकाच तो संवेदनशील आहे. आज देश कर्तव्य पथ आणि कर्तव्य भवन बांधण्याबरोबरच, कोट्यवधी नागरिकांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे आपले कर्तव्य देखील पार पाडत आहे. आज देश एकीकडे आपल्या खासदारांसाठी नवीन घराची प्रतीक्षा पूर्ण करत आहे आणि पंतप्रधान आवास योजनेद्वारे 4 कोटी गरीब कुटुंबांचा गृहप्रवेश देखील करून देत आहे.  देश नवीन संसद भवन बांधण्याबरोबरच , शेकडो नवीन वैद्यकीय महाविद्यालये देखील उभारत आहे. या सर्वांचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे.

मित्रहो,

नव्याने बांधलेल्या खासदार निवासस्थानांमध्ये शाश्वत विकासाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे याचा मला आनंद वाटतो.  देशाच्या पर्यावरणपूरक आणि भविष्याच्या  सुरक्षित दृष्टिकोनाशी सुसंगत उपक्रमांचाच  हा भाग आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पायाभूत सुविधांपासून ते सौरऊर्जेतील देशाच्या नवीन विक्रमांपर्यंत, देश सातत्याने शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनाला चालना देत  आहे. 

मित्रहो,

आज मी तुम्हाला काही आवाहन देखील करणार आहे. देशातील विविध राज्ये आणि प्रदेशातील खासदार येथे एकत्र राहणार आहेत . तुमची येथील उपस्थिती 'एक भारत, श्रेष्ठ भारत' चे प्रतीक बनेल. म्हणूनच जर या परिसरात प्रत्येक प्रांताचे सण -उत्सव  वेळोवेळी सामूहिकरित्या आयोजित केले तर या  परिसरात चैतन्य निर्माण होईल.  तुम्ही तुमच्या मतदारसंघातील लोकांना बोलावून या कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेऊ शकता.  एकमेकांच्या प्रादेशिक भाषांमधील काही शब्द देखील एकमेकांना शिकवण्याचा प्रयत्न करू शकता.  शाश्वतता आणि स्वच्छता ही या इमारतीची ओळख बनेल याप्रति आपली सर्वांची बांधिलकी असायला हवी. केवळ खासदारांचे निवासस्थानच नाही तर संपूर्ण परिसर  नीटनेटका आणि स्वच्छ राहिला तर किती चांगले होईल.

मित्रहो,

मला आशा आहे की आपण सर्वजण एक संघ म्हणून काम करू. आपले प्रयत्न देशासाठी एक आदर्श बनतील. आणि मी मंत्रालय आणि तुमच्या गृहनिर्माण समितीला खासदारांच्या विविध निवासी संकुलांमध्ये वर्षातून  दोनदा किंवा तीनदा स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन करतो.  आणि मग घोषित करावे की आज हे संकुल  सर्वात स्वच्छ असल्याचे आढळले. कदाचित एका वर्षानंतर आपण कोणते सर्वोत्तम आहे आणि कोणते सर्वात वाईट आहे हे देखील ठरवू आणि दोन्ही घोषित करू 

मित्रहो,

जेव्हा मी ही नवीन सदनिका  पाहण्यासाठी गेलो, तेव्हा आत प्रवेश केल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया होती, "इतकेच आहे का?" तेव्हा ते म्हणाले, नाही साहेब, ही तर सुरुवात आहे, कृपया तुम्ही आत चला, मला आश्चर्य वाटले,  मला वाटत नाही की तुम्ही सर्व खोल्या भरू शकाल,  खूप मोठ्या खोल्या आहेत. मी आशा करतो या सगळ्याचा सदुपयोग होईल, हे नवीन घर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या कौटुंबिक जीवनात एक आशीर्वाद ठरो. माझ्या खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद !!

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156209)