सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (सीईए) आज नवी दिल्ली येथे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांसोबत पहिली सल्लागार बैठक घेतली

Posted On: 11 AUG 2025 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2025

 

सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आज नवी दिल्ली येथे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांसोबत पहिली सल्लागार बैठक घेतली. सहकारी संस्थांमधील निवडणूका मुक्त आणि निःष्पक्ष वातावरणात पार पाडाव्यात आणि ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व्हावी या उद्देशाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणासोबत संवाद यंत्रणा स्थापन करण्याचा या बैठकीचा उद्देश होता. सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष  देवेंद्र कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ओडिशा, बिहार, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयुक्तांनी भाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने सहकार क्षेत्रात अनेक सुधारणा आणल्या असून त्यात सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या स्थापनेचा समावेश आहे, असे देवेंद्र कुमार सिंह   यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

वर्ष 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले जात असून केंद्र सरकारने अनेक नवनवीन सुधारणा अंमलात आणून सहकार क्षेत्राच्या वृद्धीसाठीची आपली वचनबद्धता दर्शवली आहे. सहकारी संस्थांमधील निवडणूका मुक्त आणि निःष्पक्ष वातावरणात पार पाडाव्यात यासाठी  ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्याकरता सहकारी संस्थांमधील निवडणूक प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

सहकारी निवडणुकांसाठी मानक नियमावली आणि आचारसंहितेची आवश्यकता आहे, असे सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी सांगितले. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी आचारसंहिता तयार करणे, निवडणूक अधिकाऱ्यांसाठी हस्तपुस्तिकेचे प्रकाशन, राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये सदस्य असलेल्या सदस्य सहकारी संस्थांमधील प्रतिनिधींची निवड आणि राज्याकडून प्राप्त झालेल्या इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अजेंड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात यावा असा एक प्रस्ताव या बैठकीत सहभागी झालेल्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानी मांडला.

सहकारी निवडणुकांमध्ये सुधारणा प्रक्रिया सातत्याने होत राहावी या उद्देशाने दर तीन महिन्यांनी सल्लागार समितीची बैठक घेण्याचा निर्णय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला.

या बैठकीत ओडिशा, बिहार, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांचे अधिकारी आणि  महाराष्ट्राच्या वतीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अनिल महादेव कवाडे आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे सहभागी झाले होते.

 

* * *

निलिमा चितळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155312)