माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारने अधिकृत फॅक्ट चेक युनिटच्या माध्यमातून भारत आणि सशस्त्र दलांविरुध्द पाकिस्तानने चालवलेल्या अपप्रचाराचा पर्दाफाश केला


ऑपरेशन सिंदूर सुरु असताना, खोट्या बातम्या, संपादित व्हिडिओ ओळखून त्यांचे प्रसारण थांबवण्यासाठी आणि पाकिस्तानच्या भारत-विरोधी अपप्रचाराचा विरोध करून त्याचे त्वरित खंडन करण्यासाठी पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटने अहोरात्र काम केले

ऑपरेशन सिंदूरच्या काळात सरकारने भारत-विरोधी बातम्या पसरवणाऱ्या 1,400 युआरएल्सचे कार्य बंद केले

Posted On: 30 JUL 2025 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार उपलब्ध असलेल्या सर्व वैधानिक तसेच संस्थात्मक यंत्रणांच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या काळात मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या, चुकीची माहिती तसेच अपप्रचार सुरु असल्याचे आणि त्यापैकी बहुतांश बाबी परदेशातून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हा सरकारने अशा चुकीची माहिती पसरवणाऱ्या मोहिमांना आळा घालण्यासाठी सक्रीय पावले उचलली:

खरी माहिती देणे: भारत सरकारने नियमित स्वरुपात माध्यमांना माहिती देण्यासाठी परिषदा आयोजित केल्या आणि माध्यमांतील व्यक्ती तसेच नागरिक यांना प्रत्येक घडामोडीविषयी अवगत केले.संरक्षण दलांनी राबवलेल्या प्रत्येक कारवाईचे तपशील संबंधित दृक्श्राव्य सामग्री आणि उपग्रह प्रतिमांच्या सहाय्याने समजावून सांगण्यात आले. या परिषदांद्वारे अधिकृत माहिती देण्यात आली.

आंतर-मंत्रालयीन समन्वय: ऑपरेशन सिंदूर सुरु असताना, आंतर-शाखीय तसेच आंतर-विभागीय समन्वयासाठी एक केंद्रीकृत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. या नियंत्रण कक्षाचे कार्य अहोरात्र सुरु होते आणि या कक्षाने सर्व माध्यम भागधारकांना वास्तविक वेळी माहिती मिळणे सुलभ केले. या  नियंत्रण कक्षात भारतीय लष्कर, नौदल तसेच हवाई दल यांचे नोडल प्रतिनिधी, विविध सरकारी माध्यम युनिट्स मधील अधिकारी आणि पत्रसूचना कार्यालयातील (पीआयबी)अधिकारी नेमण्यात आले होते. खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरवणारी समाज माध्यम हँडल्स आणि पोस्टस सक्रियपणे शोधून काढण्यात आल्या.

फॅक्ट चेक अर्थात तथ्यांची तपासणी

भारत तसेच भारतीय सशस्त्र दले यांच्याविरुध्द पाकिस्तानतर्फे सुरु असलेला अपप्रचार या कक्षाने शोधून काढून तो थांबवला आणि अशा प्रकारच्या मजकुराचा विरोध करणाऱ्या अनेक पोस्ट्समधील तथ्यांची तपासणी केली. तसेच, ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात चुकीची किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्या लिंक्सची तथ्य तपासणी युनिट (एफसीयु) द्वारे तथ्य तपासणी करून, योग्य कारवाईसाठी त्या त्वरित संबंधित मध्यस्थ संस्थांशी सामायिक करण्यात आल्या.

तथ्य तपासणी युनिटच्या प्रयत्नांची माध्यमांनी प्रशंसा केली. त्यापैकी काही लेखांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत:

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या डिजिटल अपप्रचाराविरुध्द भारताच्या एफसीयुचा त्वरित खंडनासह लढा

https://www.newindianexpress.com/nation/2025/May/10/indias-fcu-battles-pakistans-digital-propaganda-with-swift-rebuttals-following-operation-sindoor

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सरकारचे तथ्य तपासणी युनिट धडाडीने सक्रीय

https://www.livemint.com/industry/media/india-pib-govt-fact-checking-unit-operation-sindoor-misinformation-false-claims-11746770729519.html

पाकिस्तानच्या चुकीच्या माहिती मोहिमेविरुद्ध भारत कशा प्रकारे लढतो आहे

https://www.hindustantimes.com/india-news/how-india-is-fighting-pakistan-s-disinformation-campaign-101746644575505.html

ब्लॉकिंग

काही समाज माध्यम हँडल्स, त्यापैकी अनेक भारताबाहेरून कार्यरत असलेली हँडल्स चुकीच्या आणि संभाव्य हानिकारक माहितीचा सक्रियतेने प्रचार करत आहेत असे निदर्शनास आले होते. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 69अ अंतर्गत सरकारने भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, देशाचे संरक्षण, देशाची सुरक्षितता आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितार्थ अनेक संकेतस्थळे, समाज माध्यम हँडल्स आणि पोस्ट्स ब्लॉक करण्यासाठी आवश्यक निर्देश जारी केले.

मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरच्या काळात डिजिटल माध्यमांवरील 1,400 हून अधिक युआरएल्स ब्लॉक करण्यासाठी देखील निर्देश जारी केले. या युआरएल्सवरील मजकुरात खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, भारत-विरोधी बातम्या, सामाजिक-दृष्ट्या संवेदनशील मजकूर मुख्यतः पाकिस्तानातील समाज माध्यम खाती तसेच भारतीय सशस्त्र दलांविरुद्ध भावना भडकवण्यासाठीचा मजकूर इत्यादींचा समावेश होता.  

माध्यमांसाठी सल्लापत्रक

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सर्व माध्यम वाहिन्यांसाठी एक सल्लापत्रक जारी करून त्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून संरक्षण अभियान  आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवण्यापासून परावृत्त केले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150363)