पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (124 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Posted On: 27 JUL 2025 11:39AM by PIB Mumbai

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!

मन की बातमध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्‍ये  अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता  लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!

मित्रांनो,

तुम्ही इन्स्पायर-मानक’  उपक्रमाचे नाव नक्कीच ऐकले असेल.  लहान मुलांमध्ये असलेल्या नवोन्मेषी संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आहे. यामध्ये प्रत्येक शाळांमधून पाच मुलांची निवड केली जाते. प्रत्येक मूल एक नवीन कल्पना घेवून येतो. या उपक्रमामध्‍ये आत्तापर्यंत लाखो मुले सहभागी झाली  आहेत. चंद्रयान -3 नंतर तर या मुलांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. देशामध्ये अंतराळ विषयक स्टार्ट-अप्समध्ये वेगाने वाढ होत आहे. पाच वर्षांपूर्वी 50 पेक्षाही कमी स्टार्ट-अप देशात होते. आज त्यांचा आकडा 200 पेक्षा जास्त झाला आहे. ही गोष्ट फक्त अंतराळ क्षेत्राची आहे. मित्रांनो, आगामी महिन्यात 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे. हा दिवस तुम्ही कसा साजरा करणार, यासाठी तुमच्या मनात कोणती नवी कल्पना आहे? याविषयी नमो अॅपला तुम्ही जरूर संदेश पाठवावा.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकातल्या  भारतामध्‍ये आज विज्ञान-शास्त्र या विषयामध्‍ये  एक नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याकडच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाड मध्ये पदकांची कमाई केली आहे. देवेश पकंज, संदीप कुची, देबदत्त प्रियदर्शी आणि उज्ज्वल केसरी, या चार विद्यार्थ्यांनी भारताचे नाव परदेशामध्ये गाजवले. गणिताच्या विश्वामध्येही भारताने आपली वेगळी ओळख आणखी मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्रॉंझ पदक मिळवले.

मित्रांनो,

पुढच्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये अस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रोफिजिक्स ऑलिंपियाडचे आयोजन केले जात आहे. यामध्ये 60 पेक्षा जास्त देशातील विद्यार्थी सहभागी होतील. शास्त्रज्ञही यावेळी उपस्थित राहतील.  आत्तापर्यंत झालेल्या ऑलिंपियाडमध्ये हे सर्वात मोठे, भव्य ऑलिंपियाड होईल. एका अर्थी पाहिले तर भारत आता ऑलिंपिक आणि ऑलिंपियाड या दोन्ही क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आपल्यासर्वांना खूप अभिमान वाटावा, अशी एक चांगली बातमी युनेस्कोकडून  आली आहे. युनेस्कोने मराठा साम्राज्याच्या  12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळम्हणून मान्यता दिली आहे. यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रामध्ये आणि एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. प्रत्येक किल्ल्याच्या इतिहासाचे एक -एक पान जोडले आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक दगड, प्रत्येक चिरा हा एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. साल्हेरच्या  किल्ल्यामध्ये मुघलांचा पराभव झाला होता. शिवनेरी, या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही किल्ले असे आहेत की, त्यांना भेदणे शत्रूलाही शक्य झाले नाही. खांदेरीचा किल्ला तर  सागरामध्ये बनविण्यात आलेला अद्भूत किल्ला आहे. हा किल्ला बनविला जावू नये, यासाठी छत्रपती शिवाजी राजांना शत्रूपक्ष रोखू इच्छित होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. प्रतापगडच्या किल्ल्यामध्ये अफजल खानाला पराभवाचे पाणी पाजले होते. त्या पराक्रमांच्या गाथांचा जयजयकार या किल्ल्यांच्या भिंती, बुरूजांमध्ये आजही समावला आहे. विजयदुर्ग या किल्ल्यामध्ये गुप्त बोगदे होते. हा किल्ला म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते, याचे प्रमाण या किल्ल्यामध्ये सापडते.  काही वर्षांपूर्वी मी रायगडचा दौरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील पुतळ्यासमोर मी नतमस्तक होवून वंदन केले होते. त्यावेळी आलेल्या अनुभूतीचा क्षण अगदी आयुष्यभरासाठी माझ्या मनामध्ये कोरला गेला.

मित्रांनो,

देशाच्या इतर भागांमध्येही असेच अद्भूत म्हणावेत असे अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांनी कधी काळी आक्रमणे झेलली. वाईट हवामानाचे फटके सोसले. परंतु आत्मसन्मान कायम ठेवला. ते कधीच झुकले नाहीत. राजस्थानातील चित्तौडगडचा किल्ला, कुंभलगडचा किल्ला, रणथंभोरचा किल्ला, आमेर किल्ला, जैसलमेरचा किल्ला  तर अवघ्या विश्वामध्ये प्रसिद्ध आहे.  कर्नाटकातील गुलबर्गा इथं असलेला किल्लाही खूप मोठा आहे. चित्रदुर्गच्या किल्ल्याची भव्यता, विशालता  आपल्याला अचंबित करणारी आहे. हे भव्य किल्ले पाहिले की मनात येतेपूर्वीच्या काळी हे किल्ले कसे काय बांधले असतील?

मित्रांनो,

उत्तर प्रदेशातील बांदामध्ये कालिंजर किल्ला आहे. महमूद गजनवी याने अनेकवेळा या किल्ल्यावर हल्ला केला आणि प्रत्येकवेळी गजनवीला अपयश पत्करावं लागलं. बुंदेलखंडामध्ये असेच अनेक किल्ले आहेत. ग्वाल्हेर, झांसी, दतिया, अजयगड,गडकुंडार, चंदेरी अशी त्यांची नावं आहेत. हे किल्ले म्हणजे काही केवळ विटा-दगडं, चिरे नाहीत. हे किल्ले आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. संस्कार आणि स्वाभिमान, या किल्ल्यांच्या उंच-उंच भिंतींवरून जणू आजही वाकून पहात आहे. माझा सर्व देशवासियांना आग्रह आहे की, तुम्ही सर्वांनी या किल्ल्यांना भेटी द्याव्यात, आपला इतिहास जाणून घ्यावा आणि गौरवाचे क्षण अनुभवावेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

तुम्ही थोडी कल्पना करावी, अगदी पहाटेची वेळ आहे, बिहार राज्यातलं मुजफ्फरपूर शहरतारीख  आहे 11 ऑगस्ट 1908. प्रत्येक गल्ली-बोळ, प्रत्येक चौक, तिथं होणारी प्रत्येक हालचाल त्या क्षणी एकदम थांबली, जणू सगळे स्तब्ध झाले. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते, परंतु मनात मात्र आगीची मशाल पेटली होती. लोकांनी कारागृहाला वेढा घातला होता. याचं कारण होतं, तिथं एक 18 वर्षांचा युवक, इंग्रजांविरूद्ध आपले देशप्रेम व्यक्त केल्याचं मूल्य चुकतं करत होता. कारागृहाच्या आतमध्ये इंग्रज अधिकारी, एका युवकाला फाशी देण्याची तयारी करीत होते. त्या युवकाच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारच्या भयभीतीचा लवलेश नव्हता. उलट त्याला अभिमान वाटत होता. तो मोठ्या अभिमानानं, देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यास सिद्ध होता. तो वीर, तो साहसी युवक होता - खुदीराम बोस! वय वर्ष होतं, फक्त 18! या तरूण वयामध्ये त्यानं असं इतकं प्रचंड साहस दाखवलं. ते पाहून संपूर्ण देशवासियांचंही मन व्याकूळ झालं. त्यावेळी वर्तमान पत्रांनीही आपले मथळे - शिर्षकं केली होती - ‘‘खुदीराम बोसज्यावेळी फाशीवर जाण्यासाठी पुढे आले, त्यावेळी त्यांच्या चेह-यावर हास्य विलसत होते.अशाच अगणित लोकांनी  दिलेल्या बलिदानानंतर, अनेक युगांच्या तपस्येनंतर, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. देशासाठी आपलं रक्त सांडून त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाचं यज्ञकुंड धगधगतं ठेवलं होतं.

मित्रांनो,

ऑगस्टचा महिना, म्हणूनच क्रांतीचा महिना आहे. 1 ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते, याच महिन्यात- 8 ऑगस्टला गांधींजीच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनाचा प्रारंभ झाला होता. त्यानंतर 15 ऑगस्ट- म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस येतो, त्यावेळी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या समर्पणाचं स्मरण करतो, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतो, परंतु मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्यबरोबरच देशाचं विभाजन झालं, त्याचा सलही मनात कायम आहे. म्हणूनच आपण 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवसया स्वरूपामध्ये पाळतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

7 ऑगस्ट, 1905 रोजी आणखी एका क्रांतीचा प्रारंभ झाला होता. स्वदेशी आंदोलनानं स्थानिक उत्पादनं आणि विशेष करून हातमागाला एक नवीन चैतन्य दिलं होतं. त्याच्या स्मृतीनिमित्त देशात दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवससाजरा केला जातो. यावर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो त्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्‍या संग्रामाच्या काळामध्ये आपल्या खादीने या आंदोलनाला जणू नवीन बळ दिलं होतं.  त्याच प्रकारे आज ज्यावेळी देश, विकसित भारत  बनण्यासाठी पुढे वाटचाल करीत आहे, त्यावेळी वस्त्रोद्योग क्षेत्र, देशाची ताकद बनत आहे. या 10 वर्षांमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या क्षेत्राशी संबंधित लक्षावधी लोकांनी यशस्वीतेच्या अनेक गाथा लिहिल्या आहेत. महाराष्ट्रातल्या पैठण या गावांतील कविता धवले प्रारंभी एका लहानशा खोलीमध्ये काम करीत होत्या. त्यांच्याकडे जागा नव्हती की, इतर काही सुविधा नव्हत्या. सरकारकडून मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्यातील कलेला उंच उडण्याचं, भरारी घेण्याचं बळ मिळालं. आता त्या तिप्पट कमाई करतात. त्या आता स्वतः पैठणी विणतात आणि त्यांची विक्री करतात. ओडिशातील मयूरभंजमध्येही यशाची अशीच एक कहाणी घडली आहे. इथे 650 पेक्षा जास्त आदिवासी महिलांनी संथाली साडी बनविण्याची कला पुन्हा एकदा जीवित केली आहे. आता या महिला दर महिना हजारों रूपयांची कमाई करीत आहेत. या महिला काही फक्त कापड विणत नाहीत तर आपली ओळख निर्माण करीत आहेत. बिहारच्या नालंदा इथं वास्तव्य करणारे नवीन कुमार यांनी केलेली कामगिरीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कुटुंबातील मंडळी अनेक पिढ्यांपासून हे काम करीत आहेत. परंतु सर्वात चांगली गोष्ट अशी की, त्यांच्या कुटुंबाने आता या क्षेत्रामध्ये आधुनिकतेचा समावेश केला आहे. आता त्यांची मुले हातमाग तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत आहेत. मोठ्या ब्रॅंडसाठी काम करीत आहेत. हे परिवर्तन काही फक्त एखाद्या परिवारामध्ये घडून आलं आहे, असं अजिबात नाही. तर भवतालच्या अनेक कुटुंबांना पुढे घेवून जात आहे.

मित्रांनो,

वस्त्रोद्याग हे भारताचे फक्त एक क्षेत्र आहे असं नाही. हे आपल्या  सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण आहे. आज वस्त्रोद्याग आणि तयार कपड्यांची बाजारपेठ खूप तेजीत आहे, आणि ही बाजारपेठ सातत्यानं वाढत आहे. या विकास मार्गातील सर्वात सुंदर गोष्ट अशी आहे की, गावांतील महिला, शहरांतील डिझाईनर, वयानं ज्येष्ठ असलेले विणकर आणि स्टार्ट-अप सुरू करणारे आमचे युवक, असे सर्वजण मिळून या प्रवासात पुढची वाटचाल करीत आहेत. आज भारतामध्ये 3000 पेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्ट-अप सक्रिय आहेत. अनेक स्टार्ट -अप्सनी भारताच्या हातमागाला नवी ओळख देवून वैश्विक उंची प्राप्त करून दिली आहे. मित्रांनो, 2047 च्या विकसित भारताचा मार्ग आत्मनिर्भरतेतून, स्वावलंबनातून निर्माण होणार आहे. आणि आत्मनिर्भर भारताचा सर्वात मोठा आधार आहे- व्होकल फॉर लोकल’! ज्या गोष्टी भारतामध्ये बनल्या आहेत, ज्या वस्तू बनविण्यासाठी भारतीयानं घाम गाळला आहे, त्याच वस्तू खरेदी कराव्यात आणि अशाच स्वदेशी वस्तूंची विक्री केली जावी, असा आपण संकल्प केला पाहिजे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

भारताच्या  विविधतेची सर्वाधिक सुंदर झलक आपल्या लोकगीतांमध्ये आणि परंपरांमध्ये दिसून येते. आणि याचाच एक भाग म्हणजे आपल्याकडे केले जाणारे भजन आणि कीर्तन आहे. परंतु  तुम्ही एक गोष्ट कधी ऐकली आहे का? की, कीर्तनाच्या माध्यमातून वणवा म्हणजे जंगलामध्ये लागल्या जाणा-या आगींविषयी लोकांना जागरूक केले जाते? कदाचित कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही. परंतु ओडिशातील क्योंझर जिल्ह्यामध्ये एक अद्भूत, अनोखे कार्य केलं जात आहे. इथे राधाकृष्ण संकीर्तन मंडळ नावाचा एक कीर्तन करणारा समूह आहे. भक्तीबरोबरच, ही कीर्तनकार मंडळी आज पर्यावरण संरक्षणाचाही मंत्र जपत आहेत. या उपक्रमाच्या  प्रेरणास्त्रोत आहेत - प्रमिला प्रधान! जंगल आणि पर्यावरण यांच्या रक्षणासाठी त्यांनी पारंपरिक गीतांची नव्यानं शब्दरचना केली. नवीन संदेश त्या गीतांमध्ये घातले. त्यांचं मंडळ गावां-गावांमध्ये गेले. गीतांच्या माध्यमातून लोकांना समजावून सांगितले की, जंगलाला आग लागली तर किती प्रचंड नुकसान होतं. या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की, आपल्या लोकपरंपरा या काही संपलेल्या युगातील गोष्ट नाहीत, तर त्यांच्यामध्ये आजही समाजाला दिशा देण्याची शक्ती आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

भारतीय संस्कृतीचा एक प्रमुख आधार म्हणजे आपले सण आणि परंपरा, परंतु आपल्या संस्कृतीच्या सजीवतेचा आणखी एक पैलू आहे - तो म्हणजे आपला वर्तमान आणि आपला इतिहास यांचे दस्तावेजीकरण. आपली खरी ताकद म्हणजे हस्तलिखितांच्या स्वरूपात शतकानुशतकं जतन केलेलं ज्ञान. या हस्तलिखितांमध्ये विज्ञान आहे, वैद्यकीय पद्धती आहेत, संगीत आहे, तत्त्वज्ञान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवतेचे भविष्य उज्ज्वल बनवू शकणारे विचार आहेत.

मित्रांनो,

हे असाधारण ज्ञान, हा वारसा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या देशात प्रत्येक कालखंडात अशा काही व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी त्याला आपली साधना बनवलं. असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे मणि मारन जी, जे तमिळनाडूतल्या तंजावर इथले आहेत. त्यांना वाटलं की जर आजची पिढी तमिळ हस्तलिखितं वाचायला शिकली नाही तर भविष्यात हा मौल्यवान वारसा नष्ट होईल. म्हणून त्यांनी सायंकाळचे वर्ग सुरू केले. इथे विद्यार्थी, काम करणारे तरुण, संशोधक असे सर्वजण येऊन शिकू लागले. मणि मारनजींनी लोकांना "तमिळ सुवादियायल" म्हणजेच ताडाच्या पानांवरची हस्तलिखितं वाचण्याची आणि समजून घेण्याची पद्धत शिकवली. आज बऱ्याच प्रयत्नांनंतर अनेक विद्यार्थी या क्षेत्रात पारंगत झाले आहेत.

काही विद्यार्थ्यांनी तर या हस्तलिखितांच्या आधारे पारंपरिक औषध प्रणालीवर संशोधन सुरू केलं आहे. मित्रांनो, कल्पना करा की जर असे प्रयत्न देशभरात झाले तर आपलं प्राचीन ज्ञान भिंतींमध्ये बंद राहणार नाही, तर ते नवीन पिढीच्या चेतनेचा भाग बनेल. याच विचारानं प्रेरित होऊन भारत सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात एक ऐतिहासिक उपक्रम जाहीर केला आहे - 'ज्ञान भारतम् मिशन'. या मोहिमेअंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन केलं जाणार आहे. त्यानंतर एक राष्ट्रीय डिजिटल भांडार तयार केलं जाईल, ज्यायोगे जगभरातील विद्यार्थी आणि संशोधक भारताच्या ज्ञान परंपरेशी जोडले जाऊ शकतील. मी तुम्हा सर्वांना असं आवाहन करतो की जर तुम्ही अशा कोणत्याही प्रयत्नांशी जोडलेले असाल किंवा जोडू इच्छित असाल तर कृपया MyGov किंवा संस्कृती मंत्रालयाशी संपर्क साधा, कारण ही केवळ हस्तलिखितं नाहीत, तर ती भारताच्या आत्म्याचे अध्याय आहेत, जे आपल्याला आगामी पिढ्यांना शिकवायचे आहेत. 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

जर तुम्हाला विचारलं गेलं की तुमच्या आजूबाजूला किती प्रकारचे पक्षी आहेत, तर तुम्ही काय उत्तर द्याल? कदाचित एवढंच की मला दररोज 5-6 पक्षीच दिसतात किंवा चिमण्या दिसतात - काही ओळखीचे असतात, तर काही अनोळखी. पण आपल्या आजूबाजूला कोणकोणत्या प्रजातीचे पक्षी राहतात हे जाणून घेणं खूप मनोरंजक आहे. अलिकडेच असा एक अद्भुत प्रयत्न करण्यात आला. ठिकाण आहे - आसाममधलं काझिरंगा राष्ट्रीय उद्यान. जरी हा परिसर गेंड्यांसाठी प्रसिद्ध असला तरी यावेळी चर्चेचा विषय ठरला, तो म्हणजे तिथली गवताळ मैदानं आणि त्यात राहणारे पक्षी. इथे प्रथमच गवताळ प्रदेशातल्या पक्ष्यांची गणना करण्यात आली. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की या गणनेमुळे पक्ष्यांच्या 40 हून अधिक प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत. यामध्ये अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इतके पक्षी कसे ओळखले गेले? यात तंत्रज्ञानानं चमत्कार केले. जनगणना पथकानं आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणं बसवली. मग त्या आवाजांचं विश्लेषण संगणकाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलं गेलं. पक्ष्यांना फक्त त्यांच्या आवाजावरून ओळखलं गेलं - तेही त्यांना त्रास न देता. विचार करा! जेव्हा तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता एकत्र येतात तेव्हा निसर्ग समजून घेणं खूप सोपं आणि सखोल होऊन जातं. आपण अशा प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून आपण आपली जैवविविधता ओळखू शकू आणि पुढच्या पिढीला तिच्याशी जोडू शकू.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

कधीकधी सर्वात मोठा उजेड तिथूनच बाहेर पडतो, जिथे अंधारानं सर्वात जास्त मुक्काम केलेला असतो. असंच उदाहरण आहे झारखंडमधल्या गुमला जिल्ह्याचं. एक काळ असा होता जेव्हा हा परिसर माओवादी हिंसाचारासाठी ओळखला जात असे. बासिया गटामधली गावं ओसाड होत चालली होती. लोक भीतीच्या छायेत राहत होते. रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या, जमिनी रिकाम्या पडल्या होत्या आणि तरुणवर्ग पळून चालला होता. पण त्यानंतर, एक अतिशय शांत आणि धीरगंभीर बदल सुरू झाला. ओमप्रकाश साहू नावाच्या एका तरुणानं हिंसाचाराचा मार्ग सोडून दिला. त्यांनी मत्स्यपालन सुरू केलं. मग आपल्यासारख्या अनेक साथीदारांनाही हे करण्यासाठी प्रेरित केलं. त्यांच्या या प्रयत्नांचा परिणामही घडून आला. जे आधी बंदुका कवटाळून असत, तेच आता मासेमारीचं जाळं धरत आहेत.

मित्रांनो,

ओमप्रकाश साहू यांची सुरुवात सोपी नव्हती. विरोध झाला, धमक्या मिळाल्या, पण हिंमत हरली नाही. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाआल्यावर तर त्यांना नवं बळ मिळालं. सरकारकडून प्रशिक्षण मिळालं, तलाव बांधण्यासाठी मदत मिळाली आणि बघता-बघता गुमलामध्ये मत्स्यक्रांतीचे‌ वारे वाहू लागले. आज बासिया गटामधली 150 हून अधिक कुटुंबं मत्स्यपालनात सामील झाली आहेत. असे अनेक लोक आहेत जे एकेकाळी नक्षलवादी संघटनेत होते, आता ते गावात सन्मानानं जगत आहेत आणि इतरांना रोजगार देत आहेत. गुमलाचा हा प्रवास आपल्याला हेच शिकवतो - जर मार्ग योग्य असेल आणि मनात विश्वास असेल तर अत्यंत कठीण परिस्थितीतही विकासाचा दिवा पेटवता येतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

ऑलिंपिकनंतरची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा कोणती, हे माहीत आहे का तुम्हाला? याचे उत्तर आहे - 'जागतिक पोलिस आणि अग्निशमन स्पर्धा'. जगभरातले पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी होणारी क्रीडा स्पर्धा. यावेळी ही स्पर्धा अमेरिकेत झाली आणि भारतानं त्यात इतिहास रचला. भारतानं सुमारे 600 पदकं जिंकली. आपण 71 देशांच्या यादीत अव्वल तीनमध्ये पोहोचलो. देशासाठी दिवसरात्र उभ्या राहणाऱ्या या गणवेशधारी जवानांना कष्टाचं फळ मिळालं. आमचे हे मित्र आता क्रीडा क्षेत्रातही झेंडा फडकवत आहेत. मी सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षक संघाचे अभिनंदन करतो. तसं तर तुम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल की 2029 मध्ये या स्पर्धा भारतात होणार आहेत. जगभरातले खेळाडू आपल्या देशात येतील. आपण त्यांना भारतीय आदरातिथ्याचा अनुभव देऊ आणि त्यांना आपल्या क्रीडा संस्कृतीची ओळख करून देऊ.

मित्रांनो,

गेल्या काही दिवसांत मला अनेक तरुण खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे संदेश मिळाले आहेत. यात 'खेलो भारत नीती 2025' चं खूप कौतुक झालं आहे. या धोरणाचं उद्दिष्ट स्पष्ट आहे - भारताला क्रीडा महासत्ता बनवणं. गावं, गरीब आणि मुली ही या धोरणाची प्राथमिकता आहे. शाळा आणि महाविद्यालयं आता खेळांना दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवतील. खेळांशी निगडित स्टार्टअप्स - मग ते क्रीडा व्यवस्थापनाशी निगडित असोत किंवा उत्पादनाशी, त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. जेव्हा देशातले तरुण स्वतः बनवलेल्या रॅकेट, बॅट आणि बॉलनं खेळतील तेव्हा आत्मनिर्भरतेच्या मोहिमेला किती बळ मिळेल याची कल्पना करा. मित्रांनो, खेळ सांघिक भावना निर्माण करतात. हा तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि एक मजबूत भारत निर्माण करण्याचा मार्ग आहे. म्हणून भरपूर खेळा आणि भरपूर फुलून-उमलून या.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

कधीकधी काही लोकांना काही काम अशक्य वाटतं. वाटतं, हेही होऊ शकेल का? परंतु जेव्हा देश एका विचारानं एकत्र येतो तेव्हा अशक्यही शक्य होतं. 'स्वच्छ भारत मिशन' हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. लवकरच या मोहिमेला 11 वर्षं पूर्ण होतील. मात्र त्याची ताकद आणि गरज आजही तशीच आहे. या 11 वर्षांत 'स्वच्छ भारत मिशन' एक लोकचळवळ बनली आहे. लोक याला आपलं कर्तव्य मानतात आणि यालाच तर खराखुरा लोकसहभाग म्हणतात। मित्रांनो, दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामुळे या भावनेला आणखी पाठिंबा मिळाला आहे. या वर्षी देशातली साडेचार हजारहून अधिक शहरं आणि गावं यात सामील झाली. 15 कोटींहून अधिक लोकांनी यात भाग घेतला. ही काही सामान्य संख्या नाही. हा स्वच्छ भारताचा आवाज आहे.

मित्रांनो,

स्वच्छतेच्या बाबतीत आपली शहरं आणि वस्त्या त्यांच्या गरजा आणि वातावरणानुसार वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत. आणि त्याचा परिणाम फक्त या शहरांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण देश या पद्धतींचा अवलंब करत आहे. उत्तराखंडच्या कीर्तिनगरचे लोक पर्वतांमध्ये कचरा व्यवस्थापनाचं एक नवीन उदाहरण घालून देत आहेत. त्याचप्रमाणे, मंगळुरूमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय कचरा व्यवस्थापनाचं काम केलं जात आहे. अरुणाचलमध्ये रोइंग हे एक लहानसं शहर आहे. एक काळ असा होता जेव्हा इथल्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कचरा व्यवस्थापन हे एक मोठं आव्हान होते. इथल्या लोकांनी त्याची जबाबदारी घेतली. 'ग्रीन रोइंग इनिशिएटिव्ह' सुरू झालं आणि मग पुनर्वापर केलेल्या कचऱ्यापासून एक संपूर्ण उद्यान बनवण्यात आलं. तशाच पद्धतीनं कराड आणि विजयवाडा इथेही पाणी व्यवस्थापनाची अनेक नवीन उदाहरणं निर्माण झाली आहेत. अहमदाबादमधल्या रिव्हर फ्रंटवरच्या साफसफाईनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं‌ आहे.

मित्रांनो,

भोपाळच्या एका संघाचं नाव आहे 'सकारात्मक सोच'. यात 200 महिला आहेत. या केवळ स्वच्छता करत नाहीत तर विचारही बदलतात. सर्वांनी एकत्र येऊन शहरातल्या 17 उद्यानांची सफाई करणं, कापडी पिशव्या वाटणं, असं त्यांचं प्रत्येक पाऊल म्हणजे एक संदेश आहे. अशा प्रयत्नांमुळेच भोपाळही आता स्वच्छ सर्वेक्षणात खूप पुढे आलं आहे. लखनौच्या गोमती नदी संघाचा उल्लेखही महत्त्वाचा आहे. गेल्या 10 वर्षांपासून, दर रविवारी, न थकता, न थांबता, या संघाचे लोक स्वच्छतेच्या कामात गुंतले आहेत. छत्तीसगडमधल्या बिल्हाचं उदाहरणही अद्भुत आहे. इथे महिलांना कचरा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यांनी एकत्र येऊन शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला. गोव्यातल्या पणजी शहराचं उदाहरणदेखील प्रेरणादायी आहे. तिथे कचरा 16 श्रेणींमध्ये विभागला जातो आणि याचं नेतृत्वदेखील महिलाच करत आहेत. पणजीला तर राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. मित्रांनो, स्वच्छता हे फक्त एका दिवसाचं काम नाही. जेव्हा आपण वर्षातल्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी स्वच्छतेला प्राधान्य देऊ, तेव्हाच देश स्वच्छ राहू शकेल.

मित्रांनो,

श्रावणसरी पडत असतानाच देश पुन्हा एकदा सणांच्या उत्साहानं गजबजून जाणार आहे. आज हरियाली तीज, मग नागपंचमी आणि रक्षाबंधन, मग जन्माष्टमीला आपल्या खोडकर कृष्णाच्या जन्माचा उत्सव. हे सर्व सण आपल्या भावनांशी जोडले गेले आहेत, ते आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्याचा आणि संतुलनाचादेखील संदेश देतात. तुम्हा सर्वांना या पवित्र सणांच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय मित्रांनो, तुमचे विचार आणि अनुभव सामायिक करत राहा. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू - आपल्या देशबांधवांकडून मिळालेल्या काही नवीन यशोगाथा आणि प्रेरणांसह. स्वतःची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.

***

शिल्पा पोफळे/आकाशवाणी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2149015)