सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राजस्थानात जयपूर येथे आयोजित ‘सहकार आणि रोजगार उत्सवा’त राजस्थानच्या विविध जिल्ह्यांतील 8 हजारहून अधिक युवकांना नेमणूक पत्रांचे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले


देशातील प्रत्येक गाव, प्रत्येक गरीब व्यक्ती आणि शेतकरी यांच्यापर्यंत सहकार क्षेत्राचा विस्तार करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगळ्या केंद्रीय सहकार मंत्रालयाची निर्मिती केली

आगामी शंभर वर्षे सहकार क्षेत्राची असतील

Posted On: 17 JUL 2025 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2025

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राजस्थानात जयपूर येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-2025 निमित्त आयोजित ‘सहकार आणि रोजगार उत्सवा’ला प्रमुख अतिथी म्हणून संबोधित केले.

‘सहकार आणि रोजगार उत्सवा’त उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की आंतरराष्ट्रीय सहकार  वर्ष-2025 साजरे करण्याची सुरुवात भारताने केली.

देशातील प्रत्येक गाव, प्रत्येक गरीब व्यक्ती आणि शेतकरी यांच्यापर्यंत सहकार क्षेत्राचा लाभ पोहोचवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगळ्या केंद्रीय सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. ते म्हणाले की आज, 98% ग्रामीण भागात सहकार क्षेत्र सक्रीय भूमिका निभावत आहे आणि आगामी शंभर वर्षे सहकार क्षेत्राची असतील. देशातील 20% रास्त भाव दुकाने देखील सहकारी संस्थांतर्फेच चालवली जातात. ते पुढे म्हणाले की 31 कोटी लोक देशातील साडेआठ लाख सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राशी जोडले गेले आहेत.

केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, सहकार मंत्रालयाच्या स्थापनेपासूनच्या चार वर्षांच्या कालावधीत आम्ही 61 उपक्रमांच्या माध्यमातून सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. देशात 2 लाख नव्या प्राथमिक कृषी पत संस्था (पीएसीज) स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट असून त्यापैकी 40 हजार पीएसीज स्थापन करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीतील 11 व्या स्थानावरून झेप घेत जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे स्थान मिळवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील 27 कोटी नागरिकांना दारिद्रयरेषेच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मोदींनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे देशाला सुरक्षित करणे, अशी टिप्पणी केंद्रीय मंत्र्यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पूर्वीच्या सरकारच्या काळात देश दहशतवादी हल्ल्यांनी त्रासलेला होता. मात्र, जेव्हा उरीमध्ये असा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईक केला, जेव्हा पुलवामा येथे हल्ला झाला तेव्हा त्यांनी हवाई हल्ला केला आणि पहलगाम मधील हल्ल्याला चोख उत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपण पाकिस्तानच्या अंतर्भागात घुसून दहशतवाद्यांचे ठावठिकाणे उध्वस्त केले. ते म्हणाले की, यातून, भारतीय नागरिक, भारतीय सेना आणि भारतीय सीमा यांच्याशी कोणीही छेडछाड करता कामा नये, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असा एक मजबूत संदेश जगाला देण्यात आला आहे. असा संदेश देऊन, पंतप्रधान मोदी यांनी समृद्ध, सुरक्षित आणि विकसित भारताचे  स्वप्न साकार करण्यासाठी आगेकूच  सुरु ठेवली  आहे असे शाह म्हणाले.

निलीमा चितळे/संजना ‍चिटणीस/‍प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2145629) Visitor Counter : 3