इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पालकांनी बालकांचे आधार बायोमेट्रिक तपशील अद्ययावत करून घ्यावे, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे आवाहन, 5 ते 7 वयोगटातील मुलांसाठी निःशुल्क सेवा

Posted On: 15 JUL 2025 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2025

 

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) सात वर्षे पूर्ण केलेल्या मात्र अद्याप आधारमध्ये बायोमेट्रिक्स तपशील अपडेट न केलेल्या मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. आधार कार्डासाठी ही एक विद्यमान आवश्यकता असून पालक किंवा बालकांचा सांभाळ करणाऱ्यांनी त्यांच्या मुलांचे तपशील कोणत्याही आधार सेवा केंद्र किंवा नियुक्त आधार केंद्रावर अपडेट करून घ्यावेत.

अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अशा बालकांच्या पालकांच्या आधार कार्डावरील नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एस एम एस पाठवायला सुरुवात केली आहे.

तुमच्या 5 ते 7 वयोगटातील मुलाचे आधार बायोमेट्रिक्स मोफत अद्ययावत करा

पाच वर्षांखालील मुलांच्या आधारसाठी नावनोंदणी करण्याकरता फोटो, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि पत्त्याच्या पुराव्याची कागदपत्रे सादर करावी लागतात. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या आधार नोंदणीसाठी त्याच्या बोटांचे ठसे आणि बुबुळाचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत कारण ते त्या वयात परिपक्व झालेले नसतात.

विद्यमान नियमांनुसार, बालकाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बोटांचे ठसे, बुबुळाचे बायोमेट्रिक्स आणि फोटो त्याच्या किंवा तिच्या आधार मध्ये अपडेट करणे अनिवार्य आहे. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) म्हणतात. जर पाच ते सात या वयात बालकाचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट केले तर ते विनामूल्य आहे. मात्र सात वर्षे वयानंतर त्यासाठी फक्त 100 रुपये विहित शुल्क आहे.

मुलांच्या बायोमेट्रिक डेटा किंवा माहितीची अचूकता आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण करणे एक आवश्यक प्रक्रिया आहे. जर 7 वर्षांच्या वयानंतरही ते पूर्ण झाले नाही, तर विद्यमान नियमांनुसार आधार क्रमांक निष्क्रिय केला जाऊ शकतो.

नावनोंदणीपासून संधीपर्यंत - आधार प्रत्येक पावलाला सक्षम बनवतो

बायोमेट्रिक माहिती अपडेट केल्यामुळे आधार जीवनमान सुलभ करते आणि शाळा प्रवेश, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी, शिष्यवृत्तीचे लाभ, डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) योजना अशा जिथे लागू होत असतील अशा सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारचा अखंड वापर सुनिश्चित करते. पालक/पाल्याचा सांभाळ करणाऱ्यांनी त्यांच्या मुलांचे/पाल्याचे बायोमेट्रिक्स प्राधान्याने आधारमध्ये अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

 

* * *

सोनाली काकडे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2145055) Visitor Counter : 3