पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
आज 51 हजारापेक्षा जास्त तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून लाखो तरुणांना यापूर्वीच कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. आता हे तरुण देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत - पंतप्रधान
भारताकडे लोकसंख्यात्मक आणि लोकशाही म्हणजेच दुसऱ्या शब्दांत सर्वात मोठी युवा लोकसंख्या आणि सर्वात मोठी लोकशाही अशा दोन अद्वितीय शक्ती असल्याची दखल आज जगाने घेतली आहे - पंतप्रधान
आज देशात तयार होत असलेल्या स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि संशोधनाच्या परिसंस्थेमुळे देशातील युवा वर्गाची क्षमता वाढू लागली आहे - पंतप्रधान
नुकत्याच मंजूर झालेल्या नवीन योजना, रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजनांच्या माध्यमातून खासगी क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावरही सरकारचा भर - पंतप्रधान
आज उत्पादन क्षेत्र हे भारताच्या सर्वात मोठ्या सामर्थ्यांपैकी एक असून उत्पादन क्षेत्रात मोठ्या संख्येने नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत - पंतप्रधान
उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 'मिशन मॅन्युफॅक्चरिंग'ची घोषणा करण्यात आली - पंतप
Posted On:
12 JUL 2025 1:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले, यावेळी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील 51,000 हून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रेही वितरित केली. आज या युवा वर्गाची भारत सरकारच्या विविध विभागांमधील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होत असल्याचे त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. विविध विभागांमधील आपल्या सेवेची सुरुवात करणाऱ्या युवा उमेदवारांचे त्यांनी अभिनंदनही केले. या सर्वांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी राष्ट्रसेवा हेच त्यांचे परस्पर समान उद्दिष्ट आहे, आणि ते नागरिक प्रथम या तत्त्वावर आधारलेले आहे ही बाबही त्यांनी नमूद केली.
यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या भक्कम लोकसंख्याशास्त्रीय आणि लोकशाही पायाचे अद्वितीय सामर्थ्य अधोरेखित केले. जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात, देशासह जगाचे भविष्य घडवण्याची अद्वितीय क्षमता असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केले. आपली ही प्रचंड युवाशक्तीच भारताचे सर्वात मोठे भांडवल आहे आणि या भांडवलाला दीर्घकालीन समृद्धीची प्रेरणा बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
“दोन दिवसांपूर्वीच मी पाच देशांचा दौरा आटोपून परतलो. मी ज्या ज्या देशात गेलो होतो, त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय तरुणाईची ताकद ठळकपणे जाणवली. या दौऱ्यात विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या करारांमुळे देशातील आणि परदेशातही भारतीय तरुणांना मोठा फायदा होईल”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या दौऱ्यादरम्यान संरक्षण, औषधनिर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पृथ्वीवरील दुर्लभ खनिजे यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये झालेल्या विविध करारांचे दूरगामी फायदे होतील असे त्यांनी सांगितले. “या उपक्रमांमुळे केवळ भारताची जागतिक आर्थिक स्थिती मजबूत होणार नाही तर उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण होतील”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
रोजगाराच्या विकसित होत असलेल्या परिदृश्याबाबत बोलताना, पंतप्रधानांनी 21 व्या शतकात रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, याकडे लक्ष वेधले. नवोन्मेष, स्टार्टअप्स आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की भारतात अशा संधींची एक वृद्धिंगत होत जाणारी प्रणाली निर्माण होत आहे जी तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी सक्षम बनवते. मोदी यांनी नवीन पिढीबद्दलचा आपला अभिमान आणि आत्मविश्वास व्यक्त केला तसेच आजची तरुणाई महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टी आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याच्या तीव्र इच्छेने पुढे जात आहे , हे पाहून आनंद व्यक्त केला.
भारत सरकार खाजगी क्षेत्रातही नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. अलिकडेच, सरकारने ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना’ नावाची एक नवीन योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकार 15,000 रुपये देईल. "दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, सरकार त्यांच्या पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगारात योगदान देईल. या योजनेसाठी, सरकारने सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेमुळे सुमारे 3.5 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे", असे मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या परिवर्तनशील सामर्थ्यावर भर दिला. हे सामर्थ्य केवळ राष्ट्रीय विकासाला चालना देत नाही, तर रोजगार निर्मिती वाढवत आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासाला गती आहे, असेही सांगितले. पंतप्रधानांनी नमूद केले की अलिकडच्या काळात मेक इन इंडिया उपक्रमाला लक्षणीय बळकटी मिळाली आहे. केवळ उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेद्वारे, देशभरात 11 लाखाहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाला आहे. "आज, भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे मूल्य सुमारे 11 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या 11 वर्षात पाच पटीने वाढले आहे. पूर्वी, देशात मोबाईल फोन बनवणारे फक्त 2 ते 4 युनिट होते. पण आज, भारतात मोबाईल फोन उत्पादनाशी संबंधित सुमारे 300 युनिट्स आहेत, जे लाखो तरुणांना रोजगार देतात", असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताच्या जागतिक आघाडीवर झालेल्या प्रगतीच्या भरभराटीला अधोरेखित केले, हे उत्पादन 1.25 लाख कोटींहून अधिक झाले आहे. त्यांनी भारताचे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे इंजिन (लोकोमोटिव्ह ) निर्मिती करणारा देश म्हणून झालेल्या उदयाचे कौतुक केले, तसेच लोकोमोटिव्ह, रेल्वे डबे आणि मेट्रो डबे यांच्या निर्यातीतील देशाच्या कामगिरीचाही विशेष उल्लेख केला. त्यांनी पुढे सांगितले की, केवळ पाच वर्षांत ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये 40 अब्ज डॉलर इतकी थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित झाली असून, त्यामुळे नवीन उद्योगधंद्यांची उभारणी, नवीन रोजगार संधी आणि विक्रमी वाहन विक्री झाली आहे.
पंतप्रधानांनी भारतातील कल्याणकारी योजनांचा दूरगामी परिणाम अधोरेखित केला. त्यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ)अहवालाचा उल्लेख केला, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की गेल्या दशकात 90 कोटींपेक्षा अधिक भारतीय नागरिकांना शासकीय कल्याण योजनांचा लाभ मिळाला आहे. या योजना केवळ लाभपुरवठ्यावर मर्यादित नाहीत, तर विशेषतः ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावतात.
पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजना यासारख्या महत्त्वाच्या योजनांबद्दल सविस्तरपणे भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “या योजनेअंतर्गत 4 कोटी स्थायी घरे बांधण्यात आली असून आणखी 3 कोटी घरे बांधकामाधीन आहेत. त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या 12 कोटी शौचालयांमुळे प्लंबर आणि बांधकाम कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला.
त्याचप्रमाणे, उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या 10 कोटी एलपीजी कनेक्शन्समुळे बाटलीकरण यंत्रणा आणि वितरण जाळ्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. यामुळे हजारो वितरण केंद्रांची निर्मिती झाली असून लाखो नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
"पंतप्रधान सौर घर – मोफत वीज योजना" या अंतर्गत घरांवर सौर पॅनेल बसवण्यासाठी प्रति घर 75,000 रुपयांपेक्षा अधिक अनुदान दिले जात आहे, असे सांगून मोदी यांनी हे स्पष्ट केले की,या योजनेमुळे घरगुती वीजबिलात बचत होत आहे आणि तंत्रज्ञ, अभियंते आणि सौर पॅनेल उत्पादकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
‘नमो ड्रोन दीदी’ या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात आले आहे.
पुढे मोदी म्हणाले की, देश 3 कोटी लखपती दीदी घडवण्याच्या मोहीमेत सुद्धा प्रगती करत आहे, आणि 1.5 कोटी महिलांनी हे उद्दिष्ट आधीच गाठले आहे.बँक सखी, विमा सखी, कृषी सखी आणि पशु सखी या विविध योजनांद्वारे महिलांना सततचा आणि शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे.
त्यांनी यावेळी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उल्लेख केला, जी योजना रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांना औपचारिक आर्थिक मदत पुरवते आणि लाखो नागरिकांना मुख्य प्रवाहातील आर्थिक व्यवहारात सामावून घेते. त्याचबरोबर, पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही परंपरागत कारागीर, हस्तकला कामगार आणि सेवा पुरवठादारांना प्रशिक्षण, साधने आणि कर्जपुरवठा यांचा लाभ देत आहे, आणि त्यांच्या कौशल्याला नवसंजीवनी देत आहे.
गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. रोजगाराच्या संधीच नसत्या तर असे परिवर्तन शक्य झाले नसते, म्हणूनच आज जागतिक बँकेसारख्या प्रमुख जागतिक संस्था भारताचे कौतुक करत आहेत, असे मोदी यांनी अधोरेखित केले. भारताची गणना आता जगातील सर्वाधिक समानता असलेल्या राष्ट्रांमध्ये केली जात आहे, असे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सध्याच्या टप्प्याचे वर्णन विकासाचा महायज्ञ, गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मितीसाठी समर्पित राष्ट्रीय अभियान असे केले, नव्याने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि देशातील युवा पिढीला या राष्ट्रनिर्माणाच्या अभियानात ऊर्जा व समर्पणाने सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. आपल्या भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी नागरिक देवो भव: या मूल्याची आठवण करून दिली आणि नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सार्वजनिक सेवेतील उज्ज्वल आणि अर्थपूर्ण भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पार्श्वभूमी.;
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेनुसार, 16 वा रोजगार मेळावा देशभरातील 47 ठिकाणी एकाचवेळी आयोजित केला जाईल. रोजगार मेळावा देशातील तरुणांना सक्षम बनवण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आजपर्यंत देशभरात विविध मेळाव्यद्वारे 10 लाखांहून अधिक नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली आहेत. या रोजगार मेळाव्याद्वारे नवनियुक्त कर्मचारी रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, पोस्ट विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, कामगार व रोजगार मंत्रालय आणि अन्य मंत्रालये व विभागांमध्ये रुजू होतील.
***
S.Patil/T.Pawar/S.Mukhedkar/G.Deoda/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2144310)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam