पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला केले संबोधित

Posted On: 07 JUL 2025 11:38PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला संबोधित केले. या सत्राला ब्रिक्स समूहातील सदस्य देश, भागीदार राष्ट्र आणि आमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विषयांवर अधिवेशन आयोजित केल्याबद्दल त्यांनी ब्राझीलचे आभार मानले. भारतासाठी हवामान बदल हा केवळ ऊर्जेशी निगडित प्रश्न नसून जीवन आणि निसर्ग यांच्यातील समतोलावर परिणाम करणारा प्रश्न आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.  हवामान न्याय या मुद्द्याकडे भारत नैतिक जबाबदारी या दृष्टिकोनातून बघत असून ती पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. हवामानाशी सुसंगत कृतीसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असून त्यादिशेने नागरिक आणि आपल्या वसुंधरेच्या समृद्धी आणि विकासाकरता भारत, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैवइंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, मिशन लाईफ, एक पेड माँ के नाम इत्यादी उपक्रम राबवत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 

भारत विकासाच्या शाश्वत मार्गावर चालत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असूनही भारताने पॅरिस कराराची पूर्तता मुदतीच्या खूप आधीच केली आहे, असे त्यांनी सांगितले.  

पंतप्रधानांनी हवामान बदलासंदर्भात उपाययोजना राबविण्यासाठी विकसनशील देशांना तंत्रज्ञान हस्तांतरण आणि परवडणाऱ्या वित्तपुरवठ्याची गरज असल्याचे सांगितले. या अनुषंगाने, समूहाने स्वीकारलेले ‘हवामान वित्त विषयक आराखडा घोषणापत्र’ हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताच्या हरित विकासावरील बांधिलकीचा उल्लेख करताना, पंतप्रधान म्हणाले की, भारताने "एक पृथ्वी, एक आरोग्य" या मंत्राचा अंगीकार केला असून, कोविड महामारीच्या काळातही भारताने विविध देशांना सहाय्य उपलब्ध करून दिले. भारताने यशस्वीरित्या डिजिटल आरोग्य योजना राबविल्या असून, त्या जागतिक दक्षिण देशांसोबत सामायिक करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात, त्यांनी - सामाजिकदृष्ट्या निर्धारित रोगांचे निर्मूलन करण्यासाठी ब्रिक्स भागीदारी - या घोषणेचे स्वागत केले.

पुढील वर्षी भारत ब्रिक्स अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार असून, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आपल्या अध्यक्षतेदरम्यान ग्लोबल साऊथ ला प्राधान्य देतानाच  “मानवता प्रथम"  दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करेल. त्यांनी पुढे सांगितले की, भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सला नव्या स्वरूपात सादर करण्यात येईल आणि ब्रिक्स या संज्ञेचा अर्थ  ‘‘सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी लवचिकता व नवोन्मेष निर्माण’, अशी केली जाईल. पंतप्रधानांनी ब्रिक्स शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अध्यक्ष लुला यांचे अभिनंदन केले आणि आदरातिथ्याबद्दल आभार व्यक्त केले.

***

SonalT/BhaktiS/Raj/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2143053)