आयुष मंत्रालय
11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2025, ऐतिहासिक सहभाग आणि व्याप्तीसह जगाने केला साजरा
191 देशांमध्ये 2000 जागतिक कार्यक्रमांचे आयोजन
विशाखापट्टणम येथे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् झाले स्थापित
Posted On:
23 JUN 2025 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2025
21 जून 2025 रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात आलेला 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय 2025) अभूतपूर्व यशस्वी ठरला, या आयोजनात जगभरातून ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजऱ्या झालेल्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाने योगाचे वाढते जागतिक महत्त्व तसेच समग्र आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्यात भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे.
भारतभरात, 21 जूनच्या कार्यक्रमासाठी योग पोर्टलवर 20 जून पर्यंत 13.04 लाख योग संगम कार्यक्रमांची नोंदणी करण्यात आली होती. या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने व्यापकरित्या तळापर्यंतचा सहभाग दिसून आला. जागतिक स्तरावर, 191 देशांमध्ये सुमारे 1,300 ठिकाणी योग प्रात्यक्षिके झाली. यानिमित्ताने सुमारे 2,000 जागतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या व्यापक आंतरराष्ट्रीय सहभागामुळे जागतिक आरोग्य, सुसंवाद आणि कल्याणासाठी योगाचे सार्वत्रिक महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
भारताने विशाखापट्टणममध्ये दोन महत्त्वपूर्ण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् स्थापित केले. या विक्रमातून योगाची खोलवर पोहोच आणि व्यापक स्वीकृती अधोरेखित झाली.
1.एकाच ठिकाणी योग सत्रासाठी सर्वात मोठी उपस्थिती : 21 जून 2025 रोजी 302000 (3.02 लाख) सहभागींनी भाग घेतला.
2. सर्वात मोठे सामूहिक सूर्यनमस्कार सादरीकरण : 20 जून 2025 रोजी 22,122 आदिवासी विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला.
देशातील काही अत्यंत आव्हानात्मक आणि अवघड भौगोलिक भागांमध्येही योग सादरीकरण झाले, ज्यामध्ये शारीरिक क्षमता आणि देशसेवा या मूल्यांवर भर देण्यात आला.
- सियाचीन हिमनदी - जगातील सर्वात उंच रणभूमीवर भारतीय सैन्य दलाने योग सराव केला.
- गलवान खोरे - 15,000 फूट उंचीवर शांततेचा आणि आंतरिक शक्तीचा संदेश देणारे योग सत्र झाले.
- रोहतांग पास, सेला बोगदा, पॅंगॉंग तलाव - सीमा रस्ते संघटना (बीआरओ) आणि भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) च्या जवानांनी अत्यंत तीव्र हवामानात योगासने केली.
- चिनाब रेल्वे पूल (जम्मू आणि काश्मीर) - जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर अभियांत्रिकी आणि अध्यात्मिकतेचा संगम घडवत योगासने करण्यात आली.
- कच्छचे रण आणि खाडीचा भाग - भारताच्या पश्चिम टोकावर भारतीय लष्कराच्या कोणार्क कोअरने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
- इंदिरा पॉईंट अंदमान आणि निकोबार बेट - भारताच्या दक्षिण टोकावर अंदमान आणि निकोबार कमांडने योग सत्राचे आयोजन केले होते.
- मुंबई अपतटीय ऑइल रिग : या आयोजनात अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांनी योग सराव केला.
- नवीन पंबन पूल, तामिळनाडू - या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी कर्मचारी स्काऊट आणि गाईड्स तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी विशेष योग सत्रांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकला - यात वाराणसीतील नमो घाट, जैसलमेरमधील किशनगड किल्ला, जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम आणि सोनमर्ग या स्थळांचा समावेश होता.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण च्या सहकार्याने वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या 12 भौगोलिक वारसा स्थळांवर योग सत्रांचे आयोजन करण्यात आले.
या प्रतिष्ठित आयोजनांनी एकत्रितपणे भारताच्या प्राचीन योग परंपरेचा आणि अद्वितीय भौगोलिक वारशामधील गहन संबंध अधोरेखित केला. या कार्यक्रमांनी 'सर्वांसाठी योग, सर्वत्र योग' या भावनेला मूर्त रूप दिले.
आयुष मंत्रालयाने विविध मंत्रालये आणि विभाग, राज्य सरकारे, आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय सशस्त्र दल, योग संस्था आणि संघटना, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि जगभरातील लाखो योगप्रेमींचे आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ला एकता, कल्याण आणि शांतीचा ऐतिहासिक उत्सव बनवल्याबद्दल मनापासून आभार मानले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139048)
Visitor Counter : 2