पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 21 JUN 2025 8:49AM by PIB Mumbai

 

आंध्र प्रदेश चे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री आणि माझे परममित्र चंद्राबाबू नायडू गारू, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी के. राममोहन नायडू जी, प्रतापराव जाधव जी, चंद्रशेखरजी भूपती राजू श्रीनिवास वर्मा जी, राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण गारू, अन्य मान्यवर तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!

देश आणि जगभरातील सर्व लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 21 जूनला, अकराव्या वेळी संपूर्ण जग एकत्र येऊन योग करत आहे. योगाचा थेट अर्थ आहे एकमेकांशी जोडले जाणे. आणि, योग कशाप्रकारे संपूर्ण जगाला एकमेकांशी जोडत आहे, हे पाहणे खूपच सुखद आहे. गेल्या दशकभरात योगाने केलेला प्रवास जेव्हा मी पाहतो तेव्हा अनेक गोष्टींचे स्मरण होते. ज्या दिवशी संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या रूपात मान्यता दिली होती तो दिवस पाठवतो. तेव्हा अत्यल्पकाळात जगभरातलल्या 175 देशांनी आमच्या या प्रस्तावाला अनुमोदन दिले होते. आजच्या काळात जगभरात अशी एकता असे पाठबळ मिळणे सामान्य बाब नाही. हे केवळ एका प्रस्तावाला दिलेले समर्थन नव्हे तर हे मानवतेच्या कल्याणासाठी जगभराने केलेले सामूहिक प्रयत्न आहेत. आज 11 वर्षानंतर योग अभ्यास जगभरातील करोडो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्याचे आपण पाहत आहोत. जेव्हा आपले दिव्यांग मित्र ब्रेल लिपी मध्ये लिहिलेल्या योगशास्त्राचा अभ्यास करतात वैज्ञानिक अंतराळात योग साधना करतात गावागावात तरुण मित्र योग ओलंपियाडमध्ये सहभागी होतात तेव्हा मला खूप अभिमानवाटतो. येथे समोर पहा, नौदलाच्या सर्व जहाजांमध्ये सध्या खूपच शानदार योगा कार्यक्रम सुरू आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊसच्या पायऱ्या असो किंवा माऊंट एव्हरेस्टचे टोक असो किंवा समुद्राचा विस्तार असो, प्रत्येक ठिकाणाहून एकच संदेश येत आहे, योग सर्वांचा आहे आणि सर्वांसाठी आहे. योग सर्वांसाठी आहे, सीमांच्या पलीकडे जाऊन, पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन, वय आणि क्षमतेच्या पलीकडे जाऊन योग सर्वांचा आहे.

मित्रांनो,

आज आपण सर्वजण विशाखापट्टणम येथे आहोत याचा मला आनंद वाटतो. हे शहर निसर्ग आणि प्रगती दोन्हीचे संगम स्थान आहे. येथील लोकांनी अत्यंत उत्कृष्टरित्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मी चंद्रबाबू नायडू गारू आणि पवन कल्याण गारू यांना शुभेच्छा देतो. तुम्हा दोघांच्या नेतृत्वात आंध्र प्रदेशाने योगांध्राअभियान नावाचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मी विशेष रूपाने नरा लोकेश गारू यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करू इच्छितो. योगाचा सामाजिक उत्सव कसा असावा, समाजातील प्रत्येक वर्ग या कार्यक्रमाची कसा जोडला जाईल, हे त्यांनी गेल्या एक-दीड महिन्यात या योगांध्रा अभियानादरम्यान दाखवून दिले आहे. आणि यासाठीच लोकेश भाई अनेकानेक शुभेच्छांचे मानकरी ठरतात. आणि मी देशवासीयांना हे सांगू इच्छितो की अशा संधींना तुम्ही विविध सामाजिक स्तरावर कसे खोलवर रुजवू शकता हे पाहण्यासाठी लोकेश भाईंनी केलेल्या कामाला उदाहरण म्हणून सदैव समोर ठेवले पाहिजे.

मित्रांनो,

योगांध्रा अभियानात दोन कोटीहून अधिक लोक सहभागी झाले असल्याची माहिती मला मिळाली आहे. लोकसहभागाची हीच ती प्रेरणा आहे जी विकसित भारताचा मुख्य आधार आहे. जेव्हा सामान्य नागरिक स्वतः पुढाकार घेऊन एखाद्या मोहिमेची धुरा सांभाळतात किंवा एखादे उद्दिष्ट निश्चित करतात तेव्हा ते उद्दिष्ट साध्य करण्यापासून त्यांना कोणीही परावृत्त करू शकत नाही.

जनता जनार्दनाची सदिच्छा आणि आपले प्रयत्न या कार्यक्रमात सर्वत्र दिसून येत आहेत.

मित्रांनो,

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना - 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' आहे. ही संकल्पना एक गहन सत्य प्रतिबिंबित करते. पृथ्वीवरील प्रत्येक घटकाचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे. मानवाच्या आरोग्याचा संबंध त्या मातीच्या आरोग्याशी आहे जी आपल्यासाठी अन्न पिकवते, त्या नद्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे ज्या आपल्याला पाणी देतात, त्या प्राण्यांच्या आरोग्याशी आहे जे आपल्यासोबत परिसंस्थेत राहतात, आणि त्या वनस्पतींच्या आरोग्याशी आहे ज्या आपले पोषण करतात. योग आपल्याला या परस्परसंबंधांची जाणीव करून देतो. योग जगाशी एकात्मतेच्या दिशेने आपला प्रवास घडवतो. योग आपल्याला शिकवतो की आपण वेगळे, एकाकी जीव नाही, तर निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहोत. प्रारंभी आपण स्वतःच्या आरोग्याची आणि कल्याणाची काळजी घेणे शिकतो. हळूहळू आपली ही काळजी आणि आपुलकी पर्यावरण, समाज आणि संपूर्ण पृथ्वीपर्यंत विस्तारते. योग ही एक श्रेष्ठ वैयक्तिक साधना आहे. परंतु त्याच वेळी, ही अशी प्रणाली आहे जी आपल्याला मीपासून आपणपर्यंत घेऊन जाते.

मित्रांनो,

मी टू वुई’  म्हणजेच मी- माझ्यापासून सुरू झालेला प्रवास हा आपण- आम्‍ही इथेपर्यंत येवून थांबतोही भावना भारताच्या आत्म्याचे सारतत्व  आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिगत  हित तसेच स्‍वार्थापेक्षा वर उठून समाजाबद्दल विचार करते, त्याचवेळी  संपूर्ण मानवतेचे कल्याण होते.

भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते, सर्वे भवन्तु सुखिनः, म्हणजेच सर्वांचे कल्याण व्हावेत -सर्वजण सुखी व्हावेतहे माझे कर्तव्य आहे. मीते आम्हीहा प्रवास सेवा, समर्पण आणि सहअस्तित्वाचा आधार आहे. ही विचारसरणी सामाजिक सौहार्द वाढवते.

मित्रांनो,

दुर्दैवाने, आज संपूर्ण जग एका प्रकारच्या तणावातून जात आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अशांतता आणि अस्थिरता वाढत आहे. अशा परिस्थितीत, योग आपल्याला शांतीची दिशा देतो. योग म्हणजे  एक विराम बटण आहे. मानवतेला संपूर्ण लाभ मिळावेत यासाठी, सर्व प्रकारचे संतुलन साधण्यासाठी एक श्वास घेण्याची आवश्यकता आहे.

आजच्या या महत्त्वाच्या प्रसंगी मी जागतिक समुदायाला एक विनंती करू इच्छितो. हा योग दिन मानवतेसाठी योग 2.0  चा प्रारंभ  ठरावा. जिथे मनाची  आंतरिक शांती हेच जागतिक धोरण बनते. जिथे योग केवळ एक वैयक्तिक सराव नसून जागतिक भागीदारीचे माध्यम बनते. जिथे प्रत्येक देश, प्रत्येक समाज यांनी योगाचा समावेश  आपल्या  जीवनशैलीमध्‍ये करून घ्यावा  आणि सार्वजनिक धोरणाचा तो एक भाग बनवला जावा. जिथे आपण एकत्रितपणे शांततापूर्ण, संतुलित आणि शाश्वत जगाला चालना देतो. जिथे योग जगाला संघर्षातून सहकार्याकडे आणि तणावातून उपायांकडे घेऊन जातो.

मित्रांनो,

जगात योग याचा प्रसार करण्यासाठी, भारत आधुनिक संशोधनाद्वारे योगाचे विज्ञान अधिक बळकट करत आहे. देशातील प्रमुख वैद्यकीय संस्था योग या विषयावर संशोधन करत आहेत. आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेत योगच्या वैज्ञानिक स्वरूपाला स्थान मिळावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही देशातील वैद्यकीय आणि संशोधन संस्थांमध्ये योगाच्या क्षेत्रात पुराव्यावर आधारित थेरपी म्हणजे उपचार पध्‍दतीलाही  प्रोत्साहन देत आहोत. दिल्लीतील एम्सने देखील या दिशेने उत्तम काम केले आहे. एम्सच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, हृदयरोग आणि न्यूरोलॉजी विकारांवर उपचार करण्यात आणि महिलांच्या आरोग्य आणि मानसिक आरोग्यात योगची महत्त्वाची भूमिका आहे.

मित्रांनो,

राष्ट्रीय आयुष मिशनद्वारे योग आणि कल्याण या मंत्राचा प्रचार देखील केला जात आहे. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानानेही मोठी भूमिका बजावली आहे. योग पोर्टल आणि योगआंध्र पोर्टलद्वारे देशभरात 10  लाखांहून अधिक कार्यक्रमांची नोंदणी करण्यात आली आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यावरून योगाची व्याप्ती किती वाढत आहे, हे देखील दिसून येते.

मित्रांनो,

आपल्या सर्वांना माहिती आहे की, आज भारतात औषधोपचारासासाठी येण्‍याचे प्रामणही वाढले आहे. हा कल उपचार मंत्राप्रमाणे जगात खूप लोकप्रिय होत आहे. भारत जगासाठी  विविध आजारांवर उपचारांसाठी सर्वोत्तम ठिकाण बनत आहे. यामध्ये योगाचीही मोठी भूमिका आहे. मला आनंद आहेकी योगासाठी एक सामान्य योग कार्य शिष्टाचार पध्‍दती तयार करण्यात आली आहे. योग प्रमाणन मंडळाचे साडेसहा लाखांहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक, सुमारे 130 मान्यताप्राप्त संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 10 दिवसांचे योग मॉड्यूल घेणेअसे अनेक प्रयत्न एक समग्र परिसंस्था तयार करत आहेत. देशभरातील आपल्या आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये प्रशिक्षित योग शिक्षक तैनात केले जात आहेत. भारतातील या कल्याण परिसंस्थेचा जगभरातील लोकांना फायदा व्हावा यासाठी विशेष ई-आयुष व्हिसा दिले जात आहेत.

मित्रांनो,

आज योग दिवसाच्‍या कार्यक्रमात  मी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लठ्ठपणा या विषयाकडे  वेधू इच्छितो.  लठ्ठपणा असलेल्या लोकांची वाढती संख्‍या  हे संपूर्ण जगासाठी एक मोठे आव्हान आहे. याविषयी  मन की बात कार्यक्रमात याबद्दल सविस्तर चर्चा केली होती. यासाठी मी आपल्या भोजनामध्‍ये सध्‍या वापरतो त्यापेक्षा  10  टक्के तेल कमी करण्याचे आवाहन  देखील सुरू केले होते. मी पुन्हा एकदा देशवासीयांना आणि जगभरातील लोकांना या लठ्ठपणाचे आव्हान संपुष्‍टात आणण्‍यासाठी  सहभागी  होण्याचे आवाहन करतो. आपण आपल्या रोजच्या भोजनामध्‍ये  तेलाचा वापर कमीत कमी १० टक्के कसा कमी करू शकतो. याबद्दल जागरूकता पसरवली पाहिजे. तेलाचा वापर कमी करणे आणि आरोग्याला जो आहार पोषक नाही  असा आहार पूर्णपणे  टाळणे आणि नियमित योग करण्याचे आवाहन करतो.  या गोष्‍टी चांगल्या तंदुरुस्तीसाठी जणू रामबाण ठरणारी औषधी वनस्पति प्रमाणे अगदी संजीवनी बुटी  आहेत.

मित्रांनो,

चला आपण सर्वजण मिळून योग ही  एक लोक चळवळ बनवूया. जगाला शांति आणि आरोग्य तसेच  सौहार्दाकडे घेऊन जाणारी ही  चळवळ असावी.  जिथे प्रत्येक व्यक्ती योगासने करून  दिवसाचा  प्रारंभ  करेल  आणि जीवनात संतुलन साधु शकेल.  जिथे प्रत्येक समाज योगाशी जोडलेला असेल  आणि त्यामुळे तणावमुक्त असेल. जिथे योग मानवतेला एकत्र बांधण्याचे माध्यम बनेल.  आणि जिथे एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग, हा एक जागतिक संकल्प केला जाईल. पुन्हा एकदा आंध्रच्या नेतृत्वाचे आंध्रच्या जनतेचे आणि जगभरात पसरलेल्या योगसाधकांचे आणि योगप्रेमींचे अभिनंदन करताना मी तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद!

***

M.Jaybhaye/S.Mukhedkar/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2138652)