पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

Posted On: 19 JUN 2025 5:32PM by PIB Mumbai

महामहिम पंतप्रधान,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यमांमधील मित्रांनो,

नमस्कार!

दोबार दान!

जाग्रेब या ऐतिहासिक आणि सुंदर शहरात  माझे ज्या आपुलकीने ,  उत्साहाने आणि प्रेमाने स्वागत झाले त्याबद्दल मी पंतप्रधान आणि क्रोएशिया सरकारचे मनापासून आभार मानतो.

कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा क्रोएशियाचा हा पहिलाच दौरा आहे. ही संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.

मित्रांनो,

भारत आणि क्रोएशिया लोकशाही, कायद्याचे राज्य, बहुलवाद आणि समानता यासारख्या सामायिक मूल्यांनी एकत्र जोडले आहेत. गेल्या वर्षी, भारतीय लोकांनी मला आणि क्रोएशियाच्या जनतेने  पंतप्रधान आंद्रेज प्लेन्कोविच यांना सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली  हा एक सुखद योगायोग आहे. या नव्या  जनादेशासह, आम्ही या कार्यकाळात आमच्या द्विपक्षीय संबंधांची गती तिपटीने वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

संरक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन सहकार्यासाठी 'संरक्षण सहकार्य योजना' तयार केली जाईल, ज्यात प्रशिक्षण, लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उद्योगातील सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.  आमच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक असलेली अनेक क्षेत्रे चिन्हांकित केली आहेत आणि त्यांचा सक्रियपणे पाठपुरावा केला जाईल.

द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही औषधनिर्माण, कृषी, माहिती तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा आणि सेमीकंडक्टर अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देऊ.

आम्ही जहाजबांधणी आणि सायबर-सुरक्षेत सहकार्य अधिक मजबूत करू. भारताच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदर आधुनिकीकरण, किनारी-क्षेत्र विकास आणि मल्टिमोडल  कनेक्टिव्हिटी उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी क्रोएशियन कंपन्यांना महत्त्वपूर्ण संधी आहेत. आम्ही आमच्या शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रांमध्ये  संयुक्त संशोधन आणि सहकार्यावर देखील भर दिला आहे. याव्यतिरिक्त, भारत आपले  अंतराळ कौशल्य आणि अनुभव क्रोएशियासोबत सामायिक करण्यास वचनबद्ध आहे.

मित्रांनो,

आपले शतकानुशतके चालत आलेले जुने सांस्कृतिक संबंध  परस्पर स्नेह आणि सद्भावनेचा आधार आहेत.  इव्हान फिलिप वेझदिन यांनी 18 व्या शतकात  युरोपमध्ये प्रथमच संस्कृत व्याकरण प्रकाशित केले.  गेल्या 50 वर्षांपासून, जाग्रेब विद्यापीठात इंडोलॉजी विभाग सक्रियपणे कार्यरत आहे.

आज, आम्ही आमचे सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंध अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. जाग्रेब विद्यापीठातील हिंदी अध्यासनासाठी सामंजस्य कराराची मुदत 2030 पर्यंत वाढविण्यात आली आहे आणि पुढील पाच वर्षांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे.

लोकांचे आवागमन सुलभ करण्यासाठी, लवकरच गतिशीलता कराराला अंतिम स्वरूप दिले जाईल. क्रोएशियन कंपन्या भारतातील कुशल आयटी मनुष्यबळाचा लाभ उठवू शकतील.  दोन्ही देशांदरम्यान पर्यटन वाढवण्याच्या उपायांवर देखील  आम्ही चर्चा केली.

येथे योगाची लोकप्रियता मी स्पष्टपणे अनुभवली आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि मला विश्वास आहे की, नेहमीप्रमाणेच, क्रोएशियाचे लोक तो  मोठ्या उत्साहात  साजरा करतील.

मित्रांनो,

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे याबाबत आम्ही सहमत आहोत आणि लोकशाही शक्तींवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा तो विरोध करतो. 22 एप्रिल रोजी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकजुटता दाखवल्याबद्दल आम्ही पंतप्रधान आणि क्रोएशिया सरकारचे मनापासून आभारी आहोत. अशा कठीण काळात, आमच्या मित्रांचा पाठिंबा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे.

आम्ही दोघेही सहमत आहोत की आजच्या जागतिक वातावरणात, भारत आणि युरोपमधील भागीदारी अतिशय  महत्त्वाची आहे. युरोपियन युनियनसोबतची आमची धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात क्रोएशियाचा पाठिंबा आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

युरोप असो वा आशिया, समस्यांवर उपाय युद्धभूमीवर मिळत नाहीत यावर आमचा दोघांचाही ठाम विश्वास आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरी  हाच एकमेव व्यवहार्य मार्ग आहे. प्रत्येक राष्ट्राच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे आवश्यक आहे.

मित्रांनो,

आज इथे ' ‘बाँसकि द्वोरी’  येथे असणे हा माझ्यासाठी एक खास क्षण आहे. याच ठिकाणी साकसिंस्की यांनी क्रोएशियन भाषेत त्यांचे ऐतिहासिक भाषण दिले होते आणि आज  हिंदीमध्ये माझे विचार व्यक्त करताना मला अभिमान आणि समाधान वाटत आहे. ते  बरोबर म्हणाले होते , 'भाषा हा  एक सेतू आहे' आणि आज, आम्ही तो मजबूत करत आहोत.

पुन्हा एकदा, क्रोएशियाच्या  भेटीदरम्यान आमच्या  आदरातिथ्याबद्दल मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो. आणि पंतप्रधान महोदय ,  भारतात तुमचे लवकरच स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.

तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2137947)