नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि विमान कंपन्यांची कामगिरी यावर आधारित आढावा बैठक घेतली


एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट; परिचालनात्मक सातत्य राखणे, पारदर्शक संवादाला मदत करणे तसेच प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा या मुद्द्यांवर चर्चा केंद्रित

स्पाईस जेट, इंडिगो आणि अकासा या विमान कंपन्यांशी देखील झाल्या बैठका; विमान ताफ्याची कामगिरी, सुरक्षाविषयक निरीक्षण आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांचा केंद्रीय मंत्र्यांनी घेतला आढावा

एअर इंडियाच्या विमान अपघाताची विमान अपघात तपासणी ब्युरोतर्फे होत असलेली चौकशी स्थानिक अधिकारी आणि संस्थांकडून आवश्यक असलेल्या सहयोगाने पुढे जात आहे

Posted On: 19 JUN 2025 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जून 2025


अहमदाबाद जवळ एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि विमान कंपन्यांची कामगिरी यांचा व्यापक आढावा घेतला.

 

अपघात-पश्चात तपासण्या, हवामानातील बदल, भूराजकीय तणावामुळे बंद झालेली काही हवाई क्षेत्रे इत्यादींसारख्या बहुविध कारणांमुळे विमानांच्या वेळापत्रकात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भूस्तरावरील सज्जता आणि प्रवाशांच्या मदत यंत्रणा यांचा आढावा घेण्यासाठी  केंद्रीय नागरी हवाई वाहतूक  मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी आज देशभरातील सर्व विमानतळांच्या संचालकांची तपशीलवार दूरदृश्य प्रणालीद्वारे  बैठक घेतली. यावेळी खालील महत्त्वाचे निर्देश देण्यात आले:

  • प्रवाशांच्या समस्या तातडीने आणि तात्काळ  सोडवल्या जाण्याची खात्री करून घेण्यासाठी विमान कंपन्यांशी सखोल संपर्कावर भर देण्यात आला.
  • टर्मिनल्सच्या ठिकाणी, विशेषतः विमानांना होणारा विलंब अथवा गर्दीच्या वेळी अन्न, पिण्याचे पाणी तसेच पुरेशा आसनव्यवस्थेची उपलब्धता सुनिश्चित केली जावी.
  • प्रवाशांच्या तक्रारींचे सक्रियतेने व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पुरेसे कर्मचारी तैनात केले जावेत.
  • गेट क्रमांकात बदल आणि लॉजिस्टिक्स पाठबळ यांसह परिचालनातील अडचणींना तोंड देणाऱ्या विमान कंपन्यांना शक्य असलेली सर्व मदत पुरवण्याबाबत विमानतळ संचालकांना निर्देश  
  • विमानतळावरील वातावरण निर्धोक तसेच सुरक्षित राखण्यासाठी विमानतळ संचालकांना पक्षी तसेच भटके प्राणी यांच्या प्रतिबंधासह वन्यजीव संकट व्यवस्थापन दृढ करण्याचे निर्देश देण्यात आले.

केंद्रीय मंत्र्यांनी सुरक्षितता तसेच विमानांच्या परिचालनाचा घेतला आढावा

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसमवेत उच्च स्तरीय बैठक  घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत खालील तीन महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले:

  • परिचालनात सातत्य राखणे
  • जनतेशी पारदर्शक आणि जबाबदार संवादाला मदत करणे
  • प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा

मध्यपूर्वेत निर्माण झालेली परिस्थिती, वाढीव सुरक्षा तपासण्या आणि युरोपमध्ये रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध या कारणांमुळे एअर इंडियाला कमी संख्येत विमाने उपलब्ध होत आहेत. परिणामी, ही कंपनी तात्पुरत्या स्वरुपात परिचालन कमी करेल, उड्डाणांची पुनर्रचना करेल तसेच माध्यमांद्वारे बदलांची घोषणा करेल असे सांगण्यात आले आहे. प्रभावित प्रवाशांना नव्याने तिकीट दिले जाईल अथवा तिकिटाच्या संपूर्ण रकमेचा परतावा दिला जाईल. 

विमानतळांच्या ठिकाणी कंपनीचा जमिनीवरील समन्वय अधिक सशक्त करावा, विमाने रद्द होणे अथवा विमानांना विलंब होणे अशा स्थितीत प्रवाशांशी होणाऱ्या संवादांमध्ये सुधारणा करावी आणि ग्राहक सेवा पथके संवेदनशीलतेने कार्य करतील आणि प्रवाशांच्या वाढत्या चिंता अधिक सहानुभूती तसेच स्पष्टतेसह हाताळण्यासाठी सुसज्जित असतील याची सुनिश्चिती करून घ्यावी अशा सूचना एअर इंडियाला देण्यात आल्या आहेत.

 

 

स्पाईस जेट, इंडिगो आणि अकासा या विमान कंपन्यांच्या ज्येष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांसमवेत  देखील18 आणि 19 जून रोजी बैठका घेण्यात आल्या. विमान ताफ्याची कामगिरी, सुरक्षाविषयक निरीक्षण आणि प्रवाशांचे अनुभव तसेच सोयीसुविधा आणि विमान कंपनीचे संपर्क धोरण इत्यादी बाबींचा केंद्रीय मंत्र्यांनी आढावा घेतला.

उत्तम देखरेख आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने विमान कंपन्यांसोबत परिचालनाशी संबंधित मुद्द्यांवर ठराविक काळानंतर आढावा घेण्याची प्रक्रिया संस्थात्मक केली जाईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

विमान अपघात तपास ब्युरोच्या (एएआयबी) तपासाविषयी अद्ययावत माहिती

विमान अपघात तपास ब्युरोने अहमदाबादजवळील एअर इंडियाच्या विमान अपघाताची औपचारिक चौकशी सुरू केली आहे.

  • विमान अपघात तपास ब्युरोच्या बहुआयामी  तज्ज्ञांच्या  पथकाने 12 जून 2025 पासून तपासाला सुरुवात केली आहे.
  • या तपासाचा आदेश एएआयबीच्या महासंचालकांनी जारी केला आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमानवाहतूक संघटना (ICAO) च्या प्रोटोकॉल्स प्रमाणे विमान अपघात तपास संस्थेला तपासात सहाय्य करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ आणि ओ ई एम संस्थेची पथके दाखल झाली आहेत.
  • अपघातस्थळावरून 13 जून 2025 रोजी  डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)  सापडले आणि 16 जून रोजी दुसरा संच सापडला. विमानाच्या या मॉडेलमध्ये दोन ब्लॅकबॉक्स संच आहेत.
  • स्थानिक अधिकारी आणि संस्थांच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने विमान अपघात तपास संस्थेचा तपास जारी  आहे. या मध्ये ठिकाणाचे दस्तऐवजीकरण आणि पुराव्यांचे संकलन  यासह महत्त्वाचे  कार्य पूर्ण झाले आहे आणि आता पुढील विश्लेषण सुरू आहे.
  • सध्या सुरु असलेल्या तपासाबद्दल पूर्ण पारदर्शकता बाळगण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध असून प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीच्या सर्वोच्च मानकांच्या व्यापक हितासाठी सर्व अनिवार्य प्रोटोकॉल आणि निकषांचे पालन करत आहे.
  • प्रवाशांचा विश्वास कायम राखण्यासाठी आणि भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली परिचालन  स्थिरता कायम राखण्याच्या अनुषंगाने एक सुसंगत आणि प्रतिसाद देणारे पथक म्हणून एकत्रित कार्य करण्याच्या महत्त्वावर नायडू यांनी भर दिला.
  • अपघातग्रस्त दुर्दैवी AI171 विमानाचे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) यांना पुढील तपासासाठी आणि विश्लेषणासाठी परदेशात पाठवण्यात येत असल्याचे  वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. सर्व तांत्रिक, सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या बाबींचे योग्य मूल्यांकन केल्यानंतर एएआयबी फ्लाइट रेकॉर्डर्स डीकोड करण्याच्या स्थानाबाबत निर्णय घेणार आहे. अशा संवेदनशील बाबींवर अटकळ आधारित  भाष्य करणे आणि वृत्त देणे संबंधितांनी टाळावे आणि तपास प्रक्रिया गांभीर्य आणि व्यावसायिकतेसह पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने केले आहे.

नागरी विमान वाहतूकीच्या सर्व पैलूंमध्ये सुरक्षेचे सर्वोच्च मानक सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

 

N.Chitale/S.Chitnis/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2137837)