पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, डॉ. पी. के. मिश्र यांनी गुजरातमधील प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला
अहमदाबाद-धोलेरा द्रुतगती मार्ग नियोजित कालमर्यादेत पूर्ण व्हावा यादृष्टीने डॉ. पी. के. मिश्रा यांनी कामाची केली पाहणी केली
धोलेराला जागतिक दर्जाचे स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून विकसित करण्याची गुजरात सरकारची वचनबद्धता डॉ. मिश्रा यांनी पुन्हा केली व्यक्त
डॉ. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या कामाची आढावा बैठक संपन्न
Posted On:
16 JUN 2025 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2025
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के.मिश्रा यांनी आज गुजरातमधील धोलेरा आणि लोथल इथल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची क्षेत्रभेटी देऊन पाहणी केली, त्यासोबतच त्यांनी या प्रकल्पांसंबंधी आिणि उच्चस्तरीय आढावा बैठकाही घेतल्या. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाविषयी मांडलेल्या दृष्टिकोनाशी सुसंगत प्रकल्प आहेत.
क्षेत्रभेटींअंतर्गत डॉ.मिश्रा यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वतीने अंमलात आणल्या जात असलेल्या अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती प्रकल्पाच्या निर्माणाधीन मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या द्रुतगती मार्गाची अहमदाबाद आणि धोलेरा दरम्यानचा प्रवासाचा वेळ 45 मिनिटांपर्यंत कमी करण्याची क्षमता अधोरेखित केली, तसेच या मार्गाचे काम जागतिक दर्जासह, रस्ते मानकांनुसार नियोजित वेळेत पूर्ण केले जावे यावरही त्यांनी भर दिला.
यासोबतच डॉ.मिश्रा यांनी धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रालाही (DSIR)भेट दिली, तिथे त्यांनी धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीचे मूल्यांकन केले. या विमानतळावरून ऑक्टोबर 2025 पासून हवाई मालवाहतुकीला सुरुवात होईल अशी माहिती त्यांना अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना कालमर्यादेचे पालन करण्याचे आणि द्रुतगती मार्गासोबतच्या सुरळीत जोडणीची सुनिश्चिती करण्याचे निर्देश दिले.
डॉ.मिश्रा यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन (Fab) प्रकल्पाचीही पाहणी केली. हा प्रकल्प देशांतर्गत चिप उत्पादन प्रकल्पांमधील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. डॉ. मिश्रा यांनी या प्रकल्पाअंतर्गत मोबाईल उपकरणे, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्वयंचलनाशी संबंधित अॅप्लिकेशन्ससाठी चिप्स उत्पादनाच्या संभाव्य व्याप्तीचा आढावा घेतला. त्यांनी धोलेरा औद्योगिक शहर विकास मर्यादितने (DICDL) विकसित केलेल्या - शाळा, रुग्णालये आणि निवासी संकुले यांसारख्या सामाजिक पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही भेट देऊन त्यांची पाहणी केली. या प्रकल्पांच्या बाबतीत प्रत्यक्ष लाभकर्त्यांना उत्तम अनुभव मिळेल यावर भर देण्याचे तसेच भागधारकांचा प्रतिसादांचे एकात्मिकीकरण करण्याची सूचनाही केली.
यावेळी डॉ.मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली धोलेरा औद्योगिक शहर विकास मर्यादित, धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी लिमिटेड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतची एक उच्चस्तरीय आढावा बैठकही झाली. या बैठकीत डॉ. मिश्रा यांनी अहमदाबाद-धोलेरा द्रुतगती मार्ग, भीमनाथ-धोलेरा मालवाहतूक रेल्वे लिंक, अहमदाबाद-धोलेरा सेमी-हाय-स्पीड रेल्वे मार्गिका, धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी मिश्रा यांनी धोलेराला जागतिक दर्जाचे स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून विकसित करण्याची गुजरात सरकारची वचनबद्धताही पुन्हा एकदा व्यक्त केली. त्यांनी आपल्या सूचना आणि निर्देशांतून प्रकल्पांची कालमर्यादेतील पूर्तता, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि ठोस नियोजनाच्या महत्त्वावर भर दिला.
याचबरोबर डॉ.मिश्रा यांनी राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाचीही (NMHC) पाहणी केली. हे संकुल बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारितील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यावेळी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव, टी. रामचंद्रन यांच्यासह मंत्रालयाचे इतर अधिकारी तसेच गुजरात सागरी मंडळ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आणि भारतीय रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही झाली. राष्ट्रीय सागरी वारसा संकुल हे भारताच्या सागरी इतिहासाचा गौरव करणार ज्ञानसंपन्न संकुल म्हणून कामी यायला हवे अशी सूचना त्यांनी केली. यादृष्टीने तपशीलवार संशोधन, शैक्षणिक सहकार्यपूर्ण भागिदाऱ्या आणि अभ्यागतांना उत्तम अनुभव मिळेल या दृष्टीकोनावर भर देण्याचे महत्त्व त्यांनी भर दिला.
या निमित्ताने मिश्रा यांनी स्थानिक प्रजातींची लागवड तसेच जल व्यवस्थापन प्रणालींसह पर्यावरणीय शाश्वततेसंबंधी राबवल्या जात असलेल्या उपाय योजनांचाही आढावा घेतला. याअनुषंगानेच त्यांनी राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाची असाधारण व्याप्ती आणि महत्त्वही अधोरेखित केले. हडप्पा संस्कृतीपासूनच्या भारताच्या सागरी वारशाची प्रचिती देणाऱ्या कलाकृतींचे जतन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. मिश्रा यांनी सहा गॅलरी अर्थात प्रदर्शन दालनांचा अंतर्भाव असलेल्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचीही पाहणी केली. हे काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी मिश्रा यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी, पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर आणि पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव मंगेश घिल्डियाल देखील उपस्थित होते.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136842)