पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया दौरा (15 ते 19 जून 2025)
Posted On:
14 JUN 2025 7:22PM by PIB Mumbai
सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष महामहीम निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 आणि 16 जून 2025 असे दोन दिवस सायप्रसचा अधिकृत दौरा करणार आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी सायप्रसला दोन दशकांपेक्षा जास्त काळाने दिलेली ही पहिलीच भेट असणार आहे. निकोसिया इथे पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिस्तोदौलिदीस यांच्याशी चर्चा करतील, तर लिमासोल इथे ते उद्योग व्यवसाय क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांना संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीतून दोन्ही देशांची द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची तसेच भूमध्य सागरी प्रदेश आणि युरोपीय महासंघासोबत भारताचे संबंध अधिक मजबूत करण्याप्रतिची परस्परसामायिक वचनबद्धता अधोरेखित होणार आहे.
आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॅनडाचे पंतप्रधान महामहीम मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरुन, G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 16 आणि 17 जून 2025 असे दोन दिवस कॅनडामधील कॅनानास्किसचा दौरा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा G-7 शिखर परिषदेतील हा सलग 6 वा सहभाग असणार आहे. या परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 सदस्य देशांचे नेते, इतर आमंत्रित देशांचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊर्जा क्षेत्राची सांगड आणि क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.
आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहीम आंद्रेज प्लेंकोविच यांच्या निमंत्रणावरुन, 18 जून 2025 रोजी क्रोएशियाला अधिकृत भेट देणार आहेत. भारतीय पंतप्रधानांची क्रोएशियाला दिलेली ही पहिलीच भेट असणार आहे. या भेटीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहेत. आपल्या क्रोएशिया भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्लेंकोविच यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसेच क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम झोरान मिलानोविच यांचीही भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोएशिया दौऱ्यातून भारताची युरोपीय महासंघामधील भागीदार देशांसोबतचे संबंध आणखी मजबूत करण्याची वचनबद्धताही अधोरेखित होणार आहे.
***
S.Patil/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2136432)