पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत भारत मंडपम इथे जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 02 JUN 2025 7:21PM by PIB Mumbai

केंद्रातले माझे सहकारी  राममोहन नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी , आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या  शासक मंडळाचे अध्यक्ष पीटर एल्बर्स जी,  आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे महासंचालक विली  वॉल्श जी, इंडिगोचे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटीया जी, इतर मान्यवर, महिला आणि पुरुषवर्ग,

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या  81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेत आपणा सर्व अतिथींचे मी भारतात स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो. 4 दशकानंतर हा कार्यक्रम भारतात होत आहे. या 4 दशकात भारतात मोठे परिवर्तन झाले आहे. आजचा भारत पूर्वीपेक्षा अनेक पटीने आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. जागतिक हवाई परिसंस्थेत आम्ही केवळ एक मोठी बाजारपेठ नव्हे तर धोरण नेतृत्व, नवोन्मेश आणि समावेशक विकासाचे प्रतीकही आहोत. जागतिक अंतराळ-हवाई वाहतूक  या एकत्रित क्षेत्रात भारत आज  उगवते नेतृत्व आहे. गेल्या एका दशकातली  भारताची  नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातली  झेप सर्व परिचित आहे.

मित्रहो, 

ही परिषद, हा संवाद, हवाई वाहतूक क्षेत्राबरोबरच जागतिक सहकार्य,हवामानविषयक कटीबद्धता आणि न्याय्य विकासाचा  सामायिक  कार्यक्रम पुढे नेण्याचे माध्यमही आहे.  या परिषदेत आपण जी चर्चा करत आहात त्यातून जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राला नवी दिशा मिळेल. या क्षेत्रातल्या अगणित शक्यता शोधून आपण   त्यांचा उत्तम उपयोग करू शकू असा मला विश्वास आहे.

मित्रहो, 

आज आपण शेकडो किलोमीटरचे अंतर, आंतरखंडीय प्रवास केवळ काही तासात पार करतो. मात्र 21 व्या शतकातल्या या जगाची स्वप्ने, आपल्या असीम कल्पनांचा वारू इथवर थांबलेला नाही. आज नवोन्मेष आणि तंत्रज्ञान अद्ययावत होण्याचा वेग पूर्वीच्या तुलनेत प्रचंड आहे. आज आपला वेग जितका वाढला आहे तितकेच दूरदूरची ठिकाणे आपण आपले भवितव्य ठरवली आहेत. आज आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे आपला पर्यटनाचा बेत केवळ देश-विदेशातल्या शहरांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. मानव आज अंतराळ उड्डाणे आणि आंतर ग्रह  प्रवासाचे व्यावसायिकीकरण करण्याची,नागरी हवाई वाहतुकीसाठी ते खुले करण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र यासाठी आणखी काळ जावा लागेल हेही खरे आहे.मात्र येत्या काळात हवाई वाहतूक क्षेत्रात किती मोठे परिवर्तन घडणार आहे आणि हे क्षेत्र नवोन्मेषाचे केंद्र ठरणार आहे हे यातून दिसून येत आहे. भारतातले तीन भक्कम स्तंभ याचा आधार आहेत.पहिला म्हणजे भारताकडे बाजारपेठ आहे,ही बाजारपेठ म्हणजे केवळ ग्राहकांचा समूह नव्हे तर भारताच्या आकांक्षी समाजाचे हे प्रतिबिंब आहे. दुसरा स्तंभ म्हणजे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यासाठी आपल्याकडे लोकसंख्याशास्त्रीय लाभ आणि प्रतिभा आहे,  आपले युवा नव्या काळातले नवोन्मेषक आहेत जे कृत्रिम प्रज्ञा,रोबोटिक्स आणि स्वच्छ उर्जा यासारख्या क्षेत्रात नवनवे उपाय आणि शोध आणत आहेत.तिसरा म्हणजे आमच्याकडे उद्योगांसाठी खुली आणि पोषक धोरण परिसंस्था आहे.या तीन स्तंभांच्या बळावर  आपल्याला भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नव्या शिखरावर न्यायचे आहे.

मित्रहो,

गेल्या काही वर्षांमध्ये भारताने नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन पाहिले आहे.आज भारत जगातली सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ आहे. आपल्या उडान योजनेचे यश म्हणजे भारतीय नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातला सुवर्ण अध्याय आहे. या योजनेअंतर्गत 15 दशलक्षपेक्षा जास्त प्रवाशांना स्वस्त हवाई प्रवासाची सुविधा मिळाली आहे,अनेक नागरिक प्रथमच हवाई प्रवास करू शकले आहेत.आपल्या विमान कंपन्याही सातत्याने दोन अंकी वृद्धी साध्य करत आहेत. भारतीय आणि परदेशी विमान कंपन्या मिळून दर वर्षी 24 कोटी प्रवासी, 240 दशलक्ष प्रवासी आपल्याकडे विमान प्रवास करतात.म्हणजे जगातल्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आणि 2030 पर्यंत ही संख्या 50 कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आज भारतात 3.5 दशलक्ष मेट्रिक टन  मालाची हवाई मार्गे वाहतूक होते, या दशकाअखेरीला  यात वाढ होऊन हा आकडा 10 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत पोहोचणार आहे.

मित्रहो,

ही केवळ आकडेवारी नव्हे तर नव भारताच्या क्षमतेची ही झलक आहे आणि आपल्या या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी भारत भविष्यवेधी आराखड्यावर काम करत आहे. जागतिक तोडीच्या विमानतळ पायाभूत सुविधांमध्ये आम्ही गुंतवणूक करत आहोत. नायडूजी यांनी सांगितल्याप्रमाणे 2014 पर्यंत भारतात 74 विमानतळ कार्यान्वित होते. आता यांच्या संख्येत वाढ होऊन ती 162 झाली आहे. भारतीय कंपन्यांनी 2000 पेक्षा जास्त नव्या विमानांसाठी  ऑर्डर दिली आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. भारताचे नागरी हवाई वाहतूक क्षेत्र लांब पल्ल्याची आणि सर्वात उंच अशी झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहे. ही झेप भौगोलिक सीमा तर पार करेलच त्याचबरोबर जगाला शाश्वतता, हरित मोबिलिटी आणि न्याय्य संधी या दिशेनेही  नेईल.

मित्रहो,

आज आपल्या विमानतळांची क्षमता वर्षाला पाचशे दशलक्ष प्रवासी ये-जा हाताळण्यापर्यंत पोहोचली आहे.तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपयोगकर्त्यांचा अनुभव नव्या स्तरावर पोहोचवणाऱ्या जगातल्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे.

आम्ही सुरक्षितता, कार्यक्षमता आणि शाश्वततेवर तितकेच लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही शाश्वत हवाई इंधनाचे पर्याय वापरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहोत, हवेत सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण (फूटप्रिंट) कमी करत आहोत, आम्ही वसुंधरेची (पर्यावरण) प्रगती आणि सुरक्षितता दोन्ही बाबींची हमी सुनिश्चित करत आहोत.

मित्रांनो,

इथे उपस्थित आमच्या परदेशी पाहुण्यांनी,  डिजी यात्रा अॅपबद्दल नक्की जाणून घ्यावे, अशी मी त्यांना विनंती  करतो…डिजी यात्रा अॅप हे हवाईसेवेच्या डिजिटलीकरणाचे (डिजिटल एव्हिएशन) एक उदाहरण आहे. चेहर्‍याची शहानिशा (फेशियल व्हेरिफिकेशन) तंत्रज्ञानाद्वारे, विमानतळ प्रवेशापासून विमानात चढेपर्यंत अखंड विनाअडथळा प्रवासासाठीचा हा एक रामबाण उपाय आहे. कुठेही कागदपत्रे किंवा ओळखपत्र दाखवण्याची आवश्यकता नाही. मला ठामपणे वाटते की भारताचे हे नवोन्मेष,  इतक्या मोठ्या लोकसंख्येला चांगल्या सेवा देण्याचा अनुभव गाठीशी बांधत, अनेक देशांच्या कामी येऊ   शकतात. हा सुरक्षित आणि प्रगत उपयुक्त पर्यायांचा असा  एक नमुना आहे, जो विकसनशील देशांसाठी (ग्लोबल साऊथ) देखील प्रेरणा  बनू शकतो.

मित्रांनो,

भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रामागील आणखी एक मोठे कारण म्हणजे सातत्यपूर्ण सुधारणा! आम्ही भारताला प्रमुख जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी शक्य ते प्रत्येक पाऊल उचलत आहोत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात, आम्ही मिशन मॅन्युफॅक्चरिंग (विशेष उत्पादन कार्यक्रम) ची घोषणा केली आहे. याच वर्षी, आपण भारताच्या संसदेमध्ये — जसे  नायडूजींनी आत्ताच सांगितले — 'विमानसदृश हवाई वस्तूंबाबत हितसंबंधांचे संरक्षण विधेयक' (Protection of Interest in Aircraft Objects Bill) मंजूर केले आहे. यामुळे केपटाउन कराराला (Cape Town Convention) भारतात कायदेशीर बळ मिळाले आहे. आता विमान भाडे तत्वावर (Aircraft Leasing) देणाऱ्या जागतिक कंपन्यांसाठी भारतात नवीन संधी उघडत आहेत. गिफ्ट सिटीमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतींबद्दलही तुम्हा सर्वांना माहीत आहे. गिफ्ट सिटीमध्ये मिळणाऱ्या प्रोत्साहनपर सवलतींमुळे, विमान भाडेपट्टीच्या व्यवसायासाठी, भारत फायदेशीर आणि आकर्षक ठिकाण ठरला आहे.

मित्रांनो,

नवीन भारतीय विमान कायदा, आपले विमान वाहतूक कायदे जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत बनवत आहे. म्हणजेच, भारतातील विमान वाहतूक क्षेत्राचे कायदे सोपे आहेत, नियमांमध्ये सवलती आहेत आणि कर रचना सोपी आहे. म्हणूनच, जगातील मोठ्या विमान वाहतूक कंपन्यांसाठी भारतात गुंतवणूक करण्याची ही एक नामी संधी आहे.

मित्रांनो,

विमान वाहतूक क्षेत्राची वाढ म्हणजे नवीन उड्डाणे, नवीन नोकऱ्या आणि नवीन संधी! विमान वाहतूक क्षेत्रात वैमानिक, हवाई प्रवासावेळी विमानात कार्यरत कर्मचारी (क्रू), अभियंते, विमानतळावरील कर्मचारी वर्ग (ग्राउंड स्टाफ) साठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. आणखी एक नवीन उदयोन्मुख क्षेत्र उदयास येत आहे…एमआरओ, म्हणजेच देखभाल, दुरुस्ती आणि पुनरावलोकन-नूतनीकरण( मेंटेनन्स, रिपेअर,ओव्हर-हॉल) . आमच्या नवीन एमआरओ धोरणांमुळे भारताला विमान देखभालीचे जागतिक केंद्र बनवण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. 2014 मध्ये, भारतात 96 एमआरओ सुविधा होत्या, आज त्यांची संख्या 154 पर्यंत वाढली आहे. सरकारच्या परवानगीशिवाय शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकी अंतर्गत (100% FDI Under Automatic Route), वस्तू सेवा करा मध्ये कपात, आणि कर रचनेत सुधारणा — अशा उपाययोजनांमुळे MRO क्षेत्राला नवीन ऊर्जा मिळाली आहे. आता आमचे लक्ष्य 2030 पर्यंत भारताला चार अब्ज डॉलर्सचे एमआरओ केंद्र (हब) बनवण्याचे आहे.

मित्रांनो,

जगाने भारताला केवळ विमान वाहतूकीची बाजारपेठ म्हणून नव्हे तर मूल्य-साखळीतील आघाडीचा देश म्हणून पहावे असे आम्हाला वाटते. विमानांच्या रचनेपासून (डिझाईन) ते वितरणापर्यंत, भारत जागतिक विमान वाहतूक पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग बनत आहे. आमची दिशा योग्य आहे, आमचा वेग योग्य आहे, म्हणून आम्हाला खात्री आहे की आम्ही वेगाने पुढे जात राहू. मी सर्व विमान कंपन्यांना मेक इन इंडियासोबत भारतातच विमान आराखडे आणि रचना (डिझाइन इन इंडिया) तयार करण्याचे आवाहन करतो.

मित्रांनो,

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचा आणखी एक भक्कम पैलू म्हणजे त्याचा सर्वसमावेशक  कार्यपद्धतीचा नमुना. आज भारतात 15 % पेक्षा अधिक महिला वैमानिक आहेत. हे प्रमाण जागतिक सरासरीच्या तीन पट जास्त आहे. जगभरात परिचालन कक्षातील कर्मचाऱ्यांमध्ये (केबिन क्रू)  महिलांचे सरासरी प्रमाण सुमारे 70 % आहे, तर आपल्या देशात ते 86 % आहे. भारताच्या MRO क्षेत्रातही महिला अभियंत्यांची संख्या जागतिक सरासरीच्या पुढे जात आहे.

मित्रांनो,

आज, विमान वाहतूक क्षेत्राचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान. भारत, तांत्रिक प्रगतीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे आणि आम्ही ते आर्थिक तसेच सामाजिक समावेशनाचे साधन देखील बनवले आहे. ड्रोनच्या माध्यमातून, आम्ही महिलांच्या स्वयं-सहाय्यता गटांना सक्षम बनवत आहोत. यामुळे शेती, वितरण आणि सेवांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे.

मित्रांनो,

आम्ही नेहमीच विमान वाहतूक क्षेत्राच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. भारताने, आय-काओ (इंटरनॅशनल सिव्हील एव्हिएशन ऑर्गनायझेशन-ICAO) या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या जागतिक मानकांशी आपले नियम सुसंगत बनवले आहेत. अलीकडेच, आय-काओच्या सुरक्षा लेखापरीक्षणाने आमच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेत दिल्ली घोषणापत्र स्वीकारले जाणे हे भारताच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. भारत नेहमीच, हवाई प्रवासासाठी आकाश सर्वांना खुले (ओपन स्काय) आणि हवाई संपर्क व्यवस्था (ग्लोबल कनेक्टिव्हिटी) या तत्वांचा  समर्थक म्हणून उभा ठाकला आहे. आम्ही शिकागो करारातील कलमांना पाठिंबा देतो. चला आपण एकत्रितपणे असे भविष्य घडवूया जिथे हवाई प्रवास सर्वांसाठी उपलब्ध, परवडणारा आणि सुरक्षित असेल. मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण विमान वाहतूक क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी नवीन पर्याय शोधू शकाल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो.

खूप खूप आभार!

***

ShaileshP/NilimaC/AshutoshS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2133499) Visitor Counter : 2