पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील कराकत येथे 48,520 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
पाकिस्तानात बसून आमच्या भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांचे तळ आपल्या सैन्यानं उद्ध्वस्त केले : पंतप्रधान
भारताच्या लेकींच्या कुंकवाची ताकद पाकिस्तानबरोबरच जगानेही आता पाहिली !: पंतप्रधान
माओवादी हिंसाचाराचा पूर्णपणे अंत होईल तो दिवस आता फार दूर नाही, प्रत्येक गावात आता विनाअडथळा शांतता, सुरक्षा, शिक्षण आणि विकास पोहोचू शकेल: पंतप्रधान
पाटणा विमानतळाच्या टर्मिनल्सच्या आधुनिकीकरणाची बिहारच्या जनतेची दीर्घकाळापासूनची मागणी आता पूर्ण झाली : पंतप्रधान
आमच्या सरकारने मखाणा बोर्डाच्या स्थापनेची घोषणा केली, बिहारच्या मखाण्याला भौगोलिक नामांकन दिले , याचा मखाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ : पंतप्रधान
Posted On:
30 MAY 2025 1:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 30 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील कराकत येथे 48,520 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेकविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. यावेळी झालेल्या सभेला संबोधित करताना, या पवित्र भूमीवर बिहारच्या विकासाला गती देण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याचे म्हणत त्यांनी 48,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होत असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असल्याचे म्हणत बिहारच्या जनतेने दाखविलेली आपुलकी आणि प्रेमाबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांचा पाठिंबा आपल्यासाठी कायमच शिरोधार्य असल्याचे नमूद केले. त्यांनी बिहारच्या माता-भगिनींचेही मनापासून कौतुक केले.
सासारामचे महत्त्व विशद करताना त्यांनी या नावातच प्रभू रामाचा वारसा असल्याचे स्पष्ट केले. मोदींनी प्रभू रामांशी निगडित खोलवर रुजलेल्या परंपरा अधोरेखित करत- दिलेले वचन पूर्ण करण्याबद्दल अढळ बांधिलकीच्या तत्त्वावर भर दिला . हे मार्गदर्शक तत्त्वज्ञान आता नव भारताचे धोरण बनले आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ज्यामध्ये अनेक निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले, त्या नुकत्याच झालेल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचीही मोदींनी आठवण करून दिली. या निर्घृण हल्ल्याच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशीच्या आपल्या बिहार भेटीत आपण दहशतवादाच्या सूत्रधारांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवून न्याय मिळवून दिला जाईल असे देशवासीयांना वचन दिले होते, याचीही आठवण करून दिली. आज पुन्हा बिहारमध्ये येताना मी माझे वचन पूर्ण केले आहे असे ते म्हणाले. "ज्यांनी पाकिस्तानात बसून आमच्या बहिणींचे कुंकू पुसले, त्यांच्या लपण्याच्या जागा आपल्या सैन्य दलांनी जमीनदोस्त केल्या", असे मोदी म्हणाले.. "भारताच्या लेकींच्या कुंकवाची ताकद पाकिस्तानने तसेच जगाने देखील पाहिली आहे," असे सांगून ते पुढे म्हणाले की, एकेकाळी पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणाखाली ज्या दहशतवाद्यांना सुरक्षित वाटत होते, त्यांना भारताच्या सैन्याने केलेल्या एकाच निर्णायक कारवाईत गुडघे टेकण्यास भाग पडले. पाकिस्तानचे हवाई तळ आणि लष्करी आस्थापने काही मिनिटांतच उद्ध्वस्त झाल्याचे अधोरेखित करून,"हा आजचा प्रचंड ताकद आणि कणखरता असलेला नवा भारत" असल्याचे पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
बिहार ही वीर कुंवर सिंग यांची भूमी आहे,जे शौर्यासाठी ओळखले जातात हे अधोरेखित करत,सशस्त्र दल आणि सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) देशाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या बिहारमधील हजारो तरुणांच्या योगदानावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान बीएसएफने दाखवलेल्या असाधारण शौर्य आणि दुर्दम्य साहसावर त्यांनी भर देत सांगितले, की संपूर्ण जगाने त्यांचे अतुलनीय शौर्य पाहिले आहे. भारताच्या सीमेवर तैनात असलेले बीएसएफ कर्मचारी सुरक्षेची अभेद्य ढाल आहेत, ज्यांचे सर्वोच्च कर्तव्य भारतमातेचे रक्षण करणे हे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले. त्यांनी 10 मे रोजी सीमेवर कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या बीएसएफचे उपनिरीक्षक इम्तियाज यांना श्रद्धांजली वाहिली, आणि या बिहारच्या शूर सुपुत्राबद्दल आदर व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने दाखवलेले सामर्थ्य त्याच्या भात्यातील केवळ एक बाण होता या आपल्या वक्तव्याचा पंतप्रधानांनी बिहारमधे पुनरुच्चार केला.
"भारताची लढाई देशाच्या प्रत्येक शत्रूविरुद्ध आहे, मग ते सीमेपलीकडे असोत किंवा देशाच्या अंतर्गत भागात असोत", असे प्रतिपादन मोदी यांनी केले. बिहारने गेल्या काही वर्षांत हिंसक आणि विध्वंसक शक्तींचा बिमोड केला आहे हे अधोरेखित करत, सासाराम, कैमूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील पूर्वीच्या परिस्थितीची आठवण करून दिली. त्यांनी अधोरेखित केले की नक्षलवादाने एकेकाळी या प्रदेशावर वर्चस्व कसे ठेवले होते आणि बंदुकांनी सज्ज असलेल्या मुखवटा घातलेल्या अतिरेक्यांचा लोकांना सतत धोका असे. सरकारी योजना जाहीर केल्या जात असतानाही, त्या नक्षलग्रस्त गावांमध्ये, लोकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत असत,तिथे रुग्णालये किंवा मोबाईल टॉवर नव्हते आणि शाळा जाळल्या जात होत्या,असे मोदी पुढे म्हणाले.रस्ते बांधकाम कामगारांना वारंवार लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात होती. या घटकांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशी आव्हानात्मक परिस्थिती समोर असूनही, नितीश कुमार यांनी विकासाच्या दिशेने काम केले, असे मोदी यांनी नमूद केले. 2014 पासून या दिशेने प्रयत्नांना लक्षणीय गती मिळाली आहे यावर त्यांनी भर दिला. नक्षलवाद्यांना त्यांच्या कृत्यांसाठी कायद्याने शिक्षा झाली आणि तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले, असे मोदींनी अधोरेखित केले. 11 वर्षांच्या दृढनिश्चयी प्रयत्नांचे परीणाम आता दिसत आहेत. 2014 पूर्वी भारतातील 125 हून अधिक जिल्हे नक्षलवाद ग्रस्त होते, परंतु आज फक्त 18 जिल्हे नक्षलवादाने बाधित आहेत, असे ते म्हणाले. “आपले सरकार केवळ रस्तेच बांधत नाही तर रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देत आहे, ज्या दिवशी नक्षली हिंसाचार पूर्णपणे नष्ट होऊन, गावागावांमध्ये अखंड शांतता, सुरक्षा, शिक्षण आणि विकास सुनिश्चित होईल,तो दिवस आता दूर नाही”,असा विश्वास मोदी यांनी प्रकट केला. दहशतवादाविरुद्ध भारताचा लढा थांबलेला नाही किंवा मंदावलेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “जर दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले तर भारत त्याला त्याच्या बिळातून खेचून बाहेर काढेल आणि निर्णायकपणे चिरडून टाकेल” असे त्यांनी जाहीर केले.
सुरक्षा आणि शांतता विकासाच्या नवीन मार्गांना सुकर करते यावर भर देऊन, बिहारमध्ये 'जंगल राज' जाऊन नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारची समृद्धीच्या मार्गावर प्रगती झाली, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले. त्यांनी असे म्हटले की महामार्गांची दुरवस्था, खराब झालेल्या रेल्वेगाड्या आणि मर्यादित विमान वाहतूक आता भूतकाळातील गोष्टी आहेत. बिहारमध्ये एकेकाळी फक्त एकच विमानतळ होते - पटना - परंतु आज दरभंगा विमानतळ कार्यरत आहे, जेथे दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांना थेट उड्डाणे होतात हे लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी पाटणा विमानतळाच्या टर्मिनलच्या आधुनिकीकरणाची बिहारच्या लोकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता झाली आहे असे सांगितले. काल संध्याकाळी पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करण्याचा बहुमान त्यांना मिळाला, जो आता एक कोटी प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. बिहटा विमानतळावर 1400 कोटी रुपये गुंतवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिहारमधील चार पदरी आणि सहा पदरी रस्त्यांचा व्यापक विकास अधोरेखित करत मोदी यांनी पाटणा ते बक्सर, गया ते दोभी आणि पाटणा ते बोधगया यांना जोडणाऱ्या महामार्गांसह प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील जलद प्रगतीवर भर दिला. पाटणा-आरा-सासाराम हरित क्षेत्र पट्टा तयार करण्याचा त्यांनी उल्लेख केला, जिथे काम जलद गतीने सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी गंगा, सोननद, गंडक आणि कोसी यासारख्या प्रमुख नद्यांवरील नवीन पुलांच्या बांधकामाचा उल्लेख केला आणि बिहारसाठी नवीन संधी आणि शक्यता निर्माण करण्यामधील त्यांची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की, हजारो कोटी रुपयांचे हे प्रकल्प हजारो युवकांसाठी रोजगार निर्माण करत आहेत आणि या प्रदेशात पर्यटन आणि व्यापार दोन्हीला चालना देत आहेत.
बिहारच्या रेल्वे पायाभूत सुविधांमधील परिवर्तनाचा उल्लेख करताना, मोदी यांनी बिहारमध्ये जागतिक दर्जाच्या वंदे भारत गाड्यांचा प्रारंभ आणि रेल्वे मार्गाचे दोन पदरीकरण आणि तीन पदरीकरण करण्याचे काम सुरु असल्याचे अधोरेखित केले. छपरा, मुझफ्फरपूर आणि कटिहार सारख्या भागात काम वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की सोन नगर आणि अंदल दरम्यान मल्टी-ट्रॅकिंग काम सुरू आहे, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल. 100 हून अधिक गाड्या आता सासाराम येथे थांबतील असे मोदी यांनी जाहीर केले , यावरून या प्रदेशामध्ये वाढलेले दळणवळण, संपर्क व्यवस्था दिसून येते. दीर्घकालीन आव्हानांवर तोडगा काढला जात असून रेल्वे जाळ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ही विकासकामे याआधीच झाली असती, परंतु बिहारच्या रेल्वे प्रणालीचे आधुनिकीकरण करणाऱ्यांनी वैयक्तिक लाभासाठी भरती प्रक्रियेचा गैरफायदा घेतला आणि लोकांना त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून वंचित ठेवले यावर पंतप्रधानांनी भर दिला. यापूर्वी 'जंगल राज' अंतर्गत राज्य करणाऱ्यांच्या फसवणुकीपासून आणि खोट्या आश्वासनांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी बिहारच्या लोकांना केले. वीजेशिवाय विकास अपूर्ण आहे हे अधोरेखित करून, औद्योगिक प्रगती आणि सुखकर जीवन विश्वसनीय वीज पुरवठ्यावर अवलंबून आहे असे सांगत , पंतप्रधानांनी नमूद केले की बिहारने गेल्या काही वर्षांमध्ये वीज निर्मितीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. बिहारमध्ये वीजेचा वापर दशकापूर्वीच्या तुलनेत चार पटीने वाढला आहे असे ते म्हणाले. नबीनगरमध्ये 30,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एनटीपीसीच्या एका मोठ्या वीज प्रकल्पाचे काम सुरु आहे आणि या प्रकल्पामुळे बिहारला 1,500 मेगावॅट वीज मिळेल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली . त्यांनी बक्सर आणि पीरपैंती येथे नवीन औष्णिक वीज प्रकल्प सुरू होत असल्याचेही अधोरेखित केले.
भविष्यावर, विशेषतः बिहारला हरित ऊर्जेकडे नेण्यावर सरकारचा भर असल्याचे अधोरेखित करताना, मोदी यांनी राज्याच्या नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांचा एक भाग म्हणून काजरा येथे सौर पार्क उभारले जात असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले की पीएम-कुसुम योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे उत्पन्न मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, तर नवीकरणीय उर्जेवरील कृषी फीडर शेतांना वीज पुरवत आहेत, ज्यामुळे कृषी उत्पादकता आणखी सुधारत आहे. या प्रयत्नांमुळे लोकांचे जीवन सुधारले आहे आणि महिलांना सुरक्षित वाटत आहे असे त्यांनी सांगितले .
आधुनिक पायाभूत सुविधांचा सर्वाधिक फायदा गावे, गरीब, शेतकरी आणि छोट्या उद्योगांना होतो, कारण ते मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडले जाऊ शकतात यावर मोदी यांनी भर दिला. राज्यातली नवीन गुंतवणूक नेहमीच नवीन संधी निर्माण करते आणि आर्थिक विकासाला चालना देते यावर त्यांनी भर दिला. गेल्या वर्षी झालेल्या बिहार व्यापार शिखर परिषदेची आठवण त्यांनी करून दिली, ज्यामध्ये राज्यात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या संख्येने कंपन्या पुढे आल्या होत्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्यातील औद्योगिक वाढीमुळे कामगारांचे स्थलांतर कमी होते, परिणामी लोकांना घराजवळ रोजगार मिळतो. सुधारित वाहतूक सुविधांमुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दूरच्या अंतरावर विकता येते, ज्यामुळे कृषी क्षेत्राला बळ मिळते असे त्यांनी नमूद केले.
बिहारमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेले निरंतर प्रयत्न अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, बिहारमधील 75 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळत आहे. मखाणा बोर्डाच्या स्थापनेची त्यांनी घोषणा केली, बिहारच्या मखाण्याला जीआय टॅग देण्यात आला आहे, ज्यामुळे मखाणा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी पुढे नमूद केले की, या वर्षीच्या अर्थसंकल्पात बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न प्रक्रिया संस्थेची घोषणा करण्यात आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले की, दोन - तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी भातासह 14 पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळेल आणि उत्पन्न वाढेल असे त्यांनी सांगितले.
ज्यांनी बिहारची सर्वात जास्त फसवणूक केली ते आता पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सामाजिक न्यायाच्या भाकडकथांचा वापर करत आहेत अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांबाबत केली. विरोधक सत्तेत असताना, बिहारमधील गरीब आणि उपेक्षित समुदायांना चांगल्या राहणीमानाच्या शोधात राज्य सोडावे लागल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या समुदायांना बँकिंग सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले होते, अनेकदा बँकांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता आणि ते मोठ्या प्रमाणात बेघर राहिले होते, लाखो लोक योग्य निवाऱ्याशिवाय राहत होते यावर भर देत "अनेक दशकांपासून, बिहारमधील दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी समुदायांकडे मूलभूत स्वच्छता सुविधांचाही अभाव होता", असे पंतप्रधानांनी नमूद केले. मागील सरकारांच्या काळात बिहारच्या लोकांनी सहन केलेले दुःख, त्रास आणि अन्याय विरोधी पक्षांनी दिलेल्या सामाजिक न्यायाचे आश्वासन आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापेक्षा मोठा अन्याय असू शकत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. विरोधी पक्षांनी दलित आणि मागास समुदायांच्या संघर्षांची कधीही खऱ्या अर्थाने पर्वा केली नाही अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. बिहारच्या विकासासाठी काम करण्याऐवजी त्याची गरिबी दाखवण्यासाठी परदेशी शिष्टमंडळे आणल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधी पक्षाच्या चुकांमुळे आता दलित, उपेक्षित गट आणि मागासवर्गीयांनी त्यांच्यापासून फारकत घेतल्याने, सामाजिक न्यायाचे आवाहन करून हे पक्ष आपली ओळख परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
आपल्या सरकारच्या काळात, बिहार आणि देशाने सामाजिक न्यायाची नवी पहाट पाहिली आहे यावर भर देत, गरिबांसाठी आवश्यक सेवांची उपलब्धता सुनिश्चित करून पात्र 100% लाभार्थ्यांपर्यंत हे फायदे पोहोचवण्यासाठी सरकार काम करत असल्याचे मोदींनी निदर्शनास आणले. चार कोटी नवीन घरे बांधण्यात आली आहेत आणि 'लखपती दीदी' उपक्रमाद्वारे तीन कोटी महिलांना सक्षम केले जात आहे असे त्यांनी नमूद केले. देशभरात आता 12 कोटींहून अधिक घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने त्यांचे जीवनमान सुधारत आहे असेही त्यांनी सांगितले. 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध नागरिकाला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार सुनिश्चित करण्यात येत आहेत. गरजूंना मदत करण्यासाठी दरमहा मोफत अन्नधान्य दिले जात आहे यावर मोदींनी प्रकाश टाकला. "आमचे सरकार प्रत्येक गरीब आणि वंचित व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यांचे कल्याण आणि उन्नती याची खातरजमा करत आहे", याकडे मोदींनी लक्ष वेधले.
कोणतेही गाव किंवा पात्र कुटुंब कल्याणकारी उपक्रमांपासून वंचित राहू नये यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करत या दृष्टिकोनासह बिहारने डॉ. भीमराव आंबेडकर समग्र सेवा अभियान सुरू केल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. या मोहिमेअंतर्गत, सरकार एकाच वेळी 22 आवश्यक योजनांसह गावे आणि समुदायांपर्यंत पोहोचत आहे आणि दलित, महादलित, मागासवर्गीय आणि गरिबांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की आतापर्यंत 30,000 हून अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत आणि लाखो लोक या मोहिमेशी जोडले गेले आहेत. जेव्हा सरकार थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते तेव्हा भेदभाव आणि भ्रष्टाचार दूर होतो आणि हेच सामाजिक न्यायाचे खरे मूर्त स्वरूप आहे असे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्पूरी ठाकूर, बाबू जगजीवन राम आणि जयप्रकाश नारायण यांच्या संकल्पनेतील बिहार साकारण्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना,मोदी म्हणाले की अंतिम ध्येय विकसित बिहार आहे, जे विकसित भारतासाठी योगदान देईल.त्यांनी नमूद केले की जेव्हा जेव्हा बिहारने प्रगती केली आहे तेव्हा भारताने जागतिक स्तरावर नवीन उंची गाठली आहे. सर्वजण मिळून विकासाची गती वाढवतील असा विश्वास व्यक्त करत या विकासात्मक उपक्रमांसाठी जनतेचे अभिनंदन करून त्यांनी भाषणाचा समारोप केला.
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री जीतन राम मांजी, गिरीराज सिंह, राजीव रंजन सिंह, चिराग पासवान, नित्यानंद राय, सतीश चंद्र दुबे, डॉ. राजभूषण चौधरी आदि मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.
पार्श्वभूमी
या प्रदेशातील उर्जा पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या अनुषंगाने, पंतप्रधानांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यात 29,930 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या नबीनगर सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या, दुसऱ्या टप्प्याची (3x800 MW) पायाभरणी करण्यात आली. बिहार आणि पूर्व भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असेल. यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच रोजगार निर्मिती होईल तसेच प्रदेशात परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध होईल.
प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधा आणि दळणवळण सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या, NH-119A च्या पाटणा-अर्रा-सासाराम विभागाच्या चौपदरीकरणाच्या तसेच वाराणसी-रांची-कोलकाता महामार्गाच्या(NH-319B) आणि रामनगर- कच्छी दर्गा (NH-119D) खंडाच्या सहापदरीकरणाच्या कामांसह., बक्सर आणि भरौली दरम्यानचा नवीन गंगा पूल अशा अनेक रस्ते प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे व्यापार आणि प्रादेशिक दळण-वळण संपर्कात वाढ होण्याबरोबरच राज्यात सुरळित वाहतुकीसाठी हाय-स्पीड कॉरिडॉर तयार होईल. त्यांच्या हस्ते NH – 22 वरील सुमारे 5,520 कोटी रुपये खर्चाच्या पाटणा – गया – डोभी विभागाच्या चौपदरीकरणाचे तसेच उन्नत द्रुतगती मार्गाच्या चौपदरीकरणाचे आणि NH – 27 वरील गोपालगंज टाउन येथील दर्जा सुधारणांचेही उद्घाटन करण्यात आले.
देशभरातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधानांनी सोन नगर - मोहम्मद गंज दरम्यानच्या 1330 कोटी रुपयांहून जास्त किमतीचा तिसऱ्या रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित केला.
***
N.Chitale/S.Bedekar/M.Ganoo//S.Patgoankar/s.Kane/V.Joshi/P.Kor
(Release ID: 2132749)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam